‘गुरु’ ते ‘गुरुदास’ : एका अस्वस्थतेचा प्रवास…

मित्र वर्तुळात ‘गुरु’, संघटनेत ‘बॉस’ आणि कार्यकर्त्यात ‘साहेब’ नावानं परिचित असणाऱ्या गुरुदास कामत यांच्या निधनाची बातमी अनपेक्षित आणि धक्कादायक ठरली कारण हे काही त्यांचं एक्झिट घेण्याचं वय नव्हतं. न पटणाऱ्या बाबतीत कुणाशीही थेट भिडणारं आणि आडपडदा नसलेलं, कायमच अस्वस्थतेच्या शिडावर स्वार झालेला स्वभाव असणारे गुरुदास कामत यांची राजकीय कारकीर्द शेवटपर्यंत संघर्षमय राहिली.

काही माणसं विनाकारण तसंच विनाहेतू आणि सतत भेटी-गाठी न होताही आवडतात, आपलीशी वाटतात. गुरुदास कामत यांच्याबाबतीत माझं नेमकं असंच घडलं. आमच्यातलं समवयस्कपण आणि परखडपणा हे गुण जुळणारे होते. गुरुदास कामत यांच्याशी माझी पहिली भेट, नागपूरला वर्धा रोडवर असलेल्या विजयानंद या इमारतीतल्या चळवळे खास मित्रवर्य, इंदिरा गांधी यांचे कट्टर पाठीराखे, तत्कालिन खासदार विलास मुत्तेमवार यांच्या फ्लॅटवर झाली. तेव्हा विलास मुत्तेमवार महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि सूर्यकांता पाटील तसंच गुरुदास कामत सरचिटणीस होते. राजकारणाच्या पटलावर नुकताच प्रवेश केलेल्या राजीव गांधी यांचा देशातला पहिला जाहीर कार्यक्रम विलास मुत्तेमवार यांनी १९८२मध्ये घेतला. नागपुरातल्या त्या कार्यक्रमातच राजीव गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे देण्याचा ठराव विलास मुत्तेमवार यांच्या पुढाकारानं मांडला गेला. त्या ठरावाचं वाचन गुरुदास यांनी केलं होतं. सूर्यकांताशी माझी मैत्री प्राचीन आणि अगदी (अजूनही!) सख्खी. बहुदा १९८२च्या एका हिवाळ्यात विधानभवनाच्या आवारात आमदारांसाठी राखीव असणाऱ्या उपाहारगृहासमोर तेव्हा आमदार असलेल्या सूर्यकांतानं ‘हा गुरु’ अशी पुन्हा एकदा ओळख करून दिली. नंतर मुंबईत विलासराव देशमुख यांच्यासोबत एकदा गुरुदास यांच्याशी एकदा भेट झाली. विलासराव देशमुख तसंच सूर्यकांता पाटील आणि माझ्यातल्या मैत्रीची नाळ मराठवाड्याच्या मातीत अंकुरलेली होती. साहजिकच, गुरुदास कामत यांच्याशी ओळख पक्की करणारे माझे संदर्भ बळकट आणि वजनदारही होते. त्यामुळे आमच्यात ओळख विसरण्याचा बहाणा आड आला नाही आणि पुढे फार भेटी न होताही आमचं गोत्र जुळलं. पहिल्याच भेटीत लक्षात आला तो गुरुदास कामत यांचा उजळ गव्हाळ वर्ण, किंचित कुरळे घनदाट काळे केस, कुशाग्र बुद्धी, तेज नजर आणि अस्वस्थतेनं धुसमुसणं. तेव्हा मी नागपुरात पत्रकारिता करत होतो आणि गुरुदास कामत यांचं कार्यक्षेत्र मुंबई असल्यानं तसं तर, आमच्या नियमित गाठी-भेटी होण्याची शक्यता नव्हती पण, ती संधी पुढं ‘लोकसत्ता’नं दिली; तरी आमच्या फार भेटी झाल्या, मैफिली रंगल्या असं काही घडलं नाही.

राजकीय वृत्तसंकलनात असलो तरी, माझ्याकडे तेव्हा मुंबई असण्याचं कारण नव्हतं. तरी राज्याच्या मुंबई मुख्यालयातल्या राजकीय वर्तुळात वावरतांना गुरुदास कामत यांच्याविषयी एक असूया जाणवायची आणि त्याचं कारण होतं राजीव गांधी यांच्याशी असणारा त्यांचा थेट संपर्क आणि राजीव यांच्या कार्यालय तसंच घरी त्यांना असणारा सहज प्रवेश. राजीव गांधी मुंबईत आले आणि एकदा का अधिकृत कार्यक्रम संपले की, गुरुदास कामत कार ड्राईव्ह करतात आणि राजीव गांधी शेजारी बसून मग, हे दोघं मुंबईत फिरतात; अशीही चर्चा ऐकायला मिळायची. त्या दोघातल्या सलगीची ही वार्ता ग्रामीण महाराष्ट्रातही पोहोचलेली होती. दरम्यान वयाच्या अवघ्या तिशीत १९८४ साली गुरुदास लोकसभेवर विजयी झाले तेव्हा त्यांची उमेदवारी थेट राजीव गांधी कशी अंतिम केली याच्याही चर्चा घडल्या. एकदा या संदर्भात विचारलं तर गुरुदास म्हणाले होते, ‘म्हणजे राजीवजींच्या प्रत्येक भेटीच्या वेळी मी कार ड्राईव्ह केली असं काही नाहीये पण, तसं घडलं काही वेळा हे मात्र खरं’. आधी राजीव आणि मग सोनिया यांच्याशी थेट सौहार्द राखल्याची पुरेपूर किंमत गुरुदास यांना मुंबईत राजकारण करत असतांना चुकवावी लागली आणि त्याबद्दल कोणतीही खंत तसंच तक्रारही गुरुदास यांनी कधी केली नाही तो त्यांचा स्वभावच नव्हता. मात्र गांधी घराण्याशी असलेलं सख्य आणि प्रस्थापितांशी संघर्ष करत अखंड कार्यरत राहण्यानं ‘गुरु ते गुरुदास हा त्यांचा प्रवास झपाट्यानं झाला यात शंकाच नाही.
गुरुदास कामत यांच्यात अनेक परस्पर विरोध लपलेले होते. मुंबईच्या राजकारणात असूनही गुरुदास कामत यांनी मराठी माणूस, भाषा आणि संस्कृतीला कधीच दुय्यम मानलं नाही. मुंबईची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमराठी- बंबईया हिंदी आणि आंग्लाळलेल्या लोकांतही त्यांनी त्यांची पाळंमुळं रोवलेली होती. एरव्ही कार्यालयीन शिस्त आणि टापटीप याबाबत अत्यंत कांटेकोर आणि अपरिचितांना उद्धटपणासदृश्य वाटणारा स्पष्टवक्तेपणा अलंकारासारखा मिरवणारे गुरुदास कामत सामान्य माणसाच्या बाबतीत मात्र माती कोपरानं खणावी इतके सौम्य होत; त्यांच्यात हा बदल अगदी सहज घडत असे. एकीकडे विलक्षण अस्वस्थतेकडे झुकणारा मनस्वीपणा तर दुसरीकडे सुसंस्कृत आणि लाघवी दिलखुलास असं त्यांचं रुप बघायला मिळे. त्यांची कॉंग्रेसवर अंध म्हणता येईल अशी श्रद्धा होती आणि गांधी कुटुंबावरही अढळ अंधविश्वास शेवटपर्यंत होता पण, पक्षात जे काही घडतंय ते पसंत पडलं नाही की त्याविरुद्ध पंगा घेणं ही गुरुदास कामत यांची संवय बनलेली होती. कॉंग्रेसवरची त्यांची निष्ठा आणि त्यांच्या स्वभावातला अति परखडपणा कायमच संगतीनं राहिले मात्र, अनेकदा पंगा घेऊनही गुरुदास कामत यांनी ना कधी कॉंग्रेसचा त्याग केला, ना त्यांनी पंगा घेणं कमी केलं. रोष व्यक्त करण्यासाठी गुरुदास सरळ राजीनामा अस्त्र वापरत आणि त्यापुढे अखेर अनेकदा पक्षश्रेष्ठींमाघार घ्यावी लागलेली आहे!

मुंबई कॉंग्रेसमध्ये पावलोपावली संघर्ष करण्याचची वेळ गुरुदास कामत यांच्यावर आली; त्या संघर्षांनं शेवटपर्यंत त्यांची पाठ सोडली नाही. गुरुदास कामत यांचा राजकारणात उदय झाला तेव्हा ‘एलीट’ समजल्या जाणाऱ्या मुरली देवरा यांचं त्या काळात फार मोठ्ठ प्रस्थ होतं आणि त्यांची मुंबई कॉंग्रेसवर घट्ट पकड होती; शिवाय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर मुरली देवरा यांचं ‘वजन’ भारी होतं. त्याचा निश्चित फायदा कॉंग्रेसला होत असला तरी त्यामुळे पक्ष तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीये हे लक्षात आल्यावर संघटनेच्या कामात गुरुदास कामत यांनी लक्ष घालायला सुरुवात केली. हाच राजीव गांधी यांच्या नेतृत्वाच्या उदयाचा आणि त्यांचं नेतृत्व स्थिरावण्याचा काळ होता. त्यामुळं स्वाभाविकच कामत यांना पक्षात अ. भा. युवक कॉंग्रेसचं अध्यक्षपद, पक्षाचं सरचिटणीसपद अशी अनेक बडी पदं मिळाली. त्यांनी सलग तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला आणि इंगजी आणि हिंदीही अस्सखलित येणाऱ्या गुरुदास कामत यांनी दिल्लीतही बस्तान बसवलं. १९९६च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रमोद महाजन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्यावर तर मुंबई कॉंग्रेसमध्ये गुरुदास कामत आणखी पक्षात जास्तच सक्रीय झाले आणि त्यांनी मुरली देवरा यांच्या नेतृत्वास सरळ आव्हानच दिलं. त्यातून गुरुदास कामत समर्थक असा एक मोठा गट मुंबईत उदयाला आला. मुंबई कॉंग्रेसमधला सर्वाधिक लोकप्रिय नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. १९९८मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुरुदास कामत यांनी प्रमोद यांच्याकडून तत्पूर्वी झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली (त्यामुळे केंद्रात भाजपचं सरकार येऊनही प्रमोद महाजन याचं मंत्रीपद संकटात आलेलं होतं; अर्थात या संकटावर महाजन यांनी चतुराईनं मात केली हा भाग वेगळा.)

नंतरच्या काळात पक्षात श्रीमती सोनिया गांधी यांचं नेतृत्व उदयाला आलं आणि मुरली देवरा यांचा करिष्मा ओसरण्यास सुरुवात झाली. मुंबई कॉंग्रेसची सूत्र मग गुरुदास कामत यांच्याकडे गेली. केंद्रातील पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारात गुरुदास कामत राज्यमंत्री झाले; त्यांच्याकडे गृह आणि दूरसंचार अशी महत्वाची खाती आली. त्या खात्यांच्या कारभारात गुरुदास कामत यांनी ठसाही उमटवला पण, नंतर झालेल्या मंत्रीमंडळाच्या फेरबदलात कामत यांच्याकडून ही खाती काढून घेण्यात आली त्यांच्याकडे स्वच्छता आणि जल ही खाती देण्यात आली. याकडे राजकारणाचा एक भाग म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन न ठवता तुलनेनं ही खाती दुय्यम होती म्हणून त्या खात्यांचा पदभारच कामत यांनी स्वीकारला नाही. नेमका राहुल गांधी यांच्या उदयाचा हा मौसम होता. राहुल गांधी यांना गुरुदास कामत यांचं हे आग्रही वागणं मुळीच आवडलं नाही आणि कामत याचं प्रस्थ कमी होण्यास प्रारंभ झाला. त्यातच मुंबई कॉंग्रेसमध्ये कृपाशंकर सिंह आणि संजय निरुपम या ‘हुच्चां’चं प्रस्थ वाढलेलं होतं. आधी मुरली देवरा आणि मग या हुच्च प्रवृत्तीशी लढण्याची वेळ गुरुदास कामत यांच्यावर आली. त्यातच राहुल गांधी यांनी संजय निरुपम यांना झुकतं माप दिलं. मुंबई कॉंगेसचं अध्यक्षपद त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आणि ते जखमेवर मीठ चोळल्यासारखं निरुपम यांच्याकडे देण्यात आलं. मग गुरुदास कामत विरुद्ध संजय निरुपम असा दोन विषम प्रवृत्तीतला संघर्ष सुरु झाला. त्यात गुरुदास कामत यांची घुसमट होऊ लागली; एका निष्ठावान, मनस्वी नेत्याची चोहोबाजूंनी कोंडी झाली. कामत यांनी पक्षातील सर्वच पदांचे राजीनामे दिले तरी त्यांची माध्यमां व्यतिरिक्त कुणी दाखल घेतली नाही, कुणी समजूत काढली नाही. त्यांचे काही कट्टर समर्थक भाजपत प्रवेश करते झाले. मात्र गुरुदास कामत पक्षनिष्ठा वसा म्हणून जपली; राजकीय अनुभव आणि भूमिकांचा त्यांनी बाजार मांडला नाही. आता तर अचानक त्यांनी जगण्याच्या पटावरुनच कायमची एक्झिट घेतली…राजकीय पक्षात केवळ निष्ठा हाच निकष लागू होत नाही हे जसं पुन्हा एकदा सिद्ध झालं.

सस्मित ‘गुरु’ ते ‘गुरुदास’ असा या नेत्याचा प्रदीर्घ प्रवास कॉंग्रेस पक्षात झाला आणि तो एक पत्रकार म्हणून दुरुन का होईना पाहता आला. प्रलोभनं वा लाभाच्या कोणत्याही वादात ते सापडले नाहीत, सत्तेच्या मुजोरीत ते कधी सापडले नाहीत, त्यांनी पक्षाच्या चौकट तोडली नाही आणि बाणेदारपणाही सोडला नाही, परखडपणा त्यागला नाही; मात्र किंचित राजकीय तडजोड न करण्याची गुस्ताखी कामत यांनी कायमच केली; कॉंग्रेसला गुरुदास कामत आणि गुरुदास कामत यांना कॉंग्रेस कळली नाही, पेललीही नाही असाही त्याचा आणखी एक अर्थ आहे. पक्षातील अपप्रवृत्तीच्या विरोधात कायम संघर्ष करण्याची किंमत म्हणून उपेक्षा वाट्याला येऊनही बेडरपणा न सोडणाऱ्या गुरुदास कामत यांचा विसर सहजासहजी पडणारा नाही…

(छायाचित्रे- गुगलच्या सौजन्याने)

-प्रवीण बर्दापूरकर
Cellphone +919822055799
www.praveenbardapurkar.com
​====
‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ ​​या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-

http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515 आणि ‘भाष्य’ ई-बुक्ससाठी dailyhunt शी संपर्क साधावा.

====​

संबंधित पोस्ट