( छायाचित्र : प्रवीण बर्दापूरकर )
आज म्हणजे , २७ जुलैला सकाळी नानासाहेबांना भेटायला गेलो . वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांच्यात असलेली ऊर्जा आणि लेखन-वाचनाची ऊर्जा अनुभवून स्तंभित होऊन बाहेर पडलो .
नानासाहेब म्हणजे- लेखक , गोखले आणि आगरकर यांच्या विचारांच्या वाटेवर चालणारे विचारवंत , मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती , वर्ध्याला झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष , लोकशाहीचे संवेदनक्षम चिंतक , महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर निष्ठा असणारे राजकीय आणि सामाजिक भाष्यकार , चिकित्सक वाचक , वगैरे नरेंद्र चपळगावकर .
कांही वैद्यकीय चाचण्या आटोपून नानासाहेब नुकतेच मुंबईहून औरंगाबाद-छत्रपती संभाजीनगरला परतले आहेत ; त्या चाचण्यांमुळे नानासाहेब थकलेले असतील , कदाचित त्यांच्या तोंडून निराशेचा एखादा का होईना स्वर उमटेल असं वाटणं मनाला स्पर्शून गेलेलं होतं पण , प्रत्यक्षात मीच चार्ज होऊन बाहेर पडलो .
नानासाहेब चपपळगांवकर यांच्याशी माझी असलेली नाळ जुनी आहे . दूरवरुन आम्ही नात्यात आहोत , असं आमच्या भावकीत म्हटलं जातं . बीड हा आमच्यातला समान दुवा आहे . नानांच्या अफाट परिवारतल्या अनेकजणांशी माझाही निकटचा संपर्क आलेला आहे . त्यात राजकारणी जसे आहेत तसेच पत्रकार , संपादक , नामवंत लेखक , विचारवंत , सामाजिक कार्यकर्ते आहेत . आणखी एक नाळ ‘लोकसत्ता’ आहे . नानासाहेब ‘लोकसत्ता’चे वार्ताहर होते आणि पत्रकारिततेली माझी २९ वर्षांची कारकीर्द याच वृत्तपत्रातली आहे . आता सांगूनच टाकतो , संपादकीय लेखन सुरु केल्यावर सुरुवातीच्या काळात मला नानासाहेबांचं सक्रिय सहकार्य मिळालेलं आहे ; ‘लोकसत्ता‘तील माझा पहिला वृत्तवेध नानासाहेबांनी ‘डिक्टेट’ केलेला आहे !
स्मरणशक्ती ठणठणीत शाबूत असल्यानं नानासाहेबांशी गप्पा मारणं हा एक नेहेमीच आनंददायी आणि आपल्या आकलनाच्या कक्षा उजळवणारा अनुभव असतो . असंख्य आठवणी आणि हकीकती , किस्से एका पाठोपाठ अलगद उलगडत जातात . त्यात राजकारण असतं , समाजकारण , न्यायव्यवस्था , साहित्य आणि त्या क्षेत्रात वावरणारे नामवंत असतात . त्या कथनाच्या उजळलेल्या लक्षलक्ष दिव्यांच्या प्रकाशात आपण चिंब होतो . नानासाहेबांचं , वाचन आणि अनुभव विश्व किती ऐश्वर्यशाली हे अनुभवून स्तिमित होणं एवढंच आपल्या हातात उरलेलं असतं .
नानांसाहेबांचा व्यासंग आपल्या आकलनाच्या कवेत येणारा नाही . मराठी , इंग्रजी , हिंदी असं त्यांचा संचार आहे तस्साचा त्यांचा बहुपेडी संपर्कही आहे . गाठीशी इतकी विद्वत्ता असूनही त्यांच्यात ज्ञानताठा जराही नाही त्यामुळे ते आपले कुणी वडीलधारी आहेत ही जाणीव सुखावणारी असते . पुन्हा सांगतो , मोहोरीएवढ्या ज्ञानाचा आभाळभर अहंकार असणारे/मिरवणारे पायलीला पन्नास भेटले ; ताठा नसणारे नानासाहेबांसारखे ज्ञानी फारच दुर्मीळ असतात , हे साडेचार दशकं पत्रकारितेत घालवताना शेकडोंना भेटल्यावर चांगलं लक्षात आलेलं आहे .
नानासाहेबांना विचारलं , ‘हा प्लॉट केव्हा घेतला होता ,’ तर त्यांनी घडघडा सर्व माहिती दिली- ‘१९७६साली . १३ रुपये फूट दरानं . घर बांधायला सात लाख रुपये खर्च आला . त्यापैकी दोन लाख रुपये सारस्वत बँकेनं कर्ज दिलं . उरलेले इकडून तिकडून उभे केले’ , अशी स्मरणशक्ती लख्ख . या घराबद्दल माझं एक निरीक्षण असंही आहे- या घरात दर आठ-दहा महिन्यानंतर काही ना काही ‘डागडुजी’ सुरु असते आणि ती डागडुजी नानासाहेबांच्या कल्पनेतून साकारत असते !
पुस्तक किंवा एखाद्या वस्तूबद्दलही असंच असतं . पुस्तक कोणत्या कपाटाच्या कोणत्या कप्प्यात आणि बहुदा डावी किंवा उजवीकडून कितव्या स्थानी आहे हे नानासाहेब नेमकं सांगणार . एखाद्या वस्तूबद्दलही नेमकेपणा हा असाच असतो .
‘काय लिहिताय सध्या ?’ या माझ्या विचारण्याला उत्तर देताना नानासाहेब म्हणाले , ‘लोकशाही आणि हुकुमशाही हे पुस्तक नुकतंच पूर्ण झालंय . छपाईला गेलंय . येईल आता दोन-तीन महिन्यात हाती .राजहंस प्रकाशन प्रकाशित करतं आहे , हे पुस्तक .’
‘आता नवीन काय ? डिक्टेशन देता का अजून ?’ मी विचारलं तर नानासाहेब उत्तरले , ‘हो देतो की डिक्टेशन अजूनही . पण , सध्या डिक्टेशन घेणारे गृहस्थ येत नाहीयेत कांही वैयक्तिक अडचणींमुळे . ते आले की सुरु करु पुन्हा लेखन .’
‘वाचन सुरु आहे का ?’ हे विचारल्यावर नानासाहेबांनी पलंगाच्या उशाशी असलेल्या टेबल लॅम्पकडे बोट केलं आणि म्हणाले , ‘अशातच सुधीर रसाळ यांची दोन-तीन पुस्तकं पुन्हा वाचली . तुमचं ( म्हणजे साक्षात अस्मादिकांचं ! ) पत्रकारितेच्या अनुभवावरचं पुस्तक-लेखणीच्या अग्रावर-पुन्हा वाचलं . ( इकडे अस्मादिकांची कॉलर मनातल्या मनात ताठ झाली नसती तर तो दांभिकपणा होता . ) वाचायचा कांहीच त्रास नाही . वाचत असतो . वाचनाशिवाय दुसरं करणार तरी काय ?’
‘टीव्ही नाही बघत ?’ विचारल्यावर नानासाहेब म्हणाले , ‘काय बघणार ?’
‘बातम्याही नाही वाचत किंवा बघत ?’
नानासाहेब म्हणाले , ‘बातम्या म्हणजे नुसत्या उखाळ्या पाखाळ्याच असतात . भाषाही वाईट . म्हणून वाचत नाही आणि बघतही नाही . राजकारणही तसंच’ आणि एक पॉज घेऊन म्हणाले , ‘फारच कंटाळा आला तर इंग्रजी चित्रपट बघतो अधूनमधून .’
काळजी आणि प्रेमापोटी गुरगुरणाऱ्या लेकी हा नानासाहेब , नंदिनी वहिनी आणि माझ्यातला जिव्हाळ्याचा विषय . तोही नेहेमीप्रमाणं चर्चेत आला आम्हा तिघांच्या .
गप्पा बराच वेळ रंगल्या . महेश एलकुंचवार , सुधीर रसाळ , कुमार केतकर अशा अनेकांच्या आठवणींच्या सरी बरसल्या . नानासाहेब थकले वगैरे मुळीच नाहीयेत . त्यांना संडेक्लबला यायचं आहे . संडे क्लबला घेऊन जाईन असं सांगून तिथून निघालो तेव्हा मनात विचार आला , नानासाहेबांसारखी परीस माणसं जगण्यात आली म्हणून आपणही उजळून निघालो . ही ज्ञानी , निगर्वी , पारदर्शी माणसं जगण्यात भेटली नसती तर आपण कुठे तरी चाचपडत विरुन गेलो असतो…
■प्रवीण बर्दापूरकर
Cellphone +919822055799
www.praveenbardapurkar.com