(‘लोकमत’च्या २२ फेब्रुवारी २०१४च्या अंकात प्रकाशित स्तंभ)
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तेलंगण राज्य निर्मितीच्या निमित्ताने सुरु असलेला अभूतपूर्व गोंधळ थांबता थांबत नाहीये. काही सदस्यांकडून इतके ओशाळवाणे, ओंगळवाणे आणि तिरस्करणीयही वर्तन संसदेत घडत आहे की त्याला तमाशा म्हणता येणार नाही कारण, त्यामुळे तमाशाला असणारे कलात्मक मूल्य कमी होईल. खरे तर या अराजकी सदस्यांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निलंबित करून तेलंगण विधेयक संमत करून घेता आले असते पण, सत्ताधा-यांकडून खमकेपणा दाखवला न जाण्यामागे मतांचे राजकारण स्पष्टच आहे. शिवाय येन-केन प्रकारे हे विधेयक प्रलंबित राहिले तर ते सादर केल्याचे राजकीय श्रेय आणि प्रलंबित राहिले तर ते संमत न झाल्याचा सुस्कारा टाकायला सत्ताधारी मोकळे आहेतच ! हौद्यात जाणे, फलक झळकावणे, कागदपत्र फाडणे-फेकणे, माईकची ओढाओढ, परस्परांशी गुद्दागुद्दी हे आजवरचे असांसदीय हातखंडे वापरूनही विधेयक रोखण्याचा मार्ग संपल्यावर लोकसभेत मिरपूड म्हणा की विषारी वायू फवारला गेला. (काही सदस्यांचा साप सोडण्याचा विचार होता म्हणे, पण साप उपलब्ध झाले नाहीत !) जगभर आदर्श आणि अनुकरणीय म्हणून गौरव होतो त्या भारतीय लोकशाहीने असभ्यतेचा तळ गाठला. कामकाजाचे थेट प्रक्षेपण प्रकाशचित्रवाहिन्यांवर होत असल्याने भारतीय लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्या दिवशी बांगला देशचे एक संसदीय शिष्टमंडळ प्रेक्षक दिर्घेत बसलेले होते, ते भारताच्या या संसदीय लोकशाहीविषयी काय प्रतिमा घेऊन जातील याचा विचार यावेळी फिजुलच होता. हे कमी की काय म्हणून उत्तर प्रदेश विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाच्या सुरेश शर्मा आणि वीरपाल राठी या सदस्यांनी अंगावरचे शर्ट काढले तर काश्मीर विधानसभेत सय्यद बशीर या सदस्याने मार्शलला मारहाण केली. राजद सदस्यांनी विवस्त्र होणे टाळले आणि लोकशाहीची लाजच राखली असे म्हणण्याइतकी अगतिकता आता निर्माण झाली असाच त्याचा अर्थ समजायचा की आपण काय लायकीचे प्रतिनिधी निवडून द्यायला हवे याचा विचार करण्याची वेळ आता आली असे समजायचे की निवडणूक लढवणा-या उमेदवारासाठी किमान सभ्यता, शिष्टाचार आणि सुसंस्कृतपणाचे निकष ठरवून देण्याची वेळ आता आली आहे हा धोक्याचा इशारा मिळाला आहे असे समजायचे? दिवसेदिवस वाढतच चाललेल्या लोकप्रतिनिधींच्या या अशा बेलगाम असंस्कृत वर्तनाला वेळीच आला घातला गेला नाही तर संसद तसेच विधिमंडळे असभ्यतेचे चव्हाटे बनतील आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरा, संकेत, शिष्टाचार यांचे मापदंडही बदलतील याचेच हे अशुभ संकेत आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ सुरु असतानाच सर्वात ज्येष्ठ सदस्य, मणिपूरचे रिशांग केशिंग यांनी निरोप घेतला. ‘मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही’, असे सांगत ‘ज्या कामासाठी संसद आहे ते काम तिथे होते कोठे आहे?’, अशी स्वाभाविक खंत भारताच्या पहिल्या लोकसभेचे सदस्य असलेल्या ९४ वर्षीय केशिंग यांनी व्यक्त केली. केशिंग यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ आहे. पहिल्या लोकसभेत ते समाजवादी पक्षाचे सदस्य म्हणून निवडून आले, तिस-या लोकसभेत ते काँग्रेसचे सदस्य होते. नंतर दहा वर्ष त्यांनी मणिपूरचे मुख्यमंत्रीपद भूषवले आणि आता २००२ पासून एप्रिल २०१४पर्यंत ते राज्यसभेत आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यावरच आता संसदेचे अधिवेशन होणार असल्याने केशिंग पुन्हा सभागृहात दिसणार नाहीत . संसदेच्या कामाच्या ढासळत्या दर्जाबद्दल बोलताना केशिंग भावनाप्रधान झाले आणि ‘गेले ते दिन गेले’च्या गतकातर आठवणीत रमून गेले. सभागृहाची परंपरा पाळणा-या आणि शान जपणा-या पंडित जवाहरलाल नेहेरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद, आचार्य कृपलानी, श्यामाप्रसाद मुखर्जी, गोविंदवल्लभ पंत या नेत्याविषयी ते भरभरून बोलले, या नेत्यांच्या सुसंस्कृत वर्तणुकीच्या आठवणीनी केशिंग व्याकुळ झाले. ‘आम्ही तेव्हा तरुण होतो आणि आमच्या चांगल्या भाषणांची हे नेते कशी आवर्जून दाखल घेत’ याचे तल्लख स्मरण त्यांनी करून दिले. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांचे वडील एन.सी. चटर्जी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या वक्तृत्वाची तारीफ करताना आता ‘तशी भाषणे होत नाहीत, त्या ताकदीचे सदस्यही आता सभागृहात नाहीत’, अशी निराशा त्यांना दाटून आली. त्या निराशेतच ताठ मानेने आणि कोणाचाही आधार न घेत केशिंग तांबूस रंगाच्या दगडांनी बांधलेल्या भव्य संसद भवनातून बाहेर पडले …
त्यानंतर राज्यसभा सदस्य आणि लोकमत वृत्तपत्र समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या ‘पब्लिक इश्यूज बिफोर पार्लमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अनेक मान्यवर त्या समारंभात सहभागी झाले होते आणि प्रत्येकाने संसदेच्या कामकाजाच्या ढासळत्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त केली. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री डॉ. फारूक अब्दुला या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, हे सारे उद्वेगजनक आहे आणि आपल्याला खरा धोका चीन किंवा शेजारी राष्ट्राकडून नाही तर आपल्याकडूनच आहे! भारतीय लोकशाहीवर दाटून आलेल्या ‘असभ्य वर्तनरोगा’चे अचूक निदान त्यांनी केले कोणते असेल? आता डॉक्टरची भूमिका मतदारांनी निभावयाची आहे!
-प्रवीण बर्दापूरकर
(लेखक लोकमत पत्र समुहाचे नवी दिल्ली येथील राजकीय संपादक (महाराष्ट्र), आहेत.)