१९७२चा दुष्काळ अनुभवलेल्या पिढीतील मी एक आहे. अंग भाजून काढणारी उन्हें, सतत कोरडा पडणारा घसा, कधी तरी मिळणारे अत्यंत गढूळ पाणी, खायला अमेरिकन लाल मिलोच्या भाकरी, मिलो मिळणे मुश्कील झाल्यावर राज्य सरकारने सुरु केलेले सुकडी हे खाद्यान्न, रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडी फोडणारे लोक आणि याच खडीचे ओळीने रस्त्यालगत लागलेले ब्रास… असे ते दृश्य मनावर कायमचे कोरले गेलेले आहे. (त्या दिवसात घरंदाज स्त्रियाही पदर चेहेऱ्यावर ओढून घेऊन खडी फोडत असल्याचे पक्के आठवते, इतकी दुर्धर अन्नान्न परिस्थिती होती…) लोकांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने तेव्हा लाखो ब्रास खडी फोडून ठेवली. तीच खडी पुढची अनेक वर्ष रस्ते तयार करण्यासाठी वापरली गेली. माझी आई नर्स होती आणि जर गरोदर महिलेची सुटका करायला ती गेलेली किंवा गावातले शिक्षक जर शाळेत गेले असताना पाण्याचा tanker आला तर शेजारचे लोक त्यांच्यासाठी चार बदल्या पाणी बाजूला काढून ठेवत. कोणाला काही कारणाने रेशनच्या दुकानावर जाऊन धान्य आणायला वेळ मिळाला नाही किंवा त्याची घरधनीन आजारी असेल किंवा अन्य काही अडचण असेल तर, कोणी काहीच न म्हणता जाती धर्माच्या भिंती आड न येता शेजारच्या घरात त्याच्यासाठी भाजी होत असे-भाकरी थापली जात असे. कोणा एका घरात मयत झाली तर तो गावच्या जाती-धर्माच्या पलिकडील जबाबदारीचा आणि शोकाचा विषय होत असे, कोणी न मागता पै-पैसा काढून गाव अंत्यसंस्कार करत असे. दुष्काळ पाण्याचा होता, अन्नाचा होता, पैशाचा होता.. माणुसकीचा नव्हता. आता १२/१३ वर्षानंतर पुन्हा मराठवाड्यात परतल्यावर चार-पाचच महिन्यात तोच परिचित दुष्काळ अत्यंत आक्रमकपणे सामोरा आला. ७२च्या त्या दुष्काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या की नाही ते आठवत नाही पण, आता मिडिया जागरूक असल्याने वाचायला मिळणाऱ्या नापिकी तसेच कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या दररोजची सकाळ सुन्न करतात. मात्र आज १९७२ इतकी उपासमारीची स्थिती नाही कारण अन्न-धान्य मिळते आहे, पिण्यासाठी पाणीही बऱ्यापैकी का असेना उपलब्ध आहे आणि नसेल तर ते खरेदी करण्याइतकी आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. मात्र अनुभवयाला मिळतात आहेत ती प्रादेशिक स्तरावरची पाण्यासाठीची अपरिचित भांडणं. मराठवाड्याच्या तोंडी पाणी पडू नये म्हणून माणुसकी विसरून टोकाच्या असहिष्णुतेणे झालेल्या कोर्ट-कचेऱ्या…
महाराष्ट्र तोच आहे पण, राज्यातले राजकारण किती बदलले बघा, संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगून एकत्र आलेला मराठी माणूस एकमेकाच्या तहानेचा विचार माणुसकीच्या पातळीवर करायला तयार नाही आणि म्हणे हे राज्य एकसंध आहे! विदर्भाच्या पाणी प्रकल्पांचा निधी पश्चिम महाराष्ट्राचे मंत्री पळवतात. जायकवाडीचे पाणी जालन्याला मिळू नये म्हणून राजकारण होते, अहमदनगरचे राजकारणी औरंगाबादला पाणी द्यायला विरोध करतात, नासिकचे राजकारणी अहमदनगरला पाणी देण्यास नकार देतात आणि सोलापूरला पाणी देण्यासाठी पुण्याचे राज्यकर्ते विरोध करतात. तानसाचे पाणी मुंबईकर पितात पण तानसेकर मात्र पाण्यासाठी वणवण फिरतात… तहानलेल्यांना पिण्यासाठी दोन घोट पाणी मिळावे यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो आणि न्यायालयाचा पाणी देण्याचा तो आदेश न पाळण्यासाठी काही राजकीय मंडळी वरच्या.. आणखी वरच्या न्यायालयात जातात… संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी जीवाचे रान करून आंदोलन उभारलेल्यांनी, पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्लेल्यांनी, तुरुंगवास भोगलेल्यांनी, संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणाचे मोल देणा-यांनी, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्यांनी तहान भागवण्यासाठी या महाराष्ट्रात भविष्यात अशी काही माणसा-माणसात कचाकचा भांडा-भांडी उभी राहिल असे स्वप्नात तरी पहिले होते का? विकासाचे तूप आपल्याच पोळीवर ओढून घेण्याची स्वार्थी वृत्ती फोफावल्याने राज्यात फुटीचे वारे वाहायला सुरुवात होईल अशी कल्पना तरी केली होती का?
खरे तर, या राज्याचा समतोल विकास केला जाईल अशी नि:संदिग्ध ग्वाही सर्वार्थाने दृष्टे लोकनेते असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी नागपूर करार करून वैदर्भीयांना दिली तर निझामी क्रौर्याने गांजलेला मराठवाडा सुखाचा निश्वास टाकत संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झाला, ही वस्तुस्थिती आहे. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अस्तित्वात आल्यावर, ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या अग्रलेखाला उत्तर देताना हे राज्य मराठी माणसाचेच आहे, असा निर्वाळा यशवंतराव चव्हाण यांनी ठामपणे दिला असतानाही प्रत्यक्षात दिसते हे आहे की महाराष्ट्राच्या सर्व भागात जणू काही मराठी माणसे राहत नाहीत! यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दावर विसंबून संयुक्त महाराष्ट्रात आलेल्या मराठी माणसाचा दुस्वास मराठीच माणूस करतो आहे असे चित्र आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर त्यांचा वसा चालवण्याचा दावा करणा-या राज्यकर्त्यांनी समतोल विकासाचा शब्द तर पाळला नाहीच आणि आता पिण्याला पाणी देण्याची माणुसकीही हा महाराष्ट्र विसरत चालला असल्याचे पदोपदी दिसते आहे. त्यामुळेच महाराष्ट्र संयुक्त आहे पण, एकसंध आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
राजकारण म्हटल्यावर कट-कारस्थान, शह-प्रतिशह, कुरघोडी चालणार हे गृहीतच आहे किंबहुना तो राजकारणाचा धर्म आहे, अविभाज्य भाग आहे. आपल्या राज्यात घडले ते मात्र विपरीत आणि त्यामुळे परस्पराबाबत अविश्वासाची भावना निर्माण झाली. शेतीला पाणी ओढून घेण्याच्या घाईत कामे पूर्ण करण्यासाठी अन्य भागाचा निधी ओढून घेत विकासाचा असमतोल निर्माण केला गेला, त्यातून अनुशेषाचा प्रश्न समोर आला. मग अनुशेष दूर करण्यासाठी जे काही गंभीर प्रयत्न सुरु झाले त्यातही राजकारण आणले गेले. अनुशेषाचाही अनुशेष निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली! मराठवाड्यात गोविंदभाई श्रॉफ आणि विदर्भात श्री.वा.धाबे यांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी आंदोलन उभे राहिले. त्यातूनच वैधानिक विकास मंडळाचा अंकुश आला. हा अंकुश आणण्यास मराठवाड्याचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा विरोध होता कारण, हा अंकुश निष्प्रभ करण्याइतके पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व बेरकी आहे, असे मत त्यांनी मला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले होते. तरी ती मागणी गोविंदभाई श्रॉफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्याकडून मंजूर करवून घेतली (आणि मगच पद्म सन्मान स्वीकारला हा एका निष्ठेचा इतिहास आहे). आधी दांडेकर समिती आणि मग वैधानिक विकास मंडळांच्या स्थापनेनंतर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे ऐरणीवर आले ते संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहिलेल्यांना विषण्ण करणारे, वेदना देणारे होते. नंतरच्या काळात वैधानिक विकास मंडळे विकलांग करण्याचा आणि या मंडळासाठी मंजूर झालेला निधीच पळवण्याचे उद्योग करण्यात आले. शंकरराव चव्हाण यांचे भाकीत खरे ठरले. वैधानिक मंडळाला खुंटीवर टांगल्याचे उद्योग उघडकीस आल्यावर नितीन गडकरी व बी. टी. देशमुख यांनी विधी मंडळ तसेच न्यायालयीन पातळीवर दिलेली लढाई गाजली. ती लढाई संपलेली नसताना आणि विदर्भाची मागणी (सोशल मिडियात का होईना) जोर पकडत असतानाच आता या दुष्काळाने तहानेचा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणलेला आहे.
यानिमित्ताने आठवण झाली रायभान जाधव यांची. पाण्याचा प्रश्न अशा पद्धतीने आज न उद्या ऐरणीवर येणार आहे याची जाणीव अकाली निधन पावलेले मराठवाड्यातील एक अभ्यासू आमदार रायभान जाधव यांना आलेली होती. गेल्या टर्ममध्ये मनसेचे आणि या टर्ममध्ये शिवसेनेचे असलेले, ‘पोलीस मारहाण फेम’ कन्नडचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांचे ते वडील. (वडील अत्यंत जबाबदार आणि अभ्यासू तर पुत्र ? जाऊ द्या तो विषय नंतर कधी !) रायभान जाधव बराच काळ प्रशासकीय नोकरीत होते आणि मग राजकारणात आले, आमदार झाले. रायभान जाधव यांच्याच तेव्हाच्या कन्नड तालुक्यातल्या अंधानेरला मी शालेय शिक्षण घेतले, कन्नडच्या महाविद्यालयात प्रवेश घेणारा पहिला-दुसरा विद्यार्थी मी. आता मुंबईत सी.ए. असलेला लक्ष्मण काळे, औरंगाबादला वकिली करणारा भीमराव पवार, नाना थेटे आणि मी मिळून कृषी विद्यापीठ स्थापना तसेच मराठवाडा विकासाच्या चळवळीचे कन्नडला नेतृत्व केले. कॉलेज आणि कन्नड बंद करण्याचे उद्योग अनेकदा केले! साहजिकच रायभान जाधव यांच्याशी ओळख होती. पत्रकारितेत आल्यावर आमच्यात कन्नड हा समान दुवा होता. रायभान जाधव यांचे निधन होईपर्यंत आमच्यात नियमित संपर्क होता. जायकवाडीचे पाणी कसे वरच्या भागात रोखले जात आहे, त्यासाठी राज्याचे नेतृत्व कसे जबाबदार आहे, याचा सखोल अभ्यास रायभान जाधव यांनी केलेला होता. त्यासंदर्भात रायभान जाधव यांनी बरीच कागदपत्रेही जमा केलेली होती. ती सर्व माहिती ते मला पुराव्यानिशी देणार होते. औरंगाबादच्या खडकेश्वर परिसरातल्या त्यांच्या घरी आमच्या प्रदीर्घ भेटीही त्या संदर्भात झालेल्या होत्या पण, मृत्यूने अचानक घाला घातला आणि ती पुराव्याची कागदपत्रे माझ्या हाती लागलीच नाहीत.
‘महाराष्ट्राचे राजकारण पुढच्या काळात पाण्याच्याभोवती फिरेल आणि ते करताना राजकारणी सर्व मर्यादा ओलांडतील, सभ्यता आणि शिष्टाचार विसरतील’, असे रायभान जाधव नेहेमी म्हणत. त्यांच्याशी झालेल्या चर्चा आणि एक पत्रकार म्हणून राज्यभर फिरताना जे काही पाहात होतो त्यावरून मलाही ते पटू लागलेले होते, तहान भागवण्यासाठी गदर्भामागे पाणी घेऊन धावणा-या एकनाथ महाराज यांचा माणुसकीचा इतिहासही महाराष्ट्राचे राजकारणी विसरतील असे मात्र तेव्हा वाटत नसे, तो एक भाबडेपणा होता हे आता सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या नांदेडचे कवी केशव सखाराम देशमुख यांच्या एका कवितेतील ओळी आठवल्या –
हंडा हंडा पाण्यासाठी
दोर बादल्या घेऊन विहिरीच्या काठांवर झुंजणा-या स्त्रिया
डोळ्यात उभ्या असतात
अशावेळी तहानेचे इतिहास
अंगावर धाऊन येतात सर्पसमूह यावेत तसे
-म्हणूनच म्हटले महाराष्ट्र संयुक्त आहे मात्र एकसंध नाही आणि तो माणुसकी विसरण्याच्या वाटेवर चालू लागला आहे, हे काहीना कटू वाटले तरी तेच सत्य आहे!
-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com