|| नोंद …१० ||
गजानन घोंगडे यांच्या पत्रासंबंधी लिहिलेल्या मजकुरावर मुंबईच्या सरोज पाटणकर यांचा मेसेज आला . गजाननचं अक्षर बघून त्यांना कवीश्रेष्ठ ग्रेस यांच्या अक्षर आणि सहीची आठवण झाली . सरोज पाटणकर यांच्या कविता वाचल्याचं स्मरतं . सरोज पाटणकर यांच्याविषयी माझ्या मनात मत्सर आहे त्याचं कारण त्यांनी प्रख्यात चित्रकार द. ग. गोडसे ( जन्म ३ जुलै १९१४ – मृत्यू ५ जानेवारी १९९२ ) यांच्यावर पीएच. डी . चं संशोधन केलं आहे . माझ्याही मनात एक चित्रकार दडलेला आहे . वयाच्या वीस -बाविशीपर्यंत रंगकल्लोळाचे काही खेळ माझ्यातला तो चित्रकार करत असे . पण , पत्रकारितेत आल्यावर गेल्या चाळीसवर वर्षात तो चित्रकार अंतर्धान पावलेला आहे तरी , चित्र आणि चित्रकारांबद्दल सुप्त का असेना आकर्षण आहेच . सरोज पाटणकर या तर चित्रकार द . ग . गोडसे यांच्या शिष्या . चित्रांचं सौंदर्यशास्त्र ( Aesthetics in Paintings ) त्यांना द . ग . गोडसे यांच्याकडून शिकायला मिळालं . सरोज पाटणकर यांच्याविषयी मत्सर असला तरी तो या कारणामुळे प्रसन्नही आहे .
द . ग . गोडसे यांची दोन स्मरणं मनात आहेत . विदर्भ साहित्य संघाचं साहित्य संमेलन अकोला इथं झालं. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ( १९९२ ) आता नेमकं आठवत नाही पण , कुणीतरी द . ग . गोडसे यांचं नाव सुचवलं . सर्वच गोडसे ‘नत्थुराम पंथा’चे नसतात आणि सर्वच ब्राह्मण मनुवादी नसतात , हे अजून सर्वमान्य व्हायचं असल्यामुळे अध्यक्षपदासाठी द . ग . गोडसे यांच्या नावाला काही सदस्यांनी घनघोर विरोध केला . त्यांच्या नावासाठी नेटाने किल्ला लढवण्यात श्रीपाद भालचंद्र जोशी आणि मी होतो . चर्चेच्या शेवटी शेवटी , सुरेश द्वादशीवार आणि वामन तेलंग यांची कुमक आम्हाला मिळाली आणि द ग. गोडसे यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झालं . साहित्य आणि चित्र या संदर्भात द .ग . गोडसे यांनी त्या संमेलनात मूलभूत अर्थगर्भ चिंतन मांडल्याचं अजूनही स्मरतं .
दुसरं स्मरणही कांहीसं मैत्रीपूर्ण असूयेचंच आहे . ज्येष्ठ चित्रकार , ‘बसोली’ या बाल चित्रकाराच्या चळवळीचा प्रणेता आणि महत्वाचं म्हणजे दोस्तयार चंद्रकांत चन्ने यानं ती असूया निर्माण केलेली आहे . त्याचं कारणही द . ग . गोडसे हेच आहेत . काही वर्षापूर्वी आम्ही गप्पा मारत असताना द . ग . गोडसे यांचा विषय निघाला . त्यांच्यावर भरभरुन बोलतांना चंदू चन्ने मला एका खोलीकडे घेऊन गेला . एकावर एक सात कुलपं लावून भक्कम संरक्षण केलेल्या तिजोरीच्यासारखी किल्ल्या लावून ती खोली त्यानं उघडली . सॕण्डल्स बाहेर काढल्या आणि मोठ्या भक्तिभावानं त्या तिजोरीत प्रवेश करुन तिथं जपून ठेवलेली द . ग . गोडसे यांनी पेन्सिलनं रेखाटलेली ‘न्यूड’सह ( गोडसे यांच्या निधना नंतर ‘न्यूड’ रेखाटण्याच्या परंपरेचा खूपसा संकोच झालेला आहे ! ) आणखी कांही रेखाटनं त्यानं दाखवली . त्यावेळी एखादा ऐवज हाताळत असल्यासारखा भक्तिभावानं चंदूचा चेहेरा उजळून निघालेला होता . ती न्यूड आणि अन्य मिळून किमान चाळीसवर तरी गोडसे यांची रेखाटनं चंदू जवळ होती . आमच्या तोवर असलेल्या सुमारे पावणे चार दशकं वयाच्या दोस्ती खातरही त्यातलं किमान एखादं रेखाचित्र मला देण्यास चंदूनं ठाम नकार दिला . कितीही दोस्तयार असला तरी या श्रीमंतीबद्दल चंदू चन्नेची वाटणारी असूया अजूनही कायम आहे . पण ते असो .
♦♦♦
सरोज पाटणकर यांनी ग्रेस यांच्या स्वाक्षरीचं स्मरण केल्यावर आठवलं . १९७७ पासून ग्रेस यांच्याशी ‘बैठकी’चं मैत्र असूनही ग्रेस यांनी ना कधी मला त्यांचं एखादं पुस्तक दिलं किंवा ना मी त्यांना कधी मागितलं . कधी त्यांनी मला ऑटोग्राफ दिल्याचंही आठवत नाही . नुकतंच देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केलेल्या ‘ग्रेस नावाचं गारुड’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीची तयारी सुरु असतांना प्रतिभावान छायाचित्रकार विवेक रानडे यांनं मुखपृष्ठासाठी त्यानं काढलेली पण , आजवर गुपितच ठेवलेली काही छायाचित्रं दाखवली . ग्रेस यांच्या त्या सर्व मुद्रा ब्लॕक ॲण्ड व्हाइट होत्या . त्यातली एक विवेकनं मुखपृष्ठासाठी निवडली . ते छायाचित्र बघतांना ग्रेसच्या फिल्मी अंदाजातच सांगायचं तर मनात…
बाकी सारे अंदाज तो ठीक हैं तुम्हारे तस्वीर के
बस आपकी ये खामोशी अच्छी नहीं लगती
अशा भावना उचंबळून आल्या . ग्रेस मराठी साहित्यात जिवंतपणीच दंतकथा झालेले होते . त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे मोहक विभ्रमाचं अफलातून मिश्रण होतं . ग्रेस यांच्या व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा घेणार्या नामवंतांनी लिहिलेल्या अनेक हृद्य आठवणी ‘ग्रेस नावाचं गारुड’ या पुस्तकात आहेत .
‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा संपादक असतांना मी ‘क्लोज-अप’ हे व्यक्तिचित्रांचं एक सदर एक वर्षभर चालवलं . त्या मजकुराची पहिली आवृत्ती नागपूरच्या विजय प्रकाशनानं प्रकाशित केली तेव्हाची ही आठवण आहे .( ‘क्लोज-अप’ची दुसरी त्यातही महत्वाचं म्हणजे सुधारित आवृत्ती पुण्याच्या देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केली आहे . ) ‘क्लोज-अप’च्या प्रकाशनाची बातमी प्रकाशित झाल्यावर एक दिवस ग्रेस यांचा फोन आला आणि त्यांनी त्या पुस्तकाच्या संदर्भात चौकशी केली . सहकारी नामदेव पराडकर यांच्या हस्ते ‘क्लोज-अप’ची एक प्रत ग्रेस यांना सप्रेम भेट म्हणून लगेच पाठवून दिली.
चार-पाच दिवसांनी ग्रेस यांचा फोन आला . ‘क्लोज-अप वर एक टिपण लिहिलं आहे’, असं त्यांनी सांगितलं . पराडकर जाऊन ते टिपण घेऊन आले . ते टिपण कसलं , ग्रेस यांनी त्यांच्या अनवट शैलीत अत्यंत ममत्वाने हजार-बाराशे शब्दांची ती केलेली ‘क्लोज-अप’ची पाठराखण होती . त्या तीन पानांच्या मजकूराच्या शेवटी ग्रेस यांनी टिपिकल त्यांच्या शैलीतील ‘मी ग्रेस’ अशी केलेली स्वाक्षरी होती .
चाहते ग्रेस यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी , गेला बाजार स्वाक्षरीसाठी कसे आसुसलेले असतात ते खूप जवळून अनुभवलेलं असल्यामुळे ती पत्रवजा प्रतिक्रिया वाचल्यावर सहाजिकच भारावून ग्रेस यांना फोन करुन . ‘गुरुजी . लई भारी लिहिलंय , यू मेड माय डे . चिअर्स !’ असं म्हणत ती प्रतिक्रिया प्रकाशन समारंभात वाचून दाखवण्याचं कबूल करुन टाकलं…
पण ही हकीकत इथे संपायची नव्हती.
प्रकाशन समारंभ खूप उशीरा सुरु झाला आणि लांबलाही . आभार प्रदर्शनापूर्वी कार्यकर्माच्या आयोजक आणि संचालनकर्त्या शुभदा फडणवीसनं ग्रेस यांची प्रतिक्रिया वाचून दाखवायची राहिली असल्याचं सांगितलं . मात्र, ‘ती प्रतिक्रिया आता राहू दे. आपण पुढच्या आवृत्तीत ती प्रकाशित करु’, असं म्हणूत मी तो विषय संपवला.
चार-पाच दिवसांनंतर चंद्रकांत चन्ने ( पुन्हा चंद्रकांत चन्नेच ! ) ग्रेस यांना भेटायला गेला . तेव्हा ‘क्लोज-अप’ च्या समारंभाचा विषय झाला . ग्रेसनी चंदूला विचारलं ‘माझी प्रतिक्रिया कशी वाटली ?’. ग्रेस यांच्या प्रतिक्रियेबद्दल चंदू पूर्ण अनभिज्ञ होता. सहाजिकच ग्रेस यांची पत्रवजा प्रतिक्रिया वाचून न दाखवल्याचं स्पष्ट झालं . फोन करून ग्रेस यांनी माझी तुमच्यावर खुन्नस आहे असं गंमतीत सांगितलं . मग काय घडलं ते सांगून पुढच्या आवृत्तीत ती प्रतिक्रिया समाविष्ट करतो आहे , ‘सॉरी’ वगैरे असा खूप अनुनय झाला . पण , ग्रेस हंसत हंसत म्हणाले ‘माझी खुन्नस कायम आहे’ . नंतर खुन्नस या विषयावर आमच्यात बरीच एसएमएसबाजीही झाली.
-असेच दोन-अडीच महिने गेले आणि एक दिवस कवीश्रेष्ठ ग्रेस यांचा एसएमएस आला , “रेव्हरंड प्रवीणजी कुड फिल क्रियेटिव्ह इनकार्नेशन आॕफ माय लेटर , इन्क्ल्युडेड इन माय बुक, विच बिइंग प्रिंटेड…..मी ग्रेस.” पुढे ग्रेस यांचं ‘ओल्या वेळूची बासरी’हे पाप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेलं ललित बंधांचं पुस्तक आलं . ( त्या पुस्तकात पान क्रमांक १७५वर ग्रेस यांचा तो प्रतिक्रियावजा लेख आहे . ) ‘ओल्या वेळूच्या बासरीची’ ती प्रत बघून बेगम मंगला आणि माझ्या डोळ्यांत नकळत आनंदाश्रू आले यात नवल नव्हतंच. आटोग्राफ किंवा एखादं पुस्तकं भेट म्हणून मिळण्यापेक्षा कवीश्रेष्ठ ग्रेस यांनी त्यांच्या पुस्तकात मी आणि माझ्या पुस्तकावर मैत्रीतली खुन्नस म्हणून काही मजकूर घ्यावा , यापेक्षा आयुष्यात भरजरी ते काय असतं ?
सरोज पाटणकर यांच्या एसएमएस नंतर ते पत्र शोधून काढलं . कवीश्रेष्ठ ग्रेस स्केच पेननं सुरुवातीच्या काळात ‘ग्रेस’ आणि अलीकडच्या अठरा-वीस वर्षांत ‘मी ग्रेस’ अशी लफ्फेदार सही करत . त्यांचं अक्षर टपोरं , वळणदार आणि मोठं देखणं होतं ; इतकं देखणं की , त्यांच्या कवितेइतकंच त्यांच्या अक्षरांच्याही प्रेमात पडावं असं ! मला लिहिलेल्या पत्रावर मात्र ग्रेस यांनी बॉलपेननं स्वाक्षरी केलेली आहे . तिच इथं देत आहे . ग्रेस यांची स्मरणं जगण्याच्या सांध्यपर्वातही कायम उजळलेलीच राहणार आहेत .
( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत )
-प्रवीण बर्दापूरकर
( ३ ऑगस्ट २०२० )
Cellphone +919822055799
praveen.bardapurkar@gmail.com / www.praveenbardapurkar.com