जोर का धक्का धीरे से लगे…

मिताभ बच्चन यांनी केलेल्या एका जाहिरातीचा आधार घेत सांगायचं झाला तर राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा अर्थ महायुतीला आणि त्यातही विशेषत: भाजपला ‘जोर का धक्का धीरे से लगे…’ असा आहे . जनतेनी पुन्हा सत्ता स्थापनेचा कौल तर दिलाय पण , भाजप आणि सेना या दोन्ही पक्षांच्या विधानसभेतील संख्याबळ लक्षणीय कमी करत धक्का आणि कांही इशारेही दिलेले आहेत .

आमचा विजयाचा ‘स्ट्राईक रेट’ खूपच चांगला आहे असा दावा मावळते आणि भावी ( ! ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे याचा अर्थ अजून तरी त्यांची या निकालानं दिलेला इशारा समजून घेण्याची किमान ( जाहीर तरी ) इच्छा नाही असाच होतो . कारण टक्केवारी नेहेमीच वास्तवाचं निदर्शक नसते किंवा ते समजून घेणं जरा क्लिष्ट असतं . म्हणजे , एक लाखाच्या पांच टक्के पांच हजार तर दहा लाखाच्या पांच टक्के पन्नास हजार होतात . भाजपच्या विजयाचा स्ट्राईक रेट जरी वाढून  सत्तर टक्के झाला असला तरी एकूण जागा १७ कमी झालेल्या आहेत याचा विसर फडणवीस यांना पडलेला आहे किंवा ते पुन्हा सत्ता काबीज करण्यात यश मिळाल्यानं आत्ममश्गुल तरी झालेले आहेत , असा त्याचा अर्थ आहे .

राज्याच्या सर्व भागात आम्हाला ( म्हणजे भाजप आणि शिवसेनेला ) जागा मिळाल्या आहेत , असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे . मात्र या दाव्याची दुसरी बाजू , राज्याच्या सर्वच भागात कोकण वगळता भाजप आणि सेनेच्या जागा कमी झालेल्या आहेत अशी आहे , हे विसरता येणार नाही . या प्रतिपादनाच्या आधारासाठी आंकडेवारी देतो . कंसातील आंकडे २०१४च्या विधानसभेतील संख्याबळाचे आहेत .  मुंबई : भाजप- २४ (२४) , शिवसेना- २० ( २१ ) , कोकण : भाजप- ३  ( १ ) ,            सेना- ९ ( ७ ) . पश्चिम महाराष्ट्र : भाजप- १२ ( १७ ) , सेना- ० ( ४  ) . विदर्भ :       भाजप-  २९ ( ४४ ) , सेना- ४ ( ४ ) . मराठवाडा : भाजप -१६ ( १५ ) , सेना- १२ ( ११ ) . उत्तर महाराष्ट्र : १३ ( १४ ) , सेना- ६ ( ७ ) . दक्षिण महाराष्ट्र : भाजप- ८ ( ८ ) ,         सेना- ५ ( ९ ) .

या निवडणुकीने दिलेले इशारे दोन पातळीवरचे आहेत . पहिला दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर दुसरा भाजपला आहे . एक बाब आधीच स्पष्ट करतो , देवेंद्र यांच्या रुपाने महाराष्ट्राला एका चांगला मुख्यमंत्री मिळाला आहे , त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे . त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत पण, त्या चांगल्या निर्णयाचे लाभ लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचलेले नाहीत . लाभ लोकांपर्यंत पोहोचल्याचे नोकरशाहीने तयार केलेले कागद दावे म्हणून देवेंद्र फडणवीस सादर करतात पण , ते दावे  वास्तव नाहीत . जनतेला लाभ मिळाल्याचे कोणतेही अवाजवी  दावे करणं देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे टाळलं पाहिजे . समृद्धी मार्ग भ्रष्टाचाराचा पथ झालेला आहे , कर्जमाफीचे चुकारे , न वाढलेला रोजगार अशी अनेक या अपयशाचं ठसठशीत उदाहरणं आहेत .

विरोधकांना नामोहरम करण्याचे देवेंद्र फडणवीस  ( आणि भाजपचे ) कारनामेही लोकशाहीला पूरक नाहीत . नेहेमी विरोधकांच्या कुंडल्या मांडून डाव उलटवण्याचे सांकेतिक समाधान देणारे टाळ्याखाऊ उद्योगही देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे बंद करायलाच पाहिजेत . आधी आणि निवडणुकीत विरोधकांना तुच्छ लेखण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी केलेले प्रयत्नही सुसंस्कृतपणात बसणारे नव्हते . दुसऱ्याची रेष खोडून आपली रेष मोठी होत नसते तर आपलीच रेष वाढवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत . भाजप आणि सेनेने विरोधी पक्षांतून फोडलेल्यापैकी २८ जणांना उमेदवाऱ्या दिल्या . त्यापैकी तब्बल १७ जण निवडणुकीत पराभूत झाले ; हा स्ट्राईक रेट ६०च्या किंचित वर आहे  . शिवाय केवळ सत्तेसाठी येणाऱ्याना संघ आणि भाजपातील निष्ठावंत पाठिंबा देतील हे गृहीत धरलं गेलं . त्यामुळे ‘केडर’मधले लोक नाराज झाले . अशा नाराजांनी यावेळी भाजपला मतदान करणं टाळलं . भाजपला मतदान न करणाऱ्या फडणवीस यांच्या नागपुरातलीच अशी किमान पन्नास नावं मी सांगू शकतो .

आणखी एक मुद्दा म्हणजे या राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री कार्यालयाला समांतर अशी यंत्रणा देवेंद्र फडणवीस यांनी उभी केली आहे किंवा त्यांच्या मूक समंतीनं ती कार्यरत आहे आणि त्यामुळे नोकरशाहीत अस्वस्थता आहे . ही समांतर यंत्रणा आणि मुख्यमंत्री यांच्याच हातात सर्व सत्ता एकवटली आहे . या समांतरमधले कांहीजण ‘प्रति’मुख्यमंत्री झालेले आहेत . लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण अपेक्षित असते . सत्ता प्रभावीपणे राबवण्यासाठी मंत्री तसेच नोकरशाही असते याचा विसर ही समांतर यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांना कसा पडलेला आहे याच्या अनेक ( किस्से नव्हे !) कथा चांद्यापासून बांद्यापर्यंत ऐकायला मिळतात . संबधित मंत्र्यांना अंधारात ठेऊन निर्णय घेतले जातात असंही समोर आलेले आहे . म्हणजे मंत्री , नोकरशाही आणि जनता या तिघांनाही गृहीत धरलं जात आहे . कामाची ही शैली देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समांतर यंत्रणेनं बदलायला हवी . या अशा समांतर यंत्रणेनच आजवर अब्दुल रहेमान अंतुले ते अशोक चव्हाण अशा अनेक अनेकांचे बळी घेतलेले आहेत याचा विसर देवेंद्र फडणवीस यांनी पडू देऊ नये…च .

या निवडणुकीत सेनेनं भाजपचे आणि भाजपनं सेनेचे उमेदवार पडण्यासाठी बंडखोरांना रसद पुरवल्याच्या घटना किमान १८/२० तरी मतदार संघात घडल्या आहेत . स्वबळावर सत्ता मिळवण्याची सुप्त महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्यापायी  या उठाठेवी करण्यात भाजप जास्त म्हणजे किमान १२ मतदार संघात आघाडीवर होता . जालना मतदार संघातून अर्जुन खोतकर यांचा झालेला पराभव याचंच निदर्शक आहे . मी ज्या कॉलनीत राहतो तिथेही भाजप आणि संघाचे स्थानिक लोक भाजपच्या बंडखोराचा म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करण्यासाठी आलेले होते ! बीडलाही असंच घडलं . ठिकठिकाणी युती धर्म वेशीला टांगला गेल्यानं भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी होण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी विसरु नये .

राजकारणात अस्मितेचे प्रश्न उन्मादी झाले की नेहेमीच स्थानिक प्रश्न आणि जनहित दुय्यम ठरतं . मुलभूत अर्थकारणाकडेही त्यामुळे दुर्लक्ष होते , मंदीच्या झळा जाणवू लागतात  , तसंच  भाववाढ होते  , बेरोजगारी वाढते  . भाजप सत्तेत आल्यापासून देशाच्या आणि राज्याच्याही राजकारणात अस्मिता टोकदार आणि कळीदार झालेल्याआहेत  . त्याच्या झळा आता सामान्य माणसालाही चटके देऊ लागल्या आहेत . राममंदिर , घाईघाईत आणला गेलेला सेवा आणि वस्तू कर , नोटाबंदी , कलम ३७० , हे त्यातले कांही अस्मितेचे मुद्दे आहेत . कलम ३७० रद्द करणे यातील देशाच्या एकात्मतेची भावना बाजूला सारत उन्मादी अस्मिता भडकवण्यात आलेली आहे . शिवाय लोकशाहीत विरोधी पक्ष असायलाच हवा याचा विसर पडत चाललेला आहे . विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते कसे संपवता येतील यासाठी जाणीवपूर्वक सुडाचे प्रयोग ( यात मी पी. चिदंबरम यांचा अपवाद करेन ) भाजपकडून केले जात आहेत . खऱ्या-खोट्या चौकशीचा ससेमीरा लावण्यासाठी निवडणुकीचा मुहूर्त साधला जात आहे . महाराष्ट्र आणि हरयाणा य     दोन्ही विधानसभा निवडणुकात जनतेने याविरोधात मतप्रदर्शन केलं आहे . फरक इतकाच की महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी ‘जोर का धक्का धीरे से’ देत दिली आहे .

चॅम्पियन’ शरद पवार ! 

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील कसोटी मालिका नुकतीच संपली . या मालिकेत भारतीय संघानं फलंदाजी , गोलंदाजी , क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व कौशल्य अशा सर्वच आघाड्यांवर दक्षिण आफ्रिकेला नमवलं . भारतीय संघाचं नेतृत्व विराट कोहलीनं केलेलं असलं तरी मालिकावीर मात्र रोहित शर्मा ठरला . तसंच या विधान सभा निवडणुकीचं झालंय . सत्ता स्थापनेचा कौल जरी भाजप-सेनेला मिळाला असला तरी ‘​चॅम्पीयन’ मात्र ठरले आहेत ते शरद पवार !

अशात शरद पवार यांच्याबद्दल ‘शेर कभी बुढा नही होता’ आणि ‘वनराज सिंह कधी म्हातारा होत नाही . सॅल्यूट टू शरद पवार !’ अशा दोन कमेंट समाज माध्यमांवर केल्यावर भाजप समर्थकांनी मला खूपच ट्रोल केलं . हे ट्रोल्स शिकागो ते चंद्रपूर अशा पट्ट्यात विखुरलेले आहेत . एकारल्या गडद रंगाचे चष्मे घालून लिहिणं माझ्याकडून होतं नाही . मी आक्रमक असलो तरी आक्रस्ताळेपणा आणि आततायीपणा यातल्या सीमारेषा मला ठाऊक आहेत . एक लक्षात घ्या मी विवेकवादी आहे . कुणाचाही भाट नाही . ज्याचं जे चांगलं त्याचं कौतुक आणि चांगलं नाही त्यावर टीकास्त्र मी सोडतो . देशातील ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्यावर मी असंख्य वेळा टीकास्त्र सोडलेलं आहे तरी ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्र विधासभा निवडणुकीचं  एकहाती नेतृत्व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि या वयात तेही असं प्रकृती अस्वास्थ्य असतांना केलं , त्याला तोड नाहीच . कुणा एकाचा एक सॅल्यूट कमी पडावा असं शरद पवार यांचं हे स्तिमित करणारं कर्तृत्व आहे !

साताऱ्याच्या सभेत भरपावसात ‘वनराज’ शरद पवार आणि ‘वाघ’ श्रीनिवास पाटील

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीपक्षांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेला होता  त्यात शरद पवार यांचा तर नातू पार्थ पवार याचाही पराभव झाल्याची नामुष्की पदरी पडलेली होती . कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे पक्षांतराची लाट आलेली होती . पवार कुटुंबीयांचे आप्तजनही त्यात होते .   राष्ट्रवादीत पवार कुटुंबीय आणि दोन चार पाटील एवढेच लोक उरतात का अशी स्थिती होती . अनेक पाहण्या आणि माध्यमांच्या पिसाटलेपणाच्या बळावर भाजपला स्वबळावर सत्तेची स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागलेली होती . विरोधी पक्षांसाठी वातावरण पूर्णपणे हतोत्साहित करणारं होतं . महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एकतर्फी होणार असं निराशेचं मळभ दाटून आलेलं होतं…त्या परिस्थितीत शरद पवार केवळ एकटेच लढलेच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसलाही लढण्याची प्रेरणा दिली आणि त्यामुळेच या दोन्ही पक्षांना नवसंजीवनी मिळाली याबद्दल  कोणतीच शंका नाही…च !

त्यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा तिरस्कार , समर्थक व्हा किंवा विरोधक , भक्त व्हा की टीकाकार ; महाराष्ट्राचं राजकारण ज्या प्रत्येकी तीन अक्षरी दोन शब्दांशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही , ते शरद पवार हे एक कुणालाच न सुटलेलं कोडं आहे . भल्याभल्यांशी त्यांनी पंगा घेतला आणि स्वत:ची अनेक  मिथकं रुढ केली . त्यांच्यातल्या बेभरवशी राजकारण्याबद्दल खूप कांही लिहिता येईल पण , त्यासाठी आजची वेळ योग्य नाही कारण या विधानसभा निवडणुकीत या योद्ध्यानं अशी कांही अतुलनीय कामगिरी बजावली आहे की ‘शेर कभी बुढा नही होता’ आणि ‘सॅल्यूट टू शरद पवार !’ या दोन्ही कमेंट त्या कामगिरीला कवेत घेण्यास थिट्या आहेत .

अंमलबजावणी  संचालनालयाची ( इडी ) कथित  नोटीस आली आणि शरद पवार यांच्यातला मुत्सद्दी , संधीच्या शोधात असलेला चतुर राजकारणी फिनिक्स पक्षी झाला . त्यानंतर कोणतीही कृती त्यांच्याकडून अनवधानाने ( inadvertently ) घडली नाही . पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणं असो की संपावरील एचएएलच्या कामगारांची भेट की अविश्रांत प्रचार दौरे की नरेंद्र मोदी , अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांचा ( क्वचित पातळी सोडून पण , जशास तसा जबाब देत ) केलेला मुकाबला ; शरद पवार नावाचा राजकारणातला मल्ल अंगाला तेल लावून खेळला . प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात साताऱ्याच्या सभेत पावसात भिजण्याचं जे टायमिंग शरद पवार यांनी साधलं त्याला तोड नाही ! जे एका मुत्सद्दी राजकारण्यानं करायलाच हवं ते छत्री बाजूला सारत पवार यांनी केलं . वयाच्या ऐंशीच्या घरातला हा योद्ध पावसाच्या सरी झेलत प्रचार करता झाला . या सिहांच्या बाजूला कांहीही न बोलता श्रीनिवास पाटील नावाचा वाघ येऊन उभा राहिला आणि  भिजला . त्या टप्प्यावर  केवळ सातारा लोकसभा मतदार संघापुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेचीही निवडणूक शंभर टक्के फिरली . एकट्या शरद पवार यांनी ती नियोजनबद्धरीत्या सहज फिरवली . राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सक्षम विरोधी पक्ष निर्माण करणारी ती मास्टर पीस कृती ठरली…भाजपच्या उन्मादाला ‘जोर का धक्का धीरे से’ देणारी ठरली !

अनेकांचा पोटशूळ उठला तरी हरकत नाही , मी पुन्हा एकदा शरद पवार यांना सॅल्यूट करतो . कारण २०१९ची विधानसभा निवडणूक म्हणजे शरद पवार असं समीकरण आता सुवर्णाक्षरी आणि अमीट आहे !

-प्रवीण बर्दापूरकर  

Cellphone  ​+919822055799

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट