नोंद …१९
निर्व्याज मैत्रीच्या बहरलेल्या झाडावरुन अशोक प्रभाकर मोटे नावाचं एक नक्षीदार पान अचानक गळून पडलं आहे …ते माजी सैनिक म्हणजे सेवानिवृत्त विंग कमांडर होते याचा जेवढा त्यांना अभिमान होता त्यापेक्षा किंचित जास्त , ते एक छान व संवेदनशील माणूस होतेअसा माझा अनुभव आहे . वृत्तपत्रांच्या आवृत्त्या वाढल्या , खपही वाढले . मात्र , वृत्तसंकलनाचा अवाका संकुचित झालाय , असं जे माझं प्रतिपादन आहे त्याला समर्थन मिळाले आहे ते अशोक मोटे यांच्या मृत्यूची बातमी नागपूरच्या वृत्तपत्रांपुरतीच मर्यादित राहिली त्यावरुन . ( त्यातही हितवाद आणि महाराष्ट्र टाईम्स वगळता आणि वृत्तपत्रातल्या बातम्यात पत्रकारितेसाठी आवश्यक असणारं सांस्कृतिक भान दिसलं नाही…असो . ) काही माणसं आपल्या आयुष्यात येतात ती आपल्या विचारांची नसतात तरीही जीवाभावाची बनतात . अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी येते आणि मग आठवणींचे दिवे भरल्या सांजवेळी मंदपणे तेवत राहतात .
वर्ष बहुधा १९८८ असावं . तेव्हा अशोक मोटे यांची लोकप्रियता कळसाला पोहोचलेली होती . वायुदलात बडे अधिकारी , वायुदलांच्या हवाई कसरतीचं हिंदी आणि मराठी समालोचन करणारे एकमेव समालोचक , कथालेखक , हवाई छायाचित्रणात निष्णात असणारा एक उमदा माणूस असा त्यांच्या त्या लोकप्रियतेचा परीघ होता . राष्ट्रपती , उपराष्ट्रपती , पंतप्रधान आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या विमान वाहतुकीचं सारथ्य करणारे वैमानिक , ही मोटे यांच्या लोकप्रियतेची झळाळती झालर होती . वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट किंवा पुलगावच्या एका घटनेचा संदर्भ अशोक मोटे यांच्याशी झालेल्या ओळखीशी आहे . घडलं असं की , रेल्वेच्या बेपर्वाईमुळे एका माणसाचे दोन्ही पाय कापले गेले . चूक मान्य करुनही रेल्वे खातं नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होतं . हे कानी आल्यावर त्या कुटुंबाला अशोक मोटे भेटले . कर्ता पुरुषच अपंग झाल्यानं ते कुटुंब अतिशय विपन्नावस्थेत होतं . त्यांना मदत मिळावी यासाठी मोटे यांनी प्रयत्न सुरु केले . तो अपंग माणूस , रेल्वे आणि अशोक मोटे असो तो बातमीचा त्रिकोण होता . त्यावेळी अशोक मोटे वास्तव्यासाठी दिल्लीत होते . त्यांनी ही बाब तत्कालीन खासदार मधू दंडवते यांच्या कानी घातली . मधू दंडवते यांना आम्ही नानासाहेब म्हणायचो . नानासाहेबांनी चिवटपणे पाठपुरावा केला आणि अखेर त्या गृहस्थांना मोठी आर्थिक मदत मिळाली . एका भेटीत नानासाहेब दंडवते यांनीच ही हकीकत मला सांगितली , त्यासंदर्भात मोटे यांनी दाखवलेली संवेदनशीलता कौतुकानं कथन केली . ही कथा ’बेपर्वाईच्या चौकोनाची माणुसकीची चौथी बाजू‘ अशा कांहीशा शीषकाखाली ती मी खूप इन्व्हॉल्व होऊन लिहिली होती . ती वाचल्यावर अशोक मोटे भेटायला आले तेव्हा कार्यालयातल्या असंख्य नजरात उजळलेले मत्सराचे दिवे अजूनही आठवतात . तेव्हापासून मोटे यांच्याशी मैत्रीचा सिलसिला सुरु झाला तो दोन आठवड्यापूर्वी आलेल्या त्यांच्या फोनपर्यंत्त सुरु होता…
मध्यम उंची , किंचित स्थूल बांधा , सावळा वर्ण , उत्सुकतेनं तुडुंब भरलेले डोळे , भालप्रदेश थोडा जास्त पसरलेला त्यामुळे आतमध्ये सरकलेले आणि भुरभुरणारे डोईवरचे केस , अतिशय टापटीप राहणी आणि श्रवणीय रसाळ वाणी ( खरं तर अखंड बडबड ! ) ही अशोक मोटे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये . मराठीसोबतच हिन्दी , संस्कृत आणि इंग्रजीवर हुकमत तसंच उर्दूची चांगली जाणकारी त्यांच्या वाणीला साज चढत असे . बोलताना अनेकदा उर्दू शेरचा दाखला ते अगदी सहज देत असत . मोटे कुटुंबीय ‘बॉर्न अण्ड ब्रॉटअप’ नागपूरकर . वडील प्रभाकर मोटे शासकीय अधिकारी आणि आई शोभा आकाशवाणीच्या नागपूर केंद्रात नोकरीला . अतिशय सुविद्य लाघवी तसंच वाचक आणि रसिक असं हे दाम्पत्य होतं . त्यांचे सर्व गुण अशोक मोटे यांच्यात वैपुल्याने आले .
शिक्षण आटोपल्यावर ठरल्याप्रमाणे अशोक मोटे वायुदलात गेले , पायलट झाले . पुढे विंग कमांडर झाले . जवळजवळ ३० वर्षे वायुदलात नोकरी करताना १२ हजारापेक्षा जास्त तास त्यांनी ‘पायलटगिरी’ केली . वायुदलात तेव्हा असलेल्या सर्व विमानांच्या उड्डाणाचा अनुभव असणारे मोजक्या भारतीय पायलटपैकी ते एक होते . १९६५ आणि ७७ च्या युद्धात ते सक्रिय होते . शिवाय हवाईदलाच्या अनेक महत्त्वाच्या मोहिमात त्यांचा सक्रिय सहभाग होता . कमी उंचीवरुन विमान उडवत शत्रूपक्षाच्या प्रदेशाची टेहेळणी हे त्यांचं वैशिष्ट्य होते . अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या विमानाचे पायलट म्हणूनही त्यांनाच पहिली पसंती मिळत असे . सहाजिकच अशोक मुटे यांच्याकडे असंख्य किस्से आणि अस्सल आठवणी होत्या . मात्र , त्या आठवणींची पोतडी त्यांनी सैलपणे कधीच सर्वांसमोर उघडी केली नाही . त्या आठवणीमागे दडलेल्या गुपितांचं मोल एक सैनिक म्हणून त्यांना पक्कं ठाऊक होतं . हिंदुत्ववादी असण्याआधी ते एक निष्ठावान सैनिक होते आणि त्या निष्ठेच्या संदर्भात कोणतीही तडजोडीची भावना त्यांच्या मनात नव्हती . कधीकधी गप्पात कांही आठवणी त्यांनी सांगितल्याही पण , त्याची वाच्यता न करण्याचा त्यांच्याशी तेव्हा केलेला वादा न विसरता , मीही त्या आठवणींची वाच्यता त्यांच्या मृत्यूनंतरही करणार नाही…च .
राष्ट्राभिमानी सैनिक असलेल्या अशोक मोटे यांचं व्यक्तिमत्त्व ‘रसिक’ या शब्दासाठीच होतं . ते लेखक , वाचक , श्रोते , हवाई छायाचित्रकार , समालोचक आणि अतिशय वेधक शैली असलेले कथनकारही होते . आता गतस्मृतीत जमा झाल्याची दाट पुटं चढलेल्या धर्मयुग आणि इलेस्ट्रेटेड विकली यासह अनेक दैनिकं , नियतकालीकांसाठी त्यांनी लेखन केलं . ( त्या दैनिकात , मी आधी निवासी आणि नंतर पूर्ण संपादक झालेल्या ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचाही समावेश आहे . फोनवर जरी लेखनाचं आवतण दिलं तरी ठरलेल्या मुदतीच्या आंत अशोक मोटे मजकूर घेऊन हजर होत ! ) महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं विकत घेऊन वाचण्याचा वसा त्यांनी स्वीकारलेला होता . मैत्री घनगर्द असूनही माझं कोणतंही पुस्तक सप्रेम भेट म्हणून त्यांनी स्वीकारलं नाही , विकतच घेतलं . हा अनुभव अनेक लेखकांना आलेला असेलच . अशोक मोटे यांच्या वाचनाचा अवाका मोठा होता . हवाईशास्त्र आणि युद्धापासून ते कथा –कवितेच्या प्रांतापर्यंत त्यांचा वाचक आणि लेखक म्हणून चौफेर संचार आणि व्यक्तिश: संपर्कही होता . नागपुरात आलेला हिन्दी-मराठीतला कुणी बडा साहित्यिक-कलावंत अशोक मोटे यांना ओळखत नाही , असं कधी अनुभवायला मिळालं नाही . सेवानिवृत्तीनंतर तर नागपूरच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाचे अशोक मोटे स्वखुषीने नियमित वारकरी बनलेले होते . कार्यक्रमांची वारी करता-करताच पाहुण्यांना पोहोचवणे किंवा आणणे किंवा कार्यक्रमाच्या अन्य तयारीतही स्वत:ही सहभागी होण्याचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता . अशा कार्यक्रमानंतर रंगणाऱ्या मंतरलेल्या सोनेरी पाण्यासोबतच्या मैफिलतही अशोक मोटे सहभागी होत पण , त्या पाण्याला कधी त्यांनी स्पर्श केल्याचं आठवत नाही . यजमान आणि पाहुण्यांची विमानं हवेत उडाली की , त्यांना घरी पोहोचतं करण्याची जबाबदारी मात्र अशोक मोटे भक्तिभावानं पार पाडत असल्याचा अनुभवही अनेकदा आलेला आहे .
मराठीत युद्धकथा लेखन सर्वांत आधी कुणी सुरु केलं , याविषयी विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात नेहमीच प्रवाद आहे . विदर्भातून डॉ . विनय वाईकर आणि अशोक मोटे यांची नावं युद्धकथा लेखनाच्या बाबतीत अग्रक्रमानं घ्यावी लागतील . अशोक मोटे यांनी त्यापुढे जाऊन हवाई उड्डाणाचं अपरिचित जग शब्दांत मांडलं , याबद्दल शंकाच नाही . हे लेखन करताना रामायण ,महाभारतासोबतच भारतीय संस्कृतीतल्या विविध दंतकथा आणि परंपरांचा चपखल उपयोग त्यांनी करुन घेतला . वायुसेनेत असतानाच म्हणजे १९७० च्या आसपासचं अशोक मोटे यांनी हवाई छायाचित्रणाचा प्रारंभ केला . त्याही क्षेत्रातले ते पहिलेचं शिलेदार म्हणायला हवे . विनय वाईकर काय किंवा अशोक मोटे काय या दोघांनीही या क्षेत्रात मराठी माणसानं केलेल्या पहिल्या वहिल्या मुशाफिरीचं मार्केटिंग कधीच केलं नाही आणि अपरिचित दालनाविषयी त्यांच्याकडून झालेल्या लेखनाची समीक्षकांनीही तोंड देखलीही नोंद घेतली नाही , तरी लेखनातला आत्मानंद वाईकर आणि मोटे यांनी जास्त महत्वाचा मानला .
गप्पीष्ट स्वभाव असल्यानं अशोक मोटे अर्थातच मैफिलबाज होते . मात्र , कुठे गप्प बसावं , कुठे कमी बोलावं आणि कुठे मैफिलीची सूत्रं हाती घ्यावीत , याचं अचून भान त्यांना होतं . एखाद्याशी मैत्री झाली की , त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी सख्य जुळवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती आणि एकदा हे सख्य जुळलं की , ते कधीच शक्यतो तुटू न देण्याचं कौशल्य वाखाणण्याजोगं होतं . समोरचा वयानं लहान असला तरी नियमित संपर्क साधण्याची , क्षेमकुशल विचारत गप्पा मारण्याची त्यांची शैली दाद देण्यासारखी होती . त्यांचं हे ‘वेडेपण’ लोभसपणे त्यांच्या शब्दातून व्यक्त होत असे .
अशोक मोटे हिंदुत्वादी आणि मी समाजवादी पण , आमच्यात दुरावा कधीच निर्माण झाला नाही . परस्परांत वाद मात्र भरपूर झाले पण ,
तुझ्या अथांग गंगेचे
पाणी वाहू दे निर्मळ
अशी आमची मैत्री होती . माझ्या लेखनाचे ते कायमच चाहते राहिले . हिंदुत्ववादी असूनही डोळस भाजपवादी असणं हे अशोक मोटे यांचं एक खास वैशिष्ट्य ; त्यामुळे साहजिकच भाजपच्या अनेक नेत्यांच्या वर्तन आणि व्यवहाराविषयी त्यांची मतं , त्या गोटात न रुचणारी होती . भिन्न राजकीय भूमिका असणाऱ्या दिल्लीपासून ते नागपूरपर्यंतच्या असंख्यांशी अशोक मोटे यांच्या मैत्रीचा धागा घट्ट होता . ए . बी . बर्धन ते वीणा आलासे , ग्रेस ते वसंत वाहोकर , मामासाहेब घुमरे ते श्रीपाद अपराजित …असा त्यांच्या या लोभाचा अत्यंत व्यापक पट होता . त्यात कोणतीही कृत्रिमता नव्हती . काही तरी घेण्यादेण्याची हाव नव्हती आणि कुठल्या बांधिलकीच्या सीमा त्यात नव्हत्या . मैत्री नावच्या समान धाग्यांनं अशोक मोटे सर्वांशी जोडले गेलेले होते . मात्र , त्यांचा एखाद्याविषयी काही समज/गैरसमज झाला तर तो दूर करता येणं फार कठीण असे . काही लेखक-कलावंताविषयी त्यांची मतं अत्यंत कडवट होती आणि त्यांच्यापासून स्वत:ला लांब ठेवण्याचा प्रयत्न ते कटाक्षाने करत .
एक सांगायला पाहिजे , सेलफोन , इंटरनेट , डिजिटल अशा सध्या अपरिहार्य असलेल्या तंत्रज्ञानावर अशोक मोटे यांचा विश्वास नव्हता . एकतर प्रत्यक्ष भेटावं किंवा दूरध्वनीवर बोलावं , असा त्यांचा खाक्या होता . त्या खाक्यानुसारच आम्ही संपर्कात होतो . आता तर अशोक मोटे कायमचे संपर्क कक्षेच्या बाहेर निघून गेले आहेत . माझी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येकाचं नाव घेऊन अगत्यानं चौकशी करणारा , आशीर्वाद देणारा अशोक मोटे यांचा फोन यापुढे येणार नाही . जगण्याच्या ओंजळीतून अशोक मोटे अलगद निसटून गेले आहेत…भावना वहिनींच्या दु:खात सहभागी होण्याशिवाय दुसरा पर्यायच आपल्याकडे नाहीये…
( अशोक मोटे यांची छायाचित्रे विनोद लोकरे , विसा बुक्स नागपूर यांच्या सौजन्याने )
–प्रवीण बर्दापूरकर
( २८ डिसेंबर २०२० )
© या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत
Cellphone +919822055799 / www.praveenbardapurkar.com / praveen.bardapurkar@gmail.com