माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे …

छायाचित्रात प्रकाशित पुस्तकांच्या स्वाक्षरांकित प्रती मंगलाच्या स्वाधीन करतांना डावीकडून मा. नानासाहेब चपळगावकर , मा. महेश एलकुंचवार आणि मा. डॉ. सुधीर रसाळ . छायाचित्रात सायलीही दिसत आहे .

( पुनर्लेखन केलेल्या माझ्या ‘डायरी’ , ‘क्लोज-अप’ आणि संपादित ‘माध्यमातील ती’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ ज्येष्ठतम समीक्षक डॉ. सुधीर रसाळ तसंच प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार , सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम या मान्यवरांच्या हस्ते नुकताच पार पडला . या प्रसंगी प्रास्ताविक , स्वागतपर आणि लेखकाचं मनोगत मी केलं . त्याचा हा संपादित अंश- )

लेखनामागील भूमिका सांगावी असं डॉ. सुधीर रसाळ सरांनी सुचवलं आहे . ते कथन कांहीसं आत्मपर आहे पण , करतोच . मुळात पत्रकार/संपादक जे काही लेखन करतात ते साहित्य आहे , हा बहुसंख्य पत्रकार/संपादकांचा असतो तसा माझा  गैरसमज नाही . पत्रकार/संपादकाचं लेखन हे , इंग्रजीत ज्याला ‘लेजिटीमेट प्रोफेशनल वुईकनेस’ म्हणतात , तशी वेळेचं कांटेकोर बंधन असणारी व्यावसायिक गरज असते ; त्यात सृजन असतंच असं नाही किंवा सृजन    फार-फारच क्वचित असतं , हे मला प्रामाणिकपणे मान्य आहे . आपल्यामुळेच एखादा लेखक लिहिता झाला किंवा घडला असाही बहुसंख्य पत्रकार/संपादकांचा असतो , तसा माझा गोड गैरसमज कधीच नव्हता आणि आजही नाही .

तरी मी लिहितो , कारण मला केवळ लिहिता , वाचता आणि बोलता येतं . मला गाता येत नाही , मूर्ती कोरता येत नाही की चित्र काढता येत नाही . मग काय करावं ? तर जे येतं ते , म्हणजे मी लिहितो . कारण माझ्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे . माझी त्याबाबतची भावना

आलो इथे रिकामा

भरुनी गेलो आहे

अशी आहे .

एक पत्रकार/संपादक म्हणून डोळे आणि कान टक्क उघडे ठेऊन वावरल्यानं अनेक घटनांचा साक्षीदार झालो . त्या हकिकती आहेत ; किस्से नाहीत . त्यावर आधारित प्रेषिताचा आव न आणता मी जे लिहित गेलो अनेकांना आवडतं तर काहींना नाही असा अनुभव आहे . महत्वाचं म्हणजे , लेखनातून मला आनंद मिळतो . गेली चाळीस वर्ष मी पत्रकारितेत आहे . अलिकडच्या पावणेदोन-दोन वर्षांचा अपवाद वगळता पत्रकारितेच्या निमित्तानं संपूर्ण राज्य अनेकदा पालथं घातलं आहे ; देश आणि अनेक परदेशातही माझी भटकंती सतत सुरु होती . निवासी संपादक झाल्यावर आणि साल्झबर्गची आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्ती मिळाल्यावर तर परदेश दौरे जास्तच वाढले . ज्यांच्या सोबत मी काम केलं ते ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांच्यानंतर पत्रकारितेच्या निमित्तानं सर्वाधिक परदेश दौरे करणारा मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मी कदाचित एकमेव मराठी पत्रकार असेन . शिवाय  नागपूर , मुंबई , दिल्ली अशा महत्त्वांच्या शहरात प्रदीर्घ काळ दैनिक लोकसत्ता म्हणजे एक्स्प्रेस वृत्तपत्र समुह आणि अगदी अखेरच्या टप्प्यात लोकमत वृत्तपत्र समुहासाठी पत्रकारिता करण्याची संधी मला मिळाली . महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारण , समाजकारण , प्रशासन आणि सांस्कृतिक जगतात या काळात केवळ पत्रकार असल्यामुळेच मुक्त संचार करता आला . विधीमंडळ आणि संसदेच्या कामाचं प्रदीर्घ काळ वृत्तसंकलन करता आलं . महत्वाचं म्हणजे मराठीसोबतच हिन्दी आणि इंग्रजी या भाषांतही लेखन करता आलं ; प्रकाश दुबे या संपादक मित्रामुळे हिंदीत भास्कर या दैनिकासाठी नियमित लेखन केलं ; तरी मी जास्त रमलो ते मराठीतच . आधी वार्ताहर आणि नंतर संपादक म्हणून काम करतांना दररोज किमान एका तरी नवीन माणसाला भेटायचा माझा रिवाज जवळजवळ तीन पेक्षा जास्त दशकं होता ; त्यामुळे मला माणसं वाचायचीही संवय लागली .

प्रकाशन समारंभाला औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रातील साहिती, शिक्षण, उद्योग , वैद्यक क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी

मला खरं तर व्हायचं होतं कथालेखक . चाळीस-पंचेचाळीस वर्षापूर्वी मी कांही कथा लिहिल्या आणि त्याचं कौतुकही झालं ; इथं हजर असलेले प्रकाश निंबेकर आणि श्याम देशपांडे त्या कथालेखनाचे वाचक आणि साक्षीदार आहेत . माझ्या तेव्हाच्या अक्षरावर तेव्हा नागपूर पत्रिका या दैनिकात असणारी मंगलाही फिदा होती पण , तेव्हा आमची ओळख नव्हती . कथा लेखनाच्या प्रसिद्धीला  पूरक ठरेल या आशेनं मी पत्रकारितेत आलो पण , गडकरी साहेबांच्या रेट्यामुळे राजकीय वृत्तसंकलनाच्या बीट मधे काम करु लागलो . मी म्हणतोय ते गडकरी म्हणजे विद्यमान काळात गाजणारे नितीन गडकरी नव्हे तर ज्येष्ठतम संपादक माधवराव गडकरी यांच्याबद्दल हा उल्लेख मी कृतज्ञतापूर्वक करतो आहे . राजकीय वृत्तसंकलनाच्या बीटमधे प्रदीर्घ काळ काम करतांना सत्तेच्या दालनात वावरता आलं . ते अनुभव मोठे विलक्षण आणि माझ्या मध्यमवर्गीय धारणांना हादरवून सोडणारे आहेत . त्यामुळे समज वैपुल्यानं विकसित आणि टोकदार झाली ; आकलन आणि भान विस्तारलं ; अनुभवाची पोतडी गच्च भरत गेली . राजकारणी म्हणजे मग्रूर , रगेल आणि रंगेल , कायम कट-कारस्थानं करणारा , भ्रष्टच ; हा माध्यमं , लेखक आणि हिन्दी व मराठी चित्रपटांनी करून दिलेला गैरसमजही त्यामुळे दूर झाला . अनेक राजकारण्यातला माणूस मला दिसला . या अनुभवांचं वैविध्य विशाल आणि बहुपेडी आहे . संपत्तीच्या त्या दृष्टिकोनातून मी श्रीमंत आहे आणि कृतज्ञही आहे .

पत्रकारितेत काम करतांना अनेकांना कमी अधिक प्रमाणात विविधांगी अनुभव येतात पण , आलेले अनुभव लिहिले पाहिजे असं मला वाटलं . पत्रकारीतेत आलेल्या अनुभवांवर आधारित तुरळक लेखन आधीही झालेलं आहे . तरी माझं लेखन थोडसं वेगळं म्हणजे त्याला असलेला ललित शैलीचा बाज आणि काहींशी पाल्हाळीक कथन शैली हे असावं . हे मला जमलं कारण माझ्यावर वाचनाचा संस्कार बालपणीच माई-म्हणजे माझ्या आईकडून झाला . पुढे मंगलाच्या प्रेमात पडल्यावर आणि आमचा विवाह झाल्यावर शब्दकोडी सोडवण्याचा छंद आणि लळा लागला . लहानपणी भजन कीर्तन ऐकण्याचा आणि वाचत्या वयात अनंतराव भालेराव यांच्या प्रासादिक रसाळ लेखनाचा झालेला एकत्रित परिणाम म्हणजे माझी शैली असावी . मंगला मराठीची स्नातक , मराठी आणि इंग्रजीवर तिची छान पकड , त्यामुळे माझ्या भाषेला पैलू पडले . याच काळात श्री. ना. पेंडसे , जयवंत दळवी , दया पवार ते सुरेश भट , ग्रेस, मंगेश पाडगावकर , भास्कर लक्ष्मण भोळे , यशवंत मनोहर , नारायण कुळकर्णी-कवठेकर आणि आज इथं असलेले महेश एलकुंचवार सर यांसारख्या असंख्य भाषा प्रभुंचा स्नेह लाभला ; परिणामी भाषा अधिकाधिक उमजत गेली . तरी लेखन सुरु केलेलं नव्हतं कारण मी राजकीय वृत्तसंकलनाच्या दालनात आकंठ बुडालेलो होतो . गप्पांच्या मैफिलीत मी हे अनुभव सांगत असे पण , लिहित नसे . त्यासाठी माझ्यामागे लकडा लावला तो मंगला आणि ज्यांचा उल्लेख मी स्वामी असा करतो त्या श्याम देशपांडे यांनी . अखेर मंगला आणि श्यामच्या तगाद्याला कंटाळून बातम्या व फुटकळ लेखनासोबतच साप्ताहिक लोकप्रभासाठी १९९९मधे कांही वृत्तकथा लिहिल्या ; त्या संपादक प्रदीप वर्माने आवर्जून प्रसिद्ध केल्या . त्या कथांना मिळालेला प्रतिसाद स्तिमित करणारा होता . आपण लिहिलेलं वाचकांना आवडतं याची ती सुखद जाणीव होती . दरम्यान माझी बदली नागपूरला निवासी संपादक म्हणून झाली . नंतर लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचा संपादक झालो . बातमी सोडून अन्य लेखनात मग्न झालो . डायरी , नोंदी डायरी नंतरच्या , क्लोज-अप , मागोवा , भाष्य असे लोकसत्ता आणि लोकप्रभातील स्तंभ वाचकप्रिय झाले . महेश एलकुंचवार सरांना नागभूषण सन्मान मिळाला तेव्हा ‘क्लोज-अप’चा पहिला दीर्घ लेख लिहिला . तो वाचकांना आवडला . तेव्हा व्यक्तिचित्रण लेखनाची लय सापडली आहे असं वाटलं .  मग त्याच नावानं व्यक्तिचित्र लेखनाचा स्तंभ सुरु केला . ते लेखन वृत्तपत्रीय शब्द मर्यादा सांभाळून केलेलं होतं आणि फारच टुकार दर्जाचं होतं तरी त्याचं पुस्तक निघालं आणि महत्वाचं म्हणजे त्याची विक्रीही चांगली झाली . आता सुधारित आवृत्तीच्या निमित्ताना त्याचं पुनर्लेखन केलेलं आहे .

आधी वार्ताहर आणि नंतर संपादक असतांना अनंतराव भालेराव , माधवराव गडकरी ( या गडकरी स्कूलचा मी विद्यार्थी आहे ) , गोविंदराव तळवलकर , निशिकांत जोशी , मुकुंदराव किर्लोस्कर , मामासाहेब घुमरे , कुमार केतकर , अरविंद गोखले , ह. मो. मराठे , अरुण साधू , सुरेश द्वादशीवार अशा दिग्गजांचा एक तर सहवास तरी लाभला किंवा त्यांच्यासोबत सोबत काम करता आलं . या प्रत्येकाकडून कांही ना कांही शिकता आलं . ऐकीव माहितीवर लेख वगैरे तर सोडाच पण , अगदी चार ओळींचीही बातमी लिहायची नाही याचं कांटेकोर भान आलं . समोरच्यालाही मतं असतात , त्याला प्रतिवादाचा हक्क असतो हे मी मामासाहेब घुमरे आणि कुमार केतकर यांच्याकडून शिकलो . हळूहळू माझ्या लेखनाची एक स्वतंत्र शैली निर्माण झाली . कुणावरही टीका करतांना त्याचे दोन गुण आधी सांगायचे आणि मग हल्ला करायचा , आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे , हे पक्कं होत गेलं आणि माझ्यातला विवेक जागरुक झाला . राजकीय भूमिका , मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकातलं चांगुलपण मनावर ठसू लागलं ; त्यामुळे मी आणि माझं लेखन एकारलं कर्कश्श झालं नाही . माझ्या वर्तन आणि लेखनातही सुसंस्कृतपणा डोकावू लागला . याचा एकत्रित परिणाम म्हणून राजकीय विचार , ऐकीव माहितीवर आधारित दूषित ग्रह बाजूला पडून मोठ्ठा गोतावळा निर्माण झाला .

माझ्या लेखन प्रवासाची कथा इतकी छोटी आहे . ज्या भूमीत तुकाराम , ज्ञानेश्वर जन्मले आणि आता महेश एलकुंचवार यांच्यासारखे प्रतिभावंत इथे बसलेले असतांना , माझं लेखन सृजन आहे असं माझं कधीच म्हणणं नव्हतं आणि यापुढेही असणार नाही . हे लेखन अक्षर साहित्य नाही आणि जे कांही मी लिहितो आहे ते साहित्य आहे , असाही माझा मुळीच समज म्हणा की दावा नाही . आपण बर्‍या दर्जाचं लेखन करतो याची मला ठाम जाणीव आहे . जाता जाता , एक सांगितलं पाहिजे , ते म्हणजे वाचकांना माझं राजकीय लेखन जास्त आवडतं . त्यात संदर्भ असतात म्हणून असं बहुदा घडत असावं .

आणखी एक मुद्दा म्हणजे संपादित केलेल्या पुस्तकांनी मला जास्त समाधान दिलं . ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ या समजाच्या कक्षा ओलांडून आईकडे एक स्त्री म्हणून बघण्याची भूमिका घेऊन प्रकाशित झालेलं ‘आई’ , कविवर्य ग्रेस यांच्यातल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारं ‘ग्रेस नावाचं गारुड’ आणि आज प्रकाशित होत असलेल्या ‘माध्यमातील ती’ या पुस्तकांच्या निर्मितीतलं आणि त्यांना मिळालेल्या प्रतिसादाचं समाधान काम माझ्या सोबतीला राहील . नागपूरचे ज्येष्ठ सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते गिरीश गांधी हे स्मिता पाटील या गुणवंत अभिनेत्रीच्या स्मरणार्थ दरवर्षी एक अंक प्रकाशित करतात . त्या अंकासाठी ‘आई’ आणि ‘माध्यमातील ती’ हे विषय मी निवडले . पुढे त्याची पुस्तके झाली . या तिन्ही पुस्तकांच्या निर्मितीच्या प्रेरणा या पुस्तकांच्या प्रस्तावनेत आलेल्या असल्यानं पुनरुक्ती करत नाही .

एलकुंचवार सरांसाठी आवर्जून नमूद करतो , ज्यांचा ‘मराठी पत्रकारितेवरचा संस्कार’ असा मी कायम उल्लेख करतो त्या पत्रमहर्षी अनंतराव भालेराव स्मृती ग्रंथाचं आता मार्गी लागलेलं आहे . हे काम प्रदीर्घ रेंगाळलं . त्याबद्दल कोणतीही कारणं न सांगता मी दिलगिरी व्यक्त करतो . अनंतराव भालेराव यांच्या समग्र लेखनाचे दोन खंड प्रकाशित करण्याची प्रक्रिया निशिकांत भालेराव आणि संजीव कुलकर्णी यांनी पार पडत आणलेली आहे . त्या खंडांसोबतच ‘कैवल्यज्ञानी’ हा अनंतराव भालेराव स्मृती ग्रंथ प्रकाशित होणार आहे .

आणखी एक मुद्दा सांगून मी थांबतो . माझ्या पुस्तकांचं प्रकाशन असूनही मी व्यासपीठावर नाही तर माझी पत्नी मंगला व्यासपीठावर आहे , याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटतं असेल तर ते स्वाभाविक आहे . मंगला आणि मी वेगळे थोडीच आहोत ? ती व्यासपीठावर आहे म्हणजे मी पण आहेच की . आमच्या सहजीवनाचे सहप्रवासी असलेले वासंती आणि डॉ . अनिल पिंपळापुरे , डॉ. अंजली आणि डॉ. रवी दंडे , डॉ. श्याम पितळे , साधना आणि प्रकाश निंबेकर यांच्यासोबतच्या दिवसांबद्दल खूप बोलता येईल . विद्या आणि डॉ. प्रदीप मुळे , डॉ. अंजली आणि डॉ. मिलिंद देशपांडे , पुष्पा आणि डॉ. रवी जोशी , स्मिता आणि मुकुंदा बिलोलीकर यांच्याशी असलेल्या निखळ आणि हळ्व्या दोस्तीबद्दलही खूप कांही सांगण्यासारखं आहे पण , त्यासाठी आजचं हे प्रयोजन नाही .

बस्स इतकंच पुरे आज .

लव्ह यू ऑल .

( डॉ. सुधीर रसाळ , महेश एलकुंचवार आणि नानासाहेब चपळगावकर या मान्यवरांची या कार्यक्रमातील  भाषणे लवकरच अपलोड केली जातील )

-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  ​+919822055799

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट