देवरुख , कोंडविलकर आणि…

|| नोंद…१४||

त्नागिरी जिल्ह्यातील देवरुख या गावाशी संबंधित १९७९-८० अशा दोन वर्षातल्या अनेक आठवणी आहेत .  त्यातल्या काही अलवार आणि भावनाप्रधानही आहेत . तसं तर , एकूणच कोकणातल्या आठवणी  रेशमाच्या मऊशार लडी हळुवार उलगडत जाव्यात तशा आहेत . अनुभवाच्या पोतडीत लपलेली ती कांही गुजं आहेत . तेव्हा वयाच्या पंचवीशीत होतो . चिपळूणच्या ‘सागर‘ या दैनिकात उमेदवारी सुरु होती . ‘सागर‘मध्ये पत्रकारितेची मुळाक्षरे गिरवताना जे शिकायला मिळालं त्यामुळे जाणिवा व्यापक आणि टोकदार होण्यास मदत झाली . भालचंद्र दिवाडकर आणि ‘सागर’चे संपादक नानासाहेब उपाख्य निशिकांत जोशी या दोन जिंदादिल व्यक्तिमत्त्वांची भेट झाली  . त्या संदर्भात ‘चिपळूणचे दिवस’ या लेखात याआधी लिहिलं आहे . ( त्या लेखाची लिंक अशी-  https://goo.gl/o7JqZx   ) . आज थोडसं देवरुखविषयी आणि त्याचं कारण आहे , ज्येष्ठ साहित्यिक माधव कोंडविलकर यांच्या निधनाची आलेली बातमी .

निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या देवरुखला त्या दोन वर्षांत अनेकदा जाणं झालं . तेव्हा चिपळूणहून देवरुखला बहुदा थेट बस नव्हती . संगमेश्वरला उतरुन दुसरी बस पकडावी लागत असे ; परतीचा प्रवासही असाच मार्गे संगमेश्वर करावा लागे . का , कोण जाणे , निसर्गाच्या ओंजळीत विसावलेलं , बहुसंख्य कौलारु घरं असलेलं ते टिपिकल कोकणी शैलीतलं गाव खूपच भावलं . इतकं की , मनात वस्तीला आलेल्या देवरुखची काही  रेखाटणंही तेव्हा केली होती ; पुढे ती सर्व कुठे गेली कुणास ठाऊक . देवरुखच्या प्रा . डॉ .सुरेश जोशी आणि विशेषत: एका शाळेत मुख्याध्यापक असलेल्या   ज . वि . जोशी , या दोन कुटुंबांशी छान सूर जुळले . ज . वि . जोशी यांच्या घरी तर दोन-तीनवेळा

धुक्यात हरवलेललं देवरुख

मुक्कामालाही होतो . ही दोन्ही जोशी कुटुं सुसंस्कृतपणा ओतप्रोत होता . साहजिकच वर्तन आणि  वाचनाच्या बाबतीत ही दोन्ही कुटुंबे  अभिजात वळणाची होती . ज . वि . जोशी आणि त्यांचे कुटुंबिय साहित्याकडे निर्मळ आस्वादाच्या नजरेतून बघत , तर सुरेश जोशी मात्र बरेचसे समीक्षकी असत . सुरेश जोशी यांचे एखाद्या साहित्य प्रकाराविषयी मत व्यक्त करण्याची पद्धत , आस्वाद आणि समीक्षा असं मिश्रण असे . त्या काळात संध्याकाळी देवरुख गावात फेरफटका मारणे आणि रात्री ८.३० ची बस पकडून चिपळूणला परतणे असंही अनेकदा घडलं . एका पावसाळ्यात देवरुखच्या कुशीत असलेल्या एक धबधब्यापाशी दिवस घालवला होता हेही आठवतं .  देवरुखचा फेरफटका मारताना मुंबईत कधी काळी ब-यापैकी जान-पहचान झालेला पत्रकार मित्र रमेश गुणे हाही  दोन-तीनवेळा भेटल्याचे स्मरतं . त्यानंतर मात्र त्याची कधीच भेट झाली नाही . (  त्याचा धाकटा भाऊ दिनेश हा आमचा ‘लोकसत्ता’तील सहकारी होता . ) १९८१ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडाअखेर एका पहाटे मी चिपळूण सोडलं . त्यानंतर चिपळूणला एकदा ओझरता का असेना गेलो . देवरुखला मात्र कधीच जाणं झालं नाही .

‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे‘ या आत्मकथनाचे  लेखक माधव कोंडविलकर देवरुखलाच असतात , असं देवरुखच्या अशाच एका भेटीत ज . वि . जोशी यांची कन्या रेखा हिच्याकडून समजलं . त्यांना राहण्यासाठी श्री . पु . भागवतांनी घर दिलेलं आहे , हेही तिनं मोठ्या कौतुकानं सांगितलं . ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे‘ केवळ वाचलेलंच नव्हतं तर त्याची तीन-चार पारायण झालेली होती . नंतर ‘…देवाचे गोठणे’वर रेखा जोशी हिनं लिहिलेलं एक आस्वादात्मक टिपण ‘सागर’च्या रविवारच्या अंकात प्रकाशित करण्यासाठी मी जरा जास्तच रुची दाखवली होती . तेव्हा विक्रमवीर क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचं ‘सनी डेज’ गाजत होतं . त्याचा संदर्भ देत , ‘कोंडविलकर यांच्या आयुष्यातील ‘गोठणं’ आता संपावं आणि त्यांच्या जगण्यात ‘सनी डेज’ अशा यावेत’  अशा आशयाचा सूर आळवलेला रेखा  जोशी ( आता ठाकूर ) हिचा मजकूर होता .

जे कांही माणुसकीहीन , अमानवी जगणं वाट्याला आलं , ते कोंडविलकर यांनी ज्या संयत शैलीत व्यक्त केलं , त्या शैलीच्या  मी प्रेमात पडलेलो होतो . गावकुसाबाहेर जीणं कसं जगावं लागलं ,  हे कथन करणारी आत्मकथनं प्रकाशित होण्याचा तो प्रारंभीचा , बहराचा आणि त्यानं मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाला बेडरपणे धडक देण्याचा तो काळ होता . त्या वास्तववादी लेखनानं , संवेदनशील असलेलं समाजमन ढवळून निघालेलं होतं . वेदना आणि विद्रोहाचा हुंकार असलेलं , स्वत:तला माणूस लक्षात आलेल्या आत्मभानाचं ते लेखन अश्रूंनी लिहिलं गेलेलं होतं . ते वाचताना काळजाला पीळ पडत असे आणि वेदनेच्या लाटा मनात उसळत असतं . मराठी साहित्याला नवं परिमाण देणारं ते लेखन प्रकाशित होणार्‍या पहिल्या पिढीतले माधव कोंडविलकर हे बिनीचे शिलेदार होते . आत्मकथनांच्या गर्दीत माधव कोंडविलकर यांची धारदार पण , आक्रस्ताळ्या नसलेल्या लेखन शैलीनं किमान माझ्यावर तरी गारुड केलेलं होतं . ‘डाळं’ आणि खूप नंतर आलेल्या ‘हाताची घडी , तोंडावर बोट’ या त्यांच्या दोन कादंबर्‍याही वेधक होत्या पण , त्या पाहिजे तशा गाजल्या नाहीत , असं अजूनही वाटतं .

यथावकाश रापलेल्या चेहेर्‍याच्या माधव कोंडविलकर यांची भेट झाली . वयानं ते माझ्यापेक्षा बरेच मोठे होते . शिक्षकी व्यवसायात होते . त्यांचे केस पांढरे होऊ लागलेले होते आणि कपाळावर किंचित आठयांचं जाळं जमा करुन एका संथ लयीत ते बोलत असत . मग हळूहळू स्नेह आणि भेटीही वाढल्या आणि गप्पा होऊ लागल्या . ‘मौज’ आणि ‘सत्यकथा’वाल्या भागवतांचं घर , त्या घरात माधव कोंडविलकरांशी गप्पा हे तेव्हा फारच ग्रेट वगैरे वाटायचं . नंतर पत्रकारितेच्या मोठ्या परिघात आलो , राजकीय वृत्तसंकलनात शिरलो आणि भागवत , कोंडविलकर यांच्या विषयी वाटणारं , माझ्या मनातलं ग्रेटपण कधी ओहोटीला लागलं हे समजलचं नाही .

त्यावेळी झालेल्या गप्पातून कोंडविलकरांविषयी बरंच काही समजलं . गप्पातून तेही हळूहळू खुलत गेले . प्रस्तावित लेखनाविषयीही ते बोलत असत . स्मरणशक्ती पुरेशी दगा देत नसेल तर त्यांनी लिहिलेल्या काही कविताही वाचल्याचं स्मरतं . त्या कविता प्रकाशित झाल्या की नाहीत हे मला तरी माहिती नाही . माधव कोंडविलकर हे  शांत म्हणण्यापेक्षा बुज-या स्वभावाचे जास्त होते. सार्वजनिक आणि विशेषत: व्यासपीठीय वावरणंही त्यामुळेच बहुदा त्यांना फारसं काही जमलं नाही . प्रसिद्धीच्या तोवर प्रस्थापित झालेल्या फंड्यांपासूनही ते प्रसिद्धी दूर होते . सतत चार लोकांत वावरावं किंवा कोण्या गटा-तटात सहभागी होण्याचा त्यांना तिटकाराच होता . एका अर्थानं ते मनस्वी वृत्तीचेहोते .  तेव्हाच्या एकूणच जगण्यावर म्हटलं तर ते खूश होते आणि म्हटलं तर नव्हतेही , कारण अन्य दलित आत्मकथनं जशी गाजली , तितकी चर्चा ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ ची झाली   नाही ; शिवाय शाळेतल्या राजकारणाची झळ लागत असल्याची खंत त्यांनी दोन-तीनदा बोलून दाखवल्याचं आठवतं . यात एक भाग असा की , वाट्याला आलेल्या आणि नंतर स्थिरावलेल्या जगण्यापलीकडे माधव कोंडविलकर यांचा अनुभवाचा परिघ विस्तारला आहे  किंवा जाणीवपूर्वक त्या परिघाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे असं , कधी दिसलं नाही . पण ते असो .

चिपळूण सुटलं तरी चिपळूणातली काही मंडळी कायम संपर्कात राहिली. देवरुख मात्र कायमचं तुटलं आणि तिथल्या कुणाशीही नंतर कोणताही संपर्क राहिला नाही , त्याला अगदीच थोडाफार माधव कोंडविलकर यांचा अपवाद . १९८५-८६ पर्यंत आमच्यात तुटक तुटक का असेना पत्रव्यवहार होता . शाईच्या पेननं लिहिलेली त्यांची पोस्टकार्ड येत असत . ‘नागपूर पत्रिका’ दैनिकाच्या दिवाळी अंकात दोनवेळा त्यांचा मजकूरही समाविष्ट करता आला होता . तरी हा सर्व संपर्क जेवढ्यास तेवढा होता .

त्याच काळात मी राजकीय वृत्तसंकलनाच्या धबडग्यात आलो आणि साहित्य क्षेत्राशी असलेला दैनंदिन संपर्क हळूहळू क्षीण होत गेला . त्या क्षीणपणातच कोंडविलकर हेही एक . त्यांच्या निधनाची बातमी वाचली आणि त्यांच्या आठवणींनी आळोखेपिळोखे दिले तेव्हा लक्षात आलं , आठवणींच्या कोप-यात कुठेतरी देवरुख , जोशी कुटुंब आणि माधव कोंडविलकर , मौनात का असेना अजूनही वस्तीला आहेतच .

 माधव कोंडविलकर यांची प्रकाशित पुस्तके—

|| अजून उजाडायचं आहे (कादंबरी) || आता उजाडेल! (कादंबरी) || एक होती कातळवाडी (कादंबरी) || घालीन लोटांगण (धार्मिक) || डाळं (कादंबरी) || देवांचा प्रिय प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक (ऐतिहासिक) || निर्मळ (कादंबरी) || भूमिपुत्र (कादंबरी) || मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे (दलित साहित्य) || स्वामी स्वरूपानंद (आध्यात्मिक) |||| ||  हाताची घडी तोंडावर बोट (कादंबरी) ||

( छायाचित्रे सौजन्य – दिनेश गुणे आणि अजय कांडर )

-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

 

संबंधित पोस्ट