नोंद …१७
( लेखातील चित्रे प्रातिनिधिक आहेत )
आठवण तशी जुनी आहे ; जुनी म्हणजे झाली असतील ४५ ते ४८ इतकी वर्ष पण , मनात रुतून बसलेली आहे .
लक्ष्मण काळेचा फोन आला , तो म्हणाला , ‘नाना गेला’ .
डोक्यात वाजंत्री जोरजोरात वाजू लागली ती अजून वाजंत्री थांबतच नाहीये .
१९७०-७१ च्या शैक्षणिक वर्षात मॅट्रीक झाल्यावर शिक्षणाच्या आणि अर्थार्जनाच्याही पर्यायांचा विचार सुरु असतानाच तालुक्याच्या गावी नवे कला आणि वाणिज्य महाविद्यालय सुरु होत असल्याची बातमी झळकली .
तालुक्याचं गाव पाच – साडेपाच किमी , म्हणजे सोयच की .
लगेच कॉलेजच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली .
वाणिज्य शाखेत डिग्री घेतली की बँक , एलआयसी , पोस्ट यासारख्या तेव्हाच्या ‘हॉट’ खात्यात नोकरी मिळेल असं सांगण्यात आलं .
प्रवेश अर्जाला प्रॉस्पेक्टस म्हणतात हेही कळलं .
तेव्हा झेरॉक्सचा जन्मही व्हायचा होता मग , आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती काढून दुसऱ्याच दिवशी प्रवेश पक्का केला .
वाणिज्य शाखेतला माझा प्रवेश क्रमांक एक होता .
पाठोपाठ लक्ष्मण काळे आणि नाना असे तीन विद्यार्थी वाणिज्य शाखेत प्रवेश करते झाले .
घरी खाण्यापिण्याची ददात नसलेले पण , शिक्षणासाठी जिल्ह्याच्या गावी जाऊन खर्च करण्याची ऐपत नसणाऱ्या शेतकरी वर्गाचे हे दोघेही प्रतिनिधी होते . वयानी तेव्हा बावीशी – तेवीशीतले .
लक्ष्मण तर एका मुलाचा पिता होता पण , शिक्षणाची ओढ ही समान बाब होती .
नानाचं आणि माझं वास्तव्याचं गाव तालुक्यापासून एकाच अंतरावर पण , वेगळ्या दिशांना .
नानाचे वडील समाजवादी की प्रजासमाजवादी पक्षाचे कार्यकर्ते .
तोच संस्कार नानात आणि त्यामुळेच राष्ट्र सेवा दल , साधना , एस . एम. जोशी , ना . ग . गोरे , अनंतराव भालेराव-मराठवाडा वगैरे कानावर पडले , वाचले गेले , रुजले .
वाजंत्री हा नानाचा खास शब्द .
म्हणजे नाना कशालाही वाजंत्री म्हणणार .
कोणत्याही लेक्चरला जायचं असेल तर , त्या विषयाची वाजंत्री वाजवू किंवा चहाची वाजंत्री पिऊ , विल्स फ्लेकची वाजंत्री ( म्हणजे धूर ) काढू .
याची वाजंत्री वाजवू किंवा ऐकू किंवा अगदी अमुक अमुक चित्रपटाच्या वाजंत्रीला जाऊ वगैरे .
पहिल्या भेटीतच त्याचं वाजंत्री प्रकरण आमच्या लक्षात आलं .
आम्ही तिघंही तेव्हा एकमेकांना अहो , जाहो करत होतो तर नाना म्हणाला , ‘हे अगदी नेमाड्यांनी कोसला लिहिण्यासारखं वाटतंय . आपण आता मित्र आहोत , अरे–तुरेच्या वाजंत्रीतच आपण बोललो पाहिजे .’
इथे लक्ष्मण आणि माझी पुन्हा वाजंत्री झाली कारण , नेमाडे वगैरे आम्हाला माहिती नव्हते .
पहिल्या काही दिवसातच आम्ही नानाला ‘वाजंत्रीवाले’ म्हणायला सुरुवात केली . त्याचं कारणही तसंच घडलं .
नानाचे वडील कोणत्या तरी मागणीसाठी नेहमीप्रमाणे मोर्चा काढणार होते .
नाना म्हणाला , ‘ चला बापाच्या वरातीत वाजंत्री वाजवून येऊ . नाही तरी गर्दी
नसणारच . आपलीही चहा , वडा आणि फुंकणीची वाजंत्री होईल .’
वडिलांच्या नावाने वाजंत्री वाजवण्याच्या कल्पनेने आम्ही लोट – पोट हसलो आणि नानाचे नाव वाजंत्रीवाले ठेवून दिलं !
नानाचं वाचन अफाट . त्याच्यामुळेच गांधी , मार्क्स , साधना , विवेक , सोबत , माणूस आणि मराठवाडा ही साप्ताहिकं ; अनेक लेखक आम्हाला कळले .
परीक्षा घ्यावी तसे नानांनी ते आमच्याकडून वाचवूनही घेतले .
कॉलेजात साहित्य ते मोर्चा अशा सर्व आघाड्यांवर आमची गँग आघाडीवर .
लक्ष्मण आणि मी नेतृत्वात पुढे तर नाना तयारीत ; आजच्या भाषेत सांगायचं तर नाना आमची सपोर्ट सिस्टिम .
आम्ही काहीही आयडिया काढाव्यात आणि लढवण्यात…नानानी ठामपणे पाठीशी उभं राहावं .
आम्ही उचापती कराव्यात आणि कोणतीही तक्रार न करता नानानी त्या निस्तराव्यात .
असं तीन वर्षे चाललं .
यातही नानाला ‘भान’ नावाची खुजली सॉलीड असायची ; म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असेल अन् मदत कर म्हटले तर तो विचारणार ‘भाषण कुणाचं ? तुझं का लक्ष्मणच ? ’
‘का रे? ’ आपण विचारलं तर नाना चेहऱ्यावरची सुरकती न हलवता सांगणार , ‘तुझ्या भाषणाला टाळ्या हाणणारे आणले की पुरे . कारण तू बामणी बोलतो ते सर्वांना कळत नाही , टाळ्या पुरे ! लक्ष्मण असेल तर तो बोलतो ते सगळ्यांना समजतं . त्याच्या भाषणाला कुणालाही पकडून आणता येतं !! ’ असं हे .
आम्ही फर्स्ट इअरला असताना प्रिन्सिपॉल हटावसाठी जोरदार आंदोलन केलं .
नाना नेहमीसारखा पोस्टर रंगवण्यापासून पाठीशी उभा .
चांगलं दहा – बारा दिवस कॉलेज बंद पडलं .
प्रिन्सिपॉल बदलले गेले , जल्लोष झाला .
चार–पाच दिवसांनी नानानी सगळ्या गँगला त्याच्या गावी जेवायला बोलावलं . सायकली हाणत आम्ही गेलो .
नानाकडे पोहोचलो आणि चाट पडलो . कारण , तिथे ज्यांच्याविरुद्ध आंदोलन केले ते प्रिन्सिपॉल xxx हजर !
‘आंदोलन झालं , त्यांची बदली झाली , आपली दुष्मनी संपली,’ असा त्यावर नानाचं उत्तर आणि आम्ही एकदम गपगार !
♦♦♦
पुढे आम्ही पांगलो .
फक्त् लक्ष्मण सी.ए. आणि पुढे एलएलएम झाला , मुंबईत स्थिरावला ; मी
पत्रकारितेत शिरलो ; नाना गावीच राहिला .
त्याच्या निष्ठा ठाम होत्या . आमदार होऊन त्याला तालुक्याचा विकास करायचा होता .
त्यासाठी तिथेच राहून राजकारण करणं सोयीचं होतं , वगैरे वाजंत्री तो वाजवायचा .
जिल्हा परिषदेच्या एका निवडणुकीत तो विजयीही झाला . जनता पक्षाच्या बहराचे दिवस होते ते .
कुठल्यातरी समितीचा सभापतीही झाला .
मग त्याला विधानसभेची उमेदवारीही मिळाली .
दरम्यान जनता पक्षाचा बहर ओसरला होता अगदे खरं सांगायचं तर , त्या पक्षावरचा लोकांचाच विश्वास उडाला होता .
साहजिकच विधानसभा निवडणुकीत सेनेचा उमेदवार विजयी झाला .
नानाची पार वाजंत्री वाजली !
विश्वासार्हता पुरती ओसरलेली नसल्यानं नानाचं डिपॉझिट वाचलं , हेही समाधान कमी नव्हतं !
♦♦♦
नंतर दहा एक वर्षांनी म्हणजे २००५च्या शेवटाला , नाना भेटला तो एकदम मुंबईतच .
मराठवाड्यातल्या एका राज्यमंत्र्यांचा पी. ए. म्हणून .
तसा बऱ्यापैकी झकपक म्हणजे अंगावर सफारी , हातात बऱ्यापैकी महागडा मोबाईल , हातात २/ ३ जाड्या अंगठ्या , तोंडात गुटख्याची गुळणी वगैरे .
मधला काळ म्हणजे जणू एक रिकामी पोकळीच होती .
अशाच भेटी–गाठीतून जुने दिवस पुन्हा आठवले .
जन्म बालपण आणि कळतेपणाची मुळं गावखेड्यातल्या मातीत रुजलेली असलेली आणि फळं–फुलं शहरात आलेली असलेली तरी मृदगंध आठवणींच्या त्या प्रदेशात फार लवकर घेऊन जातो , असं जे म्हणतात ते किती खरं आहे , याचा अनुभव पहिल्या ५ / ७ भेटीत आला .
आठवणींच्या त्या प्रदेशात मुंबईला स्थान नव्हतं .
नानाची वाजंत्री सतत गावची गाणी वाजवायची आणि मुबईतलं त्याचे परकेपण आणखी गडद व्हायचं .
‘काँग्रेसद्वेष्टा असूनही ही नोकरी का पत्करली ?’ या प्रश्नाला उत्तर देताना हताशपणे नाना म्हणाला , ‘गावात हिरवी झाडं आणि बोडका डोंगर सोडला तर शेतीत पोटापुरती चार शितंही मिळणं मुश्किल होत चाललंय . खेड्यातला माणूस एकदम नाही पण दररोज, गुंजेएवढा मरतोय . पर्यायच नव्हता ही तडजोड स्वीकारण्याशिवाय. ’
हे असंच चालत राहिलं .
हार्टअटक आला म्हणून नानाला दाखल केल्याचं कळलं .
भेटायला गेलो तर त्यानं गावी जाऊ देण्याची वाजंत्री सुरु केली .
डॉक्टरांशी बोललो .
‘सर्दीचं माहितीये ना? ’ डॉक्टरांनी विचारलं
आणि आम्ही बाळवटासारखी नकारार्थी मान हलवली .
‘ त्याचं काय , तो डॉक्टर म्हणाला , औषधं घेतलं तर सर्दी सात दिवसांत बरी होते आणि नाही औषध घेतलं तर सर्दी आठवडाभरात जाते . तसं या पेशंटचं आहे . ऑपरेशन करा न करा …’ त्यानी वाक्य अर्धवट तोडलं .
यावेळी बावळटपणा करणं आम्ही तरी शक्यचं नव्हतं .
आणखी ४/५ एक्सपर्टकडे गेलो आम्ही . सर्वाचं ‘ओपिनियन’ सेम टू सेम होतं . आमच्या मित्राच्या आयुष्यासाठी प्रथमच एकापेक्षा जास्त डॉक्टर्स एकमतावर येण्याचा हा दुर्मिळ प्रसंग होता .
असल्या नसल्या सगळ्या धीराची पोतडी बांधून तिची धीराने वाजंत्री वाजवत नानाला भेटलो . सगळं समजावून सांगितलं .
खरं तर आम्ही खूपच रडवेले झालेलो .
त्याही प्रसंगी ‘आनंद’ हा चित्रपट आठवून मी म्हणलो नानाला , ‘तू आनंदसारखा आनंदात वाजंत्री वाजवत रहा हॉस्पिटलमध्ये .’
एक मोठा पॉझ घेतल्यानंतर नाना म्हणाला , ‘याचा अंदाज आला थोडासा तुमच्या
धावपळीवरुन . आता मला घरी जाऊ द्या . शेतातल्या आंब्याखालीच मी वाजंत्री वाजवेन आता . शिकणं , नोकरी , राजकारण , विधायक काम उभारणं काहीच जमलं नाही , आता शेवटची वाजंत्री तरी मनासारखी जमू द्या. ’
सर्वांचा आग्रह मोडून तो गावी परतला .
सुरुवातीला दररोज दोनदा , मग हळूहळू दिवसातून एकदा , त्यानंतर आठवड्यातून एकदा फोनवर गप्पा होत . फोनवर आंब्याचं झाड , वासरु , डोंगर , पीक अशी नानाची वाजंत्री वाजत असे .
हळूहळू ती वाजंत्री टेपसारखी वाजू लागली .
विचारपूस कमी झाली .
एक दिवस झाडावरुन पान गळालं पण , मुळांना त्याचा स्पर्शही जाणवलाच नाही की झाडालाही पान गळाल्याचं कळलं नाही .
तेव्हापासून डोक्यात , मनात नाना नावाची वाजंत्री अजूनही कधी कधी ढुशी मारते , कल्लोळ मांडते…
( नाना हे नाव काल्पनिक असून बाकी हकीकत पूर्ण सत्य आहे …)
© या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत
–प्रवीण बर्दापूरकर
( २३ नोव्हेंबर २०२० )
Cellphone +919822055799 / www.praveenbardapurkar.com / praveen.bardapurkar@gmail.com