गेल्या आठवड्यात पुस्तक दिन साजरा झाला. त्या आठवडाभरात आमच्या भेटीला अनेक पुस्तकं एकापाठोपाठ एक, अगदी ठरवून आल्यासारखी आली. आमचं घर त्या श्रीमंतीनं उजळून गेलं ! एखाद्या ‘खानदानी’ खवय्यासारखा या श्रीमंतीचा आस्वाद आम्ही घेतला.. अजून घेतोय.
गायतोंडे = संपादक- सतीश नाईक. प्रकाशक- चिन्ह पब्लिकेशन्स, मुंबई. एकनिष्ठ आणि सर्जनशील ध्यासातून डोळे विस्फारणारी कलाकृती निर्माण झाल्यावर कशी दिसेल, या प्रश्नाचं उत्तर जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या वासुदेव संतू गायतोंडे या चित्रकाराचा शोध घेतलेला ‘गायतोंडे’ नावाचा हा ग्रंथ आहे. देखणा हा शब्द थिटा पडावा अशी या ग्रंथाची निर्मिती आहे. गायतोंडे यांचा जन्म नागपूरचा आणि रंगपरिमळ जागतिक. गायतोंडे यांच्या व्यक्तिमत्वाचा अनेक नामवंतांनी घेतलेला धांडोळा तसंच या ग्रंथाला जोड म्हणून दिलेली संपादक सतीश नाईक यांची ‘शोधकथा’ या ग्रंथाच्या संदर्भ मूल्यात भर टाकणारी आहे. एखादं कलाध्यास कसा घ्यावा हे समजून घेण्यासाठी प्रत्येक कलेच्या विद्यार्थ्यांनं आभाय म्हणूनही सतीश नाईक यांनी लिहिलेली शोधकथा वाचायलाच हवी.
एखादी रेशमाची लड उलगडत जावी तसे गायतोंडे या पुस्तकातील मजकूर आणि चित्रातून आपल्यासमोर उलगडत जातात. ज्याला चित्रकलेत रस नाही अशांसाठीही हे पुस्तक आहे, हे या मजकुराचं यश आहे. गायतोंडे यांच्या अनेक महत्वाच्या चित्रांचा समावेश या ग्रंथात आहे म्हणून चित्रकलेशी कोणत्याही अर्थानं संबधितांसाठी हा स्वाभाविकच मौल्यवान खजिना आहे. एखादं आवडतं गाणं परत परत ऐकावं आणि ते मनात अधिकाधिक खोल रुतत जावं तसं काहीसं या पुस्तकाबाबत होतं. सतीश नाईक याची पाच वर्षाची मेहेनत आणि चाळीस पेक्षा जास्त वर्षांचा ध्यास म्हणजे वासुदेव संतू गायतोंडे हे व्रत आहे. ‘गायतोंडे’ या पुस्तकानं या श्रमार्थ व्रताची सुखद सांगता झालेली आहे.
पश्चिमप्रभा = लेखक- महेश एलकुंचवार, प्रकाशक- मौज. प्रतिभावंत ललित लेखक, नाटककार आणि आमचे एलकुंचवार’सर’ यांनी काही आभिजात्य पाश्चात्य (इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, रशियन) पुस्तकांचा अत्यंत आटोपशीरपणे घेतलेला वेध, असं स्वरूप आणि चिरेबंदी भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य तसंच वैभव आहे. एलकुंचवारसरांचा प्रातिभ आवाका जाणवून देणारं हे लेखन आहे.
वाचनानंद हा निकष लावायचा झाला तर ‘गायतोंडे’ हे बडा आणि ‘पश्चिमप्रभा’ हे छोटा ख्याल गायन आहे ! सौम्य रंगातील आणि धूसर सांकेतिक मुखपृष्ठ विवेक रानडेचं असून ते ‘पश्चिमप्रभा’च्या वाचनाची उत्सुकता वाढवणारं आहे. ही या पुस्तकाची तिसरी आवृत्ती असून पहिली आवृत्ती चक्षू प्रकाशन आणि दुसरी आवृत्ती विजय प्रकाशन, नागपूरच्यावतीनं प्रकाशित झाली होती.
बाळ केशव ठाकरे-फोटोबायॉग्राफी = संपादन-राज ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अफाट कर्तृत्वाचा घेण्यात आलेला छायाचित्रमय वेध, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाचा वेध म्हणजे महाराष्ट्राच्या गेल्या पाच दशकांचं ओझरतं राजकीय दर्शन आणि शिवसेनेच्या राज्यव्यापी विस्ताराचा आढावा, हेही एक परिमाण या फोटोबायॉग्राफीला अपरिहार्यपणे आहेच.
राजकारणाच्या अभ्यासकांसाठी संग्राह्य असलेलं पुस्तक तसं जुनं आहे पण, ते दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी भेट म्हणून पाठवलंय. महत्वाचं म्हणजे ही भेट दीर्घकाळची प्रतीक्षित आणि राजकारणी दिलेला शब्द विसरत नाहीत हे सुखदपणे जाणवून देणारी आहे !
बालकांड आणि पोहोरा- समीक्षा आणि समांतर समीक्षा = संपादक- ह. मो. मराठे, निर्मिती- पुष्पक प्रकाशन, पुणे. ‘ह.मों.’च्या बालकांड तसंच पोहोरा या गाजलेल्या (हे लेखन ‘ह.मों.’चं आत्मवृत्त आणि ब्राह्मणांनाही दारिद्र्य भोगावं लागतं, या वस्तुस्थितीची जाणीव करून देणारं समजलं जातं !) साहित्य निर्मितीची करण्यात आलेली समीक्षा आणि या पुस्तकांच्या संदर्भात ‘हमों’ना आलेली वाचकांची पत्र, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.
पुस्तक समीक्षात्मक असूनही मजकूर मात्र वाचायला बोजड नाही. लेखकाच्या जीवनातील तत्कालिन विशिष्ट भावजीवनाचं दर्शन त्यातून होतं.
महात्मा गांधींची विचारसृष्टी = लेखक- यशवंत सुमंत. प्रकाशक- साधना प्रकाशन, पुणे. महात्मा गांधी यांच्या विचारातील काही अलक्षित पैलूंचा यशवंत सुमंत यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांतून घेतलेला वेध म्हणजे हे पुस्तक आहे.
अकाली कालवश झालेल्या, विवेकी चिंतक म्हणून महाराष्ट्रात मान्यता असलेल्या यशवंत सुमंत यांच्या या बहुप्रतीक्षित लेख संग्रहाला असलेली डॉ. चैत्रा रेडकर यांची प्रस्तावना वाचनीय आहे.
समुद्रच आहे एक विशाल जाळं = कविता महाजन यांची ही प्रदीर्घ कविता आहे. प्रकाशक- राजहंस, पुणे. या दीर्घ कवितेला उद्देशून डॉ. सुधीर रसाळ यांनी लिहिलेलं दीर्घ पत्र या कवितेचा मुलभूत वेध घेणारं आणि ते मुळातूनच वाचायलाच हवं असं आहे. डॉ. रसाळ एखाद्या साहित्य प्रकारचा किती सूक्ष्मपणे व्यासंग करतात, हेही या पत्रातून दिसतं.
एका मासळीचं प्रतिक वापरून त्या मासळीचं समुद्रातला जगणं कविता महाजन यांनी या दीर्घ कवितेतून मांडलं आहे. त्या कवितेशी एकरूप झाल्यावर एका क्षणी त्या मासळीचं जगणं ‘मानवी’ भासतं, तो सापडणारा अर्थ या दीर्घकवितेचा परमोच्च बिंदू आहे.
दीडदमडीना = लेखक- वर्जेश ईश्वरलाल सोलंकी. प्रकाशक- लोकवाङ्मय गृह, मुंबई. नव्या दमाचा तसंच टोकदार जाणिवांचा कवी म्हणून वर्जेश सोलंकी परिचित आहेत आणि त्यांच्या कवितेच्या या ओळखीमुळेच त्यांच्या कवितांचा मी चाहता आहे. ‘दीडदमडीना’ मात्र कविता नसून त्यांच्या काही ललित लेखांचा संग्रह आहे. सभोवतालच्या बदलांच्या गतीनं भोवंडून जाणारा आणि काहीसा शरणागत होणारा माणूस हे वर्जेश सोलंकी यांच्या या गद्य लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
काव्य तसंच गद्य माध्यमात ठोस असं काही करण्याची मोठी उमेद या लेखकात आहे, याचीही पुन्हा एकदा जाणीव करून देणारं हे लेखन आहे. माझ्यासाठी तरी ही पुस्तक-भेट पूर्णपणे अनपेक्षित आहे !
विदर्भ गाथा = लेखक- श्रीहरी अणे. प्रकाशक- विसा बुक्स, नागपूर. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचं समर्थन करणारं हे लेखन आहे. एक संपादक आणि संयुक्त महाराष्ट्रवादी म्हणून या पुस्तकातील प्रत्येक प्रतिपादन माझ्यासाठी पूर्णपणे स्वीकारार्ह नाही. मात्र, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध असला तरी एखाद्या विषयावरचा अभ्यास कसा करावा याचा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक आहे, हे आवर्जून नोंदवायला हवं.
हे पुस्तक समोर ठेऊन प्रत्येक अविकसित प्रदेशांनी असा अभ्यास करून विकासाचा अनुशेष कसा आहे याचा सरकारला दिशादर्शक ठरणारा एक विस्तृत अहवाल तयार करायला हवा. (संपर्क- विनोद लोकरे, विसा बुक्स, ९८२३२८७२७३)
अनुकविता = संपादन- नितीन वैद्य, सोलापूर. प्रकाशक- आशय परिवार, सोलापूर. जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्तानं गेली दहा वर्ष आशय परिवाराच्या वतीनं हा वार्षिक अंक प्रकाशित केला जातो. व्रतस्थ लेखक त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी केलेल्या काही पाश्चात्य कवींच्या कवितांचा अनुवाद असलेला या वर्षीचा हा वैशिष्ट्यपूर्ण अंक आहे आणि कवितेच्या अभ्यासकांनी आवर्जून वाचावा(च) असा आहे.
‘त्र्यं.विं.’च्या भाषक झळाळीचा पुन:प्रत्यय देणारा हा अंक अनुवादित साहित्याचे चाहते आणि काव्य प्रेमींसाठी संग्राह्य आहे. (संपर्क- नितीन वैद्य, सोलापूर, ९४०५२६९७१८)
पत्रकारीतेच्या पावणेचार दशकांच्या कालखंडात मुंबई किंवा दिल्लीत मी सरकारी कोट्यातील एखादी सदनिका/ भूखंड का घेतला नाही, असा एखादा भूखंड/सदनिका असती तर, विकून मी श्रीमंत झालो असतो, असं अनेकांना वाटतं असतं. तर अनेकांनी (अगदी यवतमाळ, नांदेड सारख्या छोट्या शहरातील काहीनी काही कारण नसताना) अशी सदनिका किंवा एखादा भूखंड न मिळवल्यानं मला व्यवहार कसा कळत नाही हे अनेकदा बोलून दाखवलेलं आहे, पण ते असो.
ज्याला,या लेखात उल्लेख केला तसा ‘अनमोल ऐवज’ एका आठवड्यात भेट म्हणून मिळतो तो गरीब कसा असेल, श्रीमंती काय केवळ आर्थिक निकषावरच मोजायची असते का ?
-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com