प्रमोद माने : पत्रकारितेतली धाकटी लाघवी पाती…      

                                                                                                                                                                                पत्रकार प्रमोद माने याच्याविषयी  समाज माध्यामावर  अनेकजन लिहित आहेत आणि ते वाचताना प्रमोदच्या मृत्यूचं सावट अधिकाधिक गडद होत आहे . प्रमोदबद्दलच्या माझ्या आठवणी जरा वेगळ्या आहेत .

‘लोकसत्ता’साठी नागपूर आणि मुंबईत पत्रकारिता करत असताना माझ्याकडे मराठवाडा हे बीट कायमच असायचं . औरंगाबादला चक्कर झाली की निशिकांत भालेराव आणि अन्य मित्रांची भेट घेण्यासाठी दैनिक ‘मराठवाडा’त एक तरी चक्कर व्हायचीच कारण ‘मराठवाडा’ दैनिकांचं कार्यालय पत्रकारांच्या आमच्या पिढीसाठी पंढरपूर .
अशाच एका औरंगाबाद चकरेत ‘मराठवाडा’ कार्यालयात प्रमोद मानेची भेट झाली . माझ्यापेक्षा वयानं लहान असणारा , गव्हाळ वर्णाचा , मध्यम उंची आणि त्यामुळे कांहीसा स्थूल भासणारा , तरतरीत असणारा तो क्रीडा वार्ताहर होता . तर आम्ही पडलो राजकीय वृत्तसंकलनाच्या वारीतले वारकरी . त्यामुळे प्रमोदशी फार घसट वाढली नाही तरी तो नियमित भेटत असे . ‘ख्याली-खुशाली’ची देवाण घेवाण होत असे , बस्स इतकंच .
‘लोकसत्ता’चा  मराठवाड्यात विस्तार करण्याचं ठरलं . बाकी म्हणजे वितरण , जाहिरात वगैरेसाठी लोक होते पण , मराठवाड्यात संपादकीय रचना  फारच कमकुवत होती . मुंबईतून माझी बदली औरंगाबाद कार्यालयात संपादकीय विभाग प्रमुख (ब्युरो चीफ) म्हणून झाली . सुरुवातीच्या त्या  काळात इतर कुणापेक्षा जयदेव डोळे आणि प्रमोद माने यांच्या आमच्या गुलमंडीवरील  कार्यालयात जास्त नियमित भेटी होत . याच दरम्यान एक्सप्रेस वृत्तपत्र समूहानं ‘तारा’ नावाची प्रकाश वृत्त वाहिनी ( न्यूज चॅनेल ) सुरु केली . मराठीतला तो पहिलाच प्रयोग होता आणि तो फसला . असे ‘प्रयोग’ ही या वृत्तपत्र समूहाची खासीयत उदाहरणार्थ ; अंकांची किंमत १ रुपया , मनोरंजनपर स्वतंत्र पुरवणी आणि त्यात पानभर एखाद्या नटीचं आकर्षक  रंगीत छायाचित्र , वितरण वाढावं यासाठी वस्तू भेट म्हणून देणारे विशिष्ट पॅकेज ( यात विदर्भात आम्ही तेव्हा ‘निर्लेप’चे तवे भेट म्हणून दिले होते ! ) असे ‘उपक्रम’ सुरु होत आणि ते ( अकाली)  बंद  पडत , पण ते असो .
‘तारा’ वाहिनीत ‘लोकसत्ता’तले बहुसंख्य पत्रकार  तात्पुरती सोय म्हणून घेण्यात आले ; त्याला प्रमोद माने अपवाद होता . तो ‘मराठवाडा’ या दैनिकातून आलेला होता . क्रीडा हे त्याचं कार्यक्षेत्र ‘तारा’त विस्तारलं . ‘तारा’ची मंडळी फारच ‘टेचात’ असत . अगदी गावातल्या गावातही फिरायला कायम टॅक्सी , राह्यला-खायला चांगलंच हॉटेल आणि सोबत कॅमेरासह भाड्यानं घेतलेला केलेला कॅमेरामन . बाय द वे , प्रमोदला तेव्हा जवळजवळ माझ्या एवढाच पगार होता . सुरुवात चांगली झाली आणि हळूहळू ‘तारा’ वाहिनी डब्यात जायला सुरुवात झाली . टॅक्सी , हॉटेल्स , कॅमेरामन यांची देणी थकली . ते लोक ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद कार्यालयात घेणी वसूल करण्यासाठी चकरा मारु लागली . त्यांना सामोरं जाताना प्रमोद अतिशय शांतपणे वागायचा . अखेर एक दिवस ‘तारा’ पूर्णपणे मावळला . मूळचे ‘लोकसत्ता’चे पत्रकार पुन्हा ‘लोकसत्ता’त परतले . प्रमोद मात्र निराधार झाला . उदास चेहेरा करुन कार्यालयात बसत असे .
त्या काळातला एक अनुभव सांगायला हवा . ‘तारा’ प्रतिनिधी  म्हणून प्रमोद रुजू झाला आणि आमच्याच सोबत बसू लागला . समाजवादी वर्तुळात वावरल्यानं सर्वांना ‘अरे-तुरे’ करायची सवय त्याला लागलेली असावी . मलाही तो ‘अरे-तुरे’ करु लागला . आमच्या कार्यालयातल्या सर्वांना ते फार खटकत असे . मी त्याला समज द्यावी असं तत्कालीन व्यवस्थापक मुकुंद कानिटकर यांच्यासह कांहीनी सुचवलं पण , मी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं . विशेषत: राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर काम करण्यासाठी  प्रमोदला माझी मदत कायमच लागे आणि ती मी तत्परतेनं करत असे . हळूहळू माझं पद , आवका आणि ज्येष्ठत्व प्रमोदला समजत गेलं . कुणीही कांहीही न सांगता  तोच मग मला ‘अहो-जाहो’ करु लागला . प्रमोदचं हे असं ‘नॉनबायस्ड  कन्फर्मेशनल’ ( यासाठी मराठी  शब्दप्रयोग  सुचत नाहीये , सॉरी ) असणं मला फार आवडलं . मग लक्षात आलं , प्रमोदचा स्वभावच तसा आहे . म्हणूनच प्रमोदला ठोस अशी कोणती भूमिका नाही . जे समोर जसं येईल , त्याला तसं भिडावं अशी त्यांची वृत्ती आहे . मग आमच्या तारा चांगल्याच जुळल्या.  .
‘तारा’ डब्यात जाण्याच्या दरम्यान ‘लोकसत्ता’चा मराठवाड्यातला विस्तारचा प्लान तयार झालेला होता . माझ्या आणि कानिटकरच्या कामाचा व्याप वाढला होता ; बरीच  धावपळ होत होती . म्हणून  मला एका सहाय्यकाची गरज होती . तो शोध सुरु होता . प्रमोदच्या दररोज भेटी होतं . त्यांची अव्यक्त असहाय्यता काळजाला पीळ पाडे . मग त्याचं नाव मी आमचे तत्कालीन संपादक अरुण टिकेकर यांना सुचवलं . त्यांनी रितसर प्रस्ताव पाठवायला सांगितला  . तो प्रस्ताव मंजूर झाला आणि प्रमोद माझ्या टीममधे ‘लोकसत्ता’त रुजू झाला . त्या दिवशीचं त्याचं  कृतज्ञतेनं गहिवरलेपण आजही आठवतं . प्रमोदकडे उच्च न्यायालय बीट सोपवून मी मोकळा झालो .

सुरुवातीला त्याची प्रत्येक  बातमी मी बारकाईनं बघत असे , त्याला चुका सांगत असे . एकदा केलेली चूक पुन्हा न करण्याची त्याची सवय दाद देण्यासारखी होती . थोडक्यात तो सुधारणावादी होता ; पत्रकारितेत असे सहकारी कमी असतात असा माझा अनुभव आहे .  त्याची ‘कॉपी’ तयार व्हायला फार वेळ लागला नाही . हळूहळू अन्य बीटच्याही बातम्या मी त्याच्याकडे सोपवायला लागलो ; सोबत त्याला घेऊन राजकीय आणि अन्य सर्वच क्षेत्रात वावरु  लागलो .
त्या काळात लक्षात आलेली आणखी बाब म्हणजे प्रमोद पूर्ण निर्व्यसनी होता . माझे निकटचे मित्र असलेल्या सनदी अधिकारी , मंत्री यांच्यासोबतच्या सोनेरी पाण्यानं मंतरलेल्या रात्रकालीन असंख्य पार्ट्यात माझ्या सोबत वावरुनही त्याला कधी सुपारीच्या खांडाचं व्यसन लागलं नाही . उलट अशा ठिकाणी माझ्यासोबत सहभागी होऊन त्यानं त्याचा लोकसंग्रह व्यापक केला . या पार्ट्यात झालेल्या कोणत्याही चर्चेची त्यानं बाहेर कधीच वाच्यता केल्याचं कधीच कानावरही आलं   नाही , हाही त्याचा गुण वाखाणण्यासारखा होता . बातमीतर लेखन करण्यापेक्षा ‘न्यूज मॅनेजमेंट’ ही त्यांची खासीयत असल्याचंही याच काळात लक्षात आलं . याबाबतीत तो ‘छोटा दिनकर रायकर’ होता आणि याच गुणांमुळे पुढे माझी बदली नागपूरला झाल्यावर औरंगाबादच्या संपादकीय विभागाची सूत्रे त्याच्याकडे सोपवण्याचा निर्णय तत्कालीन संपादक कुमार केतकर यांनी घेतला . तो निर्णय प्रमोदनं पूर्ण सार्थ ठरवला , हेही सांगायला हवं .याच गुणमुळे पुढे महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाच्या औरंगाबाद  आवृत्तीचा संपादकीय प्रमुख झाला .
‘न्यूज मॅनेजमेंट’मध्ये प्रमोद माने पारंगत झाला कारण बातमीतर लेखन करण्याची क्षमता आपल्यात नाही हे समजून उमजून घेण्याचा विलक्षण समजूतदारपणा त्यांच्यात होता . त्यामुळे त्याच्यात एक आपसूक लाघवीपणा आलेला होता आणि कोणाकडून कोणतं काम कसं मुदतीच्या आत करुवून घ्यावं , हे त्याला चांगलं अवगत झालेलं होतं . स्वत:तलं अधिक-ऊणं ओळखण्याची  ही समजच औरंगाबादच्या पत्रकारीतेतील त्याचं स्थान बळकट करणारी ठरली , यात  कोणतीही शंका नाही . आणखी एक म्हणजे , प्रमोदच्या या गुणाला सालसपणाची जोड होती . सहकाऱ्यांच्या अडचणीच्या वेळी हाक न मारताही प्रमोद हजर होत असे आणि शांतपणे ती परिस्थिती हाताळण्यासाठी मदत करत असे , हे मी अनेकदा अनुभवलं आहे .
अधिक-ऊणं ओळखून कोणताही आव न आणता शांतपणे पत्रकारिता करणारा ,  धाकटी पाती असणारा प्रमोद माने याच्यासारखा लाघवी  सहकारी दुर्मीळ असतो . वयानं लहान असणारे असे सहकारी गळून पडतात तेव्हा उदासीचं सावट आणखी गहिरं होतं…

प्रवीण बर्दापूरकर   

Cellphone  +919822055799

praveen.bardapurkar@gmail.com

praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट