(लोकमत’च्या १ मार्चच्या अंकात प्रकाशित स्तंभ)
प्रत्यक्षात कौल मिळण्यासाठी अजून अवधी असला तरी निवडणूकपूर्व चाचण्या सध्या भारतीय जनता पक्षाला अनुकूल आहेत आणि लोकसभा निवडणुका अगदी हांकेच्या अंतरावर असल्याने दररोज नवनवीन राजकीय समीकरणे आकार घेत आहेत, अस्तिवात असलेली समीकरणे बिघडत आहेत, काही समीकरणे नव्याने जुळवली जात आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या आधी घडते तसेच घडते आहे. सामान्य माणसाला त्यामुळे राजकीय रंगमंचावर कसरती म्हणा की कोलांटउड्या सुरु झाल्या असे वाटत असले तरी ही अगतिकता आहे आणि ती अपरिहार्य आहे हे लक्षात घेतले पाहिजे. रामविलास पासवान यांनी भारतीय जनता पक्षाशी साधलेली सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली जवळीक अशीच अगतिक अपरिहार्यता आहे. ज्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बंड पुकारून पासवान यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा त्याग केला त्याच मोदीच्या पंखाखाली पासवान यांना राजकीय आश्रय घ्यावा लागणे त्याचाच एक भाग आहे. बरोब्बर एका तपापूर्वीची घटना आहे, मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या राज्यात झालेल्या जातीय दंगलीना त्यांचे प्रोत्साहन होते, त्या राज्यातील झालेल्या नरसंहारामागे त्यांची सूत्रधार म्हणून प्रेरणा असण्यावरून भाजपही आरोपीच्या पिंज-यात उभा होता. ‘मोदी यांनी राजधर्म पाळावा’, असे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुनावले आणि लगेच ते सुनावणे आवंढ्यासारखे गिळून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. देशाचे राजकीय आणि सामाजिक वातावरण विलक्षण तापलेले तसेच तणावाचे होते. नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी तसेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी तेव्हा मंत्री असलेल्या रामविलास पासवान व शरद यादव या दोन मंत्र्यांनी पंतप्रधान वाजपेयी यांच्याकडे केली, मोदी राजीनामा देणार नसतील तर आम्ही राजीनामा देतो अशीही आग्रही तसेच रास्त भूमिका या दोघांनी घेतली. वाजपेयी यांनी पासवान-यादव या दोघांची बरीच समजूत घातली, येत्या काही दिवसात नक्की मोदी यांचा राजीनामा घेतला जाईल असे आश्वासन देत चुचकारले. यादव यांची समजूत पटली, ते मंत्रीमंडळात कायम राहिले. मात्र, आताच मोदी यांचा राजीनामा घेतला नाही तर ते मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असे सांगत पासवान यांनी तेव्हा मंत्रीपदाचा राजीनामा दिला, एनडीएपासूनही फारकत घेतली; रामविलास पासवान यांची प्रतिमा राजकीय प्रतिमा आणखी उजाळून निघाली. हा काही प्राचीन इतिहास नाही त्यामुळे तो राजकारणी आणि अभ्यासक जसे विसरलेले नाहीत तसेच राजकीय वर्तुळात वावरणारे पत्रकारही.
रामविलास पासवानही एका तपापूर्वी काय घडले हे विसरले आहेत असे नव्हे पण, पुन्हा मोदींच्या आश्रयाला जाण्याची अगतिकता का निर्माण झाली हे समजून घेतले पाहिजे. कर्पुरी ठाकूर, राजनारायण आणि सत्येंद्र नारायण शर्मा यांच्या मुशीत तयार झालेले पासवान १९६९साली संयुक्त सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून बिहार विधानसभेवर निवडून गेले. आणीबाणीत कारागृहातही जाऊन आले आणि जनता पक्षाच्या लाटेत लोकसभेवर विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. तेव्हापासून ते तेहेतीस वर्ष रामविलास संसदेत होते. याकाळात लोकदल ते जनता दल ते लोकजनशक्ती पक्ष असा त्यांचा प्रवास झाला. मायावती यांचासारखा स्वत:ची मतशक्ती रामविलास निर्माण करू शकले नाही तरी, बिहारातील १०-१२ लोकसभा मतदार संघात ते मतांच्या निकषावर महत्वाचे झाले. दलित मतदारांचा राष्ट्रीय चेहेरा असा त्यांची प्रतिमा निर्माण झाली. भाजपशी संग घडल्याने केंद्रीय मंत्रीपद त्यांनी भूषविले. नितीशकुमार यांचा बिहारमध्ये प्रभाव वाढल्यावर रामविलास तसेच लालूप्रसाद यादव यांचा राजकीय–हास सुरु झाला. रामविलास तर लोकसभा निवडणूक हरले. रामविलास-लालूप्रसाद एकत्र आले तरीही नितीशकुमार यांचा प्रभाव कायम राहिला, रामविलास-लालूप्रसाद आणि त्यांच्या पक्षांचे अस्तित्व क्षीण होत गेले त्यातच लालूप्रसाद-रामविलास यांच्यात बिनसले. रामविलास यांचे तरुण चिरंजीव चिराग मोदींच्यावतीने टाकण्यात आलेल्या गाळ्यात अलगद गावले. त्यातच काँग्रेसनेही पासवान यांना दूर केले. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर कोणाच्या तरी आश्रयाला जाणे ही लहान पक्षांची अपरिहार्यता असते आणि अगतिकताही. लालुप्रसाद यांना काँग्रेसने आश्रय दिल्यावर तर एकाकी पडलेल्या रामविलास यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाशिवाय अन्य पर्यायच शिल्लक नव्हता. सोशल इंजिनिअरिंगचे बहुजनवादी राजकारण करून भाजप आणि सेनेने महाराष्ट्रात सत्ता मिळवली त्याचाच राष्ट्रीय प्रयोग सध्या नरेंद्र मोदी करत आहेत. मोदी आणि भाजपलाही रामविलास पासवान यांच्यासारखा चेहेरा हवा होताच. रामविलास पासवान किंवा त्यांचा लोक जनशक्ती पक्षच नव्हे तर अशा छोट्या पक्षांना राष्ट्रीय राजकारणात कोणाच्या तरी वळचणीला जाण्याशिवाय पर्यायच नसतो. शिवसेना, राष्ट्रवादी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पक्ष, तृणमुल काँग्रेस, द्रमुक, अद्रमुक अशा एक ना पक्षांना सध्या सुगीचे दिवस आहेत ते, देशात आघाड्यांचे राजकारण सुरु झाल्यापासून. मात्र या सर्वच पक्षाचे अस्तित्व राज्य पातळीवर ‘गली मी शेर…’ सारखे आहे. वेळ आली तर राष्ट्रीय पातळीवर अतिशय पांगळी असणारी राष्ट्रीय आघाडीही या छोट्या पक्षांना ‘लाईफ जाकेट’सारखी असते. त्या तुलनेत काँग्रेस-भाजप हे तर सक्षम पर्याय ठरतात आणि अशावेळी तत्व, निष्ठा, भूमिका वगैरे दुय्यमच असतात कारण तो एक व्यवहार असतो. भाजप सध्या तरी भारताच्या राजकारणात वेगाने दौडणारा घोडा आहे. रामविलास पासवान काय किंवा अपांग काय यांना याच घोड्यावर स्वार व्हावेसे वाटणे यात त्यांचा राजकीय स्वार्थ जसा आहे तशीच ती मजबुरी आहे आणि त्याचवेळी अस्तित्वाच्या असुरक्षेतून आलेली अपरिहार्यताही आहे!
-प्रवीण बर्दापूरकर
(लेखक लोकमत पत्र समुहाचे नवी दिल्ली येथील राजकीय संपादक (महाराष्ट्र), आहेत.)