सुरुवात आणि पूर्णविरामही, सहजच!
(‘स्मिता स्मृती’च्या २०१६च्या अंकासाठी मंगलाने लिहिलेला हा लेख आहे. जवळ जवळ सातवर्षानी काही तरी लेखन मंगला केलं!)
आमची बदली १९९८साली औरंगाबादला होईपर्यंत म्हणजे; जन्म ते वयाची पंचेचाळीशी पार करेपर्यंत मी पक्की नागपूरकर. धंतोलीतून वसंत नगर हेच काय ते या पंचेचाळीस वर्षातलं स्थलांतर. घरात आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ. वडील इंडियन एअर लाईन्समध्ये तर आई शिक्षिका. त्यामुळे खाऊन-पिऊन सुखी आयुष्य. घरातलं वातावरण वाचनपोषक. मी मराठीत एम.ए. करून पी.एचडी.ची तयारी करत असताना अचानक वडील वारले आणि आम्ही सैरभैर झालो. त्यातच भर पडली आणखी संकटांची. वडील त्यांच्या काही मित्रांच्या कर्जांना जामीनदार होते. ती कर्जे वसूल करण्यासाठी रेटा लागला आणि आम्ही गांजून गेलो, मेटाकुटीला आलो. विलक्षण तणावाच्या त्या दिवसात नागपूर टाईम्स आणि नागपूर पत्रिका प्रकाशित करणाऱ्या नवसमाज लिमिटेडमध्ये मोठ्या पदावर काम करणारे एम जी सराफ यांची भेट झाली. ते वडिलांचे मित्र. परिस्थिती लक्षात आल्यावर त्यांनी मला कार्यालयात बोलवलं. नागपूर पत्रिकेला इंग्रजी मजकूर मराठीत भाषांतरीत करण्यासाठी माणूस हवा होता. भेटायला गेल्यावर सराफ साहेबांनी भाषांतरासाठी इंग्रजीतला एक लेख दिला. तो लेख मी न अडखळता, लग्गेच भाषांतरीत करून दिला. मग, माझी अनंत गोपाळ शेवडे आणि यमुनाताई शेवडे यांच्यासमोर पेशी झाली. तेही भाषांतरावर जाम खूष झाले. पण, पूर्णवेळ भाषांतरकार नेमण्याइतका स्कोप नव्हता. मग माझी नड सराफसाहेबांनी सांगितली. शिक्षण, कविवर्य ग्रेसची विद्यार्थीनी असणं, पी.एचडी.ची तयारी वगैरे कळल्यावर भाषांतराचं काम संपल्यावर मी नागपूर पत्रिकेच्या रविवार पुरवणीच्या कामात यमुनाताई शेवडे यांना मदत करावी असं ठरलं. माझी बसण्याची व्यवस्थाही संपादकीय विभागातच करण्यात आली. पत्रकारितेत माझा प्रवेश इतका सहज आणि अनपेक्षित झाला. ते वर्ष होतं १९७८.
नागपूर पत्रिकेचे कार्यकारी संपादक तेव्हा शांताराम बोकील होते. संपादकीय विभागात रमेश राजहंस, हरिभाऊ येगावकर, भालचंद्र बूट, युधिष्ठिर जोशी, दिनकर देशपांडे अशी मातब्बर मंडळी होती. शरद देशमुख, अनिल महात्मे, नरेंद्र काळे, श्रीकांत न्याहाळकर, श्रीकांत कुळकर्णी असे सहकारी होते. ( पुढच्या काळात त्यात वयानी लहान असणाऱ्या नितीन केळकर, संजय आर्वीकर, नंतर सिद्धार्थ मेश्राम, हेमंत खडके , रमा गोळवलकर यांची भर पडली.) यमुनाताई शेवडे यांच्याशी संपर्क माझ्यामार्फत होऊ लागल्यानं किंवा त्यांचे निरोप माझ्या मार्फत कळत असल्यानं लवकरच या सर्वांशी संवाद निर्माण झाला. नागपूर-विदर्भाच्या मराठी पत्रकारितेत महिला अत्यंत दुर्मिळ असण्याचा तो काळ होता. नागपूर टाईम्समध्ये सत्या शरण, खुशनूर कासद, कामिनी बोबडे, सुकन्या द्रविड, अलका खेर्डीकर, विशाखा सरंजामे, वीणा साईनाथ आणि वीणा पारधी-पुराणिक, अशा काही समवयस्क पत्रकार होत्या. ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकात वीणा अडीगे, आसावरी शेणोलीकर, ‘तरुण भारत’मध्ये स्वाती शहाणे अशी काही स्त्रिया पत्रकार म्हणून कार्यरत होत्या. नागपूर पत्रिकेच्या न्यूजरूममध्ये सुरुवातीला मी एकटीच स्त्री होते. मग वृंदा कुळकर्णी आली. ती ग्रामीण वृत्त विभागाचं काम बघत असे. नंतरची अनेक वर्ष मी आणि वृंदा काम उपसंपादकाचं करत राहिलो तरी आमची नियुक्ती मात्र ‘क्लर्क’ म्हणूनच राहिली. पुढे महाव्यवस्थापक म्हणून आलेल्या राम धर्माधिकारी यांच्या ते लक्षात आलं आणि आम्हाला अधिकृतपणे उपसंपादक हा दर्जा मिळाला.
‘नागपूर पत्रिका’चा खप झपाटयान वाढत होता. याचं कारण अर्थातच बदलत्या जमान्याचं प्रतिबिंब आणि सामान्य माणसाच्या, विशेषत: शेतकऱ्यांच्या जगण्याला, त्यांच्या व्यथा वेदनांना स्थान इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद्या वृत्तपत्रात प्रथमच मिळत होतं; अर्थात हे श्रेय शांताराम बोकील आणि अनिल महात्मे यांचं होतं. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातही चानला प्रतिसाद मिळालेला होता. ‘साकवि’ म्हणजे साहित्य, कला, विज्ञान या तीन शब्दांचा शॉर्टफॉर्म. ही कल्पना युधिष्ठीर जोशींची. ही रविवार पुरवणी हा वैदर्भीय लेखकांसाठी नवं आणि महत्वाचं म्हणजे, खुलं व्यासपीठ ठरलं. अंकाचा व्याप वाढू लागला तसतशी माझ्याही संपादकीय कामात वाढ झाली आणि हळूहळू भाषांतराचं काम माझ्याकडून काढून घेण्यात आलं.
दरम्यान संस्थेचे संस्थापक अनंत गोपाळ शेवडे यांचं आकस्मिक निधन झालं आणि व्यवस्थापनात व्यवसायाने नामवंत चार्टर्ड अकाऊउंटंट असलेले नरेश गद्रे हे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले. सोनेरी फ्रेमचा चष्मा घालणाऱ्या चाळीशीतील्या नरेश गद्रेंचं व्यक्तिमत्व आकर्षक, प्रसन्न आणि दृष्टीकोन व्यावसायिक. साहजिकच त्याचं प्रतिबिंब नागपूर पत्रिका आणि टाईम्समध्ये उमटू लागलं. नरेश आणि पुष्पा गद्रे हे उच्चशिक्षित, सांस्कृतिक वृत्तीचं आणि लोभस स्वभावाचं दाम्पत्य. दोघांनाही वाचनाचा मोठा नाद. कुठंही दौऱ्यावर गेलं की गद्रे तेथील वृत्तपत्र, नियतकालिकं आवर्जून आणत. चांगलं काही वाचनात आलं की त्याची झेरॉक्स काढून पिवळी मार्कर पट्टी लाऊन माझ्याकडे पाठवत.
इथे माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि पत्रकारितेत प्रवीणचं बर्दापूरकरचं आगमन झालं. ते एका माणसाचं औपचारिक-साधंसं आगमन नव्हतं तर ते एक आव्हान होतं. नागपूर पत्रिका सुरु झाल्यापासून प्रवीण ललित आणि क्रिकेट विषयक लेखन करत असे. तेव्हा तो दूर चिपळूणला सागर या दैनिकात नोकरी करत होता. कथालेखनही करत असे. लेखनातून त्याचं साहित्य आणि भाषाविषयक आकलन चांगलं असल्याचं जाणवत होतं. त्याला नागपूर पत्रिकेसाठी लिहितं केलं युधिष्टिर जोशी यांनी. प्रवीणच्या लेखनावर गद्रेही जाम खूष होते. प्रवीण रुजू झाला आणि काम करताना त्याची त्या वयातही ( तेव्हा तो जेमतेम पंचविशीपार केलेला होता ) माध्यमावरची पकड जाणवत होती. त्याच्या अक्षरावर तर मी फिदा होते. तो खूप हट्टी होता पण, दुराग्रही नव्हता. त्याला व्यवस्थितपणाचा ध्यास होता. महत्वाचं म्हणजे तो जहाल आणि महापरखड होता ( अजूनही आहे!) मात्र, वाचाळ आणि आक्रस्ताळा नव्हता, अजूनही नाही. आपल्या ‘टर्म’वर वागण्याचा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे आमच्यात सतत खटके उडत असत. पुढे जाण्याआधी सांगते; त्याच्या या स्वभावामुळे त्याच्या सोबत काम करणं आव्हान असायचं. हे आव्हान नंतर वैयक्तिक आयुष्यात आपल्यालाच पेलायचं आहे याची पुसटशीही कल्पना मला तेव्हा आलेली नव्हती. पण, जसा सहवास वाढला तसा तो माझ्यात गुंतत गेला. सुरुवातीला मी काही फारसा प्रतिसाद दिला नाही शिवाय, तो माझ्यापेक्षा वयानं थोडा लहानही होता. पण, मग मीही त्याच्यात गुंतत गेले. घरापासून लहान वयातच तो टोकाचा दुखावलेला आणि दुरावलेला होता. पुढे आम्ही लग्न केलं तेव्हा, त्याच्याकडे कवितांची काही पुस्तकं, एक टेपरेकॉर्डर, तलत-मेहेदी हसन-गुलाम अली-जगजितसिंह यांच्या गझलच्या आणि किशोरकुमारच्या गाण्यांच्या काही कॅसेट्स, एक आरामखुर्ची आणि एक सुरई एवढीच मालमत्ता होती! त्यामुळे प्रारंभी माझ्या आईचा आमच्या विवाहाला विरोध होता; पण, तीही त्याच्या लेखनाच्या प्रेमात होती; नंतर तो तिचा लाडका झाला. आमच्या नोंदणी पद्धतीनं झालेल्या विवाहासाठी पुष्पा आणि नरेश गद्रे तसंच अमरावतीच्या प्रदीप देशपांडे आणि आता नागपूरकर झालेल्या प्रकाश निंबेकर यांनी बरीच धावाधाव केली. आता आम्ही दोघांनीही वयाची साठी ओलांडली आहे आणि आमचं सहजीवन पूर्वीसारखंच एकमेकाशी वाद घालत सुखनैव सुरु आहे. पण, ते असो कारण, तो काही या लेखाचा विषय नव्हे!
प्रवीण आधी रिपोर्टर, मग चीफ रिपोर्टर म्हणून काम करत होता आणि भरपूर लेखनही करत होता. त्याच्या लेखनावर खूष असणाऱ्या यमुनाताई शेवडे यांनी रविवार पुरवणीच्या कामातून लक्ष काढून घेत ती जबाबदारी माझ्या आणि प्रवीणवर सोपवली. दिवसभराचं रिपोर्टिंगचं काम संपल्यावर प्रवीण रविवार पुरवणीच्या कामात लक्ष द्यायचा. प्रवीणचा दृष्टीकोन केवळ विदर्भ नव्हे तर महाराष्ट्रव्यापी असल्याचा खूप फायदा रविवार पुरवणीला झाला. जयवंत दळवी, मुकुंदराव किर्लोस्कर, नरहर कुरुंदकर, यदुनाथ थत्ते, मधू मंगेश कर्णिक, माधव गडकरी, अरुण साधू, कविवर्य ना. धों.महानोर, गंगाधर पानतावणे, ह. मो. मराठे, फ. मु. शिंदे, नारायण कुळकर्णी कवठेकर, विश्वास वसेकर, मनोहर शहाणे, धनंजय गोवर्धने, किशोर पाठक, रेणू पाचपोर… अशी किती तरी विदर्भाबाहेरील नावं नागपूर पत्रिकेच्या रविवार पुरवणीशी जोडली गेली. तेव्हा नुकतेच लिहू लागलेले-नाव झालेले डॉ. सुभाष सावरकर, श्रीपाद भालचंद्र जोशी, वसंत वाहोकार, सदानंद देशमुख, रवींद्र शोभणे, डॉ. विश्वेश्वर सावदेकर, मोहन कडू, अजित उत्तमसिंह चहल, अमर रामटेके, हेमंत खडके, इंदुमती लहाने तसंच प्रख्यात चित्रकार भाऊ समर्थ, अरुण मोरघडे, नागपूर पत्रिकेत दिसू लागले.
प्रख्यात साहित्यिक वामनराव चोरघडे यांचे पुत्र असलेले डॉ. श्रीकांत चोरघडे आणि डॉ. विनय वाईकर हे नरेश गद्रेंचे मित्र असल्याने सगळे त्यांच्यापासून दबकून असायचे. पण, डॉ.वाईकरांना ‘राजाभाऊ’ आणि डॉ. चोरघडे यांना ‘श्रीकाका’ म्हणणं, अशी आमची छान मैत्री झाली. निष्णात बालरोग तज्ज्ञ असलेल्या श्रीकांत चोरघडे यांचा ‘अडगुलं मडगुलं’ हा बाल संगोपन विषयक स्तंभ सुरु झाला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. विनय वाईकर हे व्यवसायानं डॉक्टर-भूल तज्ज्ञ. माणूस आत्ममग्न पण, एकदा का सूर जुळले की, मोठा गप्पिष्ट आणि उमदा माणूस. ते सैन्यात शॉर्ट कमिशनवर होते आणि त्यांनी युद्ध अनुभवलेलं होतं. उर्दूची त्यांची जानकारी थक्क करणारी होती. तो जमाना गझलचा होता. जगजितसिंह आणि गुलाम अली यांनी धुमाकूळ घातलेला होता. अशाच गप्पातून मग, उर्दू गझल मराठीतून समजावून सांगणारा डॉ. विनय वाईकर यांचा ‘गझल दर्पण’ हा स्तंभ सुरु झाला. डॉ. वाईकर आणि डॉ. चोरघडे करत असलेलं लेखन मराठी वृत्तपत्रात प्रथमच येत असल्यानं त्याचा बोलबाला महाराष्ट्रभर झाला. रविवारच्या अंकावर उड्या पडू लागल्या. तीन-चार कॉलमची प्रोफाईल छायाचित्रे आणि आकर्षक अक्षर लेखन हेही या पुरवणीचं शक्तिस्थान होतं; प्रकाश बिसने या छायाचित्रकाराचं एका मॉडेल ( हे मॉडेल प्रकाश बिसने यांची पत्नीच होती! ) डाव्या कुशीवर झोपलेल्या एका स्त्रीचं छायाचित्र नागपूर पत्रिकेच्या ‘मास्ट हेड’च्यावर आम्ही आठ कॉलममध्ये प्रकाशित केलं आणि मोठा गदारोळ झाला होता. बाळू नागभीडकर हा छायाचित्रकार तसंच चित्रकार शरद देशमुख तसंच संजय धोतरकरांनाही’साकवि’लोकप्रिय होण्याचं श्रेय द्यायला हवं. शरद देशमुख तर स्ट्रिपलिंग शैलीतील चित्र अप्रतिम काढायचा.
नेमक्या याच काळात रविवारशिवाय आणखी एखादी पुरवणी सुरु करण्याची कल्पना प्रवीणनं मांडली. हा मराठी वृत्तपत्र सृष्टीतला पहिलाच प्रयोग होता. तोवर पुरवणी फक्त रविवारी असावी अशीच प्रथा होती. ‘मिड वीक सप्लीमेंट’ची ही कल्पना नरेश गद्रे यांनी लगेच मान्य केली आणि त्याचीही जबाबदारी माझ्याकडेच आली. दर गुरुवारी प्रकाशित होणाऱ्या या पुरवणीची मांडणी अत्यंत वेगळी असे आणि ती श्रीकांत कुळकर्णी करत असे. विदर्भाच्या सांस्कृतिक जगताचा आढावा, तरुणांनी त्यांच्या भाषेतून केलेलं ‘युथफुल’ शैलीतलं लेखन या वैशिष्ट्यांमुळे ही पुरवणी हिट झाली. याच पुरवणीत आणखी एक प्रयोग केला आणि तो होता वाचकांच्या आरोग्य विषयक प्रश्नांचं डॉक्टर्सकडून निराकरण करण्याचा. असं काही तोवर मराठी दैनिकात घडलेलंच नव्हतं म्हणून बहुदा, नाव असलेला कोणी डॉक्टर त्या सदरासाठी लेखन करायला तयारच नव्हता. मग आम्ही डॉ. मीनाक्षी आणि श्याम पितळे, डॉ. अंजली आणि डॉ. रवी दंडे आणि डॉ. अनिल पिंपळापुरे अशी आमच्या मित्रांची एक टीम तयार करुन सदर सुरु केलं. या सदराला मिळणारा प्रतिसाद अफाट होता. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश लेखन एकट्या डॉ. मीनाताईनंच केलं. दररोज अक्षरश: पोतं भरून पत्र येत. दिनकर देशपांडे हे मराठी बाल साहित्याच्या क्षेत्रातील बडं नाव. न्यूजरूममध्ये दिनकरराव असले की सतत काही नं काही नर्मविनोदी घडतच असे. व-हाडी बोलीत ते अनेकांच्या सॉलिड फिरक्या काढत. खूप मागे लागून दिनकररावांना आम्ही या गुरुवारच्या पुरवणीसाठी व-हाडी बोलीतून लिहायला राजी केलं. त्यासाठी त्यांना सर्वात जास्त मानधनदेखील मान्य केलं. दिनकररावांचं ‘इब्लीस माणसं’ हे सदर इतकं गाजलं की, एक दिवस कौतुकानं ते मला म्हणाले, ‘माझी बालसाहित्यिक ही प्रतिमाच तू पुसून टाकलीस की!’
आमच्या रविवार पुरवणीचा तो शिखरावरचा काळ होता. विचारवंत असणारे भास्कर लक्ष्मण भोळे आणि चळवळीतल्या कार्यकर्त्या असलेल्या रूपाताई यांनी आमच्यासाठी प्रायोगिक चित्रपटावर लिहिणं हा अनेकांसाठी सुखद धक्का होता. त्यांनी बरंच अन्य लेखनही आमच्यासाठी केलं. असे अनेक सुखद धक्के ‘साकवि’ ने त्या काळात वाचकांना दिले. डॉ. मधुकर आष्टीकर यांचं गाजलेलं ‘मधुघट’ हे लेखन आमच्या रविवार पुरवणीसाठी झालेलं स्तंभ लेखन होतं. त्या काळातल्या रविवार पुरवण्याचे अनेक विषय पुढे प्रबंध लेखनासाठी संदर्भ म्हणून वापरले गेले आणि त्याची तशी नोंद त्या संशोधकांनी प्रबंधात करणं हाही सुखद अनुभव होता. प्रख्यात संशोधक, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भाऊसाहेब उपाख्य वि. भि. कोलते यांनी वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं तेव्हा, त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत भास्कर लक्ष्मण भोळे यांनी घेतली आणि शब्दांकन प्रवीणनं केलं. प्रदीर्घ म्हणजे किती तर, बारा-साडेबारा कॉलम एवढी प्रदीर्घ. या मुलाखतीत मराठी भाषा, साहित्य, शिक्षण आदी विषयांवर भाऊसाहेब खूप मुलभूत बोलले. ही मुलाखत विदर्भापुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्रभर पोहोचावी असा आमचा आग्रह नरेश गद्रे यांनी मान्य केला आणि त्या मुलाखतीच्या, वृत्तपत्राच्या आकारातील हजारावर ऑफप्रिंट्स काढून आम्ही त्या मराठी साहित्यिक, भाषाप्रेमी आणि प्राध्यापकांना पाठवल्या आणि त्यावर मोठी चर्चा घडवून आणली. कवी अनिल, अमरावती विद्यापीठाची स्थापना अशा अनेक विषयांवर प्रकाशित झालेल्या नागपूर पत्रिकेच्या पुरवण्या विषयाचा मुळातून वेध घेणाऱ्या आणि कल्पक असल्यानं त्यांना संदर्भमूल्य प्राप्त झालं.
याच दरम्यान आमच्याकडे पुण्याचे वसंत परचुरे नावाचे एक गृहस्थ वितरण प्रमुख म्हणून रुजू झाले. त्यांनी केसरी या दैनिकात काम केलेलं होतं. नागपूर पत्रिकेच्या रविवार पुरवणीचा दर्जा बघून ते थक्कच झाले आणि त्यांनी ही पुरवणी महाराष्ट्रभर पोहोचली पाहिजे असा आग्रह धरला. नागपूरहून निघणारं एखादं नियतकालिक राज्यव्यापी होणं ही कल्पना आकर्षक होती शिवाय, त्यामुळे जाहिरातींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यताही भुरळ पाडणारी होती. अशा नवीन कल्पना आल्या की त्यासाठी हिरिरीनं पुढाकार घेण्याचा युधिष्ठीर जोशी यांचा स्वभाव होता. अंकाची संपादकीय जबाबदारी माझ्यावर आली. मग आम्ही रविवार पुरवणीला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी अनेक बदल केले. साहित्य आणि कला विषयक पाया बदलून अंक प्रासंगिक करण्याचं ठरवण्यात आलं. अनेक नवीन लेखक जोडले. तेव्हा मुंबईत ‘स्टार रिपोर्टर’ असणारे भारतकुमार राऊत आणि प्रकाश अकोलकर यांनी टोपणनावानं दर आठवड्याला लेखन करण्यास मान्यता दिली. पुण्यातून विज्ञान लेखक निरंजन घाटे, नामवंत क्रिकेट समीक्षक बाळ पंडित, नाशकातून व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार अशा अनेकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुंबईतून पी. के. बोणे यांनी चित्रपटविषयक लेखनाची जबाबदारी स्वीकारली. २४ पानांचा tabolaid आकाराचा अंक करण्याचं ठरलं. वितरण, प्रासंगिक लिहिणारे ज्येष्ठ वार्ताहर-लेखक यांचं नेटवर्क महाराष्ट्रभर तयार करण्यात आलं. अंक निघालाही चांगला आणि सुरुवातीला प्रतिसाद मिळाला भरपूर पण, तेव्हाची प्रवासाची साधनं मर्यादित होती. त्यामुळे लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स ही बडी दैनिकेही राज्यात अन्यत्र आवृत्या काढण्याचं धाडस दाखवत नव्हत्या. लेखकांनी भरमसाठ मानधन मागितलेलं होतं आणि राज्याच्या उर्वरीत भागातून जाहिरातीचं अपेक्षित उत्पन्न एकाही पैशाचं नव्हतं. मानधन थकल्यानं या लेखकांनी लेखन थांबवलं; मुंबईचं चित्रपट विषयक लेखन, राज्याच्या अन्य भागाशी संबधित प्रासंगिक लेखन नागपुरातून होऊ लागलं. सहाजिकच ती माहिती फर्स्टहॅन्ड असणं शक्यच नव्हतं. लेखनातील फोलपणा वाचकांच्या लक्षात येऊ लागला. नागपूरहून अंक राज्यभर पाठवणं खूप जिकिरीचं ठरू लागलं; अंक एकेक आठवडा उशीरा पोहोचू लागले. चांगली सुरुवात होऊनही नागपूर पत्रिकेची पुरवणी राज्यभर देण्याचा प्रयोग गळ्यातलं लोढणं बनला आणि एक दिवस हा प्रयोग बंद पडला. माझी बदली न्यूज डेस्कला करण्यात आली.
याच दरम्यान संगणकाचा जमाना सुरु झाला. वृत्तपत्राचा ‘मिशन टू प्रोफेशन’ असा प्रवास वेगानं सुरु झाला. व्यावसायिक मंत्र, तंत्र आणि यंत्रात मोठे बदल झाले. मुद्रण ऑफसेट झालं. रंगीत छपाई आली. स्वत:ला इतकं व्यापक बदलवून घेत नव्या काळाच्या गतीशी जुळवून घेणं ही फार मोठी नवी गुंतवणून ठरली. एवढी मोठी आर्थिक क्षमता नवसमाज लिमिटेडची नव्हती. ‘लास्ट स्टिक ऑन कॅमल्स बॅंक’ म्हणतात तसं आणखी एक घडलं; ते म्हणजे नागपूर पत्रिका या दैनिकात जवाहरलाल दर्डा आणि बनवारीलाल पुरोहित या कॉंग्रेस नेत्यांच्या विरोधात खालच्या पातळीवरून मोठ्ठी मोहीम सुरु झाली… नागपूर टाईम्स आणि पत्रिका या दोन्ही वृत्तपत्रांची झपाट्यानं घसरण सुरु झाली. नरेश गद्रे यांनी या घसरणीतून सावरण्याचा प्रयत्न जीवाच्या आकांतानं केला. त्याच प्रयत्नात एका प्रवासात त्यांचं अपघाती निधन झालं.
नंतर उमद्या, लोकप्रिय आणि चैतन्यानं सळसळणाऱ्या डॉ. श्रीकांत जिचकार यांनी ही दैनिके चालवण्यास घेतली पण, ते आव्हान त्यांना पेललं नाही. वृत्तपत्र चालवण्यासाठी त्यांची लोकप्रियता आणि विद्वत्ता उपयोगी नव्हती. शिवाय त्यांनी सर्वच स्तरावर वरच्या पदावर निवडलेली माणसं ‘शासकीय मनोवृत्ती’ची होती. त्यामुळे घोषणा मोठ्या आणि अंमलबजावणी कासवाच्या गतीनं असा कारभार सुरु झाला. ही दोन्ही दैनिकं बंद पडली. ती जागा मग एका हॉटेल व्यावसायिकानं विकत घेतली. जागा रिकामी करण्यासाठी त्यानं नागपूर पत्रिका आणि टाईम्सचे जुने सर्व अंक एका पेपर मिलला रद्दीच्या भावानं दिले. ते कळल्यावर ते अंक मिळवण्याचा प्रयत्न झाला पण, फार उशीर झालेला होता. त्या अंकांचा लगदा झालेला होता. वृत्तपत्राच्या इतिहासातील एक महत्वाचं अस्तिव कायमचं मिटलं होतं…
मग मी काही महिने एका प्रकाशकासाठी काम केलं पण, मोबदल्याच्या बाबतीत तो अनुभव कटू ठरला. औरंगाबादला आल्यावर किशोर कुळकर्णी यांच्या आग्रहामुळे दैनिक ‘मराठवाडा’त काम केलं पण, त्यांची आर्थिक अवस्था फारच बिकट होती…ते दैनिक शेवटचे आचके देत होतं. नंतरचे काही महिने आमचे स्नेही दिलीप चितलांगे यांच्या ‘सांजवार्ता’ या सायंदैनिकात काम करण्याचाही खटाटोप केला पण, कामाचं समाधान मिळेना; निराश वाटू लागलं. अखेर प्रवीणनं एकट्यानंच पत्रकारिता–लेखन करावं, लेकीनं शिक्षण घ्यावं आणि आपण घर सांभाळावं असा निर्णय मी शांतपणे घेतला… लगेच अंमलातही आणला.
नागपूरच्या मराठी महिला पत्रकारितेच्या पहिल्या पिढीतल्या मंगला नावाच्या पत्रकाराच्या २२/२३ वर्षांच्या पत्रकारीतेचा दीप जितक्या सहज आणि अनपेक्षितपणे पेटला तितक्याच सहजपणे औरंगाबादला कायमचा मालवला…त्यानंतर मी फारच कमी लिहिलं, त्यातला हा एक लेख आहे!
-मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर
९०११०५४०९९
mangala.bardapurkar@gmail.com