■ औरंगाबादच्या ‘आदर्श गावकरी’ या दैनिकांचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला . त्यानिमित्ताने ‘आदर्श गावकरी’ने एक विशेष पुरवणी प्रकाशित केली . त्या पुरवणीत पत्रकार उद्धव भा . काकडे यांनी मराठवाड्याच्या विद्यमान राजकीय परिस्थितीच्या संदर्भात घेतलेली ही माझी मुलाखत -■
शंकरराव चव्हाण यांना मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती. त्यानंतर विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे हे लोकांशी नाळ जुळलेले नेते मराठवाड्याला लाभले. ही नेतेमंडळी लोकचळवळीतून, तळागाळातून राजकारणात आली होती. मात्र त्यांच्या जाण्यानंतर आज मराठवाड्याला एका सूत्रात बांधणारा, संपूर्ण मराठवाड्याचे नेतृत्व करणारा, येथील प्रश्न सोडवण्याची तळमळ असणारा असा एकही नेता आपल्याकडे नाही, हे आपले दुर्दैव आहे. आपल्या नेत्यांकडे केवळ राजकीय दृष्टी आहे, विकासाची नाही. आज संपूर्ण मराठवाड्याला एकत्र बांधेल, असा नायक हवा आहे. हे नेतृत्व मिळत नाही, तोपर्यंत मराठवाड्याचे प्रश्न सुटणार नाहीत, असे स्पष्ट मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रवीण बर्दापूरकर यांनी व्यक्त केले.
दै. ‘आदर्श गावकरी’च्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ संपादक आणि राजकीय विश्लेषक प्रवीण बर्दापूरकर यांनी मराठवाड्याच्या राजकीय पैलूंवर दिलखुलास चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, मराठवाड्याच्या राजकारणात सध्या कुठलाही एखादा पक्ष प्रभावी नाही. मराठवाडा हा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप अशा पक्षांमध्ये विभागला आहे. आपण राजकीय लोकशाही स्वीकारलेली आहे. म्हणजे आपल्या सर्व प्रश्नांची, समस्यांची उत्तरे ही राजकारण्यांकडेच आहेत. मात्र सध्याचे वातावरण असे आहे की, संपूर्ण मराठवाड्याला एका सूत्रात बांधून ठेवेल, असा एकही नेता येथे नाही. ज्याप्रमाणे विदर्भात नागपूरमध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार, अजित पवार आहेत. पश्चिम महाराष्ट्राची शिकवण घेऊन विदर्भातील नेत्यांनी विकासाच्या मुद्यावर एकत्र येत त्यांच्या भागाचा विकास करून घेतला, करुन घेत आहे. मात्र आपल्याकडे मराठवाड्यात विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर एक पोकळी निर्माण झाली आहे. विलासर्व आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मराठवाड्याविषयी व्यापक आकलन आणि विकासाची दृष्टी दिवाकर रावते यांच्याकडे होती पण , सिवसेनेने त्यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी सोपवली .
मराठवाड्याचे आकलन असणारा असा एकही नेता नाही, असेही म्हणता येणार नाही. आपल्याकडे अशोकराव चव्हाण, अमित देशमुख, पंकजा मुंडे आहेत. मात्र सगळे परंपरेने राजकारणी. यांच्या घराण्यात, रक्तातच राजकारण आहे. पण, या नेतेमंडळींचा मराठवाडाभर संचार आहे का? यांना मराठवाड्याच्या प्रश्नांची सखोल जाण आहे का? येथील प्रश्नांसंदर्भात ही नेतेमंडळी एकत्र येतात का?. नेमके हेच होत नसल्याची खंत बर्दापूरकर यांनी व्यक्त केली. जनतेची नाडी ओळखण्यासाठी जनतेमध्ये रहावे लागते. पण, मुंडे, देशमुख, चव्हाण घराण्यातील आजच्या राजकीय नेत्यांचा ‘पीपल कनेक्ट’ काय आहे, अशोकराव चव्हाण तर मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आदर्श घडले नसते तर त्यांना मोठी इनिंग
- ( छायाचित्र – अंकुश नाहटा )
मिळाली असती. आज शरद पवार या वयात जेवढे फिरतात, तितके तितके आमचे मराठवाड्यातील हे सर्व नेते मिळून आमचे तरुण नेतेमंडळी फिरतात का? तर नाही. यामुळेच आज विलासराव आणि मुंडेनंतर प्रादेशित नेतृत्व मराठवाड्यात निर्माण झालेले नाही, असा स्पष्ट उल्लेख प्रवीण बर्दापूरकर यांनी केला. दिवंगत खा. राजीव सातव यांच्यात हे गुण होते. मात्र त्यांना महाराष्ट्रातील राजकारणात रस नव्हता. ते दिल्लीच्या राजकारणात जास्त रमले. इथल्या नेत्यांमध्ये आपल्या भागाविषयी, इथल्या विकासाविषयी तळमळच दिसून येत नाही, असे स्पष्ट विचार त्यांनी मांडले.
देशमुख, मुंडेंनंतर मिळाले परंपरेचे राजकारणी
विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे हे लोकचळवळीतून पुढे आलेले नेते. त्यांनी तळागाळापासून राजकारण सुरू केले. विलासरावांनी बाभुळगावच्या सरपंच पदापासून राजकीय वाटचाल सुरु केली. रेणापूरच्या अगोदरपासून परळीतून गोपीनाथ मुंडेंनी काम करायला सुरुवात केली. तळागाळातून वर आल्यामुळे या नेत्यांचा थेट लोकांशी संपर्क होता. तर शंकरराव चव्हाणांना मराठवाडा मुक्तीसंग्रमाची पार्श्वभूमी होती. औरंगाबादच्या नेत्याला अहमदपूरच्या राजकारणात काय चालू आहे, तिथली गरज काय आहे, हे माहिती पाहिजे किंवा माहित करून घेतले पाहिजे. संपूर्ण मराठवाड्याचे प्रश्न मांडू शकेल, असा नेता नाही. त्याचे कारण म्हणजे हे घराणेशाहीतून परंपरेने राजकारणात आलेले नेते. बातमी करताना जसा न्यूज सेन्स हवा असतो, तसा मराठवाड्याची नाडी ओळखणारा, ही नाडी म्हणजे काय तर जनतेचे प्रश्न जाणणारा, ते सोडवण्यासाठी धडपडणारा नेता आज आपल्याकडे नाही, असे प्रवीण बर्दापूरकर यांनी नमूद केले.
परळीत धनंजयची व्होटबँक, पंकजा मात्र सक्रीय नाही
मागील तीन निवडणुकांपासून परळीत राजकारण बदलते आहे. पंकजा या गोपीनाथ मुंडे यांची मुलगी. त्या तळागाळातून नाही आलेल्या, तर घराणेशाहीतून त्या राजकारणात आल्या. त्या जनतेची नाडी ओळखण्यात अयशस्वी ठरल्या. पंकजा मुंडेंना पक्षातल्यांनीच पराभूत केले, असे माझे अॅनालिसिस अजिबात नाही. परंतु, धनंजय मुंडे आपली व्होटबॅक वाढवत आहे, हे पंकजांच्या लक्षातच आले नाही. दुसरीकडे अमित देशमुखही विलासरावांसारखे फिरत नाहीत नाहीत ; लोकांत जात नाहीत . एकूण काय तर , पूर्ण मराठवाड्याला राजकीय नायक नसल्याचं वातावरण आहे. आज इथल्या नेतृत्वात क्षमता आहे की नाही, हे मला माहित नाही. मात्र त्यांच्यात तळमळ दिसून येत नाही, हे मात्र खरे असल्याचे प्रवीण बर्दापूरकर यांनी निक्षून सांगितले.
पीपल कनेक्ट, क्रॉस द पार्टी रिलेशनशिपचा अभाव
सध्याचे औरंगाबादचे मराठवाड्याचे जे संपर्कमंत्री आहेत, ते किती लोकांशी कनेक्ट आहेत? त्या त्या नेत्यांचा, आमदार-खासदारांचा त्यांच्या तालुक्यात, जिल्ह्यात पीपल कनेक्टच नाही. क्रॉस द पार्टी रिलेशनशीपच येथे नाही, हा मुद्दा महत्वाचा आहे. राजकीय मतभेद विसरुन मैत्री असणं आणि त्याचा विकासासाठी उपयोग करणं, हे राजकारण्यांचं फार महत्वाचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. विदर्भातल्या लोकांनी हेच ओळखले की विकासाचा मुद्दा आला की सर्वपक्षीय राजकीय नेते एकत्र येतात ; विकासाची राजकरणपलिकडची दृष्टी हीच विलासराव-गोपीनाथ मंडे असेपर्यंत मराठवाड्यात होती. आज हाच अभाव असल्याचे प्रवीण बर्दापूरकरांनी नमूद केले.
लॉ, आर्किटेक्चर युनिव्हर्सिटी, डीएमआयसीचे काय झाले?
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी औरंगाबादसह नागपूरलाही आली. आज आपल्याकडच्या युनिव्हर्सिटीची अवस्था काय आहे? नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्चर आले, त्याचे पुढे काय झाले? डीएमआयसी आली, आज त्याची काय अवस्था आहे? किती लोकांना रोजगार मिळाला, किती उद्योग आले? जे येणार होते, ते का नाही आले? अलीकडील दहा-पंधरा वर्षात औरंगाबादेत कोणत्या मोठ्या संस्था किंवा किमान ५ हजार कोटींची भांडवली गुंतवणूक असणारे प्रकल्प आले का? हे सर्व प्रश्न का मार्गी नाही लागले. मराठवाड्याचे सोडा, मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. अजिंठा लेणीला जाणार्या रस्त्याचे काम रेंगाळत पडलेले आहे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक घटलेत. मिनी घाटी बांंधली, ती अजूनही पूर्ण क्षमतेने सुरु नाही. जालना रोडचा प्रश्न कायम आहे. मंत्रालयात कुणी यावर जाब विचारतेय का? असा सवाल प्रवीण बर्दापूरकर यांनी उपस्थित केला .
इथल्या खासदार-आमदारांनी हिशोब द्यावा!
औरंगाबादचे राजकारण तर भोंग्यातच गुरफटले आहे. येथील प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. याकडे कुणाचेच लक्ष नाही. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पूर्ण मतदार दौरा केलाय का? दुसरीकडे चंद्रकांत खैरे काही प्रॉब्लेम आला की मी आधीच पत्र दिले होते, असेच सांगतात आणि तिथेच त्यांचे विकासाचे उद्दिष्ट संपते ! म्हणून औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रत्येक आमदार, खासदारांनी हिशोब द्यावा की , त्यांनी मागील पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली. कोणते प्रकल्प आणले, जनतेचे किती प्रश्न सोडवले, हे सांगावे, असे आव्हानच प्रवीण बर्दापूरकर यांनी दिले.
■ शब्दांकन-उद्धव भा. काकडे , औरंगाबाद