‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या दिवसांत कधीतरी नरेंद्र लांजेवारची ओळख झाली . त्याच काळात केव्हा तरी स्त्री अत्याचाराच्या विरोधात ठामपणे संघर्ष करणाऱ्या डॉ. सीमा साखरे यांनी बुलढाण्याजवळच्या सैलानी बाबा दर्ग्याच्या परिसरातील स्त्री शोषणाबद्दल लिहिलं होतं . त्या संदर्भात आम्ही दोघे तिघे पत्रकार अधिक माहिती घेण्यासाठी गेलो तेव्हा नरेंद्र लांजेवार दिवसभर आमच्यासोबत होता . तेव्हा तो तरुण होता आणि शिकत होता . बहुधा ग्रंथपाल म्हणून त्याची नोकरीही सुरु व्हायची होती . २००३मध्ये ‘लोकसत्ता’च्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या विदर्भ आवृत्तीचा मी प्रमुख झालो . वार्ताहारांच्या बैठकीच्या निमित्तानं बुलढाण्याला गेलो तर पुन्हा नरेंद्रची भेट झाली . ‘लोकसत्ता’चा बुलढाण्याचा वार्ताहार तेव्हा सोमनाथ सावळे होता . सोमनाथमुळे नरेंद्र लांजेवार माझ्या आणि ‘लोकसत्ता’च्या जणू परिवारातच सहभागी झाला . एव्हाना एक प्रयोगशील ग्रंथपाल आणि वाचन संस्कृतीच्या तळमळीचा प्रसारक अशी नरेंद्रची ओळख विदर्भाबाहेरही होऊ लागलेली होती .
नरेंद्र लांजेवार बुलढाण्याच्या भारत विद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करत होता . या विद्यालयाचे एक संस्थापक भय्यासाहेब आगाशे यांच्याशी ऐकेकाळी म्हणजे १९७०च्या दशकात माझा चांगला संपर्क होता . त्या काळात विधायक काम करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी भय्यासाहेब आगाशे आस्थेचं ठिकाण होतं . भारत विद्यालयात म्हणजे नरेंद्र एका प्रयोगशाळेतच आहे याची खात्री भय्यासाहेब आगाशे यांना ओळखणाऱ्या सर्वांना होती . नरेंद्र लांजेवारनं ती खात्री वास्तवात आणून दाखवली . भारत विद्यालयाचा हा ग्रंथपाल अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्धीस पावला ते त्या ग्रंथालयात राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे . विद्यार्थ्यांनी रांगा लावून पुस्तकं वाचायला मागावी , असं चित्र अख्ख्या महाराष्ट्रात दिसलं ते फक्त याच विद्यालयात आणि तेही नरेंद्र लांजेवार याच्यामुळेच .
ग्रंथालयाचं ग्रंथपालपद म्हणजे मासिक वेतन देणारी नोकरी आहे , असं नरेंद्रनं कधी मानलंच नाही . पुस्तकांवर त्याचं नितांत प्रेम होतं . लहान बाळाला जोजवावं तसं तो पुस्तकांची देखभाल करत असे . शाळकरी मुलांवरही नरेंद्रनं हाच संस्कार बिंबवला . शाळकरी वयातच जर वाचायची आवड निर्माण झाली तर ती कायम राहील आणि तो वाचन संस्कृतीचा मूळ संस्कार असेल , अशी ठाम धारणा नरेंद्रची होती . त्यामुळे शाळेतल्या मुलांवर त्यानं हा प्रयोग केला आणि तो मान्यताप्राप्तही झाला . त्या प्रयोगाचं कौतुक झालं , त्याला प्रसिद्धी मिळाली , नरेंद्रचं अभिनंदन झालं . इतर शाळांतही हा प्रयोग राबवण्याच्या ‘सरकारी बाता’ झाल्या पण , पुढे काहीच घडलं नाही . नरेंद्र लांजेवार ना सरकार होता ना शासनातला अधिकारी किंवा कर्मचारी , त्यामुळे टाकणं टाकावं तसं काही त्याच्याकडून पुस्तकावरचं प्रेम आणि वाचन संस्कृतीबाबत घडलं नाही . शालेय विद्यार्थ्यांवर वाचनाचा संस्कार करण्याचा त्याचा वसा त्यानं कधीच सोडला नाही .
मध्यम उंची , किंचित स्थूल शरीरयष्टी , अतिशय हसरा चेहरा , उत्सुकतेनं आकंठ भरलेले डोळे , त्यावर चष्म्याचं कवच आणि साधेसे कपडे असं नरेंद्र लांजेवारचं व्यक्तिमत्त्व होतं . त्याच्या वागण्या आणि बोलण्यात एक छानसं मूल कायमच दडलेलं होतं . शालेय मुलांशी समरस होण्याआधी हे मूल प्रगट व्हायचं आणि त्या मुलांमधलाच एक म्हणजे नरेंद्र असायचा . मुलांना मूल होऊन साभिनय कविता शिकवणारा , गोष्टी सांगणारा , गावात आलेल्या पाहुण्यांना त्या मुलांसमोर बोलतं करणारा नरेंद्र लांजेवार नसायचा तर त्याच्यातलं ते मूल असायचं . ते दृश्य पाहाणं हा एक अवर्णनीय आनंद असायचा .
नरेंद्र जसा प्रयोगशील ग्रंथपाल होता तसा लेखक , कवी , वक्ता , कार्यकर्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय चांगला वाचक होता . हे सगळं थोडं थोडं त्याच्यात होतं . खरं तर , त्याला या सर्वच क्षेत्रात खूप काही करायचं होतं पण , त्याचे व्यापच खूप होते . कार्यकर्ता असण्यामुळे चळवळीतला कुणीही कार्यकर्ता आला की त्याची सर्व काळजी घेण्याची जबाबदारी अर्थातच नरेंद्रवर असायची . लेखक , कलावंत किंवा अन्य कुणी मान्यवर आला की असंच घडायचं . बुलढाणेकरांचा पाहुणा बनून आलेल्यांची काळजी घेण्याचं काम नरेंद्र लांजेवार घरच्या भाकरी खाऊन समरसून करायचा . असं वागणं त्याच्यात जन्मजातच होतं . साहित्य आणि सामाजिक विषयावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात तो गढूनच जायचा . अशी अनेक सभा संमेलनं बुलढण्यात आयोजित करण्यात त्याचा कायमच निर्विष पुढाकार राहिला . यामुळे परिणाम व्हायचा तो त्याच्या लेखनावर .
बुलढाण्यासारख्या अतिशय आडवळणाच्या गावी राहूनही अशा स्वभावामुळे नरेंद्र लांजेवारचा गोतावळा राज्यभर पसरलेला होता . त्याची ओळख प्रयोगशील ग्रंथपाल आणि वाचन संस्कृतीचा कार्यकर्ता अशीच होती . शिवाय तो जणू बुलढाण्याला महाराष्ट्राशी जोडणारा सांस्कृतिक दूतच झालेला होता ! प्रयोगशील ग्रंथपाल , वाचन संस्कृतीच्या पालखीचा आघाडीवरचा भोई , तळमळीचा कार्यकर्ता , लेखक या अशा विविध भूमिकांतला महाराष्ट्रातला दादा माणूस म्हणून नरेंद्रचं नाव प्रस्थापित होतं गेलं आणि त्याचा जनसंपर्क आणखी वाढत गेला . त्यातून लष्करच्या भाकरी भाजण्याचे त्याचे व्यापही वाढत गेले . निरलस भावनेनं एखादा माणूस केवढा अफाट गोतावळा निर्माण करु शकतो याचं मनोहर उदाहरण म्हणजे नरेंद्र लांजेवार होता . मुंबई असो की नागपूर नरेंद्र कुणाला भेटायला गेला आणि त्याला फार वेळ वाट बघावी लागली , असं कधी घडतंच नसे .
भारत विद्यालय , प्रगती वाचनालय यासोबतच अनेक संस्था-संघटनांशी नरेंद्रची नाळ जुळत गेली . विदर्भ साहित्य संघ , साधना परिवार , अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशी कितीतरी नावं त्या संदर्भात सांगता येतील . या सगळ्या संपर्कातून राज्यभर बाल वाचनालयाची एक चळवळ उभी राहावी अशी त्याची खूप इच्छा होती . राजकारणातल्या अनेकांनी त्याला अनेकदा तशी आश्वासनंही दिली होती पण , राजकारणातली आश्वासनं म्हणजे पाण्यात निर्माण झालेले बुडबुडे असतात , हे न समजण्याइतका नरेंद्र लांजेवार भाबडा होता .
जतन करणं हीही एक नरेंद्र लांजेवारची सवय होती . विविध वृत्तपत्रांच्या पुरवण्या , विशेषांक , नियतकालिकांचे वेगवेगळ्या विषयाला समर्पित असणारे अंक असं बरंच काही त्याच्या संग्रही होतं . एकदा बुलढाण्याच्या वाचनालयातलं व्याख्यान संपल्यावर नागपूर पत्रिका या दैनिकाच्या रविवार पुरवणीचा विषय निघाला . एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला ती पुरवणी मंगला आणि मी सांभाळत असू . त्या काळात तसंही विदर्भाचं एक प्रमुख दैनिक ‘नागपूर पत्रिका’ होतं आणि आमची ‘साकवि’ ( साहित्य , कला , विज्ञान यंतीन शब्दांचं लघुरुप ! ) ही रविवार पुरवणी विविध विषय हाताळणीमुळे चर्चेत होती . ते दिवस मंतरलेले होते असं म्हणायला हवं . आमचं हे बोलणं सुरु होतं त्या दिवसात ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीत ‘नोस्टॉलजिया’ हा स्तंभ मी लिहित होतो . त्या स्तभांत ‘नागपूर पत्रिका’च्या त्या मंतरलेल्या दिवसांबद्दल मी लिहावं असा आग्रह नरेंद्रनं धरला . एव्हाना ‘नागपूर पत्रिका’ आणि ‘नागपूर टाइम्स’ ही दैनिकं बंद पडली होती ; बिल्डरनं तर त्या दैनिकांचे जुने अंक बल्लारपूर पेपर मिलला कधीचेच विकून टाकले होते . हे सांगितल्यावर ‘उद्या सकाळी मला विचारल्याशिवाय नागपूरचा प्रवास सुरु करु नका ,’ असं जणू वचनच नरेंद्रनं घेतलं . रात्री उशिरापर्यंत गप्पांची मैफिल रंगली तरी सकाळी साडेसातच्या सुमारास ‘नागपूर पत्रिका’ दैनिकाच्या ‘साकवि’ या रविवार पुरवणीचे पंचवीस- तीस अंक घेऊन नरेंद्र हजर झाला . पुढे मी त्या आठवणींचे चार-पाच लेख लिहिले . त्यात नरेंद्रनं दिलेले अंक वापरले शिवाय नरेंद्रच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला . तो उल्लेख वाचून हरखलेला नरेंद्र लांजेवार आजही डोळ्यांसमोर आहे . जतन करण्याच्या या वृत्तीमुळे संदर्भ पुरवण्यात तो तात्पर असायचा . त्याच्याकडे माहिती नसली तर ती मिळवून देण्यासाठी तो धडपड करायचा आणि महत्वाचं म्हणजे संदर्भ देतान लहान-थोर असं भेदभाव करणं नरेंद्रच्या स्वभावात नव्हतं .
‘अभिव्यक्तीची क्षितीजे’ , ‘अभिव्यक्तीची स्पंदने’ , ‘वाचू आनंदे परमानंदे’ , ‘विदर्भ राज्य ; आक्षेप आणि वास्तव‘ अशा अनेक पुस्तकांचं लेखन नरेंद्र लांजेवारनं केलं . ‘विदर्भ राज्या’वरच्या पुस्तकासाठी तो वणवण फिरला . त्यासाठी त्यानं खूप वाचन केलं . असंख्यांच्या मुलाखती घेतल्या आणि अखेर हा ग्रंथ सिद्ध केला . त्याच्या मनात लिहिण्याचे आणखी काही प्रकल्प होते पण , ते तडीस जाऊ शकले नाहीत .
अतिशोयोक्ती न करता सांगायचं तर नरेंद्र लांजेवार सर्वार्थाने साने गुरुजींचा पट्टशिष्य होता . निकोप मनानं माणसाकडे पाहाणं आणि तरीही स्पष्ट असणं , एकाच वेळी लहान मूल आणि प्रौढ माणूस म्हणून जगणं , व्यासपीठीय आणि कार्यकर्ताही असणं असे अनेक परस्पर नम्र विरोध नरेंद्र लांजेवारमध्ये होते . त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाला झळाळी आलेली होती . त्या सर्वच रुपात त्याला पाहतांना साने गुरुजींच्या साधेपणाची आठवण येत असे . नरेंद्र आणि त्याचा साधेपणा कायमचा पडद्याआड गेला आहे .
पत्रकार सोमनाथ सावळे आणि निगर्वी तसंच काहीसा भाबडा असणारा नरेंद्र लांजेवार हे दोघे जण बुलढाण्याला जाण्याचं माझं मुख्य निमित्त असायचं , ते आता नाहीत . निमित्ताचं अस्तित्वच कायमचं संपुष्टात आल्यानं , माहिती नाही यानंतर कधी बुलढाण्याला जाणं होईल की नाही आणि तिथल्या विश्रामगृहात पुन्हा गप्पांची मैफिल पुन्हा रंगेल की नाही ते …
■प्रवीण बर्दापूरकर