देशाचे ‘सर्वोत्तम पंतप्रधान न होऊ शकलेले शरद पवार’ यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने मिडिया गेला पंधरवडा घाईत होता. असायलाच हवा, कारण या उंचीचा आणि इतकं बहुपेडी व्यक्तिमत्व असलेला नेता महाराष्ट्राने गेल्या पन्नास वर्षात पहिलाच नाही. आमच्या पिढीची पत्रकारिता तर शरद पवार यांची राजकारण आणि शरद जोशी यांनी उभारलेल्या शेतकरी चळवळीच्या करिष्म्यावर फुलली, समंजस झाली, असं मी अनेकदा म्हटलंय आणि वारंवार लिहित आलोय; यापुढेही म्हणत आणि लिहितही राहणार आहे. आमच्या पिढीने पत्रकारितेतील ग-म-भ-न गिरवायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारण, प्रशासन, समाजकारण आणि सांस्कृतिक जगतात, पुरोगामी आणि प्रतिगामी गोटात, उजव्या आणि डाव्या प्रवाहात…सर्वत्र शरद पवार यांच्या नावाचा ‘सेक्रेड काऊ’सारखा दबदबा होता, प्रतिमा होती आणि महत्वाचं म्हणजे प्रभाव होता. नंतर दबदबा आणि प्रतिमेवर शिंतोडे उडाले तरी शरद पवार यांचा सत्ता दालनातील प्रभाव केवळ कायमच राहिला नाही तर, तो उत्तरोत्तर वाढतच गेला; तो सर्वपक्षीय राष्ट्रव्यापी झाला. या शरद पवार यांचं “लोक माझे सांगाती…” हे राजकीय आत्मकथन राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात सर्वपक्षीय भव्य, शानदार झालेल्या, शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारात साडेतीनशे(३५४) पानांच्या या आत्मकथेचं प्रकाशन झालं. शरद पवार हे ‘हत्ती’ असून त्यांना समजू-उमजू पाहणारे ‘सात आंधळ्या’सारखे आहेत; थोडक्यात ते तेल लावलेल्या पैलवानासारखे आहेत म्हणजे; कवेत गावले असं वाटतं पण प्रत्यक्षात ते कोणाच्याच येत नाहीत असं जे म्हटलं जातं त्याचा प्रत्यय त्यांच्या राजकीय आत्मकथनातूनही येतो !
‘राजकीय आत्मकथन’ असूनही त्यात शरद पवार यांनी कर्करोगाचा सामना करताना जे अतुलनीय मनोधर्य दाखवले त्यावर एक प्रेरक प्रकरण (पृष्ठ २५१) आहे. कर्करोगाशी शरद पवार यांनी केलेला संघर्ष, सहन केलेल्या असह्य वेदना आणि त्या तशा टोकाच्या विपरीत परिस्थितीही ते कसे कार्यरत राहिले, हे वाचताना अंगावर कांटा उभा राहतो आणि शरद पवार यांच्या त्या धैर्याला सलाम केल्यावाचून राहवत नाही; किंबहुना आपण नकळत त्यांना सलाम करूनच टाकतो. या पुस्तकात प्रारंभी शरद पवार यांनी कथन केलेली त्यांची जडण-घडण आणि त्यातून ओसंडणारे मातृ-ऋण आणि गौरव हा मजकूर मनापासून उतरलेला असल्यानं मनाला भिडणारा आहे.
चंद्रशेखर पंतप्रधान असताना अयोध्या प्रश्नावर निर्णायक हालचाली कशा झाल्या आणि त्यात शरद पवार यांचा सहभाग कसा होता याची आलेली (पृष्ठ ११५) हकीकत नवीन आहे. चंद्रशेखर यांची आकलनक्षमता कशी मोठी होती आणि हा प्रश्न भविष्यात देशात अस्वस्थता निर्माण करणार आहे याची जाणीव चंद्रशेखर यांना झालेली होती. या प्रश्नावर चंद्रशेखर यांच्याकडून बाबरी मशीद कृती समितीशी बोलणी करण्यासाठी भाजप नेते (पुढे देशाचे उपराष्ट्रपती झालेले) भैरोसिंह शेखावत आणि रामजन्मभूमी न्यासशी बोलणी करण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपविण्यात आली. या दोघांच्या म्हणजे, शेखावत आणि पवार यांच्या, अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर एकाच ठिकाणी राम मंदिर आणि मशीद उभारणीच्या प्रस्तावावर अनुकुलता निर्माण कशी झाली होती आणि ‘हा प्रस्ताव मान्य करावाच लागेल’, असं शेखावत यांनी संघ नेतृत्वाला कसं बजावून सांगितलं होतं; चंद्रशेखर सरकार आणखी चार-सहा महिने टिकलं असतं तर या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघाला असता, अशी माहिती शरद पवार यांनी दिलेली आहे. या पुस्तकातून हाती आलेलं महत्वपूर्ण काही काय असेल तर ते, ही माहिती आहे. पंतप्रधानपदावर दावा करण्याआधीच शरद पवार यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता आणि महत्व कसं प्राप्त झालेलं होतं हे या माहितीतून अधोरेखित होतं. यापैकी चंद्रशेखर, भैरोसिंह शेखावत आणि मोरोपंत पिंगळे यापैकी एकही जण हयात नसल्यानं या माहितीच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित करणं कद्रूपणा ठरेल कारण, ‘फेकाफाकी’ करणं हा काही शरद पवार यांचा स्वभाव नव्हे. अपेक्षेप्रमाणे बाबरी मस्जिद प्रकरणात सर्व खापर शरद पवार यांनी तत्कालिन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्यावर फोडलं आहे आणि त्यात नवीन काही नाहीच. अर्थात बाबरी प्रकरणाचा जो तपशील (पृष्ठ १४३) पवार यांनी नोंदवला आहे तो अधिकृत असल्याने वाचनीय आहे. शांतता प्रस्थापित करण्याची उल्लेखनीय कामगिरी भारतीय लष्कराने पंजाबात प्रकाशात न येता कशी बजावली याचीही पवार यांनी सांगितलेली हकिकत (पृष्ठ ९४) वेधक आणि आजवर मराठीत तरी अप्रकाशित आहे. मनमोहनसिंग आणि पी.व्ही. नरसिंहराव यांच्या आर्थिक आणि जागतिकीकरणाच्या धोरणाबद्दल विस्ताराने मजकूर आहे. विशेषत: नरसिंहराव यांचं शरद पवार याने केलेलं कौतुक सुखद आश्चर्यजनक आहे.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर शरद पवार यांनी विस्तारानं आणि खूपसं मोकळेपणानं लिहिलं (पृष्ठ ६७ ते ७८) आहे. ‘अनंत भालेराव यांचं मराठवाडा हे वृत्तपत्र दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आघाडीवर होतं, त्यांना दलित समाज्विषयी सहानुभूती होती त्यामुळे नामांतर प्रश्नी अनंत भालेराव यांची थोडीशी अडचण झाली’ तसंच ‘गोविंदभाई श्रॉफ हे काही ‘दलितांचे विरोधक’अशी ओळख किंवा वर्तन असलेले नेते नव्हते, हे कबूल करतानाच शरद पवार यांनी नामांतराला विरोध करणाऱ्या चळवळीला उत्तेजन देणारे मराठा नेते कोण होते हे धाडसानं स्पष्टपणे नमूद केलं आहे. (पवार मराठ्यांनाच कायम पाठीशी घालतात हा समज त्यामुळं दूर व्हायला हरकत नसावी !) नामांतराच्या मुद्द्यावर असलेला शरद पवार यांचा हा मजकूर मुळातून वाचण्यासारखा आहे, कारण या एका मुद्यावर त्यांना मतांच्या रुपात किंमत कशी मोजावी लागली आणि केवळ मतांचाच विचार करणारे राजकारणी ते कसे नाहीत हे या विवेचनातून दिसतं.
बाकी, पवार यांच्या या राजकीय आत्मकथेत फार काही नवीन नाही आणि पवार यांच्याविषयी जे काही प्रवाद राजकीय क्षितिजावर प्रचलित आहेत त्याचं कणमात्रही निराकरण होत नाही; हे या आत्मकथेचं अपयशच म्हणायला हवं. या प्रवादात “देशातल्या सर्वाधिक धानिकापैकी एक” (पृष्ठ ४) आणि “शरद पवार आणि भूखंड हे समीकरण महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मांडलं गेलं आहे” (पृष्ठ ५) असा उल्लेख शरद पवार यांनी केला आहे. हे प्रवाद कानावर पडतात ‘तेव्हा विषाद, वेदना, त्रास तर होतोच; पण काही वेळा करमणूक होते’ असं पवार या संदर्भात नमूद करतात आणि धनिकपण हे सर्वपक्षीय मित्र, चाहत्यात कसं दडलेलं हे सांगतात; तर भूखंड प्रकरणात ‘आजवर तथ्य सापडलं नाही’ असं म्हणतात. न्यायालयाकडून जसं ‘पुराव्याअभावी निर्दोष मुक्त’ म्हणजे पुरावे सापडले असते तर निर्दोष मुक्त होता आलं नसतं’, असं जे काही असतं; तसंच काहीसं शरद पवार यांच्याविषयी असणाऱ्या या सार्वत्रिक प्रवादांविषयी घडलेलं आहे. ‘मी धनसंपत्ती गोळा केलेली नाही तसंच भूखंडही हडपले नाहीत’ असं स्पष्ट आणि स्वच्छपणे त्यांनी एकदाचं का सांगून का टाकलं नाही हे कोडं पुस्तक वाचून संपवताना कायमच राहतं.
आणखी एका प्रकरणात शरद पवार स्पष्ट भूमिका घेत नाहीत. पवार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद पटकावताना केलेल्या बंडाच्यावेळी राज्यातलं वसंतदादा पाटील-नासिकराव तिरपुडे यांचं सरकार पाडलं. “चव्हाणसाहेबांची सुप्तेच्छा ‘हे सरकार जावं’ अशीच होती. त्याकाळात त्यांचं (म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचं) मत ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या माध्यमातून व्यक्त होत असे” असं शरद पवार (पृष्ठ 55) म्हणतात. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र आणि वारसदार वगैरे, तरी त्यांच्याकडे मतप्रदर्शन न करता यशवंतराव ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या माध्यमातून सांगतात हे काही पटत नाही. यातून शरद पवार यांच्यापेक्षा यशवंतराव यांना महाराष्ट्र टाईम्स (म्हणजे गोविंदराव तळवलकर) जास्त जवळचे होते हाच संदेश जातो.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपद पटकावण्यासाठी पी. व्ही. नरसिंहराव यांच्या उमेदवारीला जेव्हा शरद पवार यांनी आव्हान दिले तेव्हा ‘माखनलाल फोतेदार, अर्जुनसिंग या गांधी घराण्याशी घट्ट नातं असणाऱ्यां नेत्यांनी १० जनपथचा कौल (म्हणजे सोनिया गांधी यांचा) पी.व्ही नरसिंहराव यांच्या बाजूनं असल्याचं जाहीर केलं’ असं शरद पवार (पृष्ठ १३२) म्हणतात पण; त्यावेळी ना सोनिया गांधी राजकारणात सक्रीय होत्या ना कॉंग्रेसच्या साध्या सदस्य ! राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेस कारणीभूत ठरलेल्या सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला अर्जुनसिंग यांनी कसं गोत्यात आणलं हे शरद पवार यांनी नमूद केलंय; ते वाचल्यावर प्रश्न हा उभा राहतो की अर्जुनसिंग किती कारस्थानी आहेत हे शरद पवार यांच्या सारख्या मुरब्बी, भविष्यवेधी बुझुर्ग राजकारण्याला उमगले कसं नाही; दिल्लीच्या राजकारणाची डोक्यावर बर्फ, जीभेवर खडीसाखर आणि चेहेऱ्यावरची सुरकुती न हळू देता खेळी करण्याची शैली ओळखता का आली नाही, इतके ती दिल्लीच्या राजकारणात नवीन नव्हते.
सोपी निवेदन शैली आणि घटनांची सलग साखळी तसंच त्यातील तपशील यामुळे शरद पवार यांनी या आत्मकथेत सांगितलेल्या अनेक बाबी राजकारणापासून दूर असणाऱ्या अनेकांसाठी नवीन तर अनेकांसाठी एखाद्या वेधक पटकथेसारख्या असल्यानं त्यांना खूप काही नवीन वाचायला मिळाल्यासारखं वाटेल. पण राजकीय वार्ताहर, विश्लेषक, राजकारणाचे अभ्यासक यांच्या हाती मात्र फार काही हाती लागत नाही. पवार मुख्यमंत्री असतांना आधी विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांनी आणि नंतर सुधाकरराव नाईक यांनी केल्या बंडाच्या हकिकती वेधक आहेत; त्या बंडामागे कोण होतं हे पवार सांगतात पण त्या बंडखोरीमागच्या कारणाबद्दल मात्र मौन बाळगतात हे या आत्मकथनाचं अपुरंपण आहे. त्यांनी रेखाटलेली काही व्यक्तिचित्रे (पृष्ठ २८९) अत्यंत त्रोटक आहेत; त्यामुळे काहीच समाधान मिळत नाही. असं त्रोटक लेखन करण्याऐवजी पवार यांनी ही व्यक्तीचित्रे विस्ताराने लिहून वेगळं पुस्तक केलं असतं तर त्या व्यक्ती नीट समोर उभ्या ठाकल्या असत्या.
दुसऱ्या टर्ममध्ये युपीए सरकार कसं ‘कणाकणा’नं आणि दिवसेंदिवस निष्प्रभ होत गेलं आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार परिषद कशी प्रभावी होत गेली (खरं तर सरकारच्या बोकांडी कशी बसली !) परिणामी मनमोहनसिंग पंतप्रधान म्हणून कसे निष्प्रभ ठरत गेले याचे बरेच तपशील या लेखनात आहेत. दिल्लीत तर त्यासंदर्भात यूपीएच्या शेवटच्या वर्षात उघड चर्चा होती आणि ती बातम्या-वार्तापत्र-लेख या माध्यमातून बर्यापैकी प्रकाशित झालेली आहे. शिवाय संजय बारू (The Accidental Prime Minister) आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी पी.सी. परख यांच्या (Crusader or Conspirator) या पुस्तकांतूनही ते समोर आलेलं आहे. सोनिया गांधी यांचं व्यक्तिकेंद्रित आणि केवळ काही सल्लागारांवर अवलंबून असणारं राजकारण, सोनियांचा पवारांविषयी असणारा आकसपूर्ण दृष्टीकोन; अशी बरीच माहिती या कथनातून समोर येते आणि ती राजकारणाबद्दल उत्सुकता असणारांनी मुळातून वाचण्यासारखी आहे; तरीही राजकारण-प्रशासन-पत्रकारितेत वावरणाऱ्यांना हे सर्व तपशील नवीन नाहीत. व्यक्ती केंद्रित राजकारणाने कॉंग्रेसचा संकोच कसा होत गेला आणि त्यांचा जनाधार कसा तुटत गेला याचं पवार यांनी विस्तृत विवेचन केलं आहे पण, त्यातही फार काही नवीन नाही कारण देशातील बहुसंख्य राजकीय पक्षांबाबत हीच मांडणी राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आणीबाणीनंतर सातत्याने करत आहेत. शरद पवार यांच्या मांडणीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कॉंग्रेसबद्दलचं हे विवेचन स्वानुभवाधारीत अनेक उदाहरणांसह केलं आहे; त्यामुळे यापूर्वी झालेल्या या मांडणीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
शरद पवार यांनी अनेक बाबतीत हातचं राखून हे राजकीय आत्मकथन केलेलं आहे. तरीही राज्य आणि देशातल्याही सर्वात चर्चित राजकारण्याचं ते आत्मकथन असल्यानं प्रत्येकानं ते वाचायला हवंच कारण; त्यातून हातचं राखून कसं लिहायचं याचा आदर्श पाठ शरद पवार यांनी घालून दिला आहे.
-प्रवीण बर्दापूरकर
9822055799 / 9011557099
भेट द्या – www.praveenbardapurkar.com