■■
२०१९च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेस आणि डाव्यांची मतं पुन्हा भाजपकडे वळली तर मग मात्र पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती असतील , अन्यथा ८० ते ९० जागा भाजपा जिंकेल आणि सभागृहातला प्रमुख विरोधी पक्ष असेल , असा अंदाज आहे .
■■
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता टिपेला पोहोचलाय . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा सुरु झाल्या आहेत . ममता बॅनर्जी यांनी तर प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे जरा बघितलं तर निवडणुकीत चुरस आहे , असं दिसतंय . ही निवडणूक स्वाभाविकपणे ममता बॅनर्जी यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आणि खूपशी निर्णायक देखील आहे . सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात त्या यशस्वी होतात की नाही याकडे देशाच्या राजकीय निरीक्षकांचं तसंच भाजपाच्या विरोधी एकत्र येऊ इच्छितात त्या पक्षांचंसुद्धा लक्ष तिकडे लागलेलं आहे . याच कारण , भाजपसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला तोंड देऊन जर ममता बॅनर्जी यांनी ही निवडणूक जिंकली तर भाजपेतर आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून त्यांचं नाव अग्रक्रमानं समोर येऊ शकतं . ममता बॅनर्जी जर निवडणूक हरल्या तरी त्यांच्या बाजूनी सहानुभूतीची फार मोठी लाट राहिल कारण पुन्हा तेच , त्यांच्या विरोधात भाजपसारखा सर्वार्थानं बलाढ्य पक्ष होता .
ममता बॅनर्जी यांना देशातील भाजपेतर बहुतेक सर्व पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे . शरद पवार , उद्धव ठाकरे , स्टॅलीन अखिलेश यादव , तेजस्वी यादव…अशी देशभरातील दिग्गज नेते मंडळी ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी आहे पण , एक लक्षात घेतले पाहिजे की , हा पाठिंबा केवळ सांकेतिकच आहे . कारण तेजस्वी यांचा थोडाफार अपवाद वगळता पश्चिम बंगालमध्ये हे पक्ष किंवा या नेत्यांची किमानही शक्ती मुळीच नाही .
ममता बॅनर्जी यांचा राजकीय इतिहास संघर्षाचा आहे . डाव्या आघाडीशी प्रदीर्घ काळ संघर्ष करुन आणि त्यासाठी भाजपा-काँग्रेस असं ‘तळ्यात मळ्यात’ करुन ममता बॅनर्जीनी पश्चिम बंगालमध्ये त्यांची सर्व शक्ती एकवटली आणि २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वप्रथम सत्ता प्राप्त झाली . नेमकं सांगायचं झालं तर ,३४ वर्षांचं डाव्या आघाडीचं सरकार पायउतार झालं . तेव्हा ममता बॅनर्जी यांचा हा संघर्ष नेत्रदीपक राजकीय आदर्श मानला जात होता . एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की , पश्चिम बंगालमधलं राजकारण आणि सत्ताकारण हे नेहमी प्रतिष्ठेच्या मुद्दयावर चालतं . जसं आपल्याकडे निवडणूक आली की मराठीचा प्रश्न उफाळून येतो किंवा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उफाळून येतो , तसं पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रतिष्ठेचे प्रश्न निर्माण होत असतात . ममता बॅनर्जी यांनी देखील मी या ‘मातीची मुलगी‘ आहे असा जोरदार प्रचार करत २०११ च्या निवडणुकीमध्ये विजय संपादन केलेला होता . आताही पश्चिम बंगालची कन्या मीच आहे अशी हाक त्यांनी दिली आहे आणि त्यांच्या या हाकेला जनता आता तरी चांगला प्रतिसाद देतेय असं दिसून येतंय .
पण , यावेळेची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे . आतापर्यंत तुल्यबळ नसलेला भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये खंबीरपणे पाय रोवून उभा असल्याचं दिसतं आहे . शिवाय डावी आघाडी , काँग्रेस आहे आणि अन्य स्थानिक जे काही उमेदवार असतात ते आहेत . पण , ते निष्प्रभ आहेत म्हणून ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेस विरुद्ध नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पक्ष अशीच ही सरळ लढत आहे . त्यातही अजून एक गंमत आहे . ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रादेशिक पातळीवर भाजपाचा कोणताही प्रभावी चेहरा नाही . ममता बॅनर्जी यांच्या विरोधात दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरलेले आहेत . म्हणजे एका देशाचा पंतप्रधान विरुद्ध एका राज्याचा मुख्यमंत्री अशीही विषम लढाई आहे . संघटित भाजपला धनाची कमतरता नाहीये . भाजपची निवडणूक लढवण्याची तयारी नेहमीच अडीच-तीन–चार वर्ष आधी सुरु होते तशीच ती पश्चिम बंगालमध्ये सुरु झालेली आहे . असं असलं तरी ममता बॅनर्जी या काही लेच्यापेच्या नेत्या नाहीयेत . त्यांची नाळ तिथल्या मातीशी , लोकांशी घट्ट आहे . त्यांनी अनेक योजना तेथे सुरु केलेल्या आहेत . अगदी सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसांसाठी त्या उपलब्ध असतात . त्यांच्या राहणीमानात डामडौल नाही . त्यांना सत्तेचा माज नाही . अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी २०११ पासूनच्या कालखंडामध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे आणि पश्चिम बंगालमधल्या जवळजवळ सर्वच गावांमध्ये त्यांचा संपर्क आहे .
आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ज्याप्रमाणे डाव्या आघाडीशी संघर्ष करुन ममता बॅनर्जीना यांनी नेतृत्त्व आणि स्थान निर्माण केलं त्या संघर्षाला हिंसेची धार आहे . त्याचा उपयोग आता त्यांना भारतीय जनता पक्षाशी लढत देताना होणार आहे . कारण भाजपाला ‘ठोश्यास ठोसा’ देण्याची क्षमता ममता बॅनर्जीमध्ये आहे . प्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची धमक त्यांच्यात आहे . ममता बॅनर्जींचा स्वभाव हट्टी आहे . ( या स्वभावाची तक्रार तत्कालीन पंतप्रधान दस्तुरखुद्द अटलबिहारी वाजपेयींनी त्यांच्या आईकडे केली होती . ) त्यांचा स्वभाव ‘हट्टी‘ म्हणण्यापेक्षा ‘जिद्दी‘ आहे म्हणणं जास्त समर्पक आहे आणि या जिद्दीमुळेच त्या आजवर इथवर प्रवास करु शकलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे . त्यांचा कारभार कांहीसा एककल्लीही आहे . कुठलीही भूमिका घेतांना त्या अगदी ‘तारस्वरात‘ ( म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ! ) बोलत असतात . सर्वसामान् नेत्याचं हे वागणं आवडतं असतं आणि अशा वागण्याची मोहिनी पडत असते , हेही तेवढंच खरं . त्या कलावंत आहेत त्यामुळे अभिजनांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे .
पण , अशात त्यांना ममता बॅनर्जी अनेक सहकारी त्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्याचं कारण त्या पक्षाच्या एकमेव नेत्या आहेत ; हा जसा त्याच्याबद्दल उणेपणाचा मुद्दा आहे तसंच तोच मुद्दा त्यांचं बलस्थानसुद्धा आहे . निवडणुकांमध्ये एखादा मुद्दा अकारण किंवा सकारणही गाजत असतो आणि तो कुठला असेल हे कधीच सांगता येत नसतं . माझ्या ‘डायरी‘ या पुस्तकात आपल्या महाराष्ट्रातील एका विधानसभा निवडणुकीचा अनुभव दिलेला आहे . त्यात एका प्रख्यात उमेदवाराला त्याच्या गॉगलमधून समोरचा माणूस ‘आरपार’ दिसतो , अशी अफवा अचानक पसरली आणि त्यांच्या सभेला स्त्रियां सोडाच पण , पुरुषसुद्धा येणं बंद झालं .
भाजपच्या दृष्टीकोनातून अनपेक्षितपणे प्रतिकूल घटना आणि तृणमूल काँग्रेसच्या दृष्टीने सकारात्मक घडलेली आहे . ( आंधी‘ चित्रपटाची या निमित्ताने येथे आठवण होईल .) नुकताच एका सभेमध्ये ममता बॅनर्जीवर हल्ला झाला . पण तो हल्ला असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलेलं नाहीये ; ती सुरक्षा व्यवस्थेतील त्रूट होती असा प्राथमिक निष्कर्ष आयोगानं काढला आहे . त्या वादात जायला नको कारण ‘निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं असतं ‘ असा आरोप पूर्वी काँग्रेसच्या काळात होतं असे आता भाजपाच्या राजवटीत होतो . त्याबाबत वस्तुस्थिती जेव्हा समोर येईल तेव्हा येईल पण , तूर्तास पश्चिम बंगालमधील माझे जे काही स्त्रोत आहेत , त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्यावर जो हल्ला झालेला आहे , त्याचा भाजपाच्या संदर्भात कांहीसा नकारात्मक संकेत गेलेला आहे . निवडणुकीत शेवटच्या क्षणी दोनशे अडीचशे मते जरी इकडच्या तिकडे फिरली तरी त्याचा फार मोठा परिणाम होत असतो . शेवटी विजय महत्त्वाचा असतो . तो दहा हजार मतांनी मिळाली की , दहा मतांनी हे काही महत्त्वाचं नसतं .
शिवाय आणखी एक मुद्दा असा आहे की , २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याचं धाडस जसं राहुल गांधींनी दाखवलं ( ते कितपत प्रभावी ठरलं हा मुद्दा वादाचा आहे . ) तसंच अलिकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरुद्ध बंडाचं निशाण फडकण्याचं धाडस ममता बॅनर्जी यांनी दाखवलेलं आहे . चिट फंड घोटाळा असो की अन्य काही मुद्दा असो . केंद्र सरकारच्या संस्थांना त्यांनी तेथे हस्तक्षेप करु द्यायला नकार दिला . हे असं सगळं जास्त अनुकूल आणि कांही उणे वातावरण सध्या ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आहे . ममता बॅनर्जी यांना सत्ता प्राप्तीची पुन्हा संधी आहे अशी सध्याची परिस्थिती आहे . अर्थात मी असं विधान केल्याबरोबर भाजपाचे ट्रोल खवळतील हा भाग वेगळा . असो .
■■■
आता भाजपकडे वळू यात – भाजप एक राष्ट्रीय आणि सर्वार्थानं बलदंड पक्ष आहे . पश्चिम बंगाल काबीज करण्याची भाजपची योजना जुनी आहे . भारताच्या पूर्व भागातील काही राज्यात भाजपनं सत्ता संपादन केलेली आहे . पश्चिम बंगाल राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीकोनातून प्रमुख राज्य आहे . याचं कारण या राज्यात लोकसभेच्या ४२ जागा आहेत . २०१९ च्या निवडणुकीत त्या ४२ पैकी १८ जागा जिंकण्यात भाजपला यश आलेलं आहे आणि मतांची टक्केवारी जी आहे ४०. २ आहे त्यामुळे या निवडणुकीत सत्ता प्राप्तीची ईर्षा त्यांच्यात आहे . पण , भाजपाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये पश्चिम बंगालमधे सतत चढ–उतार आढळून येतो . २०११ च्या निवडणुकीत भाजपला ४ टक्के तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १६ टक्के मतं मिळाली २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मतांची ही टक्केवारी १० टक्क्यांवर आली ; ही चढ-उतार आव्हानात्मक आहे .
पण , वर उल्लेख केल्याप्रमाणे भाजप निवडणुकीची तयारी अतिशय प्रदीर्घ काळापासून करतो . शिवाय भाजपाचं अशातलं छोट्या जाती , जमाती , उपजाती , पोटजाती एकत्र करुन भक्कम मोळी बांधण्याच एक सूत्र आहे . जे उत्तर प्रदेशात दिसलं , ते महाराष्ट्रात १९९५ च्या निवडणुकीत दिसलं . तोच फार्म्युला पुन्हा आता वापरला जाईल . २०१७ पासूनच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणारे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत . यांचा अर्थ भाजप अशा पद्धतीची काही एक सूत्रबद्ध रचना करुन , बांधणी करुन , रणनीती आखून ही निवडणूक लढवण्याची तयारी करत असणार हे अगदी स्पष्ट आहे . आणखी एक मुद्दा असा की , भाजपाच्या राजकारणाचा भर नेहमीच ध्रुवीकरणावर राहिलेला आहे . ‘वन व्हर्सेस ऑल‘ अशा पद्धतीचं निवडणूक जिंकण्याचं ते धोरणात्मक सूत्र असतं . त्याचा ते खूप अभ्यास करतात आणि त्याची पद्धतशीर बांधणी करतात . त्यांच्या संघटनात्मक बांधणीच्या चिकाटी व चातुर्याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही . पश्चिम बंगालमध्ये विविध अंदाजानुसार २८ ते ३० टक्के मुस्लिम मतं आहेत आणि ती साहजिकच निर्णायक ठरतात . या निवडणुकीत हे मतांचं ध्रुवीकरण कसं केलं जातं . ही २८ ते ३० टक्के विरुद्ध बाकीची मतं आणि त्यातली भाजपाच्या पारड्यात किती पडतात किंवा पाडून घेतली जातात यावरसुद्धा भाजपाचं यश मोठं अवलंबून आहे .
नरेंद्र मोदी यांचा करिष्मा देशाच्या अनेक राज्यांमध्ये असला तरी तो पश्चिम बंगालमध्ये तितकासा नसावा असं मला वाटतं . शिवाय नेहमीप्रमाणे उमेदवारी वाटपावरुन भाजपामध्ये नाराजी आहे . ( तशी ती तृणमूलमध्ये देखील आहे ; निवडणुकीत ती सर्वच पक्षात निर्माण होते . ) तृणमूलचे जे अनेक लोक सोडून पक्षात आले त्यांना भाजपनं विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे . त्याबद्दल पक्षाच्या केडरमध्ये थोडीशी नाराजी आहे . पण , अशा बातम्या आम्ही पत्रकार नेहमीच देत असतो पण , त्याचा परिणाम आधी काँग्रेसच्या मतांवर नसे आणि आता भाजपावर होत नाही , हे वास्तव नाकरण्यात अर्थ नाही .
माझी जर माहिती अचूक असेल आणि माझ्या स्त्रोतांनी योग्य माहिती दिली असं आपण जर गृहीत धरलं तर भाजपाला पश्चिम बंगाल मधील ही विधानसभा निवडणूक जिंकण्याची आशा नाहीये . २०१९च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेस आणि डाव्यांची मतं पुन्हा भाजपकडे वळली तर मग मात्र सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती असतील अन्यथा ८० ते ९० जागा जिंकून भाजप संभागृहातला मुख्य विरोधी पक्ष असेल . तरी याचा एक दीर्घ फायदा भाजपाला होणार आहे आणि तो म्हणजे आता यापुढे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध भाजपा अशी सरळ लढाई राहिल . कारण काँग्रेस नेस्तनाबूत झाल्यातच जमा आहे . आता डावेही सगळे नेस्तनाबूत होतील . तेव्हा या निवडणुकीतून भाजप प्रमुख विरोधी पक्ष झाला तर राज्याच्या राजकारणात पकड घट्ट होईल आणि पुढच्या निवडणुकीत भाजपला सत्ता प्राप्त करता येईल , अशी आजची स्थिति आहे .
अर्थात हे सगळं ‘जर तर’ आहे . प्रत्यक्षात निकाल काय लागतील तोवर वाट बघायला हवी …
( छायाचित्र रचना संकल्पना – संभाजी सुरवसे )
■प्रवीण बर्दापूरकर
Cellphone- 9822055799