।। नोंद । ११ ।।
सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं , सत्ताधारी जर जनहित विरोधी निर्णय घेत असतील तर त्यावर टीका करणं , त्यांना अडचणीचे प्रश्न विचारणं आणि या प्रक्रियेतून खरं काय ते हुडकून काढून लोकांसमोर मांडणं म्हणजे पत्रकारिता , असा संस्कार माझ्या पिढीवर झालेला आहे . १९७७ ते २०१५ असा प्रदीर्घ काळ मी पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात म्हणजे मुद्रीत माध्यमांत वावरलो ; अजूनही माझी पत्रकारितेतील मुशाफिरी नवमाध्यमांत सुरुच आहे . त्यातील सर्वाधिक म्हणजे जवळजवळ २९ वर्ष इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समुहासाठी मी वेगवगेळ्या पदावर राहून मुंबई , दिल्ली , नागपूर अशी पत्रकारिता केली . ‘लोकसत्ता’सारख्या तेव्हाच्या सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात काम करताना तर आणि ( कांही काळ ‘लोकमत’चा दिल्लीतील राजकीय संपादक म्हणून काम करतांना ) सत्ताधाऱ्यांच्या दोषांवर बोट ठेवणं , त्यांची कुलंगडी उजेडात आणणं हे आमचं ब्रीदच होतं . केवळ ‘लोकसत्ता’चं कशाला बहुसंख्य मुद्रित माध्यम तेव्हा प्रस्थापितांना धक्का देणारी पत्रकारिता करत . या संपूर्ण काळात राज्यात १९९५तला सेना-भाजप युतीचा अपवाद वगळता काँग्रेस पक्षच सत्तेत होता . ( ‘खंजीर नाट्य’ म्हणून गाजलेला पुलोदचा प्रयोगही काँग्रेसच्या बंडखोर लेबलखालीच झाला होता . ) केंद्रातही भारतीय जनता पक्षाचं आधी १३ दिवस , मग १३ महिने आणि मग पूर्ण मुदतीचं अटलबिहारी वाजपेयी , नंतर पी . व्ही . नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली तसंच मोरारजी देसाई , चंद्रशेखर , विश्वनाथ प्रतापसिंग , एच. डी. देवगौडा , इंदरकुमार गुजराल असे अल्पकाळचे पंतप्रधान आणि त्यांची अल्पजीवी काँग्रेसेतर पक्षांची सरकारं माझ्या पिढीच्या पत्रकारांना अनुभवायला मिळाली . कांही अपवाद वगळता राज्य आणि केंद्रात प्रदीर्घ काळ काँग्रेसची सत्ता होती . संसदेत दोन ते आता पूर्ण बहुमत असा भारतीय जनता पक्षाचा प्रवास याच काळातला .
माध्यमांकडून सर्वाधिक टीका त्या काळात काँग्रेसच्या वाट्याला आली . मात्र अगदीच कांही किरकोळ अपवाद वगळता काँग्रेस नेते किंवा त्यांचे समर्थक ( आताच्या भाषेत ट्रोल म्हणा की अंधभक्त ) ‘वचावचा’ करत माध्यमांवर चालून गेल्याचं आठवत नाही ; अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवरही कांही ( शवपेटी घोटाळा , राष्ट्रीय अध्यक्ष बंगारु लक्ष्मण लांच घेतांना पकडले जाणे इत्यादी ) प्रकरणात तुफान टीका झाली पण , अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपकडूनही माध्यमांना ट्रोल केलं जाण्याची आगळीक घडलेली आठवत नाही . तेव्हा एकूणच सर्वपक्षीय बहुसंख्य नेते विरोधी विचारांचा आदर राखत परस्परांशी तसंच समाजात सुसंस्कृतपणे वावरत आणि पत्रकारांशीही तसंच वागत . महाराष्ट्राच्या राजकारणातील राडा संस्कृतीचं जनकत्व शिवसेनेकडे जातं . आता तर प्रत्येक राजकीय पक्षाकडे ट्रोल आर्मी आहे आणि कोणताही विधिनिषेध न बाळगता , सुसंस्कृतपणाच्या सर्व मर्यादा ओलांडून असभ्य व क्वचित अश्लील शब्दांतही , ही ट्रोल आर्मी माध्यमांतील टीकाकारांवर चाल करते ; पत्रकारांना नामोहरम करण्यात धन्यता मानते . समर्थक अंधभक्त झालेले असून उन्माद हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे . महत्वाचं म्हणजे हे सर्व पक्षीय आहे आणि यासंदर्भात राष्ट्रीय राजकीय एकमत आहे ; प्रमाण कमी-जास्त असेल एवढंच काय तो फरक . म्हणूनच बहुसंख्य पत्रकारांच्या लेखण्या सॉरी , की-बोर्ड , सध्या तरी बोथट होण्याचं हेही एक कारण आहे . पण , ते असो .
वरील विवेचनामागे कारण आहे ते सोबतच्या छायाचित्राचं . या छायाचित्रात विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे दोन बडे नेते दिसत आहेत . मराठवाडा लोकविकास परिषद ही विनायक मेटे यांनी मराठवाड्यातल्या मुंबईतल्या लोकांसाठी स्थापन केलेली संस्था . मुळच्या मराठवाड्यातील आणि राज्याच्या विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्यांचा ‘मराठवाडा भूषण’ हा सन्मान धुमधडाक्यात आणि तोही मुंबईत प्रदान करण्याची परंपरा विनायक मेटेंनी या संस्थेच्या माध्यमातून सुरु केली होती . विनायक मेटे मुळचे बीड जिल्ह्यातील आणि मला वयानं धाकटे . त्यामुळे या धडपड्या तरुणाविषयी मला अतिशय आस्था वाटत असे . मराठा आरक्षणाची बीजं ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पेरली त्यापैकी विनायक मेटे एक . त्यातच ( सध्या काँग्रेसचा मुख्य प्रवक्ता असलेला ) नागपूरचा अतुल लोंढे विनायक मेटेसोबत कायम असायचा . आमच्यातल्या नियमित संपर्काचा हाही एक दुवा होता . विलासराव आणि गोपीनाथ मुंडे या दोघांशीही माझी नाळ सत्तरीच्या दशकात जुळलेली . ते दोघंही माझ्यापेक्षा वयानं थोडे ज्येष्ठ . त्यांचा राजकारणातला आणि माझा पत्रकारितेतला प्रवास समांतरपणे खुलत गेला . अनेकदा त्या दोघांवरही टीका करण्याची वेळ आली तेव्हा माझ्यावर कोणतंही दडपण कधीच आलं नाही . बर्दापूर , रेणापूर , लातूर ही एकाच रेषेतील भौगोलिक मातीची नाळ आमच्यात होती . गंमत बघा विलासराव काँग्रेसचे , गोपीनाथराव भाजपचे तर मी समाजवादी . व्यासपीठावरुन बोलतांना आम्ही एकमेकांच्या राजकीय भूमिकांची यथेच्छ टर उडवलेली असली तरी आम्हा तिघातलं मैत्र आणि विलासराव व गोपीनाथराव यांच्यातील दोस्ती तर खूपच गहरी होती .
२००८ च्या डिसेंबर महिन्यात ( तेव्हा मी ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा संपादक होतो . ) गोपीनाथरावांकडे गेलो तर तिथे विनायक मेटे होते . सत्तेत असो वा नसो गोपीनाथरावांकडे जायला मला पूर्व परवानगीची गरज नसे . केबिनमध्ये गेलो तर मुंडे आणि मेटे ‘मराठवाडा भूषण’वर चर्चा करत होते . मला बघितल्यावर मुंडे लगेच मेटेंना म्हणाले, ‘माझ्यासोबत प्रवीणचा सत्कार करत असशील तर मी येतो. मात्र प्रमुख पाहुणे विलासरावच हवेत. ’ ( गोपीनाथराव आणि मी केवळ खाजगीत एकमेकांना अरे-तुरे संबोधत असू. ) विनायकचा नकार असण्याचं कारणच नव्हतं . आता आठवतं त्याप्रमाणे मग या सन्मानासाठी नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी , तत्कालीन शासकीय अधिकारी श्रद्धा बेलसरे ( पूर्वाश्रमीची जयश्री खारकर ) , साखर उद्योगातील बी . जी . ठोंबरे अशा काही नावांवरही शिक्कामोर्तब करण्यात आलं .
पण , नंतर एक नाट्य घडलं . मुंबईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला आमचे तत्कालीन संपादक कुमार केतकर यांनी विरोध केला त्यामुळे विनायक मेटे आणि त्यांचे समर्थक प्रचंड संतापले . मेटेंच्या समर्थकांनी केतकरांच्या ठाण्यातल्या घरावर हल्लाच केला . ते प्रकरण खूपच पेटलं आणि लांबलंही . त्यात मराठवाडा भूषण प्रदानचा कार्यक्रमही लांबला . ‘हा सन्मान आता स्वीकारणार नाही ,’ असं मीही विनायक मेटेला सांगून टाकलं . असेच पाच-सहा महिने गेले आणि हा कार्यक्रम होण्याचं पुन्हा ठरलं . मी सहभागी होणार नसल्याचं आणि त्या मागचं कारण कळल्यावर कुमार केतकरांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं, ‘हा तुझ्या मातीतल्या लोकांकडून होणारा सन्मान आहे . माझ्यावरचा हल्ला आणि तुझा हा सन्मान या स्वतंत्र बाबी आहेत गल्लत करु नकोस.’ सांगितलं कसलं, केतकरांनी आदेशच दिला . विलासराव आणि गोपीनाथरावांनी तेच सांगितलं तेव्हा हे घडवून आणण्यामागे कोण आहे हे स्पष्ट झालं पण, या निमित्तानं कुमार केतकरांचा उमदेपणा मनाला भुरळ पाडणारा ठरला .
मुंबईत दादरमध्ये जंगी कार्यक्रम झाला ; नेमकी तारीख सांगायची तर २७ जून २००९ रोजी . एरव्ही उशिरा पोहोचणारे गोपीनाथराव आणि विलासराव वेळेत पोहोचले ; मीच उशिरा पोहोचलो . कारण मी मुंबईच्या ट्राफिकमध्ये अडकलो होतो . मी पोहोचल्यावर, ‘म्हणशील का मला आता लेट लतिफ ?’ असा टोला मुंडेंनी लगावला . सगळेच दणदणीत हसले . उपमुख्यमंत्री असतांना अफाट लोकसंपर्कामुळे तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या गोपीनाथरावांचा घड्याळाशी संबंध विच्छेद होत असे . शासकीय बैठका असो की, जाहीर कार्यक्रम गोपीनाथराव कुठेच दिलेल्या वेळेत पोहोचत नसतं . प्रशासनात त्यांचा खाजगीत उल्लेख ‘लेट लतीफ’ असाच होत असे ; उघड तसा उल्लेख करण्याचं धाडस मात्र अर्थातच कुणातच नव्हतं ! त्यांच्यासाठी विमान खोळंबवून ठेवण्याची वेळ अनेकदा येत असे . मी औरंगाबादला असतांना एकदा त्यांच्यासाठी असंच विमान थांबवून ठेवल्यावर ‘लेट लतिफ’ गोपीनाथ मुंडेंमुळे प्रवासी ताटकळले’ अशी बातमी मी दिली होती . त्याचा संदर्भ गोपीनाथरावांनी लगावलेल्या त्या टोल्याचा होता .
पुरस्कार वितरणाच्या नंतर सुरुवातीची चार भाषणं फारच रटाळ झाली . शेवटून तिसरं भाषण माझं होतं . सभागृहातले लोक चक्क जांभया देत होते . माझं पत्रकारितेविषयी गंभीर प्रतिपादन बाजूला ठेवून मी चौफेर फलंदाजी केली . कांही तत्कालीन राजकीय संदर्भ देत विलासराव आणि गोपीनाथरावांना खुशखुशीत शब्दांत टोले लगावले . सभागृहात हास्याच्या लाटा उसळू लागल्या कारण दस्तुरखुद्द विलासराव आणि गोपीनाथरावही त्या भाषणाला दाद देत होते . पुढे अपेक्षेप्रमाणे चढत्या क्रमानं गोपीनाथराव आणि विलासराव यांची भाषणं फर्मास रंगली ; राजकारण आणि पत्रकारितेतील मित्रांच्या भाषणांची ते एक जुगलबंदीच ठरली . त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोक अजूनही आम्हा तिघांच्या भाषणांची आठवण काढतात . विलासराव देशमुख यांच भाषण यु ट्यूबवार आहे पण ते अर्धवट आहे .
भाषणांची ती जुगलबंदी मराठवाड्यातही करावी असं आम्हा तिघांत ठरलं पण, ते पुढे जुळूनं आलंच नाही . आता विलासराव, गोपीनाथराव आणि विनायक मेटेही मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात निघून गेले आहेत . त्या प्रसंगीचे छायाचित्र मात्र माझ्यासोबत शिल्लक उरलं आहे . असे राजकारणी मित्र खरंच दुर्मीळ असतात ….
छायाचित्रात विनायक मेटे, मी , विलासराव देशमुख , गोपीनाथ मुंडे दिसत आहेत . या छायाचित्रात सुरेश वरपुडकर कसे काय आले ते काही आठवत नाही . विलासरावांसोबत हे माझं एकमेव छायाचित्र आहे म्हणून तर त्याबाबत मी जास्त गतकातर आहे .
■ प्रवीण बर्दापूरकर
Cellphone +919822055799