माणसे तीच असली तरी त्यांच्या राजकारण आणि संसारिक आयुष्यात कोणतीच समानता नसते. संसारात कधी-कधी कडू-तुरट धुसफुस असते, आंबट-गोड असंतोष असतो, नाते न तुटू देणारी घुसमट असते. या घुसमटीला कधी कधी तोंड फुटते. मग पती-पत्नीत एकमेकाची उणीदुणी काढणारे जोरदार भांडण होते. एकमेकावर केलेल्या प्रेमाची पश्चातापदग्ध कबुलीही बिनदिक्कत दिली जाते आणि त्याच प्रेमाचे कढ ही कटुता संपवून टाकतात. रुसव्या-फुगव्याचे जाळे फिटते आणि संसारात पुन्हा हसू फुलते. ही भांडणे नळावरची नसतात तर लुटुपुटुची असतात आणि ती इतरांचे मनोरंजन करण्यासाठी नसतात. केवळ भावनांना वाट मोकळी करून देणे हाच हेतू त्यात असतो. त्यामागे स्वबळाचा कावा नसतो, समोरच्याचे पंख छाटण्याचा अव्यक्त स्वार्थ नसतो. त्यामागे नात्याची वीण असते, एकमेकात झालेल्या भावनात्मक गुंतवणुकीचा घट्ट धागा असतो, परस्परांसाठी समर्पणाची कायम ओढ असते. राजकारणात मात्र अशा भावनात्मक गुंतवणुकीला काहीच स्थान नसते म्हणूनच निवडणुका आल्या की राजकीय नेते स्वबळासाठी कचाकचा भांडत असतात.
राज्यात निवडणुकीचा प्रचार रंगात आलाय आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताहेत त्या २५ वर्षांची युती आणि १५ वर्षांची आघाडी तुटल्याच्या/तोडल्याच्या पार्श्वभूमीवर. युतीचा धर्म विसरून, इतकी वर्ष जपलेले विश्वासाचे(?) नाते गुंडाळून ठेऊन, सभ्यपणाचे संकेत खुंटीला टांगून, सत्तेत केलेली भागीदारी आणि त्यातून मिळालेले (तसेच एकमेकाला अंधारात ठेऊन साधलेले) स्वार्थ विसरून एखाद्या झोपडपट्टीतल्या नळाला तीन-चार महिन्यांनी पाणी आल्यावर होणारे भांडण सुसह्य वाटावे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचाराचा राजकीय कलगीतुरा रंगला आहे. मावळलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मावळलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ऐकताना यांचा ‘संसार’ किती कचकड्याचा तसेच अनिच्छेचा होता याची चुणूक पाह्यला मिळते आहे. पुन्हा आघाडी करावी लागली तर उपमुख्यमंत्री म्हणून ‘अजित पवार नको’ असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण त्यातून पुन्हा एकत्र येण्याचेच अगतिक संकेत देत असतात. मनोहर पर्रिकर सेनेला सूर्याजी पिसाळ म्हणतात किंवा उद्धव ठाकरे भाजपला अफजलखानाची औलाद म्हणतात तेव्हा सेनेने कधी मुस्लिम लीगसोबत आघाडी केलेली असते हे विसरलेले असतात! सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी ज्या युतीची स्थापना केली केली ती युती तुटण्याचे/तोडण्याचे समर्थन बालशिवसैनिक आदित्य ठाकरे, तसेच बालस्वयंसेवक देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार करतात तेव्हा ते श्रवण इतिहासाचे त्यांचे आकलन किती कच्चे आहे याचे स्मरण करून देणारे असते. भ्रष्टाचाराला मुळीच थारा नाही असे अजित पवार म्हणतात तेव्हा जितके हंसायचे असते त्यापेक्षा सेनेचा पक्ष म्हणून मुंबई-ठाण्याबाहेर विस्तार झालेला नाही या एकनाथ खडसे यांच्या म्हणण्यावर जास्त खुदुखुदू हंसायचे असते. उर्वरित महाराष्ट्रातील मते हातची जाऊ नये म्हणू ‘महाराष्ट्र तुटू देणार नाही’, असे नरेंद्र मोदी यांनी ठणकावल्यावर स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना तोंडघशी पडावे लागले म्हणून छद्मीपणे हंसायचे नसते तर, त्यांची झालेली राजकीय अडचण समजाऊन घ्यायची असते. मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी शेवटी-शेवटी घेतलेल्या निर्णयाची चौकशी व्हावी असे अजित पवार यांनी म्हटल्यावर त्याकडे, कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये झालेल्या एखाद्या पांचट विनोदाकडे आपण कीवभरले हंसत जसे करतो तसे दुर्लक्ष करायचे असते. नितीन गडकरी यांनी पत्रकारांबाबत ‘लक्ष्मी दर्शनाचा’ मुद्दा मांडताना ‘बहुसंख्य पत्रकार’ असा चपखल शब्दप्रयोग न करणे तसेच मुंबईतले मतदान झाल्यावर बोटावरची शाई पुसून सातारला जाऊन पुन्हा मतदान करा हा शरद पवार यांनी दिलेला सल्ला यातील तथ्य उमजून घेत ‘स्लीप ऑफ टंग आणि रियालिटी’ यातील सीमारेषा किती धुसर असतात हे समजून घ्यायचे असते!! आघाडीत इतकी अनिच्छा आणि घुसमट होती तर यानी ती पंधरा वर्षे टिकवली का असा प्रश्न भाबड्या माणसाला पडू शकतो पण जाणकारांना मात्र माहिती असते की सत्तासुंदरीचा जबरदस्त मोह आणि भोग हेच त्यामागचे एकमात्र कारण असते. जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तेच शिवसेना – भारतीय जनता पक्षाचे! काँग्रेस-राष्ट्रवादीतील घुसमट १५ वर्ष तर सेना-भाजपतील घुसमट २५ वर्ष खदखदत राहिली. युतीचे काही कर्तेधर्ते काळाच्या पडद्याआड तर, हयात असणारे राजकारणाच्या पटावरून बाजूला फेकले गेल्याने (पक्षी: वाजपेयी आणि अडवाणी!) इतिहास विसरून स्वबळाची फुरफुर सुरु होऊन भडास व्यक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला. भग्न भवनातून संध्याकाळी हळवे मवाळ हळवे सूर येणे जसे स्वाभाविक असते तसेच कोसळलेल्या गढ्यातून स्वबळाच्या बेडकुळ्या फुगवल्या गेल्यावर बेसूर आणि कर्कश्श ओरडणेच ऐकू येणार हे स्वाभाविकच असते हेही आपण कायम गृहीत धरलेच पाहिजे. आज कडाकडा भांडणारे हे नेते उद्या सत्तेसाठी जुन्या किंवा नव्या रूपात पुन्हा एकत्र येणारच आहेत कारण, सोय आणि संधी यांचा योग्य वेळी साधलेला मेळ म्हणजे राजकारण असते. याबद्दल खंत नको, हा आजकाल आपल्या भारतीय राजकारणाचा स्थायीभाव झाला आहे हे कटू असले तरी सत्य आहे, हीही आपण स्वीकारले पाहिजेच!
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता निवडणूक पोहोचली आहे. पूर्वी ठोक बाजारातील सौदे हातावर रुमाल टाकू होत. नंतर ही पद्धत बंद झाली तरी ती आपल्या देशातील राजकारणात कायम आहे, हाही आपल्या राजकारणाचा आणखी एक व्यावहारिक स्थायीभाव आहे. त्याप्रमाणे निवडणूकपूर्व सौदे झालेले आहेत. देण्या-घेण्याचे व्यवहारही पूर्ण झाले आहेत. दिल्या-घेतल्या जाणा-या वचनांच्या शपथा घेतल्या-घातल्या गेल्या आहेत. या शपथा काही करार-मदार करून होत नाहीत किंवा लगेच देव-घेव करून त्या वचनांना मूर्त स्वरूप दिले जात नसते. अनेक वचने भविष्यात शब्द पाळून करून पूर्ण केली जातात, ती राजकारणाची रीतच असते. लढती पंचरंगी असल्याने दोन-तीन हजार मते मिळवणारे उमेदवारही यावेळी ‘भाव’ खाऊन गेले. हा भाव मिळल्यावरच त्यापैकी काहीनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. स्वत:चे जे नक्की मतदार आहेत त्यांच्यासाठी शेवटचे दोन दिवस राखून ठेवलेले असतात, शिवाय बहुरंगी लढतीत ऐनवेळी जो फिरणार आणि आपल्याकडे येणार त्याच्यासाठी मोठी बेगमी करून ठेवावी लागते. या प्रक्रिया आता संपल्या आहेत. आता शेवटच्या टप्प्यात आपण कुठे आहोत याचा अंदाज घेऊन कोण प्रचाराला बाहेर पडला पाहिजे आणि कोण नाही, रिंगणातला एखादा ‘प्रभावी’ उमेदवार बसवण्याचे उद्योग आता जोरात आहेत. येणाऱ्या आठवड्यात जो कोणी ऐनवेळी कोणासाठी तरी माघार घेण्याचे जाहीर करेल त्याला लोकशाहीचा ‘अर्थ’ खरा कळला आहे हे समजून घ्यावे. याचे ‘भाव’ या दोन दिवसात लागतील आणि त्याचा दक्षता यंत्रणेला पत्ताही लागणार नाही! देव-धर्म-जात-पंथ यांच्या शपथांना सुगीचे चार दिवस याच काळात येतात. अशा शपथा घेण्यासाठी ‘प्रसाद’ ताटभर असतो. हे सर्व तपशील फारच मनोरंजक आणि सर्वसामान्य माणसाचे डोळे विस्फाणारे पण, निवडणूक प्रक्रियेचा एक अपरिहार्य भाग असतात, हेही आपण उमजून घेतले पाहिजे. विविध आघाड्यांवर ‘सेटिंग्ज’ पूर्ण झालेले असल्याने निवडणुकीच्या निकालाचा अंदाज येऊ लागतो. सार्वजनिक ठिकाणी कोणाचे पारडे किती जड आहे याच्या चर्चा सुरु होतात. किराणा घालणारा ‘जरा अमुक-तमुक उमेदवाराकडे लक्ष राहू द्या’ असे सांगायला सुरुवात करतो ते या आठवड्यात आणि तलाठी, ग्रामसेवक मत कोणाला द्यावे हे फुकटचे सल्ले द्यायला सुरुवात करतात ते याच आठवड्यात. सकाळी हेअर कटिंग सलूनमध्ये आणि रात्री साडेदहा-अकरानंतर ढाबे-बार मध्ये रंगणा-या चर्चातून कोणाचा हात कसा सढळपणे सुटला आहे, कोण कुठे कसा ‘लई भारी’ झाला आहे, कोण कुठे मार खातोय याची जड जीभेने आणि मोकळ्या मनाने चर्चा सुरु असते. हे अंदाज घेत पत्रकारांची निवडणूक अंदाज व्यक्त करण्याची लगबग आणि लिहिण्याची धार शेवटच्या आठवड्यात वाढण्यामागचे इंगित हे असते. म्हणून लाट नसेल तर या आठवड्यात जाणवणारे मतदारांचे कल जरा गंभीरपणे घ्यायचे असतात.
या विधानसभा निवडणुकीत अजून तरी भाजप म्हणतो तशी मोदी लाट जाणवत नाहीये, उलट भाजपच्या जाहिरातींवर सोशल मिडियात जोरदार टीकास्त्र सुटले आहे. भाजपचे स्वबळावर राज्यात सत्ता संपादनाचे स्वप्न साकार होणार नाही असेच १० ऑक्टोबरच्या सायंकाळी दिसते आहे. स्वबळावर बहुमताच्या उंबरठ्यावरही कधीच नसणा-या सेनेबद्दल आणि काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल अनेकांच्या बोलण्यात आस्था जाणवत असली तरी त्यात सत्तेच्या दिव्यांचे किरण अंधुकसेही दिसत नाहीयेत. राष्ट्रवादीचे घड्याळ कण्हत-कुंथत चालते आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाने धूर सोडायला सुरुवात केली आहे असे मुंबईबाहेरच्या महाराष्ट्राचे निवडणुकीचे वातावरण आहे. शेवटच्या आठ-नऊ दिवसात कोण कसा बाजी मारतो हे कळण्यासाठी निकालाची वाट पहावी लागणार आहे.
औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशन संस्थेच्या जनसंवाद शाखेच्या विद्यार्थ्यांशी निवडणूक वृत्तसंकलन या विषयावर बोलत होतो तेव्हा, मतदार पाहणीच्या अंदाजांचे काय गुपित असते असा प्रश्न विचारला गेला. मी सांगितले, कोणता चित्रपट हमखास यशस्वी होईल याचा जसा कोणताही फॉर्म्युला नाही तसाच निवडणुकीच्या निकालांचे अंदाज घेण्याचाही नाही. मतदारांच्या मनाचा अंदाज घेणारे काही सर्व्हे पूर्ण बरोबर येतात आणि काही पूर्ण चुकतात. काही सर्व्हे अंशत: बरोबर निघतात आणि काही अंशत: चुकतात, म्हणूनच त्याला अंदाज म्हणतात. त्यात दोष मतदारांचा नसतो आणि तो कौल जाणू पाहणा-या संस्थेचाही नसतो कारण, सगळ्या मतदारांचा कौल नेमका जाणून घेण्याचा फॉर्म्युला अजूनही अस्तित्वात आलेलाच नाही. तरीही असे सर्व्हे करणे ही एक मजबूत नफा मिळवून देण्याचे आमिष असलेली व्यावसायिक मजबुरी असते! म्हणून जरा थांबा, मतदारांचा नेमका कौल कळण्यासाठी काऊंट डाऊन सुरु झाले आहे …
=प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com