मैत्रीचा न दरवळलेला गंध

 

 

 || नोंद …२२ ||

〈सत्तेच्या दालनात पाय टाकला आणि त्याचसोबत अतिरिक्त पैशाची हाव सुटली की असे अनेक देवेन्द्र निर्माण होतात . अशाच एका  ‘देवेन्द्र’ची ही सत्यकथा  ; अर्थात नाव बदललं आहे – प्रब  〉

■■■

देवेंद्रच्या मृत्युची बातमी कळाली तेव्हा एक मैत्र अंतर्धान पावल्याचा दु:ख तर सोडाच डोळ्याच्या कडाही ओलावल्या नाहीत …

का घडलं असेल असं ? असाही प्रश्न पडला नाही .

परिचित , स्नेही , मित्र आणि सख्खा मित्र अशी स्वत:भोवती वर्तुळं आखून घेतली तर स्नेही आणि मित्र यामध्ये देवेंद्र कुठे तरी असेल .

काही सख्ख्या मित्रांमुळे त्याची – माझी ओळख झाली , त्याला २८ -२९ वर्ष झाली तेव्हा तो संपूर्ण ग्रुप इंजिनिअरिंगला होता .

देवेंद्र तेव्हाही त्या सर्वांपेक्षा वेगळा होता .

म्हणजे इंजिनिअरिंगला येण्याऐवजी आयएएस गेला बाजार ; आमदार तरी व्हायचं आणि झटपट श्रीमंत व्हायचं स्वप्न होतं त्याचं .

इंजिनिअर होऊनही तू ऑल इंडिया अॅडमिनिस्ट्रिटेटिव्ह एक्झामला अॅपिअर होऊ शकतोस , असं त्याला आम्ही सांगत असू पण ,  ते त्याला पटण्याचं काही कारणच नव्हतं .

त्यावरुन त्याला मी फारच ताड-ताड बोलत असे , ‘तुझ्यामुळे इंजिनिअरिंगची एक सीट वाया गेली , कोणाची तरी इंजिनिअर होण्याची संधी हुकली वगैरे .’

‘ जाऊ दे नं , वो बात अब छोड दे तू यार ’ , असं म्हणत माझ्या रागाकडे तो दुर्लक्ष करत असे .

एक मात्र खरं , त्याचा स्वभाव अतिशय लाघवी होता .

मित्रांना काही तरी व्हावं , आपण त्याच्या उपयोगी पडावं आणि त्यासाठी हवा तर अंगावरचा शर्ट विकण्याची वेळ यावी–इतकी टोकाची परोपकारी सदवृत्ती त्याच्यात होती पण , एकदा तो प्रसंग सरला की त्यातून तो इतका वेगळा होत असे , इतका दूर जात असे की , हाच का तो असा प्रश्न पडायचा .

आपलं भर्राटपण जपण्याचा त्याचा तेव्हाही कटाक्षाने प्रयत्न असे .

म्हणजे आम्ही , नेमाडे , जी. ए. , चि . त्र्यं . , त्र्यं . वि . वगैरे विषयी बोलायचो तर हा ग्रेसची कविता दुर्बोध कशी नाही वगैरे वाद घालायचा .

आम्ही ग्रेस , महानोर , चित्रे वाचायला घ्यायचो तर तो तत्त्वज्ञान , अध्यात्माचे सिद्धांत वगैरे वेगळी पुस्तकं वाचायचा .

बेडरुमच्या छताला पूर्ण आरसा लावणे वगैरे भन्नाट कल्पना सांगायचा .

रुमवर एखादा भिकारी आला तर आपलं – पार्टनरचं असा भेद–भाव न करता हाती येईल ते त्याला देऊन मोकळं व्हायचा .

आपण पिक्चर टाकायचा म्हटलं तो नाही म्हणायचा , वाद घालायचा आणि प्रवचनाला जाऊन बसायचा . खाणं , पिणं , उठणं , जागणं , शिकणं यातही असंच बेभान वागणं .

त्याचं असं वागणं मला अॅबनॉर्मल  वाटायचं .

ते मी बोलून दाखवायचो तरी प्रत्येक निर्णय तो मला सांगून घ्यायचा , प्रत्येक विरोधी कृती आधी ठरवून आणि मला सांगून करायचा .

■■■

तशातच एकदा दुसऱ्या गावी असणाऱ्या त्याच्या घरी जाणं झालं .

त्याचे वडील शासकीय सेवेत अधिकारी होते .

राहायला मोठ्ठं क्वार्टर होतं .

त्याच्या घरात पाय टाकला आणि विलक्षण सात्विक वाटलं .

गावाकडे मंदिराच्या पायऱ्यावर बसून अंधाराच्या कवेत जाणाऱ्या नदीकडे बघत असताना अचानक कोणी देवळातही सांजवात पेटवावी आणि गाभारा उजळून जावा , तसं वाटलं .

त्याची आई समोर आली तेव्हा तर सोज्वळता प्रकटली असंच वाटलं ; माझ्याकडून अगदी नकळत पटकन उठून त्याच्या आईच्या पाया पडणं झालं .

या पार्श्चभूमीवर देवेंद्रकडे पाहिलं तर तो नारायण धारपांच्या कथांमधला अमंगल पुरुष वाटला आणि आणखी परका भासू लागला .

मैत्रीच्या आणखी पलीकडच्या रिंगणाच्या टोकाकडे गेला .

■■■

इंजिनिअरिंगमधील पदवी  मिळाल्यावर तो शासकीय सेवेत जॉईन झाला .

त्याचा शहरातला मुक्काम हलला .

एकमेकांच्या वार्ता हस्ते – परहस्ते कळण्याच्या आणि अपघातानेच भेटी होण्याचा आमच्याही आयुष्यातला कालखंड सुरु झाला .

तो विदर्भात कोठे तरी स्थिरावला .

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त दरवर्षी नागपूरला यायचा तेव्हा आवर्जून भेटायचा .

प्रगती पुस्तक सादर केल्यासारखा वर्षभरातल्या कामगिरीचा लेखा – जोखा सादर करायचा .

त्यात वर्षभराची कमाई किती झाली याचा भरपूर तपशील असायचा .

त्यासाठी कराव्या लागलेल्या लबाडीच्या कथा असायच्या .

मला त्यात काहीच रस नसायचा पण , त्याच्यातला सादरीकरणाचा भक्ती भाव ऊतू जात असे .

हळूहळू त्याचे राहणीमान बदलले साधी शर्ट -पॅन्ट ते सफारी आणि मग ब्रॅण्डेड सफारी असा वेष बदल झाला .

शासकीय जीपऐवजी आधी सेकंड हँड अॅम्बेसडर कार आली .

ती जाऊन झेन , एस्टिम आली .

पूर्वी तो एकटा येत असे आता त्याच्याभोवती गोतावळा दिसू लागला .

तो मला भेटत असे तेव्हा तो गोतावळा बाहेर बसलेला असे .

‘अरे तुरे’ च्या जागी ‘साहेब’ आणि ‘साहेब’ जागी ‘सर’ तोंडी आले .

साधा चहा घ्यायचा तरी तारांकित हॉटेलच्या दिशेने पावले वळू लागली .

कालांतराने गोतावळा रेस्ट–हाऊसला आणि हा हॉटैलमध्ये मुक्कामाला असे घडू लागले .

मुंबईच्या चकरातून रेल्वे बाद झाली .

आय सी , जेट सोबतच मॉर्निंग फ्लॉईट , कनेक्टिंग फ्लाईट असे शब्द त्याच्या बोलण्यातून सफाईदारपणे डोकावू लागले .

दरम्यान , माझीही बदली मुंबईला झाली .

आमच्या क्वचित होणाऱ्याही गाठी – भेटी थांबल्या .

त्यामुळे अर्थातच कोणाचंच काही बिघडलं नाही ; बिघडण्याचं काही कारणच नव्हतं .

■■■

अशीच काही वर्षे गेली .

नागपूरचा एक सख्खा मित्र भेटायला आला .

त्याचं मंत्रालयात काम होतं .

मलाही जायचं होतंच तिकडे .

गप्पांच्या ओघात देवेंद्रचा विषय निघाला .

– तुला माहिती नाही ?

– तो मंत्र्याच्या स्टाफवर आहे ?

– कोण मंत्री ?

– त्याने नाव सांगितले .

– खरं तर , अशातच संबंधित मंत्र्याकडे अगदी ठरवून ३/४ वेळा जाऊन आलो होतो पण , हा दिसला नव्हता .

त्याची भेट न होणं निव्वळ योगायोग नव्हता , असं ठामपणे म्हटलं पण , बोललो मात्र नाही .

विनाकारण या मित्राला वाईट वाटलं असतं .

नंतर आम्ही त्या मंत्र्याकडे गेलो मात्र , देवेंद्र तेथे नव्हता .

स्टाफवरचे बहुतेक सगळे परिचित पण , जवळीक सुरेश नावच्या पी .ए .शी होती .  .

मी येऊन गेल्याचा निरोप सुरेशकडे ठेवताना देवेंद्रशी असलेली जुनी ओळख सांगितली .

‘-कमाल आहे‘ सुरेश पुढे म्हणाला ,’साहेब कधी बोलले नाहीत , उलट तुम्ही यायचे असले की बंगल्यावर निघून जातात काही तरी काम काढून .’

म्हणजे देवेन्द्रची आजचीही अनुपस्थिती हा योगायोग नव्हता तर .

मी काय समजायचे ते समजलो .

सकाळी मंत्रालयात फेरफटका मारुन अधिकाऱ्यांना भेटण्याचा दिनक्रम तेव्हा माझा होता .

एक तर , सकाळी मंत्रालयात तेव्हा लोकांना प्रवेश नव्हता , दुपारी २ नंतर होता शिवाय मंत्रीही आरामात साडेबारा – एकनंतर त्या काळात येत .

त्यामुळे सकाळी अधिकारी आरामात भेटत ; चांगल्या बातम्या मिळत .

एक दिवस आम्ही सहाव्या मजल्यावर अचानक अमोरा-समोर आलो !

टाळावे म्हटले तरी टाळता येणार नाही , असे सामोरे  .

काही कळायच्या आतच हातातल्या फाईल्स सहकाऱ्याकडे सोपवत देवेंद्रने मिठी मारली .

त्या मिठीत इतकी आत्मीयता होती की , मधली वर्ष भराभरा उडून गेली .

■■■

आमच्या भेटी पुन्हा सुरु झाल्या .

उंची बार , महागडी हॉटेल्स अशा ठिकाणी आम्ही भेटू लागलो .

गळ्यात सोन्याची जाड साखळी , मनगटावर ब्रेसलेट , दहाही बोटात अंगठ्या , हातत दोन महागडे सेलफोन असा बदल त्याच्यात दिसू लागला .

( माझ्या बेगमाला त्याची आधी कल्पना देऊन ) त्याच्यासोबत एकदा डान्सिंग फ्लोअरलाही गेलो .

‘दादा आया’ म्हणत मुली त्याला झोंबल्या .

त्याच्या प्रचंड ओळखीची व्यापकता सतत सगळीकडे जाणवायची  .

सगळ्या ठिकाणी मोठी टीप तो देत असे .

हे सगळे मंत्र्याचा पीएस असण्याचे प्रिव्हिलेजेस होते .

हे मला कळत होते .

त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला पण , तो ऐकून घेण्याच्याही मन:स्थितीत नव्हता .

माझे मित्र असलेल्या एक्साईज आणि पोलीस अधिकाऱ्यांनी देवेंद्रसोबत न राहण्याचा सल्ला दिला .

त्याची डान्सिंग फ्लोअरची दौलतजादा करण्याची तऱ्हा सांगितली , पिण्याचे आणि पिण्यानंतरचे किस्से सांगितले .

चोहोबाजूंनी रोरांवत येणाऱ्या पैशानी आणि त्यातून येणाऱ्या सवयींनी देवेंद्र नावाचे झाड चैन बनले होते आणि बहरले होते .

माझी औरंगाबादला आणि पुढे नागपूरला बदली झाली .

आमच्या भेटी पुन्हा टोकाच्या कमी झाल्या .

■■■

ज्या मंत्र्याकडे होता त्याचे मंत्रीपद गेले आणि देवेंद्रची बदली झाली .

त्याचे मन त्या बदलीच्या पदावर रमले नाही .

कोणा-कोणा मंत्र्याकडे जाण्यासाठी हातपाय मारत राहिला आणि…थकला .

महीने सरले  , वर्ष उलटली आणि आलेल्या पैशाचा बहर पाहता पाहता ओसरला .

तो बहर ओसरल्यावर घाम गाळून जे मिळवलं होतं तेही गेलं .

देवेंद्रचा संसार पत्नीच्या कुबड्यावर काही काळ चालला पण अखेर कंटाळून तीही मुलांना घेऊन माहेरी परतली .

एकेका दिवसाने तो भणंग होत गेला .

आम्ही जुने मित्र भेटलो तर , जमेल तसं देवेंद्रला सावण्याचा प्रयत्न केला पण , ते सावरणं खूपच खोटं होतं .

शाळेत एक कथा होती तिचा आशय असा – लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते .

डोक्यावरुन घेतली की पाय उघडे पडतात आणि पायावरुन घेतली की , डोकं उघडं पडतं .

लवकर श्रीमंत होण्याच्या घाईसाठी देवेंद्रने निवडलेला मार्ग अशा लबाडीसारखा होता .

म्हणूनच आमचं मैत्र फुललं नाही , ओळख झाल्यापासून जणू मैत्रक्षय झाला होता  .

कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचे आईवडील राहात त्या क्वार्टरसमोरुन जाण्याची संधी २/३ वेळा आली .

सांज आरतीचा तो दरवळ आसमंतात पसरल्याचा भास झाला .

देवेंद्र आठवला ; नुसताच आठवला , त्याचा चेहेरा आठवला नाही आणि मैत्रीचा गंधही दरवळला नाही…

© या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत 

प्रवीण बर्दापूरकर

( १८ जानेवारी २०२० )

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट