शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला पक्की लागू होणारी ‘जवळ ये पण, शिवू नको’ असा इरसाल अर्थ असणारी ‘आरतें ये, पण आपडां नको’ अशी एक मालवणी म्हण आहे. युती आणि आघाडी या दोघानाही एकमेकासोबत सत्ता हवी आहे पण एकत्र नांदायचे नाही कारण स्वबळाचे प्रयोग करून पहायचे डोहाळे लागल्याने एकमेकांना शिवायचे नाही आणि तरी दूर जातो हे सांगायचे कोणी हे त्रांगडे होते. भाजप आणि राष्ट्रवादीने अखेर ते सांगायचे धाडस केले आणि हे त्रांगडे दूर केले मात्र त्यासाठी प्रचंड घोळ घातला आणि स्वत:चे हंसे करून घेतले. सेना- भाजपचा विचार करायचा झाला तर सत्तेत येण्यासाठी अनुकूल स्थिती असताना या दोन्ही पक्षांना ही दुर्बुद्धी सुचली आहे. ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ आतापर्यंत ठाऊक होते मात्र ‘अनुकूलकाले विपरित बुद्धी’ अशी स्थिती या दोन्ही पक्षांनी निर्माण केली आहे.
कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील गेल्या पंधरा वर्षातील भ्रष्टाचारी आणि स्वार्थी कारभाराला, त्यातून आलेल्या अफाट मग्रुरीला, बजबजपुरीला आणि एकमेकावर कुरघोडी करण्याच्या वृत्तीला लोक कंटाळले आहेत. लोकसभेत तसा कौल मतदारांनी स्पष्ट दिला. लोकसभेच्या राज्यातील ४८ पैकी ४२ जागी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी मोठ्या बहुमताने पराभूत केले. राज्यातील २४६ विधानसभा मतदार संघात सेना-भाजप-स्वाभिमानी-शिवसंग्राम-रिपब्लिकन पक्ष आठवले गट या महायुतीला दणकून आघाडी मिळाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील सत्ता नजरेच्या टप्प्यात आली. मात्र हे यश आपल्या एकट्याचेच आहे आणि त्यात केवळ नरेंद्र मोदी लाटेचाच वाटा आहे अशी भारतीय जनता पक्षाची भावना प्रबळ झाली. भारतीय जनता पक्षाचा स्वबळाचा प्रभाव जर एवढा मोठा होता तर सेना-भाजप युतीचा महायुती असा विस्तार गोपीनाथ मुंडे यांनी का केला, उत्तरेतील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही स्वबळाचा प्रयोग का केला गेला नाही हे अगदी बाळबोध प्रश्न भाजपला पडले नाहीत. मतदारांचा कौल काँग्रेसप्रणित यूपीएच्याही विरोधात आहे, नरेंद्र मोदीसमोर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव पडलाच नाही, काँग्रेस-भाजपला पर्याय म्हणून समोर आलेली आम आदमी पार्टी साफ निष्प्रभ ठरली आणि भाजपचे नसणारे मतदार भाजपकडे वळले याही मुलभूत मुद्द्यांचा विसर लोकसभा निवडणुकीतील विजयाचे विश्लेषण करताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना पडला. त्यामुळे महायुतीला मिळालेल्या मतात अन्य कोणाचेच योगदान नसून ती मिळालेली ४७ टक्के मते केवळ आपली एकट्याचीच आहे असा भाजपचा भ्रमाचा भोपळा फुगला! विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच ‘दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी एकारली हाळी ठोकत महायुतीत दुहीची बीजे भाजपकडून पेरली गेली आणि निवडणुकीआधीपासूनच सर्व काही बिनसत गेले. सेना-भाजप युती गेल्या २५ वर्षांची आहे. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या युतीचे शिल्पकार आणि अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा या युतीला पाठिंबा अशी ती स्थिती. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘दादागिरी’ केल्यावरही महाजन आणि मुंडे अनेकदा एक पाऊल मागे घेत युती टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत हा इतिहास सर्वज्ञात आहे. सेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यावरही अशा कुरबुरी सुरूच राहिल्या.
चिमूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तर उद्धव ठाकरे आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यातील संबध टोकाचे कसे ताणले गेले आणि त्यांचा एकमेकाशी संवाद पुन्हा सुरु होण्यात काय काय झाले याचे आस्मादिक जवळून साक्षीदार आहेत! असे अनेक प्रसंग आहेत पण, युती तुटली नाही कारण या दोन्ही पक्षांची ती एक अपरिहार्य राजकीय आगतिकता होती.. शिवसेनेत नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे यांनी फूट पाडली. नंतर प्रमोद महाजन यांची हत्या झाली. गोपीनाथ मुंडे काहीसे बाजूला फेकले गेले आणि नितीन गडकरी यांचे नेतृत्व समोर आले. मुंडे विरुद्ध गडकरी असा पक्षांतर्गत संघर्ष सुरु झाला आणि या दोन गटात पक्ष विभागला गेला. गडकरीसोबतच दुस-या फळीतले विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे हे नेतृत्व राज ठाकरे यांच्याशी सोयरिक जुळवावी या मताचे उघडपणे होते. त्यातून पुन्हा युतीत तणाव निर्माण झाला पण गडकरी दिल्लीच्या राजकरणात गेले. याच दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचे वार्धक्याने निधन झाले आणि युतीचा आणखी एक शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला. यथावकाश गडकरी-मुंडे यांच्यात गडकरी दिल्लीत तर मुंडे महाराष्ट्रात असा समझौता झाला आणि राज्याची सूत्रे पुन्हा मुंडे यांच्याकडे एकमताने आली. महाराष्ट्रात केवळ युतीच्या बळावर काँग्रेस-राष्ट्रवादीला शह देता येणार नाही हे ओळखून मुंडे यांनी युतीचा महायुती असा विस्तार करून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धूळ चारत विधानसभा निवडणुकीतील यशाची पायाभरणी केली. दरम्यान सेना-भाजप युतीला अनुकूल असणारी परिस्थिती झपाट्याने बदलली. पंतप्रधान पदासाठी आपल्याऐवजी सुषमा स्वराज यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पसंती दिली होती हे न विसरलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांना अनुल्लेखाने मारणा-या मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेताना बाळासाहेबांच्या त्या (पक्षी : सुषमा स्वराज) पसंतीचे उट्टे सेनेला डावलून काढले. दरम्यान अटलबिहारी बाजपेयी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाजूला गेले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेप्रमाणे लालकृष्ण अडवाणी बाजूला फेकले गेले. गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. भारतीय जनता पक्षाची सूत्रे राजनाथसिंह यांच्याकडून अमित शहा (म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडेच!) यांच्याकडे आली. साहजिकच महाराष्ट्रात भाजपची स्वबळाची भाषा आक्रमक उजागर झाली आणि युतीतील तणाव तुटण्याकडे झुकला. सेनेसोबत युती तोडण्याची घोषणा करण्यासाठी नरेंद्र मोदी भारतात नसतील हे फार आधीच ठरले होते. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांचे विमान अमेरिकेच्या दिशेने निघाले आणि २५ सप्टेबरला सायंकाळी ‘आमचा मार्ग वेगळा’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत जाहीर केले. या घडामोडी पक्षात बहुसंख्याना ठाऊक होत्या. विदर्भ आणि मराठवाड्यातील सेनेकडे नसणा-या मतदार संघातील भाजपच्या अनेक इच्छुकांनी अन्य अन्यांप्रमाणेच प्रस्तुत पत्रकाराशीही बोलताना हे सूचित केलेले होते आणि हा काही योगायोग नव्हता. जर ऐनवेळी भाजपची उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवावी का याची चाचपणी हे इच्छुक करत होते, याचा अर्थ भारतीय जनता पक्षात काही तरी ‘वेगळे’ शिजत आहे हे न कळण्याइतके पत्रकार बुद्दू नाहीत! मुद्रित माध्यमे आणि प्रकाशचित्र वृत्तवाहिन्यांवरूनही ‘युती तुटण्याच्या मार्गावर’ असल्याच्या बातम्या भाजप गोटातून कोण प्लांट करत होते आणि त्या बघून जनमानसात काय प्रतिक्रिया उमटेल याचा अंदाज कसा घेतला जात होता हेही जगजाहीर आहे! भाजपचे हे उद्योग लपून राहणे शक्यच नव्हते ते जसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कळत होते तसेच त्याची बित्तंबातमी सेना आणि महायुतीतील अन्य पक्षांनाही मिळत होती. अन्य पक्षांचा जीव फारच लहान आहे त्यामुळे ते घायकुतीला आलेले होते, कोंडीत सापडले होते तर सेनेनेही स्वबळाची तयारी न बोलता गनिमी काव्याने सुरु केली होती आणि ते भाजपला कळले होते.. असे हे २५ वर्षाचा संसार मोडीत काढण्याचे ‘अनुकूलकाले विपरित बुद्धी’ शैलीतील दुष्टचक्र आहे.
चुका दोन्ही बाजूनी झाल्या. सेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याने युतीत तणाव निर्माण ही एक बाजू असेल तर ‘दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी घोषणा आधी भाजपने केली हे विसरता येणार नाही आणि देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे अशा अनेकांना मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत उतरवून सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग भाजपने केले (यापैकी एकाच्या सहायकाने सांगितल्याप्रमाणे साहेबांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी कपडे कसे शिवून ठेवले… अशी ही घाई old man in hurry.. सारखी!) हे कमी की काय म्हणून मंत्री आणि त्यांची खाती ठरवण्याची कांगलघाई भाजप नेत्यांना लागली. शेवटच्या क्षणी ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असा मानभावी पवित्रा भाजपनेच घेतला. विधानसभा निवडणुकीत सेना सतत हरत असलेल्या जागांवरच आम्ही दावा सांगितला, असे भाजपचे म्हणणे वरवर खरे मानले तर भाजप ज्या जागांवर सतत पराभवाला सामोरे जात आहे त्या जागा सेनेने मागितल्या असत्या तर त्या भाजपने सेनेला दिल्या असत्या का, या दुस-या बाजूकडे साफ आणि सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. शिवसेनेने १५० ऐवजी १४५ जागांपर्यंत उतरत मोठ्या भावाची भूमिका न निभावता ताणून धरले हेही विसरता येणार नाही. एकीकडे २८८ मतदार संघात उभे करण्याइतके उमेदवार नाहीत अशी कोडगी कबुली देत सेना आणि भाजपने स्वबळावर लढायची तयारी कितीतरी आधीपासूनच सुरु केली ती युती टिकवण्यासाठी असे म्हणत राहणे खरे तर स्वत:ची फसवणूक करणे आहे पण, राजकारण हा फसवाफसवीचा खेळ असल्याने हे दोन्ही पक्ष हा डोळे मिटून दूध पिणा-या मांजरासारखा हा खेळ खेळत राहिले!
महायुतीला लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते आता विभागली जाणार आहेत आणि नेमकी तीच स्थिती काँग्रेस राष्ट्रवादीची आहे. यात बाजी मारणारा केवळ २४/२५ टक्के अनुकूल मतदानाचा धनी असेल. या चौघांपैकी कोणाला इतकी मते मिळतील हे आता सांगणे कठीण आहे. मात्र निकालानंतर नवीन युती आणि आघाड्या अस्तित्वात येतील. ‘आरतें ये, पण आपडां नको’ असे म्हणण्याची वेळ या चारही पक्षावर येणारच आहे. हा निर्लज्जपणा असला तरी तो आपल्या देशातील राजकारणाचा स्थायीभाव झालेला आहे!
जाता जाता – काँग्रेस , राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या चौरंगी लढतीचा लाभ राज ठाकरे सर्वेसर्वा असलेल्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेला कसा होईल ही अजून स्पष्ट झालेले नाही पण, युती आणि आघाडी तुटल्याने अडगळीत पडलेल्या ‘मनसे’ला धुगधुगी मिळाली आहे एवढे मात्र निश्चित !!
-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com