‘कन्नड’चे दिवस

हात्मा गांधी मिशनच्या रम्य परिसरात शिरलं की , महाविद्यालयीन जीवनातले दिवस आठवतात . हा परिसर इतका मनोहारी तर , आमचा तेव्हाचा महाविद्यालयीन परिसर अतिशय रुक्ष . कन्नड बसस्टॅण्ड समोर असलेल्या नाल्याच्या काठावर नुकतीच तयार झालेली नगरपालिकेची  एक वास्तू म्हणजे आमचं महाविद्यालय .

१९६० ते ८० तो काळ सर्वच बाबतीत अतिशय प्रतिकूल होता . शिक्षणाच्या सोयीचा अभाव , दळणवळणाची साधनं अत्यंत मर्यादित ; एका वेळेस एकच चारचाकी वाहन जाऊ शकेल असे रस्ते , आरोग्याच्या सुविधा तर खूपच त्रोटक ; शासनाचं प्राथमिक उपचार केंद्र तालुक्याच्या गावी असायचं . माझी आई नर्स होती आणि पंचक्रोशीसाठी एकच नर्स , असं तेव्हाचं अतिशय व्यस्त प्रमाण होतं . खेडोपाडी संवादाची साधनं जवळजवळ नव्हतीच ; जी काही एकमेकांची ख्यालीखुशाली कळायची ती पोस्टामार्फत . पोस्टही पंचक्रोशीत एकच . खेडोपोडी बाजारही नव्हते . पंचक्रोशीत एखादाच आठवडी बाजार असे . गावात किराणा सामानाचं एखादं दुसरं छोटसं दुकान असे .

 

तेव्हाच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या अंधानेर या गावातून मी मॅट्रिक झालो , ते शैक्षणिक वर्ष १९७१-७२ होतं . संपूर्ण कन्नड तालुक्यात कन्नड आणि पिशोर या दोनच गावात मॅट्रिकच्या परीक्षेचं केंद्र होतं . तेव्हा हायर मॅट्रिक म्हणजे अकरावी होतं . अकरावी नंतर पीयुसी (प्री युनिर्व्हसिटी कोर्स ) आणि पीयुसी नंतर तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम अशी रचना होती . आमच्या बॅचनंतर १० वी मॅट्रिक म्हणजे १० + २ +३ अशी शिक्षण प्रणाली सुरु झाली .

तेव्हाची सामाजिक-आर्थिक परिस्थितीसुद्धा अतिशय हालाखीची    होती . सधन वर्ग समाजात फारच कमी होता . शिक्षणही प्रामुख्यानं याच समाजापर्यंत मर्यादित होतं . मात्र , १९६० नंतरचा तो काळ , ही बंधनं  सैल होण्याचे दिवस होते . समाजामध्ये शिक्षणाबद्दल जागृती निर्माण होऊ लागली होती . माझ्या मॅट्रिकच्या वर्गात २६ मुलं होती  पण ,  एकही मुलगी नव्हती . २६ पैकी तब्बल २२ जण शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या समाजातले पहिले होते . दोघांचा अपवाद वगळता वर्गातल्या सगळ्यांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती .  शाळा संपल्यावर माझे बहुतेक सहध्यायी शेतात कामाला जात . त्यापैकी अनेक जण कन्नडला भरणाऱ्या सोमवारच्या आठवडी बाजारात भाजी-फळं-धान्य विकायला जात आणि येतांना आठवड्याचा बाजार करुन येत .या मित्रांसोबत मीही बाजारात भाजी विकायला अनेकदा बसलो आहे ; एका वर्षी तर दिवाळीला आकाश कंदील तयार करुन विकायला  बसलो होतो , हेही  अजून आठवतं .  माझा एकही आकाश कंदील विकला गेलं नाही कारणं तेव्हा तयार आकाश कंदील विकत घेण्याची पद्धतच नव्हती . शेवटी मी सर्व कंदील वाटून टाकले आणि महाराष्ट्र  एका उद्योजकाला कायमचा मुकला !

आमचीही परिस्थिती कनिष्ठापेक्षा कनिष्ठ मध्यमवर्गीय होती . वयाच्या तिशीतच अकाली वैधव्य प्राप्त झालेली माझी आई- तिला आम्ही माई म्हणत असू .  तिच्या पदरी चार मुलं आणि नर्सला पगार असून असून असणार किती ? अंधानेरला एका खोलीत आम्ही सर्व राहात असू . रात्रीचा आमचा सर्व वावर चिमणी किंवा कंदिलाच्या प्रकाशात असे . घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे साधारण आठवीपासूनच उन्हाळ्यातील दोन-अडीच महिने कुठे तरी काम करणं आणि त्यातून झालेल्या कमाईतून वर्षभराच्या शिक्षणाची सोय करणं  , हा आमच्या घरातला परिपाठ होता . मी नववीत असताना अंधानेर जवळ अंबाडी  मध्यम सिंचन प्रकल्पाचं काम सुरु झालं . त्या कामाचे स्थानिक प्रमुख के. एस. नांगरे आणि बेग असे दोघे होते . या कामावर मला संधी मिळाली . एक तर माझं अक्षर चांगलं त्यामुळे काम म्हणजे , मस्टर लिहिणं , डिक्टेट केलेली पत्र लिहून देणं आणि नांगरे साहेबांची तान्ही मुलं सांभाळणं अशी दुहेरी जबाबदारी होती . एक अतिरक्त जबाबदारीही पडत असे आणि ती म्हणजे नांगरे आणि बेग साहेबांना भिडू कमी पडला तर त्यांच्यासोबत ब्रिज या पत्त्याच्या खेळात सामील होणं .  रोजंदारी २ रुपये ७५ पैसे अशी काहीशी आठवड्यातले पाच दिवस मिळायची . नांगरे साहेबांमुळे इयत्ता नववी ते बी.कॉम प्रथम वर्षापर्यंत मला रोजगार हमी योजनेवर काम मिळालं .

कन्नड तालुका पंचायत समितीचे तत्कालीन सभापती लक्ष्मणराव मोहिते-पाटील अंधानेरचे होते . तेव्हा पंचायत समितीच्या सभापतींना जीप मिळत असे . मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी अंधानेरची सर्व मुलं त्या जीपनं  दोन ट्रिपा करत लक्ष्मणराव मोहिते-पाटील यांनी कन्नडला जिल्हा परिषदेच्या एका शाळेच्या वर्गात पोहोचती केली . परीक्षेच्या काळात आम्हा सर्व मुलांच्या जेवणाचे डबे ; खरं तर , फडक्यात बांधलेल्या भाकरींचा गठ्ठा , दररोज लक्ष्मणराव पाटील कन्नडला येताना जीपमध्ये घालून आणत . त्यात दोघा-तिघांचा अपवाद म्हणजे , त्यांचं जेवण डब्यात येत असे , बाकी सर्वांचं कपड्यात बांधून येत  असे . महत्त्वाची बाब म्हणजे त्यात कोणताही जातीभेद नव्हता .   ब्राह्मण , मराठा , कोळी , तेली , दलित  अशा सर्वांचं जेवण जीपमध्ये गुण्यागोविंदानं लक्ष्मणराव पाटील घेऊन येत असत . शाळेसमोर असणाऱ्या एका टपरीवाल्याला सकाळ आणि संध्याकाळ आम्हाला चहा देण्याची सूचनाही लक्ष्मणराव पाटील यांनी केलेली होती .

१९७१ चा मध्यम दुष्काळ संपून ७२ च्या तीव्र दुष्काळाची चाहूल लागलेले ते दिवस होते . गावोगावी खडी फोडण्याची कामं सुरु  झाली होती . जगण्याचे वांधे होते अन्  मरणाचेही . कारण कोणी मरण पावला तर त्याला आंघोळ घालायलाही पाणी नव्हतं तर जगण्यासाठी अमेरिकेतून आलेला लाल गहू , पावडरचं दूध आणि सुकडी या अन्नाचा आधार होता . अशी ही सर्वत्र अभावाची स्थिती होती .  अशा परिस्थितीत मॅट्रिकनंतर पुढील शिक्षणाच्या कोणत्याही आशा आमच्यासमोर नव्हत्या . मॅट्रिकचा निकाल लागला . मला ५३ का ५४ टक्के मिळाले . मॅट्रिकच्या परीक्षेत इतके चांगले (?) गुण मिळवणारा  बर्दापूरकर घराण्यातला मी पहिला  कुलदीपक होतो  तरी माई नाराज झाली ! कारण ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले असते तर बँक , विमा किंवा पोस्टात सहज नोकरी मिळाली असती . पुढचं शिक्षण घ्यायचं तर वैजापूर किंवा औरंगाबादला जावं लागलं असतं आणि ते परवडणारं नव्हतंच . त्यामुळे पुढच्या शिक्षणाच्या आशा संपुष्टात आल्या . खरं तर , मॅट्रिकनंतरच नांगरे साहेबांच्या साईटवर तात्पुरत्या स्वरुपात रोड कारकून म्हणून मला नोकरी मिळण्याबद्दल माईचं बोलणंही झालं होतं .

एक दिवस संध्याकाळी गावात दवंडी पिटली की , उद्या ‘खासदार बाळासाहेब पवार आणि आमदार नारायणराव नागदकर पाटील अंधानेरला येणार आहेत . कन्नडला त्या वर्षीपासून कला आणि वाणिज्य महाविद्यालय सुरु होणार होतं . त्या संदर्भात ग्रामस्थांशी बोलण्यासाठी ते येणार होते .  लक्ष्मणराव मोहिते-पाटील यांच्या वाड्यात दुसऱ्या दिवशी बैठक झाली . बाळासाहेब पवार यांनी नारायणराव नागदकर आणि लक्ष्मणराव पाटील यांच्या उपस्थितीत नवीन महाविद्यालयाची घोषणा केली . मॅट्रिक पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल याची ग्वाही दिली . बैठकीला उपस्थित असलेल्या ग्रामसेवकाला सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्न १२०० रुपयांपेक्षा कमी असल्याचा दाखला देण्याचा आदेशच दिला . आता नाव आठवत नाही पण , ग्रामसेवकानं माझा जातवार उल्लेख करुन माझी आई नर्स असल्याचं म्हणजे , आमचं उत्पन्न १२०० रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं . लक्ष्मणराव मोहिते यांच्याशी कानगोष्टी केल्यावर बाळासाहेब पवार यांनी  ‘अरे, नर्स बाईला पगार असणार तरी किती ‌? आणि बाईच्या पदरी चार पोरं आहेत याचा काही विचार करशील का नाही ,’ हे खडसावून विचारलं आणि पुढील शिक्षणाचा अंधानेरच्या आमच्या वर्गातील माझ्यासकट इतर मुलांचा मार्ग मोकळा झाला.

■■

अंधानेरहून महाविद्यालयात मी आणि रामराव मालकर सोबतच गेलो . रामराव आणि मी शालेय जीवनातले मित्र . अंधानेरला शेजारीच राहत असूत . शाळेतून आलो की , रामराव सोबत त्याच्या शेतात मी अनेकदा जात असे . महाविद्यालयात गेल्यावर अशोक बारवकर यांनी आम्हाला मार्गदर्शन  केलं . ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक होते . वाणिज्य शाखेत पदवी मिळवली की नोकरीची कशी हमखास खात्री आहे , हे त्यांनी पटवून दिलं तरी रामरावनं कला आणि मी वाणिज्य शाखा घेतली . प्रवेशाचा फॉर्म  सादर करायला गेलो तर लक्ष्मण काळे याच्याशी ओळख झाली . महाविद्यालयीन जीवनातला तो माझा पहिला मित्र . कन्नडच्या  शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेत  प्रवेश घेणारे मी आणि लक्ष्मण पहिला-दुसरा विद्यार्थी . पायजामा-सदरा घालून असलेला लक्ष्मण , विद्यार्थी नाही तर ‘बाप्या-माणूस’ वाटला . कन्नडला पुढील शिक्षणाची सोय नसल्यानं मॅट्रिक झाल्यावर तीन वर्षापासून तो शेती करत होता आणि पिठाची गिरणीही चालवत होता . कन्नडच्या आठवडी बाजाराला लागून त्याचं घर होतं .  दरम्यान त्याचं लग्न झालेलं होतं आणि एका मुलांचा तो पिता होता . आमच्या दोघांचे सूर खूपच जुळले . आता तो मुंबईत बडा सनदी लेखापाल ( चार्टर्ड अकाऊंटंट ) आहे ; फोर्ट सारख्या भागात त्याचं मोठं कार्यालय आहे . आजही आम्ही संपर्कात आहोत . लक्ष्मण नंतर भीमराव पवार , नाना शेटे , सुभाष भारुका अशी बरीच मित्रमंडळी लाभली .

महाविद्यालयातला पहिला दिवस अजून लख्ख आठवतो . मॅट्रिकनंतर उच्च शिक्षण घेणारा आमच्या घरातला मी पहिलाच त्यामुळे नाही म्हटलं तरी सर्वांनाच कौतुक होतं . महाविद्यालयात जाण्यासाठी मला एक नवीन पॅन्ट-शर्ट शिवून देण्याचं नुकताच नोकरीला लागलेल्या माझा मोठा भाऊ प्रदीप यानं कबूल केलं . त्याला आम्ही दादा म्हणत असूत . माईनंही पॅन्ट शर्टसाठी ४० रुपये दिले . ते पैसे घेऊन औरंगाबादला दादाकडे आलो . गुलमंडीवरुन कापडाची खरेदी झाल्यावर दादाच्या नेहेमीच्या टेलरकडे कपडे शिवायला टाकले . पॅन्ट घालण्याच्या कल्पनेनं मी हुरळून गेलो होतो . टेलरनं दहा-बारा दिवसांत कपडे शिवून देण्याचं मान्य केलं . मग दादानं नव्या कोऱ्या वह्या घेऊन दिल्या . ‘कपडे शिवून आले की अंधानेरला कुणाच्या हाती पाठवतो ,’ असं दादानं कबूल केलं आणि मी अंधानेरला परतलो . इकडं  कॉलेजचा पहिला  दिवस आला तरी कपडे आलेच नाहीत कारण अंधानेरला येणारं कुणी दादाला भेटलं नाही . मग आदल्या दिवशी तांब्यात विस्तव टाकून त्यातल्या त्यात चांगल्या हाफ-पॅन्ट आणि शर्टला मी इस्त्री केली . पायातल्या स्लीपर्स स्वच्छ धुवून घेतल्या . रामराव मालकर आणि मी सकाळी सातलाच अंधानेरहून निघून पाणंदीतून पायी चालत सकाळी आठ वाजता महाविद्यालयात पोहोचलो , तेव्हा कन्नड गांव आळोखेपिळोखे देत होतं .

प्राध्यापक आणि मोजके वगळता बहुतेक सर्व मुलं पायजामा सदरा घालूनच आलेली होती . मी एकटा  हाफ-पॅन्टवर होतो . एक-दोन वगळता सर्व मुली चापूनचोपून साडी नेसून आलेल्या होत्या . वर्गात ओळखीच्या वेळी ( आजच्या भाषेत इंडक्शन ) सरांनी ‘काय रे चड्डी घालून का आलास ? हे कॉलेज आहे माहिती नाही का?’ असं विचारलं तेव्हा कांही मुलं-मुली जोरात हसली . मी  किंचित ओशाळलो पण ,  उभं राहून धीटपणे परिचय करुन दिला . छंद म्हणून वाचन सांगितलं तेव्हा सरांना आश्चर्य वाटलं . त्यांनी ‘काय वाचतोस’ असं विचारलं तेव्हा तोंडी आली ती , चिं . त्र्यं . खानोलकर , अण्णाभाऊ साठे , वि. स. खांडेकर , फडके , आचार्य अत्रे , पेंडसे वगैरे नावं सांगितली . मराठवाडा आणि लोकसत्ता या दैनिकांचाही उल्लेख केला . आमचे तत्कालीन प्राचार्य पी. ए. नरवाडे टाय , कोट असे सूट घालून सजून आलेले होते . तोपर्यंत आम्ही टाय , सूट घातलेला माणूस हिन्दी चित्रपटातच पाहिलेला होता , त्यामुळे आमच्यात चर्चा प्राचार्याच्या पेहेरावाचीच होती .

तोवर कथा कादंबऱ्यात वाचलं होतं तसं वेगळं म्हणजे , ‘पहिली नजर मे…’ वगैरे कांहीच त्या पहिल्या दिवशी घडलं नाही ; फक्त आमच्या हातात दप्तर नव्हतं . महाविद्यालयातला पहिला दिवस असाच संपला . मी आणि रामराव पुन्हा पाणंदीतून चालत अंधानेरला परतलो तेव्हा दुपारचे चार वाजलेले होते आणि जाम भुका लागलेल्या होत्या . घरी माई नव्हती ; नेहेमीप्रमाणं कुठल्या तरी तांड्यावर ती अडलेली बाई सोडवायला गेलेली होती . मग मी रामरावच्याच घरी भाकरी खाल्ली . त्या पहिल्या दिवसाची एवढीच आठवण आहे .

अंधानेरहून कन्नडला एक मार्ग पाणंदीतून आणि दुसरा मुख्य रस्ता . कन्नड ते चाळीसगांव हा तो मार्ग . त्यासाठी गावातून फाट्यापर्यंत दोनेक किलोमीटर्स पायी जावं लागायचं मग डांबरी सडक लागायची . फाट्यावरून बस  मिळायची पण , तिकीट चार आणे होतं आणि ते आम्हाला परवडणारं नव्हतं . शिवाय त्या चार आण्यात कन्नडला चहा आणि सिंगल आलूवडा मिळायचा . म्हणून खिशात पैसे असले तरी आम्ही पायीच जा-ये करत असूत आणि गरमागरम वडा चापून चहा घेऊन कॉलेजला जात असूत . हिवाळ्यात पाणंदीतून जाताना जाम थंडी वाजायची . हात  आणि पायाची बोटं आखडून जायची , चेहेरा उलायचा पण , पर्याय नव्हता . मग उन्हाळ्यात सावलीतली पाणंद आणि हिवाळा, पावसाळ्यात डांबरी रस्ता असा मार्ग आम्ही काढला . पीयुसी झाल्यावर एक सेकंड हँड सायकल माईनं घेऊन दिली . १०० रुपयांची ती सायकल चार हप्त्यावर  ( इनस्टॉलमेंट ) मिळाली होती . सायकलवर रामराव आणि मी डबल सीट  जात असू . सायकल आल्यावर हँड पंपनं हवा भरणं , पंक्चर काढणं , अशी काम शिकून घेतली . त्या सायकलवर मी आणि रामराव वेरुळ , खुलताबाद , पिसादेवी , चाळीसगांव असं भरपूर फिरलो . ‘डबल पेडल’ मारत आम्ही प्रवास करत असू .  ‘डबल पेडल’ म्हणजे मुख्य सीट आणि कॅरियर बसलेल्या दोघांनी मिळून एकाच वेळी पेडल मारणं .

■■

१९७० ते ८० हा काळ देश तसेच राज्यात खूपच उलथपालथीचा होता . आमचं महाविद्यालयीन जीवन सुरु झालं तेव्हा भारतानं बांगला देशच्या मुक्ततेसाठी लढलेलं युद्ध नुकतंच संपलेलं होतं .  निर्वासिताचे लोंढे भारतात आलेले होते . त्यांना जगवण्यावर देशाचा मोठा खर्च होत  होता . त्यातच आर्थिक वाढीचा दर मंदावलेला होता . त्याचे परिणाम देशभर महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईच्या स्वरुपात जाणवत होते . धान्य , तेल , रॉकेल रेशन दुकानावरच मिळे ; रेशनच्या दुकानासमोर भल्या मोठ्या रांगा असत . देशातील बेकारी खूपच वाढलेली होती . बेकारांच्या टोळ्या औद्योगिक वसाहतीत आशाळभूतपणे फिरताना दिसत . खाजगी संस्था , दुकाने , मोठया  आणि मध्यम उद्योगांबाहेर ‘नो व्हेकन्सी’चे बोर्ड लागलेले असत . महागाई आणि बेकारीमुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी  अस्वस्थता होती . त्याचा उद्रेक अधूनमधून आंदोलनांच्या स्वरुपात होत असे . केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांविरुद्ध असंतोष होता ; त्याचेही पडसाद रस्त्यावर तसंच संसदेत उमटत होते .

राज्यात १९७२चा भीषण दुष्काळ अजून पूर्ण ओसरलेला नव्हता . राज्यात त्याच्याही झळा जाणवत होत्या . शेतात पीक नाही आणि हाताला काम नाही अशी स्थिती होती . रेशनवर धान्य मिळावं म्हणून मोर्चे निघत होते . प्रादेशिक विकासाचे प्रश्न उफाळून आले होते . मराठवाड्यातील युवक कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले होते . ठिकठिकाणी मोर्चे निघत होते , आंदोलने होत होती . हे आंदोलन ओसरतं  न ओसरतं  तोच मराठवाड्यात कृती समितीच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या विकासाच्या मागणीसाठी युवक संघटित आणि आक्रमकही झाले . त्यातच  वसमतला पोलिसांच्या गोळीबारात कांही युवक ठार झाले आणि मराठवाड्यात संतापाची लाट उसळली . युवकांच्या आंदोलनाला आणखी धार चढली . पाहता पाहता या आंदोलनाचा वणवा संपूर्ण मराठवाडाभर पसरला . बंद , रस्ता रोखो , रेल रोखो , उपोषणं , जाळपोळ , मोर्चे याचं लोण  मराठवडाभर पसरलं .

आंदोलनाची माहिती कन्नडलाही मिळत होती . ‘मराठवाडा’ दैनिक वाचून लोक त्या आंदोलनावर चर्चा करत . ही चर्चा कन्नड तालुक्यात अगदी गाव , तांड्यापर्यंत झिरपली होती . आम्हालाही त्यात सहभागी व्हावसं वाटू लागलं . त्यात लक्ष्मण काळे आणि माझा पुढाकार होता . लक्ष्मण अध्यक्ष आणि मी सचिव अशी समिती स्थापन केली . भीमराव पवार , नाना शेटे सोबतीला होते .  ही रचना स्वयंघोषित होती आणि ती सर्वांना मान्य होती . कृषी  विद्यापीठाच्या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढला . त्यात लोकही सहभागी झाले . घोषणांनी कन्नडच्या मुख्य गल्ल्या  दणाणून गेल्या . हे बघून आम्हाला हुरुप आला . मग आम्ही कन्नड बंदची हांक दिली . बंदलाही मोठा प्रतिसाद मिळाला . हे संपतं न संपतं तोच विकासाचं आंदोलन सुरु झालं . त्यातही आम्ही सहभागी झालो . दैनिक ‘मराठवाडा’तील बातम्या वाचून लक्षण काळे आणि मी आमच्या आंदोलनाची दिशा ठरवत असूत .

कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक दिवस आम्ही कन्नडच्या नगराध्यक्षांचा राजीनामा घेतला . त्यासाठी नगर पालिकेवर मोर्चा नेला , नगराध्यक्षांना घेराव घातला . घोषणांनी नगर पालिकेचं कार्यालय दणाणून सोडलं . राजीनामा तर घेतला पण , त्याचं करायचं काय हे आम्हाला माहिती नव्हतं . मग आम्ही तो राजीनामा डॉ. टी . एस . पाटील यांना नेऊन दिला . ते समाजवादी पक्षाचे नेते आणि बहुदा ‘मराठवाडा’ दैनिकाचे वार्ताहरही  होते . कन्नडच्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची बातमी ‘मराठवाडा’ दैनिकात पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध झाली . लक्ष्मण आणि मी हिरो ठरलो . कन्नडच्या राजकीय लोकांचं लक्ष आमच्याकडे वेधलं गेलं पण , आम्ही राजकारण्यांपासून दूरच राहिलो . सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे आमच्या कोणत्याही आंदोलनात रस्त्यावरचा एक दगड कुणी उचलला नाही की कागदाचा कपटासुद्धा जाळला नाही . महत्त्वाचं म्हणजे , नगराध्यक्षांच्या राजीनाम्याच्या बातमीमुळे मराठवाडा कृती समितीच्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला . कृती समितीच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या परिषदांची आमंत्रणं आम्हाला येऊ लागली . निशिकांत भालेराव , भालचंद्र कांगो , विजय गव्हाणे , गोपीनाथ मुंडे , प्रमोद महाजन , अशोक सोनी , सुभाष लोमटे , रंगा राचुरे असा  ओळखीचा परीघ विस्तारला .

आमचं आंदोलन करणं , मोर्चे काढणं वगैरे आमच्या प्राचार्यांना पसंत नव्हतं . त्यातच ग्रंथालयांच्या वेळेवरुन का कुठल्याशा मुद्द्यावरुन त्यांचा आमच्याशी खटका उडाला , त्यांनी आम्हा काहींना दंड केला म्हणून  आम्ही ‘प्राचार्य  हटाव’ आंदोलन सुरु केलं . त्यासाठी मोर्चा काढून कन्नडच्या गल्लीबोळात फिरलो . बाळासाहेब पवार आम्हाला भेटायला कन्नडला आले . आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं . प्राचार्यपद त्यांनी प्रभारी स्वरुपात दुसऱ्याकडे सोपवल्यावर आमचं आंदोलन संपलं . या सर्व  गदारोळात परीक्षा झाली .  निकाल आला अन बी . कॉम. प्रथम वर्षांच्या परीक्षेत एका विषयात मी नापास झालो ; मला एटीकेटी मिळाली .  दरम्यान केंद्र सरकारची योजना असलेल्या औरंगाबादच्या नेहरु युवक केंद्रात मला अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून ६५ रुपये महिना पगाराची नोकरी मिळू शकत असल्याचा निरोप मिळाला . माईनं माझी रवानगी तडकाफडकी औरंगाबादला केली . माझ्या आयुष्यातून कन्नड नजरेआड झालं . अशात शिवाजी महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेलो तर विस्तारलेलं कन्नड आणि शिवाजी महाविद्यालयांचा भव्य , अतिशय नीट-नेटका  परिसर पाहून अचंबित झालो . आता या महाविद्यालयात विज्ञान शाखा , भव्य ग्रंथालय आहे  .

महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात इतकी धावपळीची झाली की कथा कादंबऱ्यात वाचलेले कॉलेजचे कथित ‘मोरपंखी’  दिवस एंजॉय करताच आले नाहीत किंवा आमच्या वाट्याला आले नाहीत . अशोक बारवकर , पुढे सूरमणी म्हणून गाजलेले बासरी वादक दत्ता चौगुले , अर्थशास्त्राचे पांडे हे प्राध्यापक आणि ग्रंथपाल ओंकार पाटील अजूनही स्मरणात आहेत . आमच्या महाविद्यालयात कला शाखेत १८-२० मुली होत्या पण , त्या खालमानेनं येत आणि परत जात . आमचीही त्यांच्याशी बोलण्याची कधी हिंमत झाली नाही . नाही म्हणायला एक अपवाद त्रिपाठी नावाच्या मुलीचा . तेव्हाच्या प्रतिष्ठेच्या रानडे वक्तृत्व स्पर्धेसाठी  महाविद्यालयातून मी पहिला आलो , तेव्हा तिनं हस्तांदोलन करुन अभिनंदन केलं होतं पण , तिचं नाव विचारण्याची हिंमत तेव्हा झालीच नाही…

■■

कन्नडच्या दिवसातली एक उपलब्धी म्हणजे मी कांहीबाही लिहू लागलो . पहिली कथा याच दिवसांत मी लिहिली आणि महाविद्यालयाच्या ‘पारिजात’ या वार्षिक अंकात प्रकाशित झाली . २०१०च्या सुमारास या महाविद्यालयातले एक प्राध्यापक रमेश सूर्यवंशी यांनी तो अंक मेलवर पुन्हा पाठवला तेव्हा लक्षात आलं , ती कथा शैली , आशय आणि गांभीर्य या तिन्ही निकषांवर पार गंडलेली होती . तेव्हा ‘पारिजात’चे संपादक कोण होते ते आठवत नाही पण , ही कथा त्यांनी प्रकाशित केली म्हणजे ते फारच सहिष्णू होते , असा अर्थ काढून मी मोकळा झालो  .

शिवाजी महाविद्यालय आणि कन्नडच्या दिवसांनी मला जगण्याचा आत्मविश्वास तर दिलाच , सोबत माझ्या आकलनाच्या कक्षा विस्तारल्या आणि वाचनाला दिशा दिली . महात्मा फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर इथेच प्रथम कळले .  पीयुसीला असतांना पहिल्या कांही दिवसांतच एकदा ग्रंथालयात गेलो . एका मोठ्या खोलीत हे ग्रंथालय होतं . खोलीत सगळीकडे पुस्तकांचे गठ्ठे पडलेले होते , रॅकमधे ती पुस्तकं लावण्याचं काम सुरु होतं . पुस्तकांच्या त्या गंधानं मला गारुड घातलं . मी तिथंच रेंगाळू लागलो . ग्रंथपाल ओंकार पाटील म्हणून होते . त्यांची ओळख झाली . माझी वाचनाची आवड त्यांना समजली . त्यांनाही एक फुकट सहायक हवाच  होता . त्यांना  पडेल ती मदत म्हणजे , पुस्तकांचे गठ्ठे सोडणं , ती कपाटात लावणं वगैरे मी करु लागलो . सुवाच्च अक्षरामुळे ते लिखापढीचंही काम ते  मला सांगत असत . अनेकदा ग्रंथालय माझ्या भरवशावर सोडून ते जाऊन जेवून येत असत . ग्रंथालय शास्त्र नावाची एक स्वतंत्र शाखा आहे , त्यात प्रमाणपत्र आणि पदविका असे अभ्यासक्रम आहेत आणि ते केल्यावर नोकरी लगेच मिळते ,  ही माहिती मला ओंकार पाटील यांच्याकडून मिळाली . ग्रंथपाल व्हायचं खूळ माझ्या डोक्यात शिरलं . मग पीयुसीची परीक्षा झाल्यावर औरंगाबादला जाऊन उन्हाळ्याच्या सुटीत मी ग्रंथालय प्रमाणपत्र हा पन्नास की साठ दिवसांचा अभ्यासक्रम केला . त्याचा खर्च नांगरे साहेबांनी उचलला . पीयुसी आणि प्रथम वर्षांच्या काळात वर्ग संपल्यावर मी एक तर ग्रंथालयात किंवा रस्त्यावर आंदोलनात असे . ओंकार पाटील यांच्यामुळे मला अनेक लेखक , विश्वकोश , विविध शब्दकोश असं नवं जग खुलं झालं . ते पुस्तक मुलासारख हाताळत असत आणि ते बघणं फारच लोभस असे . अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय म्हणून ते कधीमधी मला रागावतही असत पण , थोड्या वेळानं राग मावळला की नवीन आलेलं एखादं पुस्तक समोर करत .  ग्रंथांच्या माध्यमातून विश्वाचं अफाट दालन त्यांनी मला खुलं करुन दिलं , हे नक्की .

डॉ . टी . एस . पाटील कन्नडच्या तहसील कार्यालयासमोर असलेल्या छोट्या बाजारात दवाखाना चालवत . कन्नडच्या आसपासच्या गावातून आलेल्या गोरगरीब रुग्णांची गर्दी त्यांच्याकडे असे . त्यांच्याकडेच पहिल्यांदा ‘साधना’ या साप्ताहिकाचा अंक बघितला , वाचला . तो परिणाम इतका गडद होता की , अजूनही मी स्वत:ला  ‘साधना’ परिवारातला एक मानतो . आमच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी कांहीच नव्हती . माझी आई , माई पुरोगामी विचारांची होती . जात धर्म ती मानतच नसे . ‘रुग्ण आणि अन्नाला जात नसते , धर्म नसतो ‘,  अशी तिची धारणा होती . तिचा वावरही ब्राह्मण कुटुंबांपेक्षा  अन्य जाती धर्मातच जास्तच असे . तिचे तेच गुण माझ्यात उतरलेले . त्या काळात तर एकही ब्राह्मण माझ्या मित्र परिवारात नव्हता .  माई मुळेच डॉ . पाटील यांची ओळख झाली आणि डॉ . पाटील यांच्यामुळे समाजवादी विचारांशी ओळख झाली . महात्मा गांधी , मार्क्स , भारतीय राजकारण त्यांच्यामुळेच समजले . डॉ . पाटील यांच्याकडे जॉर्ज फर्नांडिस , मृणालताई गोरे , ग . प्र . प्रधान , यदुनाथ थत्ते  अशी बडी समाजवादी  मंडळी आल्याचंही आठवतं . त्यांच्या गप्पा समजत नसत पण , त्या ऐकताना आपण अद्भूत कांही तरी ऐकतो आहोत , असं वाटत असे  . पुढे एकदा मृणालताईंना ती आठवण मी करुन दिली तर त्यांना कन्नड , डॉ. पाटील आठवत होते पण , माझी आठवण त्यांना नव्हती .

एक खरं , माझे ते घडण्याचे दिवस होते आणि घडवणारी अनेक चांगली माणसं त्या काळात मला भेटली . शिवाजी महाविद्यालय आणि कन्नडचे दिवस माझ्यासाठी तरी माहिती व ज्ञानाचे अगणित दिवे उजळवणारे होते ; त्या प्रकाशातच जगण्याची पुढची वाटचाल सुसह्य झाली , अशी कृतज्ञतेची भावना माझ्या मनात आहे .

( हा लेख महात्मा गांधी मिशनच्या ‘गवाक्ष’ या गृहत्रैमासिकांच्या २०२४ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला आहे . )

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  ​+919822055799

praveen.bardapurkar@gmail.com
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट