|| नोंद | १३ ||
शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या चिंताजनक घटना अशात राज्यात सातत्याने घडत आहेत ; त्या कोण घडवून आणत आहे , त्यामागचे हेतू काय आहेत हे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट होईल आणि राजकीयदृष्ट्या सोयीचं असेल तरच जाहीर होईल पण , तरी ते सर्वविदित आहे .
एकेकाळी राज्यात पुतळा विटंबनाच्या घटना वाढल्या होत्या आणि त्यातील अनेक घटनांनी हिंसक स्वरुप प्राप्त केलेलं होतं . त्यावेळची एक आठवण आहे- ‘लोकसत्ता’चा नागपूरचा ज्येष्ठ वार्ताहर ( senior correspondent ) म्हणून मी काम करत होतो . गडचिरोलीला अशीच पुतळ्याच्या विटंबनेची घटना घडली आणि बऱ्यापैकी गाजली . मी कांही बातमी दिली नाही . आमचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांचा फोन आला आणि ती बातमी का दिली नाही , अशी विचारणा त्यांनी जरा रागातच केली .
गडकरीसाहेब रागावले म्हणजे कांही खरं नसे . मी क्षणभर गांगरलो पण , त्यांना सांगितलं , बातमी न दिल्याबद्दल सॉरी पण , लोकसत्ता महाराष्ट्रात सर्वदूर गांव-खेड्यातही वाचला जातो . ( तेव्हा लोकसत्ता हे मराठीतील सर्वाधिक खपचं दैनिक होतं ! ) ही बातमी तिचे वाचून पडसाद जर राज्यात सर्वत्र उमटले तर चांगलं होणार नाही म्हणून दिली नाही मी बातमी . तुमचा आदेश असेल तर बातमी पाठवतो .
एक पॉज घेतल्यावर माधव गडकरी म्हणाले , तुझं म्हणणं एकदम योग्य आहे पण , असे महत्वाचे निर्णय घेताना संपादकाला सांगशील की नाही ? आणि मग त्यांनी त्यांच्या आवडत्या ( गाढवा ) शब्दात माझी संभावना केली . तेव्हाची पत्रकारिता कशी समंजस होती हे सांगण्यासाठी ही आठवण मुद्दाम येथे दिली .
कायदेशीर पातळीवर अजून नामांतर न झालेलं औरंगाबाद , अकोला , धुळे , संगमनेर , कोल्हापूर अशा एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांनी महाराष्ट्रात अवस्थता निर्माण केली जात असतांना माध्यमे समंजस भूमिका निभावत आहेत का पिसाटल्यासारखी वागत आहेत असा प्रश्न साहजिकच पडतो . प्रकाश वृत्त वाहिन्या तर तारतम्य पूर्णपणे विसरल्यासारखी ‘लाईव्ह’ दृश्य दाखवत सुटतात…त्याचा काय परिणाम होऊ शकतो यांचा अंदाज प्रकाश वृत्त वाहिन्या आणि भडक बातम्या प्रकाशित करणाऱ्या एकाही मुद्रीत माध्यमांना का नाही ? औरंगजेबाची छायाचित्रे फडकावणारे आणि नथुरामचे समर्थक एकाचा वर्गात मोडतात हे माध्यमांना समजत नाही का , टीआरपीसाठी वाट्टेल ते सुरु आहे ?
बरं भाषाही किती चूक वापरावी याचं कांही तारतम्य आहे किंवा नाही ? एका प्रकाश वृत्त वाहिनीच्या बातमीचे ठळक शीर्षक होतं – “सामाजिक शांतता कोण नासवतंय ?”
फळं पिकवतात , शेतात पीक घेतलं जातं आणि कारखान्यात वस्तू निर्माण केली जाते , शांतता बिघडवतात नासवत नाहीत , इतकंही मूलभूत प्राथमिक भाषा ज्ञान यांना नसावं ? शांतता म्हणजे काय , पनीर तयार करण्यासाठी नासवण्या/फाटवण्यासाठी भांड्यात गॅसवर तापवायला ठेवलेलं लिंबाचा रस किंवा सायत्रीक अॅसिड घातलेलं दूध आहे ?
पत्रकारितेचा संकोच म्हणा की हुकुमशाही , पण लोकांची माथी आणखी न भडकण्यासाठी असं वाटतं , समाजातील शांतता बिघडवणाऱ्या प्रसंगांचं ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करायला माध्यमांवर बंदी घातली पाहिजे .
बाय द वे , ‘लोकसत्ता’चा आधी निवासी संपादक आणि नंतर संपादक झाल्यावर , पुतळा विटंबनासारख्या संवेदनशील घटनांचे वृत्त शक्यतो टाळण्याच्या आणि द्यावेच लागणार असेल तर अतिशय थोडक्यात , आतल्या पानावर प्रकाशित करण्याचा कटाक्ष मी बाळगला .
माधव गडकरी यांच्या कांही भूमिकांबद्दल मतभेद असणारच पण , ते आणि त्यांच्या पिढीच्या बहुसंख्य पत्रकार व संपादकांकडे असणारा समंजसपणा एकाही विद्यमान संपादक पत्रकाराकडे नसावा याचं वैषम्य वाटतं…
■प्रवीण बर्दापूरकर