शह-काटशह , डाव-प्रतिडाव , कोपरखळ्या , खुन्नस-वचपा , अशा अनेक कृती राजकारणात सतत घडत असतात . या कधी दृश्यमान असतात तर कधी नसतात . दृश्यमान नसणाऱ्या अशा कृतींचे परिणाम काही काळानंतर दिसू लागतात . राजकारणाचा हा खेळ कधी कुणाला वर चढवतो , तर कधी कुणी राजकारणाच्या साप-शिडीवरुन थेट तळाला येऊन पोहोचतो . या सगळ्या कृतींकडे कसं बघायचं हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असतो त्यामुळे त्या कुणाला मनोहर वाटतात तर कुणाला राजकारणाचा तो एक अपरिहार्य भाग वाटतो . बिहारच्या लोक जनशक्ती पक्षामध्ये सध्या जे चालू आहे त्याचं वर्णन नितीशकुमार यांनी इंधन काढून घेतल्यानं पासवान यांचा ‘चिराग’ आता फडफड करु लागला आहे , अशा शब्दात करता येईल . बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चिराग पासवान यांच्यावर राजकीय सूड उगवला असा त्याचा अर्थ आहे .
आपल्या देशात समाजवादी विचाराची जी काही छकलं झाली , त्यापैकी एक रामविलास पासवान यांनी २००० साली स्थापन केलेला त्यांचा सवतासुभा म्हणजे लोक जनशक्ती पक्ष आहे . या पक्षाला म्हणजे रामविलास पासवान यांना बिहारमध्ये मागासवर्गीय समाजाचा चांगल्यापैकी पाठिंबा आहे , हे त्यांनी जनता दल ( यु ) मधून फुटून निघाल्यावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत सिद्ध केलेलं आहे . २०१४ आणि २०१९ १९ अशा दोन लोकसभा निवडणुकांत या पक्षाला बिहारात सहा जागा मिळाल्या . रामविलास पासवान यांचा लोकसंग्रह आणि सत्ताधाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा गुण वाखाण्यासारखा आहे . रामविलास पासवान आणि नितीशकुमार या बिहारमधील दोन नेत्यांचं अत्यंत खास वैशिष्टय म्हणजे दोघांचाही लढा धर्मांध शक्ती म्हणजे भाजप विरुद्ध आहे , तरीही त्यातला संधिसाधूपणा म्हणजे या दोघांनीही त्याच भाजपच्या चमच्यातून सत्तेचं दूध प्राशन केलेलं आहे ! अर्थात ते दोघेही याला संधिसाधूपणा समजत नाहीत , हा त्यांचा राजकीय कोडगेपणापणा म्हणायला हवा . शुगर कोटेड आणि जरा वेगळ्या शब्दात हेच म्हणणं सांगायचं झालं तर , राजकारणात चालून आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करुन घेण्याची नजर असलेले मुत्सद्दी म्हणजे रामविलास पासवान आणि नितीशकुमार आहेत ! अर्थात या बाबतीत रामविलास पासवान टेकाड असतील तर नितीशकुमार पर्वत आहेत , हे काही वेगळं सांगायला नकोच .
रामविलास पासवान यांनी अशा राजकीय सुर्वणसंधी अनेकदा साध्य केलेल्या आहेत . २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रामविलास पासवान भाजपच्या आश्रयाला गेले आणि सुमारे अर्धतपाच्या काळानंतर त्यांनी पुन्हा केंद्रातला सत्तेचा सोपान चढण्यात यश मिळवलं . नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि रामविलास पासवान यांच्या राजकारणाच्या बाजाचा अंदाज भल्याभल्यांना आलेला नाही . तसा तो लोक जनशक्ती पक्ष आणि भाजप यांच्यात युती झाली तेव्हाही आलेला नव्हता . तेव्हा मी दिल्लीतच पत्रकारिता करत होतो आणि अमित शहा यांनी पाटण्याहून लोक जनशक्ती पक्षासोबत भाजपसोबत युती करत आहे अशी घोषणा केली तेव्हा दस्तुरखुद्द भाजप मुख्यालयातही भल्याभल्यांना कसा धक्का बसला होता हे अजूनही आठवतं .
रामविलास पासवान हयात होते तोपर्यंत लोक जनशक्ती पक्षातील कुरबुरींना तोंड फुटलेलं नव्हतं कारण रामविलास यांचा करिष्मा आणि वचकही तसाच होता . बिहारवर वर्चस्व निर्माण करण्याच्या नितीशकुमार आणि रामविलास यांच्यात सुरु असलेल्या सुप्त संघर्षालाही जाहीर स्वरुप प्राप्त झालेलं नव्हतं . त्या संदर्भात जे काही शह आणि काटशहाचं राजकारण सुरु होतं त्याला तोंड फुटलेलं नव्हतं . मात्र , रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षाची सुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली आणि नितीशकुमार यांचा जनता दल (यु) आणि लोक जनशक्ती पक्षात वर्चस्वाचा संघर्ष उघडपणे सुरु झाला तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकापर्यंत त्याची फार काही झळ नितीशकुमार आणि त्यांच्या जनता दल (यु ) पक्षाला बसलेली नव्हती .
चिराग पासवान यांच्याकडे लोक जनशक्ती पक्षाची सूत्र आली ती केवळ ते रामविलास यांचे पुत्र आहेत म्हणून . हे काही वेगळं सांगायला नको . चिराग पासवान तरुण आहेत , अभियांत्रिकीतलं उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे . दिसायला रुबाबदार असल्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीचेही दरवाजे ठोठावून बघितले आहे . मात्र , वडिलांच्या आग्रहामुळे तेही राजकारणाच्या वाटेवरुन चालू लागले आणि पुरेशी राजकीय पक्वता येण्याच्या आतचं चिराग यांनी नितीशकुमार यांच्यासारख्या ‘हेवी वेट‘शी पंगा घेऊन स्वत:चं राजकीय भविष्य धूसर करुन टाकलं .
भाजपची बिहारमधील युती जनता दल (यु )पेक्षा नितीशकुमार यांच्याशी जास्त पक्की आहे आणि ती तशी पक्की असणं नैसर्गिक नसून अगतिकता आहे . त्यामुळे संधी मिळेल तेव्हा जनता दल ( यु ) आणि नितीशकुमार यांच्यापेक्षा बिहारात मोठं होण्याच्या संधीची भाजपाला प्रतीक्षा होतीच . नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ती संधी रामविलास पासवान यांच्या अनुपस्थितीत चिराग पासवान यांनी भाजपाला मिळवून दिली . चिराग पासवान म्हणजे लोक जनशक्ती पक्ष आणि नितीशकुमार म्हणजे जनता दल ( यु ) हे दोन्ही पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए ) चे घटक पक्ष असले तरी बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल ( यु ) च्या म्हणजे नितीशकुमारच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतला . लोक जनशक्ती पक्ष किती जागा जिंकू शकतो यापेक्षा जनता दल ( यु )चा किती जागी पराभव करण्यास कारणीभूत ठरु शकतो . याचा अंदाज आल्यावर भाजपनी मौन धारण करुन चिराग पासवान यांना पुरेशी ‘कुमक’ पुरवली हे कांही लपून राहिलेलं नाही . निवडणुकीची प्रक्रिया सुरु होण्याआधीपासूनच बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील पण , भारतीय जनता पक्ष सभागृहातला सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी भाकीतं व्यक्त केली जात होती आणि ती खरीही ठरली . बिहारमधल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप संख्याबळाने सर्वात मोठा पक्ष ठरला आणि जनता दल ( यु ) चक्क तिसऱ्या नंबरवर फेकला गेला कारण लालूप्रसाद यादव सर्वेसर्वा असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी अनपेक्षितपणे मुसंडी मारुन दुसऱ्या क्रमांकाचं संख्याबळ पटकावलं . अर्थात भाजप आणि जनता दल ( यु )युती असल्यानं ठरल्याप्रमाणे नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी झालेल्या पिछेहाटीचं शल्य त्यांच्या मनात होतं आणि त्याचा राजकीय वचपा काढल्याशिवाय ते राहणार नाहीत , हे उघड होतं . त्याप्रमाणे घडलं आता घडलं आहे .
सर्व राजकीय पक्षात असतात तसेच सत्तेसाठीचे संघर्ष लोकसभेत जेमतेम सहा सदस्य असलेल्या लोक जनशक्ती पक्षातही आहेत , हे नितीशकुमार यांनी हेरलं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं बिगूल वाजायला सुरुवात होताच फासे फेकले . कुठल्या तरी हिंदी चित्रपटात ‘ये खेल तुमने शुरु किया है , इसे मै खतम करुंगा’ असा डॉयलॉग आहे . नितीशकुमारांना शह देण्याचा खेळ चिराग पासवान यांनी सुरु केला आणि त्या खेळाचा शेवट आता नितीशकुमार करत आहेत . लोक जनशक्ती
पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलं . पक्षाच्या गटाचं लोकसभेतील नेतेपद चिराग पासवान यांच्याकडून काढून घेऊन पशुपती पारस यांच्याकडे सूपूर्द केलं . पक्षाच्या संसदीय गटात फूट पडली . चिराग पासवान अल्पमतात गेले . त्यांच्या गटात आता तेच एकमेव खासदार उरले आहेत . पुढच्या सगळ्या हालचाली नितीशकुमार यांच्या नियोजना प्रमाणे घडत गेल्या आणि चिराग पासवान एकटे पडले . पक्षात फूट पडली हे मान्य करुन स्वत:च्या नेतृत्वाखालील पक्ष मूळ असल्याचं सिद्ध करण्याऐवजी चिराग पासवान यांनी त्या पाच खासदारांना पक्षातून काढून टाकलं . आता ते पाच खासदार विरुद्ध एकटे चिराग पासवान अशी अस्तित्वाची खडाखडी सुरु झालेली आहे . २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतच बिहारातील मतदार पशुपती पारस यांच्यामागे आहेत की , चिराग पासवान यांच्यामागे हे सिद्ध होईल .
एक बऱ्यापैकी प्रभावी असलेला प्रादेशिक पक्ष अंतर्गत लाथाळीमुळे अस्तित्वहिन होत असल्याचा आनंद निश्चितच भाजपाला असेल पण , दुसरीकडे त्यामुळे नितीशकुमार यांचे पाय बिहारमध्ये आणखी घट्ट होतील याची भीतीही असेल . त्यामुळे यापुढचा बिहारातला भाजप विरुद्ध नितीशकुमार हा सुप्त राजकीय संघर्ष आणखी तीव्र होत जाईल . लोक जनशक्ती एक चिटुकल्या पिटुकल्या पक्षातील अंतर्गत संघर्षाला असे भाजप विरुद्ध नितीशकुमार या सुप्त संघर्षाचे कंगोरे आहेत .
या लाथाळीत भारतीय जनता पक्ष चिराग पासवान यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना मंत्रीपद देतो की , नितीशकुमार यांच्या सांगण्यानुसार पशुपती पारस यांना , का दोघांच्याही हातात वाजवण्यासाठी गाजराची पुंगी मिळते , हे पाहणं उत्सुकतेचं आहे .
■प्रवीण बर्दापूरकर
Cellphone- 9822055799