स्वतंत्र विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हवा एक केसीआर !

थंडी निरोप घेते आहे असे वातावरण निर्माण झालेले असताना अचानक वादळवारे सुटले, मुसळधार पाऊस झाला, गारपीट झाली… थंडी पुन्हा वाढली, काढून ठेवलेले स्वेटर्स, कोट दिल्लीकरांनी पुन्हा काढले त्या बदललेल्या वातावरणाच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि देशाच्या सत्तेची महानगरी असलेल्या दिल्लीला खाडकन राजकीय जाग आली कारण अद्याप कोणताही राजकीय पक्ष सर्व उमेदवार नक्की करू शकलेला नव्हता. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयात चक्कर मारली तर उमेदवारीसाठी इच्छुक असणा-या आशाळभूतांचे तांडे आणि त्यांना टांगवून ठेवणारे नेते हे चित्र आहे. तरीही यावेळी राजकीय विषयावर न लिहिता स्वतंत्र विदर्भ हा विषय घेतो आहे कारण, एक तर आता क्षणोक्षणी काही नवी राजकीय समीकरणे आकाराला येतील, काही जुनी बिघडतील, उमेदवारांच्या यादीत काही अपेक्षित नावे येतील तर काही नावाबाबत राजकीय गरज किंवा शह-काटशहाचे डावपेच म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत बदल होत राहतील. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे, देशाच्या कोणत्याच राजकीय पक्षाच्या विषयपत्रिकेवर हा विषय नाही आणि तरीही स्वतंत्र विदर्भ या विषयावर सोशल साईटवर भरपूर चर्चा सुरु आहे. शुक्रवारपासून ‘व्हॉटस अप’वर नागपूरच्या वैभव गांजापुरे संयोजक असलेल्या ‘विदर्भ कनेक्ट’ ग्रुपच्यावतीने स्वतंत्र विदर्भ या विषयावर पुन्हा एकदा सुरु करण्यात आलेल्या चर्चेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात एकीकडे स्वतंत्र विदर्भाची प्रांजळ आशा, उत्कट इच्छा, आत्यंतिक तळमळ, चौफेर विकासाची तीव्र उर्मी आहे आणि दुसरीकडे एक अस्सल भाबडेपणाही आहे, म्हणून हा लेखन प्रपंच !

छोट्या राज्यांना (आणि पर्यायाने स्वतंत्र विदर्भाला) असलेला माझा विरोध ज्ञात आहे, तो माझ्या लेखन आणि व्याख्यानांतून वारंवार व्यक्तही झालेला आहे. एक सांगतो, स्वतंत्र विदर्भाचे स्वप्न पाहणा-या कोणाही विषयी माझ्या मनात कधीही आकस नव्हता, शत्रुत्व तर नाहीच नाही कारण प्रत्येकाला एक भूमिका असते हे लोकशाहीवर नितांत श्रद्धा असल्याने मला मान्य आहे. एक मात्र खरे, स्वतंत्र विदर्भासाठीचे आंदोलन करणारे नेतृत्व जबरदस्त इच्छाशक्ती तसेच सर्वसमावेशक असणारे, सर्वस्व झोकून देणारे, निस्वार्थी असायला हवे आणि त्याला सर्वस्तरीय जनआंदोलनाचा व्यापक पाठिंबा मिळाल्याशिवाय स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन यशस्वी होणार नाही हे माझे ठाम मत होते आणि आहेच. अलीकडच्या इतिहासात जांबुवंतराव धोटे यांच्या आंदोलनाला व्यापक चळवळीचा व्यापक जनआधार होता पण तेव्हा राजकीय समीकरण ‘जरा’ बिघडले आणि ते बिघडतच कसे गेले… मग स्वतंत्र विदर्भ हे एक कधीही पूर्ती न होणारे स्वप्न कसे बनले हे जसे मी अनुभवले तसेच, १९८०पासून विदर्भाचा मुद्दा केवळ राजकीय स्वार्थासाठी कसा उचलला जातो हेही एक पत्रकार म्हणून पाहात आलो आहे. विदर्भातल्या कोणत्याही पक्षाच्या विद्यमान (म्हणजे आता खरे तर मावळत्या !) खासदार किंवा आमदार किंवा राजकीय नेत्यात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे आंदोलन करण्याची म्हणा की उभारण्याची म्हणा कुवतच नाही, हे सगळे कागदी वाघ आहेत. गेली आठ महिने दिल्लीत मी तेलंगण राष्ट्रीय समिती आणि के.चंद्रशेखर राव यांचे काम जवळून बघत आलो, तत्पूर्वी त्यांच्या या व्यापक जनचळवळीविषयी, भडकलेल्या आंदोलनाबद्दल वाचत आलो आहे. एक लोकआंदोलन चिकाटीने कसे उभे करायचे आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी यशस्वी कसे करावयाचे याचे आदर्श उदाहरण म्हणून स्वतंत्र तेलंगण निर्मितीसाठी उभारल्या गेलेल्या आंदोलनाचा उल्लेख करावा लागेल . या यशस्वी झालेल्या आंदोलनाचे श्रेय शहीद झालेल्या अनेकांसह अनेकांना देता येईल पण सूत्रधार म्हणून के.चंद्रशेखर राव यांनी बजावलेली भूमिका नि:संशय वाखाणण्याजोगी आहे, त्यांचे करावे तेव्हढे कौतुक कमी ठरेल अशी आहे, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावेच लागेल यात कोणतीच शंका नाही हे आवर्जून नमूद करायला हवे.

एकाचवेळी के. चंद्रशेखर राव यांची तेलंगण राज्याचा हिरो आणि आंध्र प्रदेशचा व्हिलन अशी दुहेरी प्रतिमा सध्या निर्माण झालेली आहे. कलवकुंतला चंद्रशेखर राव असे पूर्ण नाव असले तरी ते परिचित आहेत ते ‘केसीआर’ अशा सुटसुटीत आद्याक्षरांनी. १७ फेब्रुवारी १९५४ रोजी आंध्र प्रदेशातील मेडक जिल्ह्यातील चितमडका या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. तेलगु साहित्यात एम.ए. केल्यावर हा युवक, तेव्हा आंध्रात क्रेझ असलेल्या, एन.टी.रामाराव यांनी स्थापन केलेल्या तेलगु देशम पक्षात थेट दाखल झाला. या युवकाचा शांत स्वभाव, प्रत्येक विषयाकडे मुळातून बघण्याची अभ्यासपूर्ण दृष्टी तसेच संघटन कौशल्य अनुभवल्यावर रामाराव प्रभावित झाले आणि थेट १९८३च्या विधानसभा निवडणुकीत या युवकाला उमेदवारी बहाल झाली. त्याचवेळी ‘कलवकुंतला चंद्रशेखर राव’चे ‘केसीआर’ हे सुटसुटीत नामकरण झाले, जे आजवर कायम आहे.

पहिली निवडणूक तर केसीआर हरले पण नंतर १९८५, ८९, ९४ आणि ९९ अशा विधानसभा निवडणुका त्यांनी सलग जिंकल्या. ते मंत्री झाले, विधानसभेचे उपसभापती झाले. स्वभावात एखादा विषय संयम न ढळू देता चिकाटीने समजून घेण्याची जन्मजात अभ्यासूवृत्ती असल्याने आमदार झाल्यावर तेलंगण प्रदेश मागासलेला का, तेलंगणला मागास ठेवले कोणी, त्यामुळे जनतेच्या मनात ठसठसणारा आणि ठासून भरलेला असंतोष किती तीव्र आहे हे त्यांना कळले. सत्तेच्या दालनात प्रवेश झाल्यावर जी माहिती उपलब्ध होऊ लागली त्यातून स्वतंत्र तेलंगण राज्याची जुनी मागणी योग्य आहे , स्वतंत्र झाल्याशिवाय या प्रदेशाचा विकास होणार नाही याची खात्रीशीर समज अत्यंत व्यापक झाली. चार निवडणुकात विजयी होऊन विधि मंडळात काम केल्याने स्वतंत्र तेलंगणच्या मागणीसाठी सांसदीय लढा कसा उभारायचा, त्याला जनतेचा पाठिंबा तळागाळातून कसा मिळवायचा, लोकसंघर्षाची जोड कशी द्यायची याची आखणी व जुळवणी करता आली. ही आखणी आणि सांसदीय तसेच लोकआंदोलन अशा दोन्ही आघाड्यावरील दीर्घ अंमलबजावणीचे नियोजन पूर्ण झाल्यावर केसीआर यांनी मे २००१मध्ये उपसभापतीपद, आमदारकी तसेच तेलगु देशम या पक्षाचा राजीनामा दिला; तेलंगण राष्ट्र समितीची स्थापना केली आणि पंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा करून कामाला सुरुवात केली आणि लोकसभा निवडणूक जिंकण्यापर्यंत त्याची व्याप्ती वाढवली . एखादे नियोजनबद्ध आंदोलन समाजाच्या किती मुळापासून उभे करायचे याचा वस्तुपाठ म्हणजे पंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

मे २००१ ते जानेवारी २०१४ अशा सांसदीय आणि रस्ता या दोन्ही आघाड्यांवर तहान-भूक, विश्रांती विसरून केसीआर-तेलंगण राष्ट्र समिती आणि त्यांची साथ कणखरपणे करणा-या सहका-यांनी केलेल्या अविरत लोकसंघर्षाची यशस्वी सांगता म्हणजे स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीचे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेले बिल आहे. हा लढा अनेकदा हिंसक झाला, अनेकांना प्राण गमवावे लागले, हैद्राबाद आणि तेलंगण प्रदेश सतत बंदच्या वणव्यात जळत राहिला, आंध्रचे विभाजन होऊ नये म्हणून टोकाचा विरोध झाला तरी नैराश्याचा स्पर्शही न होऊ देता, कडवटपणा न बाळगता, यत्किंचितही आततायीपणा न करता, केसीआर यांचा पीळ कायम राहिला, ध्येयासक्ती अटळ राहिली म्हणूनच संसदेत स्वतंत्र तेलंगण राज्य निर्मितीचे बिल संमत झाल्यावर स्वतंत्र तेलंगण निर्मितीमुळे काँग्रेसचे काय नुकसान झाले आणि आपला काय फायदा झाला याचा विचार न करता त्यांची प्रतिक्रिया अश्रूंची होती … ना त्यांनी विजयाचा उन्माद दाखवला ना तेलंगण समर्थकांना तो दाखवू दिला, ना एकट्या स्वत:कडे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. संसदेचे अधिवेशन सुरु झाल्या दिवसापासून तेलंगण बिल मंजूर होईपर्यंत केसीआर दिल्लीत, अनेकदा संसदेच्या परिसरात होते पण, त्यांच्या चेहे-यावरचा शांतपणा ढळला नाही की आत्मविश्वास कणभरही कमी झाला नाही. केसीआर यांना आता वेध लागले आहेत ते तेलंगण विकासाचे. हे ते काँग्रेसच्या मदतीने साध्य करतात की, काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करून हाच काय तो केवळ उत्सुकतेचा विषय आहे !

स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीसाठी गरज आहे ती अशा एका ‘कलवकुंतला चंद्रशेखर राव’उपाख्य ‘केसीआर’सारख्या विश्वासाहर्ता असणा-या नेतृत्वाची आणि एका प्रदीर्घ तसेच व्यापक लोकलढ्याची. राजकीय हित बाजूला ठेऊन स्वतंत्र विदर्भाचे आव्हान स्वीकारणारा केसीआर यांच्यासारखा कोणी नेता विदर्भात आहे का ? (माझे मत असे की, वर्तमान परिस्थितीत केसीआरसारखा व्यासंग, क्षमता, प्रतिमा आणि चिकाटी माझे मित्र आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांच्यात होती… पण ते असो !)

-प्रवीण बर्दापूरकर

संबंधित पोस्ट