नव्वदीच्या उंबरठ्यावरचा आशावादी कॉम्रेड !

bardhan
आत्ममग्न भासणा-या अजय भवनातील एका साध्या खोलीत भाई बर्धन यांची भेट झाली तो, त्यांचा वयाच्या ८८व्या वर्षाचा शेवटचा दिवस होता . चेहे-यावर वार्धक्याच्या खुणा सोडल्या तर १९८०च्या सुमारास पाहिलेली त्यांची ऐट आणि नागपूरच्या पत्रकार भवनात काय किंवा रस्त्यावर काय, मोर्चात मूठ वळवून घोषणा देणारी बर्धन यांची चिरपरिचित सळसळती देहबोली कायम होती . ओळखीला उजाळा मिळाल्यावर मराठीत गप्पा सुरु झाल्या . नागपूरच्या मामासाहेब घुमरे ते महेश एलकुंचवार , शंकरराव गेडाम , जांबुवंतराव धोटे , नितीन गडकरी ते विजय दर्डा , अशा अनेकांचे क्षेमकुशल त्यांनी विचारले . सुमतीताई सुकळीकर यांची आठवण अपरिहार्य होती ; कम्युनिस्ट बर्धन आणि हिंदुत्ववादी सुमतीताई यांच्यातील भावाबहिणीचे नाते राजकीय सीमेपारचे म्हणून आजही बहुचर्चित कौतुकाचे आहे . मराठीत काय वाचताहात, या विषयावर आलो तेव्हा, एलकुंचवार यांचा उल्लेख निघाला .

‘ओळख नाही त्यांची’ असे म्हणत एलकुंचवारांच्या लेखनाचे कसे चाहते आहेत हे सांगत बर्धन यांनी विचारले , ‘एलकुंचवार वयाने मोठे असतील ना माझ्यापेक्षा ?’.

मग बर्धन यांचे वय विचारले तर म्हणाले , ‘मी वाढदिवस साजरा करत नाही आणि लक्षातही ठेवत नव्हतो पण, अलीकडे गिरीश गांधींचे वाढदिवसाला पत्र येते म्हणून वाढदिवसाची आठवण राहते , कालच आले त्यांचे पत्र’ .
‘कधी आहे तुमचा वाढदिवस’, विचारले तर म्हणाले ‘उद्या!’ .
‘वय ऐंशी असेल ना तुमचे?’,हे विचारल्यावर निष्कपट आणि निर्व्याज हसत बर्धन म्हणाले ‘उद्या मी ८९व्या वर्षात पर्दापण करतो आहे !’      त्यानिमित्ताने मुलाखत द्या म्हटले तर ठामपणे नाही म्हणाले .
अर्धेंदू भूषण बर्धन हा भारतीय राजकारणातला व्रतस्थ अविचल निष्ठेचा एक तेजस्वी लाल तारा आहे . जन्म १९२५सालचा; वयाच्या १५व्या वर्षी म्हणजे, १९४० साली त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आणि आज ७३ वर्षे उलटली तरी ते त्याच पक्षात आहेत . बर्धन नावाचा बंगालीबाबू १९४०च्या दशकात नागपूरला आला व अस्सल नागपूरकर आणि पक्का मराठी झाला ! बर्धन यांना बंगाली , मराठी , इंग्रजी , हिंदी आणि उर्दू भाषा इतक्या पूर्ण अवगत आहेत की त्यांची मातृभाषा कोणती हा प्रश्न पडावा . वक्तृत्व प्रपात कोसळावे तसे . या बहुभाषकतेमुळेच बर्धन जनमानसात रुजले आणि एक विशाल वटवृक्ष झाले . पोथीनिष्ठता हाच अलंकार आणि एकारलेपण हे भूषण ही , कम्युनिस्टांची ओळख बर्धन यांना मान्य नाही . हा माणूस मनाच्या गाभा-यातून रसिक . कवितेवर , गाण्यावर प्रेम करणारा . सुरेश भट यांच्यासारखा कलंदर कवी मित्र असल्याने कवितेच्या थेट हृदयाला भिडण्याची सवय बर्धन यांना आहे . एका वेगळ्या अर्थाने भाषा , धर्म , जात आणि राजकीय सीमा ओलांडलेले ए.बी.बर्धन महाराष्ट्राचे दिल्लीतील राजदूत आहेत . पक्षाचा जाहीरनामा आणि मार्क्स जसा मुखोद्गत तसाच गायत्री मंत्रही …पुढे जाऊन गायत्री मंत्रातील शोषणमुक्ती आणि विज्ञानवाद पटवून देण्याची हातोटीही आहे.
एक कामगार नेता , एक टर्म आमदार आणि कम्युनिस्ट पक्षाचे देशातील सर्वोच्च पद हा बर्धन यांचा तब्बल ७३ वर्षांचा राजकीय प्रवास आहे . हे सर्वोच्च पदही १६ वर्ष सांभाळल्यावर स्वत:हून सोडले . राजकीय निष्ठात कोणतीही तडजोड नाही आणि मोहालिप्त वज्रनिर्धारामुळे या प्रवासात हा माणूस कधीही पथभ्रष्ट झाला नाही असे त्यांचे राजकीय चारित्र्य खणखणीत आणि सालस आहे . आमदार म्हणून मिळणारा एकही फायदा न घेणारे बर्धन कदाचित देशातील एकमेव राजकारणी असावेत . मानवी समतेचे गीत केवळ लोकशाहीवादी राजकीय विचासरणीतूनच गाता येते हा दुर्दम्य आशावाद बाळगणारा असा राजकारणी दुर्मिळच .
गप्पांच्या ओघात आजच्या राजकारणाचा विषय आला . बर्धन म्हणाले , ‘देशाची परिस्थिती केवळ वाईटच नाही तर इतकी चिंताजनक होईल अशी कधी कल्पनाही केलेली नव्हती . आज राजकारणात मूल्य नाही तर पैसा महत्वाचा झाला आहे पण , माझा जनतेवर विश्वास आहे . आज नाही उद्या या देशातील जनता ही परिस्थिती बदलून टाकेल असा मला खात्री आहे’ , असा ठाम आशावाद त्यांनी व्यक्त केला . वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या कॉम्रेड बर्धन यांच्या या आशावादाला सलाम .
( लोकमत वृत्तपत्र समुहाचा राजकीय संपादक म्हणून नवी दिल्लीत नोकरी करत असताना ‘दिल्ली दिनांक’ या सदरासाठी 28/9/2013 रोजी लिहिलेला हा मजकूर पुनर्मुद्रित )

 ” बावन्नकशी ए. बी. बर्धन !” हा सविस्तर मजकूर पुढच्या ब्लॉगमध्ये

-प्रवीण बर्दापूरकर 

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९

संबंधित पोस्ट