( बलवंत वाचनालयाची माझ्या मनातली ‘ती’ वास्तू . छायाचित्र सौजन्य- आशा कोरान्ने )
||१||
बलवंत वाचनालय ९९ वर्ष पूर्ण करुन १००व्या वर्षात पदार्पण करणार , ही बातमी वाचली आणि वयाचे किती उन्हाळे पावसाळे उलटून गेले ते जाणवलं , कारण बलवंत वाचनालयाशी असलेली नाळ माझ्या बाल आणि तरुण वयातली आहे .
१९६६ सालच्या एका थंडीतल्या संध्याकाळी आम्ही औरंगाबादला आलो . एवढं मोठं गाव पहिल्यांदाच बघितलं म्हणून कांहीसा बुजून गेलेलो होतो . अण्णा म्हणजे माझे वडील उद्योग खात्यात नोकरी करत होते . दोन दिवसांनी अण्णा कार्यालयातून घरी आले . चहा झाल्यावर म्हणाले ‘चल आपण बलवंतमध्ये जाऊ’ . मला कांहीच कळलं नाही पण , सायकलवर बसायला मिळणार या अप्रुपापोटी त्यांच्यासोबत गेलो . झाडाच्या सावलीत विसावलेल्या , आंत जाणाऱ्या वाटेवर फुलांच्या कुंड्या शिस्तबद्ध मांडलेल्या , एका टुमदार इमारतीच्या समोर त्यांनी सायकल लावली . सायकल चालवतांना विजारीला लावलेले गोल चिमटे काढून सायकलला अडकवले . आत गेलो तर खूप पुस्तकं होती आणि एका हॉलमध्ये जरा उंच असणाऱ्या उतरत्या टेबलावर वृत्तपत्रे लावलेली अनेक लोक शांतपणे वाचत होते . अण्णाही वाचनात गुंगले . थोड्या वेळानं त्या शांततेला कंटाळूनच मी बहुदा परत जाण्याचा तगादा लावला असावा . अण्णांनी मला व्हरांड्यात आणून सोडलं आणि सांगितलं, ‘खेळ इथं तू , मी आलोच’ . मग रस्त्यावरची वर्दळ बघण्यात मी गुंगून गेलो . रस्ता म्हणजे पायी जाणारी माणसं आणि बैलगाड्या एवढंच मला माहिती होतं . शिस्तीत पायी जाणारी टिपटॉप कपडे घातलेली माणसं , ये-जा करणारे सायकलस्वार , टांगे आणि क्वचित जाणारी एखादी मोटार अशी वर्दळ म्हणजे शहरातला रस्ता , हे औरंगाबादला आल्यावरच कळलं ; ते बघण्यात मी गुंगून गेलो . नंतर असं आठवड्यातून ४/५ वेळा घडू लागलं . त्या इमारतीत मीही सराईतपणे वावरु लागलो . बलवंत वाचनालयाशी माझ्या झालेल्या पहिल्या ओळखीची अशी लख्ख आठवण आजही माझ्या स्मरणात आहे .
हळूहळू बलवंतमधे मीही वाचायला लागलो . विशेषत: रविवारच्या पुरवण्यात बालकांसाठी येणाऱ्या मजकुराची गोडी अण्णांनी लावली . हळूहळू मी क्रीडा वगैरे करत मुख्य दैनिकांकडे वळलो . साप्ताहिक स्वराज्य पहिल्यांदा मी इथेच वाचलं . त्यातल्या कथा जाम आवडत . एक कथा तर अजूनही अंधुक आठवते- एसटीच्या एका चालकाला बस चालवतानाच हृदयविकाराचा त्रास होतो पण , त्याही स्थितीत तो बस इप्सित स्थळी पोहोचवतो आणि मगच स्टीअरिंग व्हिलवर कोलमडून प्राण सोडतो , अशी त्याच्या कामावरील अविचल निष्ठेची ती कथा होती . मग वेळ मिळेल तसं बलवंतमधे जाऊन , कांही कळो अथवा न कळो वाचण्याचं वेडच मला लागलं . दैनिक ‘मराठवाडा’चा पहिला अंक मी बलवंतमधेच वाचला . लोकसत्ता , मराठा , सकाळ , टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकांची ओळखही इथलीच . इलेस्त्रेड विकली , माधुरी , श्री , अमृत , विचित्र विश्व अशा अनेकांचीही जान-पहेचान इथलीच . या वाचनानं माझी भाषा विकसित होत गेली . अजूनही आठवतं- या वाचनानं शाळेत माझं मराठी इतर मुलांच्या तुलनेत चांगलं असायचं . मराठी साहित्य संस्थांच्या व्यवहारात आता एक बडं प्रस्थ असलेले डॉ . दादा गोरे आम्हाला विज्ञान वर्धिनी शाळेत मराठी शिकवत असत . मला त्यांच्या विषयात पन्नास पैकी कायम ४०/४२ गुण मिळत आणि त्याचं कौतुक दादा गोरे यांना असे . मी दररोज बलवंतमधे जातो असं मी त्यांना मोठ्या ऐटीत सांगितलं होतं !
आमच्या घराला वाचनाचं संस्कार आणि छंदही होता . ते आम्हा भावंडाचं संचित आहे . वडिलांचा भर मराठी-इंग्रजी-उर्दू वृत्तपत्रे , साप्ताहिकं आणि मासिकांवर असायचा . माई म्हणजे माझी आई मात्र पुस्तकं वाचत असे . ती कामात असली की अनेकदा वाचून दाखवण्याची जबाबदारी माझ्यावर असे . माईची शिक्षा म्हणजे पाण्याच्या पितळेच्या पिंपात उभं करुन पाठांतर करायला लावणं अशी असे . बलवंत वाचनालयानं माझ्या या वाचनाच्या संवयीत भरच घातली . पुढे बलवंत वाचनालय निर्मितीची गरज का निर्माण झाली , त्यातून केवळ वाचन नाही तर देशभक्तीचाही संस्कार कसा रुजवला गेला , आ. कृ. वाघमारे यांचं हे वाचनालय उभारण्यातलं योगदान समजलं . अर्थात माझी पिढी तो काळ ओलांडून खूप नंतर जन्माला आलेली . आमच्यावरच्या वाचन संस्काराला फुलवण्यात बलवंत आणि पुढे तशा अनेक वाचनालयांचा मोठा हातभार लागलेला आहे ; त्या अर्थानं माझ्यासारख्या अनेकांसाठी बलवंत सारखी वाचनालये संस्कारालय सुद्धा आहेत . नोकरी मिळत नसल्याच्या निराश मूडमधेही हेच बलवंत वाचनालय माझ्यासाठी झुळूक असायची ; वाचण्यात गढून गेलो की ती निराशा लांब पळून जात असे .
वाचनाच्या याच ओढीतून पुढे मी सरस्वती भुवन महाविद्यालयात उन्हाळ्यात होणारा ग्रंथालय शास्त्राचा दीड महिन्यांचा कोर्स केला . नंतर पदवी मिळवल्यावर ग्रंथालय शास्त्रात पुढचं शिक्षण घेतलं . याही काळात बलवंत वाचनालयानी मला आधार दिला . पण , दोन वेळा संधी मिळूनही मी शासकीय सेवेत ग्रंथपाल झालो नाही तर पत्रकारितेत शिरलो आणि स्थिरावलोही . १९७८साली पत्रकारिता करण्यासाठी मी औरंगाबाद सोडलं आणि बलवंतशी असलेला संपर्क तुटला . मध्यंतरी औरंगाबादला बदलून आलो तेव्हा म्हणजे २०००मध्ये केव्हा तरी बलवंत वाचनालयात एकदा गेलो तर समोरचा रस्ता , इमारतीपासून सर्वच वातावरण , तिथले कर्मचारी परके भासले . आता म्हणजे , २०१५ पासून औरंगाबादला स्थायिक झाल्यापासून अधून-मधून पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी त्या परिसरात गेलो पण , आंत मात्र जाण्याची इच्छा झाली नाही , इतका जास्त परकेपणा दाटून आलेला . तरी ती तेव्हाची टुमदार इमारत मनात आणि माझ्या वाचन वेडाला खतपाणी घालणारा बलवंतचा संस्कार अजूनही कायम आहे !
||२||
आपल्याकडे संस्कृती आणि सांस्कृतिक संचिताविषयी आत्मीयतेचं भान निर्माण करणारं शिक्षण कोणत्याच स्तरावर दिलं गेलं नाही ; कांही अपवाद वगळता तसा संस्कार घरा-घरातूनही व्यापक प्रमाणावर झालेला नाही आणि अजूनही होत नाही . त्यामुळे आपल्याकडे साहित्य , कला , संस्कृतीबद्दल बहुसंख्य लोकांत अनास्थाच आहे ; कांहीना तर ते सर्व तुच्छच वाटतं ; युरोप , अमेरिकेत फिरतांना हे आणि त्यांचं ते जतन केलेलं गतवैभव , त्याविषयी असणारी त्यांची आत्मीयतेची भावना बघतांना मनात सल दाटून येत असे . सांस्कृतिक , ऐतिहासिक मोल असलेल्या इमारती आपल्याला कायमच स्वत:च्या प्रेमकथा कोरण्याची जागा किंवा खूप मोठी गर्दी करुन पर्यटन नावाचा सोपस्कार उरकण्याचे स्थळ झालेल्या आहेत . ( आता सेल्फी पॉईंट झालेल्या आहेत . ) अशा वास्तूंचा व्यावसायिकांनी तर बाजारच कसा मांडलेला आहे , याचा शिसारी आणणारा अनुभव पदोपदी येतो . मग ते मंदिर असो की ताजमहाल की औरंगाबादचा बीबी का मकबरा किंवा दिल्लीतला लाल किल्ला म्हणा की दौलताबादचा किल्ला की कोणत्याही लेण्या ! ग्रंथालयेही याला अपवाद नाहीत . एशियाटिक लायब्ररीसारखे अत्यंत मोजके अपवाद वगळता बहुतेक ग्रंथालये गेल्या ४०/५० वर्षांनंतर , आज किमान सुस्थितीत असणं तर सोडाच , गतवैभव गमावलेल्या आणि मोडकळीस आलेल्या , उसासे टाकणाऱ्या वास्तू झालेल्या आहेत…वाचन संस्कृती लोप पावली किंवा वाचन संस्कृतीचा संकोच झाला असा टाहो मी कधीच फोडणार नाही तरी , आपल्याकडील ग्रंथालये आणि तत्सम वास्तूंची अवस्था भग्नावस्थेकडे प्रवास करु लागलेली आहे , यात कोणतीच शंका नाही . मला वाटतं याची एकूण कारणे चार आहेत-
एक-बहुसंख्य लोकांना वाचनासाठी ग्रंथालयात जाण्याची गरज हळूहळू कमी झाली . कारण क्रयशक्ती वाढल्यानं पुस्तकं खरेदी करण्याकडे लोकांचा कल झुकला हे मी स्वानुभवानं सांगतो . मासिक उत्पन्न हजाराच्या घरात गेल्यापासून म्हणजे साधारण १९८२-८३ नंतर माझी ग्रंथालयात जाऊन बसण्याची संवय कमी होत गेली आणि हवी ती पुस्तकं खरेदी करण्याकडे कल वाढला . ( औरंगाबादचे आमचे ‘स्वामी’ श्याम देशपांडे आणि नागपूरच्या साहित्य प्रसार केंद्राचे राजाभाऊ कुळकर्णी यांनी तर हप्तेवारीनं मराठी विश्वकोशासह हवी ती पुस्तकं दिली . ) उत्पन्नात आणखी वाढ होत गेल्यावर घर खर्च भागल्यावर आणि अत्यावश्यक तेवढी अन्य खरेदी झाल्यावर धनसंचय करण्यापेक्षा किंवा ते धन कुठे तरी गुंतवून ठेऊन वाढवण्यापेक्षा पुस्तक खरेदीचा वेगही वाढत गेला . माझ्या मित्र परिवारातील जवळ जवळ प्रत्येकाचा हाच अनुभव आहे . आजवर माझी पुस्तकांची खरेदी कमीतकमी १० हजारांवर आहे आणि त्यातली दोन एक हजार तरी पुस्तके मी भेट म्हणून किंवा कुणाला तरी गरज वाटते त्याला दिलेली आहेत . आज प्रथमच सांगतो , अमर हबीब या मित्रानं अंबाजोगाईत काव्य संग्रहाचे ग्रंथालय करायचं ठरल्यावर माझ्याकडचे सुमारे ४०० कविता संग्रह तेव्हा नागपूरहून पाठवले . पण , ते असो.
दोन-आपल्या राज्यकर्त्यांची म्हणजे तमाम लोकप्रतिनिधींची सांस्कृतिक समज खुजी आहे . साहित्य ( यात वाचन संस्कृतीला उत्तेजन देणं म्हणजे ग्रंथालयेही आली ), संगीत ( याला ऑर्केस्ट्रा अपवाद ! ), मूर्तीकला , चित्रकला याबद्द्ल लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कळकळ वाटत नाही . त्यांच्या कार्यकर्त्यांना भांडारकरवर हल्ला करण्यात थोरपण वाटतं . दर वर्षी मराठी साहित्य संमेलनाला मदत केली की आपली जबाबदारी संपली अशी सत्ताधाऱ्यांची उथळ समज आहे . न वाचणारेही लोक या आर्थिक मदतीवरुन नाहक वाद घालत बसतात . थोडक्यात सरकार आणि समाज अशा दोन्ही पातळीवर या संदर्भात उदासीनता आणि खुजेपणाही आहे . खरं तर , प्रत्येक राज्य सरकारनं वर्षाला २००/३०० कोटी रुपयांचा निधी सर्वच प्रकारच्या साहित्य आणि कला प्रवाहातील उपक्रमांसाठी कृतज्ञतेची भावना म्हणून राखून ठेवला पाहिजे , अशी माझी भूमिका कायमच राहिलेली आहे .
तीन-जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आणि माहितीचे मायाजाल म्हणजे इंटरनेट आल्यावर कुठे जाऊन माहिती जमा करावी , नोंदी काढव्यात , त्यासाठी चार पुस्तके वाचावीत , डिक्शनरी उघडून शब्दांचे अर्थ शोधावेत , अशी गरजच उरलेली नाही . चालता-बोलता एका बोटाने केलेल्या एका क्लिकवर माणूस वृत्तपत्र वाचतो , त्याला सर्व माहिती , पुस्तकं , संगीत…हवं ते उपलब्ध झालेलं आहे . हे ज्ञान नसून केवळ माहिती आहे हे त्यालाही ठाऊक असतं पण , त्याची गरजच तेवढी असते . माहितीकडून ज्ञानाकडे लोकांना वळवण्यात आपण फारसे यशस्वीच झालेलो नाहीयेत . वाढत्या उत्पन्नातून चैन करणं बहुसंख्य लोकांना जितकं गरजेचं वाटतंय तितकं घरात वर्षाला पांच-पन्नास पुस्तकांची खरेदी करावी , चार चित्र लावावीत , अवीट संगीत संग्रही ठेवावं असं वाटत नाही .
चार-या सर्व पार्श्वभूमीवर जे बदल करायला आणि ते करवून घेण्यात आपल्याकडच्या ग्रंथालयासारख्या उपक्रमांना पूर्ण अपयश आलं . ते करवून घेण्याची निकड भासणारं भान , ज्ञान आणि पात्रता असणारं व्यवस्थापनही सर्वांना लाभलेलं नाही , ही देखील आणखी एक बाजू आहेच . डिजिटायझेशनच्या वेगाशी वाचकांनी जुळवून घेतलं आणि दुनिया त्याच्या मुठीत आणलेली असतांना सरकारच्या अनुदानावर जगण्याची ग्रंथालयांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांची भिस्त वाढतच गेली .
आपल्यात म्हणजे समाजात काळानुरुप बदल झाले ; तसे बदल अपरिहार्यही असतात पण , ते सर्वच बदल आपली संस्कृती आणि संचित जोपासण्याला पूरक ठरणारे झालेले नाहीत ; सांस्कृतिक भान विकसित करण्यात हे बदल फार कांही पूरक ठरले आहेत , असंही म्हणताच येणार नाही . बलवंत वाचनालयाचा शतकाच्या दिशेने सुरु झालेला प्रवास संस्कृती आणि संचित जोपासण्यास आपल्याला प्रवृत्त करो , आपल्यातलं सांस्कृतिक भान प्रबळ करो , याच सदिच्छा ….
-प्रवीण बर्दापूरकर