विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त ‘लोकसत्ता’ या दैनिकात ‘कुजबुज’ हा स्तंभ प्रकाशित होतोय. त्यात लोकप्रतिनिधींच्या खाद्यप्रेमाची महती सांगणारा ‘‘डब्बा’ ऐसपैस’ मजकूर प्रकाशित झालाय. ही कुजबुज कोणी केलीये त्याचं नाव दिलेलं नाहीये पण, निर्दोष भाषा तसंच शैली आणि संदर्भ लक्षात घेता हा मजकूर आमच्या पाठच्या पिढीचा पत्रकार संतोष प्रधान याचाच असणार याची खात्री आहे. हा मजकूर वाचल्यावर आमच्या पिढीच्या रिपोर्टिंगच्या काळातील लोकप्रतिनिधींची डब्बा संस्कृती आणि त्यातून अनेक राजकारण्यांशी निर्माण झालेल्या अकृत्रिम मैत्रीचा नोस्टाल्जिया उफाळून आला. बाय द वे, कुजबुज हा स्तंभ सुरु करण्याचं श्रेय तेव्हा ‘लोकसत्ता’त असलेल्या आणि सध्या एबीपी माझा या वृत्त वाहिनीचा संपादक असणाऱ्या राजीव खांडेकर याचं. २००४साली, राजीवच्या कल्पनेतून हे सदर ऑप-एड पानावर सुरु झालं.
नागपूर-मुंबईत विधिमंडळ आणि मंत्रालयाचा मी, १९८१ ते १९९८ या काळात नियमित आणि नंतरची चार-पाच वर्ष अनियमित वारकरी होतो. निवासी संपादक झाल्यावर विधिमंडळाशी असलेला संपर्क कायमचा तुटला. आमच्या पिढीचं विधिमंडळ वृत्तसंकलन सुरु झालं तेव्हा, वृत्तवाहिन्यांचा आणि पत्रकारांचा आजच्यासारखा सुळसुळाट नव्हता. मंत्रालय आणि विधिमंडळाचं वृत्तसंकलन करणारे पत्रकार मोजके; २०/२५च्या आसपास होते. या पत्रकारांचा मंत्री, विरोधी पक्षनेते, विधिमंडळात बोलक्या तसंच आक्रमक असणाऱ्या अनेक सदस्यांशी थेट संपर्क असे. भेटीसाठी पत्रकारांना वाट पहायला लावण्याची प्रथा तेव्हा नव्हती. लॉबीत ओळखीचा पत्रकार दिसल्यावर मंत्री थांबून दोन तरी शब्द बोलत, तिघं-चौघं पत्रकार एकत्र गेले तर हातातलं काम, बाजूला ठेऊन वेळ काढत असत…आता हे चित्र इतिहासजमा झालं आहे!
तो काळ विधीमंडळात खूप आणि दीर्घकाळ काम होण्याचा होता. सरकारला सभागृहात अडचणीत पकडण्यासाठी विरोधी पक्षाकडून सर्व सांसदीय आयुधं वापरली जात. ‘सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही’, असा दिलासा सत्ताधारी पक्षाला अधिवेशनाआधीच मिळत नसे. अर्थसंकल्पावर खातेनिहाय चर्चा होताना एक रुपयाची कपात सूचना मांडून कायमच सरकारचे वाभाडे काढले जात. कामकाज मध्यरात्रीपर्यंतही अनेकदा चालत असे. कामकाज लांबलं की, आम्हा बहुदा सडेफटिंग आणि तरुण पत्रकारांच्या भुकेची काळजी बबनराव ढाकणे, ना.धों. महानोर, रा. सु. गवई आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांनी खूप वेळा घेतलेली आहे. तेव्हा नागपूरला एक उपाहारगृह केवळ आमदारांसाठी राखीव होतं. आमदारांना तिथे सवलतीच्या दरात चहा-भोजन मिळत असे. राजकीय विचार बाजूला ठेऊन वर उल्लेख केलेली ही ज्येष्ठ मंडळी आमच्या क्षुधाशांतीची तिथं काळजी घेत असत. नागपूरला खाण्याचे डबे घरून आणण्याची पद्धत तेव्हा नव्हती, त्यामुळे विधिमंडळ परिसरातील उपाहारगृहे हेच भूक भागवण्याचं एकमेव साधन असे. नागपूरच्या विधानभवनात जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावरच्या एका कोपऱ्यात मुंबईहून आलेले एक कॅन्टीन असे. तिथं मिळणारे बटाटेवडे, भजी, ऑम्लेट फार म्हणजे-अतिच चविष्ट असत. ते तळण्याचा वास कॉरीडॉरमध्ये दूरवर कायम मुक्कामाला असे. त्याच कॉरीडॉरमध्ये आमदारांचा भत्ते मिळण्याचा विभाग असल्यानं तर, त्या बटाटेवडे आणि भज्यांचा आस्वाद घेण्यासाठीही आमदारांचीही झुंबड उडत असे. तिकडे जाण्याआधी अनेक आमदार कोणाच्या तरी हाती पत्रकार कक्षात निरोप पाठवून आम्हाला बोलावून घेत असत. मुंबईत असो की नागपुरात, भाई सावंत त्यांची भुकेची वेळ झाली की उपस्थित असतील तितक्यांना ते जेऊ-खाऊ घालत. त्यांच्या केबिनमध्ये डबे उघडले की मत्स्यांन्नाचा दरवळ जठराग्नी प्रज्वलीत करत असे.
विलासराव देशमुखांच्या चेंबरमध्ये खाण्यासाठी काही तरी मागवण्याची वेळ दुपारी चारच्या सुमारास असे. सुरुवातीच्या काळात, म्हणजे केवळ सदस्य असतांना, गोपीनाथ मुंडे, दत्ता मेघे, रा. सु. गवई यांची गाठ कॅन्टीनमध्ये हमखास पडत असे. उपमुख्यमंत्री झाल्यावरही गोपीनाथ मुंडे यांचा भर कॅन्टीनमधील खाण्यावरच असे. प्रताप आसबे, दिलीप चावरे, धनंजय कर्णिक, धनंजय गोडबोले, संजय जोग असे आम्ही काहीजन एकटे किंवा मिळून त्यांच्या केबिनमध्ये शिरलो की, आता खायला मागवलं जाणार म्हणजे, कामातून अर्धा तास तरी विश्रांती, असा सुस्कारा मुंडे यांचा स्टाफ सोडत असे! दत्ता मेघे मंत्री झाल्यावर त्यांचा डब्बा मोठा येत असे पण, ते फार माफक खात आणि इतरांना मात्र भरपूर खिलवत असत. सतीश चतुर्वेदी मंत्री झाल्यावर त्यांच्या विधिमंडळ आणि मंत्रालयातील दालनात खाऊगिरीसाठी गर्दी असे. सतीश चतुर्वेदींकडच्या या सामुहिक खाद्यास्वाद कार्यक्रमाला तेव्हा ‘सत्संग’ असं दिलेलं नाव, अजूनही स्मरणात आहे. या दुपारच्या मैफिलीत मुंबईचे काही ज्येष्ठ पत्रकारही सहभागी होत. त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्या घरून आलेले डबे आणि त्यातील रुचकर, झणझणीत सामीष भोजनाच्या आठवणींना आवर्जून उजाळा मिळत असे. नागपूरचे तेजसिंह राजे भोसले कॉंग्रेसचे प्रतोद आणि रणजित देशमुख मंत्री झाल्यावर आमची खाण्यापिण्याची जास्त चंगळ होण्यास सुरुवात झाली. तेव्हा नागपूरहून दोन-तीन आठवड्यातून एक तरी चक्कर मुंबईला होत असे. मंत्रालयात किंवा विधिमंडळातल्या रणजित देशमुख यांच्या केबिनमध्ये डोकावलं तरी, तिथे जर तेजसिंह राजे भोसले असले तर (ते असतच!) त्यांच्या पुढाकारानं रणजित देशमुख यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यात रात्रीच्या भोजनाचे इरादे लगेच पक्के होत. तेजसिंह राजे भोसले कुठून-कुठून फिरून अत्यंत चविष्ट असं ‘फिशफ्राय’ घेऊन रात्री तिथे येत. तेजसिंह राजे भोसले पुढे खासदार झाले. दिल्लीतही त्यांचा हा खिलवण्याचा सोस केवळ कायमच राहिला नाही तर आणखी विस्तारीत झाला; तो दिल्लीच्या खाद्य संस्कृतीचा महिमाच आहे!
आम्हा काही पत्रकारांची ‘खाद्यनाळ’ नितीन गडकरी यांच्याशी खास जुळलेली होती. गडकरी मंत्री झाल्यावर त्यांच्या चेंबरमध्ये ते कितीही कामात असले आणि त्यांना मुळीच वेळ नसला तरी, आम्हा काही ‘निवडक’ मित्र-कम-पत्रकारांना परस्पर त्यांच्या डब्यावर ताव मारण्याचा किंवा त्यांच्या खात्यावर कॅन्टीनमधून हवं ते मागवण्याचा मुक्त परवाना होता. तसंही गडकरींना आठ-दहा माणसं सोबतीला असल्याशिवाय आणि गप्पांची मैफिल रंगवल्याशिवाय जेवण जात नाही! त्यात खवय्येगिरी हा त्यांचा मुलभूत शौकच होता आणि आहे. मंत्री झाल्यावर गडकरींच्या मुंबईतील निवासस्थानी येणारा-जाणारासाठी भटारखाना कायम सुरु असे. तिथे आम्ही अधिकारवाणीनं पाहिजे त्या डिशेसची फर्माईश करत असू. अलिकडे पत्रकारिता करायला दिल्लीत गेल्यावर पहिल्यांदा गडकरींना भेटायला गेलो तेव्हा, त्यांनी कुकला बोलावून ‘याद राखना, ये साब मेरा बहोत पुराना दोस्त है. वो कभीभी आये तो जो फर्माईश करेंगे वो खिलाना’ अशा सूचना कडक आवाजात दिल्या, अशी ही आमची खाद्यनाळ! नितीन गडकरी यांच्याकडे ‘सामीष’प्रेमींची कुचंबणा होत असे, हे मात्र खरं.
‘खाणं आणि खिलवणं’ यात छगन भुजबळ यांच्या अगत्याचा आम्हा पत्रकारांच्या पिढीला खूप लाभ झाला. भुजबळ विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते होते तेव्हा मी आणि प्रताप आसबे मनोरा या आमदार निवासात दीर्घकाळ वास्तव्यासाठी होतो. ते बंगल्यावर असोत वा नसोत त्यांच्या स्वयंपाकघराचे दरवाजे आम्हा दोघांसाठी कायम खुले असत. त्यांच्या घरी होणाऱ्या काही ‘राजकीय भोजनात’ आमचा सहभाग पत्रकार असल्यानं शक्य नसला की, आम्ही न म्हणताही भुजबळ यांच्या घरून प्रताप आसबे आणि माझ्यासाठी भलामोठा टिफिन पोहोचत असे, असं हे भुजबळांचं निर्व्याज अगत्य! ‘निर्व्याज’ हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण ‘अमुक एक बातमी घ्या किंवा घेऊ नका किंवा का घेतली ?’ असे रुसवे-फुगवे म्हणा की वाद, मुंडे-भुजबळ-गडकरी-विलासराव यांनी किमान माझ्याशी तरी कधीच केले नाहीत.
धनंजय कर्णिक कायम ज्यांचा ‘अशांत टापू’ असा उल्लेख करत असे त्यातील आर आर पाटील, दिग्विजय खानविलकर, दिलीप वळसे पाटील यांच्याशी याच काळात सलगी निर्माण झाली. आर आर उपाख्य आबा पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईतल्या विधानभवनाच्या दुसऱ्या मजल्यावरील कॅन्टीनशी परिचय करून दिला. आर आर हे चवीने आणि मनाच्या गाभाऱ्यातून नॉन-व्हेजचे कडक भक्त! विधिमंडळ कॅन्टीनमधले ‘नॉन-व्हेज’ पदार्थ खास चवीचे असत. महत्वाचं म्हणजे तिथे सामीष पदार्थ पातळ ‘रश्श्या’त असत, ‘करी’त नाही. सामीषची फार आवड नसली तरी गप्पांसाठी मी आणि दिलीप चावरे तिथे आबांसोबत अनेकदा जेवलो आहे. भूक नसली तरी आबांसोबत अनेकदा तिथल्या चवदार रश्श्याच्या दोन-तीन वाट्या मी फस्त केलेल्या आहेत. रस्सा आणि करी, चिकन आणि मटन यातील उच्च-नीच ‘भेद’, प्रत्येकाची वेगळी स्वाद प्रक्रिया, बनणाऱ्या डिशेशचा विस्तृत ‘शाखा’विस्तार आणि चवीतील जायका, अशी माहिती आबांमुळेच मला कळली. आर आर पाटील मंत्री झाल्यावर (एव्हाना मी औरंगाबादला बदलून आलेलो होतो) त्यांच्या मंत्रालयातील राखीव चेंबरमध्ये त्यांच्या घरून आलेल्या डब्यावर अनेकदा दुपारी ताव मारल्याचं आठवतं. एकदा ठरवल्यानुसार जेवायला पोहोचलो तर, आबांना अचानक महत्वाच्या कामासाठी दौऱ्यावर जावं लागलेलं होतं पण, त्या गडबडीतही आमच्यासाठी डबा पाठवायला ते विसरलेले नव्हते!
दिग्विजय खानविलकर यांना कोल्हापुरी रांगड्या, मोकळ्या-ढाकळेपणानं मैफिल रंगवावी, स्वत: लज्जतदार खावं आणि इतरांना आग्रह ते करून खिलवावं यात खूपच रस होता. आम्हा दोघांचे सूरही फारच लवकर जुळले. त्यांचा स्वभाव अत्यंत उमदा आणि वागणं आदबशीर; अस्सल राजेशाही आदब. त्यांनी मुंबईची जी खाद्ययात्रा घडवली त्याची चव अजूनही जिभेवर आहे. मी औरंगाबादला असताना ते बीडचे पालक मंत्री होते. त्यामुळे मी मुंबई सोडली तरी आमच्या फारच नियमित भेटी होत. दिग्विजय जन्मजात सामीष; कट्टर शौकीन. त्यांच्याकडे ब्रेकफास्टलाही अनेकदा सामीष पदार्थ असत. ‘मटनाचं लोणचं’ आणि ‘चिकनचे लाडू’ हे अफलातून जिव्हेला पाणी आणणारे पदार्थ त्यांच्यामुळेच कळले. माझ्या घरी नॉनव्हेज बनवलं जात नाही कारण, आम्हाला कुणालाच ते येत नाही. म्हणून, खानविलकर मुंबईहून येतांना आठ-दहा खणांचा टिफिन घेऊन येत. त्यात विविध प्रकारचे सामीष पदार्थ भरलेले असत. विमानतळावरून तो टिफिन माझ्याकडे पोहोचत असे आणि खानविलकर बीडला जात. रात्री परतल्यावर मग आमच्या घरी रंगलेल्या मैफिलीत आणि ‘नॉनव्हेज खाणारा पण, न बनवणारा बामन’ अशा शब्दात ते माझी खेचत असत. औरंगाबादकर डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. अमृत महाजन, नितीन बागवे हे या मैफिलीचे कायम सदस्य असत. पुढे मी नागपूरला गेल्यावरही आमची ‘ही’ नाळ अशीच जुळलेली राहिली. निवडणुकीत पराभव झाल्यावर दिग्विजय खानविलकर बाजूला फेकले गेले. मग त्यांना असाध्य रोगानं ग्रासल्याची बातमी आली. मन चरकलं. अचानक एक दिवस त्यांचा फोन आला. ‘मी ठणठणीत बरा झालो असून राजकारणात पुन्हा सक्रीय होत असल्याचं’, त्यांनी उत्साही स्वरात सांगितलं. त्यांनी जुन्या काही मित्रांचे फोन नंबर घेतले. आमच्यात भेटीचा वादा झाला पण, आमची भेट राहूनच गेली…आम्ही दिल्लीत असताना अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली.
‘कुजबुज’मधील ‘डब्ब्या’नं आमच्या रिपोर्टिंगच्या काळातीलही डब्बे आणि त्यातून प्रेमानं खिलवणाऱ्या अनेक राजकारण्यांच्या आठवणी दाटून आल्या. त्यातले आता गंगाधरराव फडणवीस नाहीत, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील आणि दिग्विजय खानविलकरही नाहीत…हे सर्व मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात निघून गेले आहेत. आता उरल्या आहेत त्यांच्या केवळ गतकातर आठवणी…
-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या – www.praveenbardapurkar.com