आईला आम्ही माई म्हणत असू. शिक्षा करण्याची माईची संवय जगावेगळी होती (हे आता जाणवतं!); खोड्या केल्या, चूक जरा गंभीर असली किंवा शेजारपाजारच्या कोणी चुगली केली तर पितळी पिंपातील पाण्यात उभं राहण्याची आणि तसं उभं असतांना म्हणजे, शिक्षा भोगताना एखादं पुस्तक मोठ्या आवाजात वाचण्याची सक्ती असे. शिक्षेची तिनं ठरवलेली मुदत संपण्याआत वाचन थांबलं तर शिक्षेच्या मुदतीत वाढ होत असे! यापेक्षा कठोर शिक्षा म्हणजे याच पिंपात उभं राहून वीरकरांच्या डिक्शनरीतले शब्द पाठ करणं किंवा मग ‘रेन अँड मार्टिन’चं ग्रामर घोकणं. एखादं अक्षर (अल्फाबेट) माई सांगत असे आणि त्या अक्षरानं सुरू होणारे इंग्रजी शब्द पाठ करणं; हे अतिशय कंटाळवाणं असे. पाठ करत असलेल्या शब्दातले काही शब्दार्थ माई अचानक डिक्शनरी हातात घेऊन (रॅन्डम) विचारत असे. त्याची उत्तरं अचूक देता आली तर शिक्षा समाप्त; नाही तर पितळेच्या पिंपातल्या त्या पाण्यात उभं राहणं आणि पाठांतर पुढे सुरु अशी ती वाढलेली शिक्षा असे असे! शिक्षा संपल्यावर पिंपाततलं पाणी अंगणातल्या झाडांना टाकावं लागायचं; त्याचवेळी बाहेर धप्पाकुटी खेळणाऱ्या मित्रांचा कल्ला कानी पडत असल्यानं झाडाना पाणी टाकण्याचं हे काम जाम कंटाळवाणं होत असे. वाचनाचा पहिला संस्कार झाला तो असा. या जगावेगळ्या शिक्षेमुळे वाचन-पाठांतरावर लक्ष केंद्रीत करायची संवय लागली ती आजतागायत कायम आहे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत जुन्यापुराण्या टाइम्स ऑफ इंडिया आणि एक-दोन दिवस शिळ्या असलेल्या ‘मराठा’तल्या २० ओळी दररोज लिहिणंही बंधनकारक होतं. हे लेखन झाल्याशिवाय सकाळचं खाणं (विद्यमान काळात त्याला ब्रेकफास्ट असं म्हणतात!) मिळत नसे आणि हे शुध्दलेखन व्याकरणदृष्ट्या अचूक असेल तर सातूच्या पीठात गुळाचा एखादा अतिरिक्त खडा किंवा एखादं बिस्किट बक्षीस म्हणून मिळत असे. दासबोध, तुकाराम गाथा, कर्हेबचे पाणी वगैरे वयाच्या बारा-तेरा आधीच वाचून झाली (कळली नाही तो भाग वेगळा) माई स्वयंपाक करतांना तिला ही पुस्तकं वाचून दाखवावी लागत.
‘भाषाभिमान असावा, भाषाद्वेष नाही’ आणि ‘खाऊन माजावं, टाकून नाही’ हा माईचा कठोर संस्कार लहानपणापासून झालेला. त्यामुळे जेवतांना ताटात अन्नाचा कणही शिल्लक ठेवायचा नाही आणि चांगलं असलेलं अन्न कितीही शीळं असलं तरी त्याची जागा पोटातच आहे हे आमच्याकडे अजूनही पाळलं जातंच; मराठीचा कट्टर पुरस्कर्ता असूनही हिंदी आणि इंग्रजी भाषेशी माझी मातृत्वाच्या नात्याची नाळ घट्ट राहिलेली आहे. शब्द केवळ अक्षरांचा समूह नसतो, त्याला अर्थ असतो, भावना असतात आणि अन्न तसंच शब्दाला धर्म किंवा जात नसते हाही संस्कार माईचाच; उमलतानाच ही जाणीव विकसित करणारा. पुढचं आयुष्य समृध्द करणारा हा संस्कार केल्याबद्दल माईप्रति कृतज्ञता व्यक्तभ करायची की जन्म दिल्याबद्दल ? इतका हा संपन्न संभ्रम आहे.
वाचनासोबतच पाढे-शुभंकरोती काही स्तोत्र संध्याकाळी एकदम ‘मस्ट’ होतं. परवचा संपला की लगेच ‘अलिफ बे’साठी जावं… च लागे. मराठवाड्यात तेव्हा सर्वच भाषक शाळांत उर्दू कंपलसरी होतं; ही सक्तीर पुढे आमच्या इयत्ता तिसरीपासून बंद झाली. कळत्या वयात डॉ. विनय वाईकर तसंच कवीवर्य नारायण कुलकर्णी कवठेकरची भेट झाल्यावर उर्दू शिकणं राहून गेल्याची सल पुन्हा उमळली आणि ती अजूनही ठसठसते. ‘परवचा’ आणि ‘अलिफ बे’मुळे उच्चार सुधारतात हा माईचा ठाम समज होता. नंतरच्या काळात अभ्यास, अवांतर आणि पत्रकारिता करतानाचे अपरिहार्य वाचन तसंच श्रवणात या संवयीचा विलक्षण परिणामकारक उपयोग झाला. दीड/दोन तासाचं भाषण किंवा एखाद्या तेवढ्या वेळात संपणार्याा कार्यक्रमाची कोणतीही टिपणं न घेता अचूक वृत्तसंकलन करण्याची शैली पत्रकारितेत आल्यावर विकसित झाली ती याच संस्कारातून. माईच्या संस्कारातून आणि नंतर ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास करताना शब्दांची गोडी आणखी लागली. याचा एकत्रित परिणाम म्हणजे आजही लक्ष खूप केंद्रीत न करता वाचलं तरी खूपसं, म्हणजे मनाला आवश्यक वाटेल तेवढं, लक्षात राहतं. पुढे मराठवाडा हे दैनिक, अनंतराव भालेराव आणि वयाच्या तिशीत भेटलेल्या उच्चशिक्षित पत्नी, मंगलामुळे वाचनाला दिशा आणि शिस्त लागली. मंगला विंचुर्णे ही मुक्तिबोध आणि ग्रेस यांची विद्यार्थीनी. तिच्यामुळे आयुष्यात शब्दकोडं आलं. त्यातून शब्दाचा अभिधा (मुळार्थ) शोध, व्युत्पत्ती, उच्चारशास्त्र यांच्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला तो आजही सुरू आहे. अलिकडच्या काही वर्षात तर घरी येणाऱ्या वृत्तपत्रातलं शब्दकोडं मी मनातल्या मनात सोडवतो; कारण प्रत्यक्ष सोडवण्यासाठी ते मंगलाला हवं असतं. आमच्या वैवाहिक जीवनात सुरुवातीची अनेक वर्ष सकाळी माझा वेळ वृत्तपत्र वाचनात तसंच शब्दकोडी सोडवण्यात जात असे आणि त्या वेळात नेमकी मंगला घरकामात व्यग्र असे; मंगलाच्या प्रकृतीमुळे हे घरातलं ते चित्र आता नेमकं उलटं झालंय. शब्दकोडं सोडवायचा अधिकार कुणाचा यावर वाद जास्तच (अनेकांच्या घरी भांड्याला भांडं लागतं आणि आवाज होतो आमच्या घरी शब्दाला शब्द भिडून अजूनही अनेकदा कल्लोळ होतो!) वाढल्यावर मग मी ‘मनातल्या मनात’चा हा फंडा शोधून काढला!
आस्मादिकांच्या बाबतीत वाचन आणि लेखनासाठी जागा, वेळ, मूड वगैरे नखरे तेव्हा नव्हते आणि आजही नाहीत. मुळात पत्रकार आणि संपादक म्हणून केलेलं लेखन हे काही सर्जन नाही तर ती व्यावसायिक मानवी मजबुरी (proffesional human weakness) अशी माझी धारणा आहे (त्यामुळे अनेक संपादक माझ्यावर जाम खवळलेले असतात!); त्यामुळे अशा लेखनाला मूड, वातावरण, निर्मितीच्या प्रेरणा वगैरेला थाराच नसतो. बातमी असो की स्तंभ लेखन की लेख-अग्रलेख; सर्व लेखनाला वेळेचं कुंपण असतं तरीही त्यात अचूकता, शैली, सौष्ठव, विश्वासार्हता असावीच लागते. भेटायला कुणी आलं की जिथे थांबावं लागलं तिथून पुन्हा पुढे सुरु करतांना मला तरी कधी त्रास झाला नाही किंवा ‘संपादक लिहिताहेत शांतता बाळगा/भेटता येणार नाही’, असे ‘टिकेकरी’ चोचले किंवा सबबी (अपवाद फक्त भास्कर लक्ष्मण भोळे यांच्या निधनानंतर अग्रलेख लिहितांनाचा) घडले नाहीत; अजूनही घडत नाहीत. अलिकडच्या २०/२२वर्षांत तर विचित्र सवय लागलीये. कार्यालयात एक, घरी दुसरं आणि कारमध्ये किंवा प्रवासात असतांना तिसरं असं एकाच वेळी (मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतल्या) तीन पुस्तकांचं वाचन सुरू असतं आणि महत्वाचं म्हणजे एकातून दुसर्याहकडे वळताना संदर्भ तुटला, असं काहीच होत नाही; सलग वाचन सुरू असल्यासारखी ही प्रक्रिया आपसूकच घडत जाते. हे कथन करताना ‘हटके’ वाटतंय, पण तुटक तरीही सलग असल्यासारखं हे वाचन संवयीनं अगदी सहज घडतं. एक मात्र खरं, आवडीनं किंवा ओढीनं खरेदी केलेलं प्रत्येक पुस्तक लगेच वाचून होतंच असं नाही. पूर्वी तर वाचायला काही तरी ‘हाती लागणं’ महत्वाचं असायचं आणि अक्षरश: काहीही वाचून व्हायचं. हाती लागण्याच्या या ‘खोडी’मुळे त्या काळात ‘यजुर्वेदीय किंवा ऋग्वेदी अंत्येष्टीसंस्कार’ सारखी पुस्तकंही वाचून झालेली आहेत आणि ‘सर्व पैलू ठोक भावात’ असलेल्या एकापेक्षा एक भयाण-भीषण कविताही आकळनात आलेल्या आहेत! अनेकदा खरेदी केल्यावर अचानक वर्ष-सहा महिन्यांनी ते पुस्तक हांक मारतं आणि मग वाचन सुरू होतं. काही पुस्तकांना हात लागण्यासाठी त्यापेक्षा जास्तच वेळ लागतो.
ललित मजकुरातल्या पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस संपादित ‘बापलेकी’ वाचनासाठी तब्बल चार-साडेचार वर्षांनी मुहूर्त लागला, तर अरुणा ढेरेच्या ‘कवितेच्या वाटेवर’ फिरून यायला एकही दिवस लागला नाही. (हे पुस्तक आधीच हाती आलं असतं, तर इतक्या कविता ‘आकळण्यात’ गेलेला वेळ अन्य वाचनासाठी सत्कारणी लागला नसता का ?) नंदा खरेंच्या ‘कहाणी मानव प्राण्याची’ बद्दलही असंच घडलं. अच्युत गोडबोलेंच्या ‘अर्थात’नं पदवीचं शिक्षण घेताना अर्थशास्त्राच्या अभ्यासातले ‘सेल्फ अॅअक्च्युलायझेशन’चा सिध्दांत मांडणारा अब्राहम मॅस्लॉव्ह वगैरे पुन्हा भेटले आणि लक्षात आलं अरे यांना तर आपण विसरलोच होतो की! अशात म्हणजे या वीस वर्षांत, ‘मांदियाळी’ ‘नॉट विदाऊट माय डॉटर’, ‘ब्लास्फेमी’, ‘एका साळीयाने’, ‘ब्र’, ‘गायतोंडे’ आणि महत्वाचं म्हणजे ‘मौनराग’ अशी काही पुस्तके मनात कायम मुक्काामाला आली आहेत. महेश एलकुंचवार नाटककार म्हणून मोठे आहेत का (अनेकदा गतकातर आठवणींच्या प्रदेशात नेणारं) मनाच्या गाभाऱ्यातले लक्ष लक्ष दीप उजळविणारं ललित लेखन करणारे प्रतिभावंत; असा गोंधळ उडतो अनेकदा. गोविंद बाबाजी जोशी याचं ‘माझे प्रवासाची हकिकत’ या १८९६साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाची माध्यम प्रकाशनानं प्रकाशित केलेली दुसरी आवृत्ती वाचनात आली; भन्नाट अनुभव आहे तो. डॉ. सुधीर रसाळ याचं ‘लोभस’, शाहू पाटोळेचं ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’, विजय तरवडे यांचं ‘माणसं’ यासह राम जगतापचं संपादन असलेलं अशात आलेलं मध्यमवर्गांवरचं पुस्तक अशी अनेक वाचनात आलेली पुस्तकं उल्लेखनीय आहे. पण, अलिकडच्या काही वर्षात ललित मजकुराचा ठेका मंगलानं घेतलेला आहे. महेश एलकुंचवार, यशवंत मनोहर, नरेंद्र चपळगावकर, सुरेश द्वादशीवार, नारायण कुळकर्णी, अरुणा ढेरे, कविता महाजन, दासू वैद्य , बालाजी सुतार असे काही अपवाद वगळता मंगलानी शिफारस केली की मगच ते ललित लेखन वाचलं जाण्याची संवय आता लागलेली आहे.
अलिकडच्या बारा-पंधरा वर्षात राजकीय वाचनाकडे आणि त्यातही इंग्रजी कल झुकलेला आहे; या मालिकेतल्या राम प्रधान आणि माधव गोडबोले यांच्या आत्मपर पण राष्ट्रीय आकलन असणाऱ्या लेखनासह ‘Half Lion’ हे विनय सीतापती यांचं; ‘Indian Democracy and Disappoiintments’ हे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी जोगिंदरसिंग यांचं, माखनलाल फोतेदार यांचं ‘Chinar Leaves’, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं ‘In the Line of Fire’ अशी अनेक चांगली पुस्तकं वाचनात आली.
पुस्तकांचा संग्रह करण्यासोबतच ती आपल्यासोबत इतरांनी वाचावी असा पूर्वी कल असे पण, वाचायला नेलेली पुस्तकं न परतण्याचं प्रमाण वाढल्यावर ही देण्याची संवय काही अपवाद वगळता मोडली. तरी जयवंत दळवी यांनी दिलेली ‘चक्र’, ग्रेस यांनी दिलेलं ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, यशवंत मनोहर यांनी दिलेलं ‘उत्थानगुंफा’ अशी त्यांच्या स्वाक्षरी असलेली अनेक पुस्तकं परतून न आल्याची हळहळ आहेच. दोन दशकांपूर्वी औरंगाबादला असतांना जाहीर आवाहन करुन किमान दीडशे तरी कवितांचे अनेक संग्रह वाटून टाकले. ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा आधी निवासी संपादक आणि मग संपादक झाल्यावर व्यक्तीश: आणि संपादक म्हणून भेट मिळालेले खूप काव्यसंग्रह जमा झाले. पुढे अमर हबीब यानं अंबाजोगाईला काव्य संग्रहालय सुरु केल्यावर तोवर जमलेले ४०० संग्रह पाठवले; थोडक्यात ते काव्यसंग्रह ‘सुस्थळी’ पडले! औरंगाबादला स्थायिक व्हायचं ठरलं तोवर साडेतीन हजारावर पुस्तकं जमलेली होती. त्यातली मोजकी १००/१५० घ्यायची आणि उर्वरीत ‘शोधग्राम’च्या ग्रंथालयाला द्यायची असं मनात घोळत होतं पण, बहुश्रुत आणि अफाट वाचनवेड असलेल्या श्रीकांत या मेव्हण्यानं ती ग्रंथ संपदा संभाळण्याची जबाबदारी घेतली. तरी इतके ग्रंथ भेटीला येताहेत की औरंगाबादच्या घरात शेल्फ वाढवावे लागतच आहेत.
दिल्ली-मुंबई-नागपुरात दुर्मिळ असलेली शांतता अशात औरंगाबादला स्थायिक झाल्यापासून लाभते; लेखन/वाचनाची तंद्री लागते अनेकदा. एकांतही असतो बहुसंख्य रात्री. कधी रात्रीच्या त्या एकांतात पुस्तकांचं गुणगुणणं ऐकायला येतं. ही ग्रंथ गुणगुण विलक्षण मेलोडियस असते; कधी ऐकलीये का ?
(२३ एप्रिल हा जागतिक ग्रंथ आणि लेखन हक्क दिन. या आठवड्यात राजकारणावर लिहिण्याचा कंटाळा आल्यानं ग्रंथ आणि लेखन हक्क दिनाच्या निमित्तानं वाचन संस्कार आणि संवय, पुस्तकं असा काहीसा हा आत्मपर मजकूर. काही वर्षापूर्वी केलेल्या एका टिपणाचा हा विस्तार आहे.)
Cellphone +919822055799
www.praveenbardapurkar.com
====
‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-
http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515 आणि ‘भाष्य’ ई-बुक्ससाठी dailyhunt शी संपर्क साधावा.
====