मराठी माणसांत दिल्लीवर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा नाही – पृथ्वीराज चव्हाण

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाबद्दल
आपण पार्श्वभूमीकडे नाही गेलो तर तो
मनमोहनसिंगजी यांच्यावर अन्याय ठरेल

■■  

नवी दिल्लीत झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पृथ्वीराज चव्हाण , सुरेश प्रभू आणि श्रीमती नीलम गोऱ्हे या मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी मी म्हणजे प्रवीण बर्दापूरकर आणि ‘एबीपी माझा’ या प्रकाश वृत्त वाहिनीचा राजीव खांडेकर यांच्यावर सोपविण्यात आलेली होती . ‘असे घडलो आम्ही’ असा मुलाखतींचा विषय होता . कोणते प्रश्न विचारावे किंवा कोणते विचारु नये ,  याबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ किंवा आयोजक ‘सरहद्द’ या संस्थेकडून कोणत्याही सूचना आम्हाला देण्यात आलेल्या नव्हत्या . त्या मालिकेतील श्री. पृथ्वीराज चव्हाण यांची ही मुलाखत –

■■

प्र. ब. : नमस्कार, पाहुण्यांच्या अनौपचारिक ओळखीचा काही प्रश्नच नाहीये. पृथ्वीराज चव्हाण यांना सर्वच ओळखतात . सध्या मराठीच्या अभिजाततेच्या संदर्भामध्ये बरीच काही चर्चा होतेय. त्याच अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आम्ही बोलणार आहोत . कारण आम्ही घडलो कसे वगैरे याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये . खरं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे बिघडले कसे नाही, हाच प्रश्न आहे . याचं कारण असं की , त्यांची शैक्षणिक कारकीर्द शिवाय राजकीय पार्श्वभूमी सुद्धा अतिशय उज्जवल आणि धवल आहे . आपण तिथूनच सुरुवात करुया.  तुम्ही बिघडलात का नाही ?

पृथ्वीराज चव्हाण : बिघडलोय का बिघडलो नाही हे तुम्ही पत्रकारांनी ठरवायचंय पण , तुम्ही जर म्हणत असाल की बिघडलो नाही , तर त्याबद्दल धन्यवाद . थोडक्यात सांगायचं झालं तर लहानपणीचे जे संस्कार झाले, विशेषतः आई-वडिलांचे संस्कार, कराडला लहानाचं मोठं होत असताना आणि त्यानंतर दिल्ली… ते महत्त्वाचं होते . त्यानंतर मी काही वर्ष अमेरिकेत शिक्षणासाठी गेलो . तिथली लोकशाही , विशेषतः विद्यालयीन परिसरामध्ये जी विद्यार्थ्यांची १९६० च्या दशकांमध्ये क्रांती झाली होती, त्याचा केंद्रबिंदू मी शिक्षणाकरता ज्या ठिकाणी गेलो होतो ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले हे ठिकाण होतं . त्याबद्दल खूप शोध निबंध लिहिले गेलेले आहेत , त्याबद्दल पुस्तकं लिहिली गेलेली आहेत . त्या कालखंडामध्ये मला तिथं राहायची संधी मिळाली . अमेरिकेतली लोकशाही कशी चालते ते जवळून पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मी जेव्हा राजकारणात आलो , १९९१ ला पहिल्यांदा लोकसभेचा खासदार म्हणून , त्यावेळेला एक आर्थिक संकट होतं . नरसिंहराव पंतप्रधान आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री यांच्या समवेत ते पाच वर्ष मला संसदेमध्ये काम करायला मिळाली आणि आर्थिक सुधारणा अगदी डोळ्यासमोर घडत होत्या . त्या आर्थिक सुधारणाच्या विधेयकावर मला बोलण्याची अनेक वेळा संधी मिळाली . तो कालखंड आणि मग शेवटचा २००४ ते २०१० पर्यंत . मी पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून डॉ . मनमोहन सिंग यांच्यासारख्या एका नेत्याच्या हाताखाली घडलो किंवा माझ्यावर संस्कार झाले . हे सगळे संस्कार महत्त्वाचे होते . त्यातलं काही मी घेऊ शकलो , सगळं नाही घेतलं . त्यामुळे मला वाटतं,  माझी राजकीय कारकीर्द पुढे महाराष्ट्रात आल्यावर चालली.

रा. खां. : बाबा, तुम्ही राजकारणी म्हणून केंद्रामध्ये केलेलं काम, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात केलेलं काम याबद्दल सगळ्यांना माहिती आहे पण , तुम्ही अमेरिकेतून आल्यानंतर जेव्हा कॉम्प्युटर हे आपल्याकडे नवे नवे होते , त्यामध्ये एक कंपनी तुमची होती. अनेकांना याची कल्पना नसेल की , कॉम्प्युटरमध्ये देवनागरी स्क्रिप्ट आणण्याचे श्रेय बाबांच्या कंपनीला आहे . मला कायम हे वाटत आलेलं आहे की, जर ते १९९१ मध्ये निवडणूक न लढता बिझनेस करत राहिले असते, तर नारायण मूर्तींसारखे बाबांची कंपनी आणि बाबा घडले असते . सांगायचं तात्पर्य म्हणजे एक चांगला राजकारणी , एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला . आदर्श वाटेल असा राजकारणी महाराष्ट्राला बघायला मिळाला पण , त्यामध्ये एक नारायण मूर्ती आमच्याकडे घडता घडता राहिला… मुळात ते आमच्याकडे घडत नाहीत आणि एक जो घडू शकला असता, तोही गेला. तर तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं?

 

पृथ्वीराज चव्हाण : राजू , तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मराठी भाषा संगणकावर आणण्याचं श्रेय वगैरे काही नाही  पण , माझा खारीचा वाटा आहे हे नक्की. कारण अमेरिकेमध्ये चार-पाच वर्षे राहिल्यानंतर मी जेव्हा भारतात परत आलो , त्यावेळची जी परिस्थिती होती त्यामुळे काही संरक्षण खात्याला लागणारी संगणक उपकरणे अमेरिकेतून आयात करणं अशक्य होतं . मी तिथल्या एरोस्पेस सेक्टरमध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून काम करत असल्यामुळे ती काही टेक्नॉलॉजी मला माहित होती . त्यामुळे मी संरक्षण खात्याकरता लागणारी काही उपकरणं , नौसेनेला अँटी सबमरीन वॉरफेअर , मिसाईल कंट्रोल सिस्टीमसाठी वगैरे आम्ही काम करण्यास सुरुवात केली . ते काही खास विचारानं नव्हतं , पण ते होत गेलं . ते काही करत असताना बऱ्याच वेळेला तैवान , चीन, सिंगापूर, हाँगकाँगला जाण्याची संधी मिळत असे . संगणक मोठी क्रांती घडवणार आहेत , याबद्दल कोणाच्या मनात काही शंका नव्हती .  मी तिथं कॅलिफोर्नियामध्ये काम करत होतो ,विशेषतः संगणकाचा जो आत्मा असतो मायक्रोप्रोसेसर त्याचा जन्म होताना ते पाहिलं. मग तैवान वगैरे देशात गेल्यावर तिथले लोक सगळे आपल्या चिनी भाषेत संगणकावर काम करतात हे पहिलं . मग आपण आपल्या भारतीय भाषेमध्ये का करु शकत नाही ? या विचारानं मग आम्ही काही मित्र एकत्र आलो . काही ठिकाणी काम चाललं होतं . त्याला थोडीशी चालना देण्याचं काम आमच्याकडून झालं . मराठी भाषेला संगणकामध्ये आणण्याच्या खूप अडचणी होत्या . खूप वेगवेगळी दिशा होती . कुठल्या दिशेने जायचं , कुठली दिशा निवडायची याबद्दल खूप तज्ज्ञामध्ये मतभेद असत . त्यामध्ये एक थोडासा खारीचा वाटा उचलण्याचं काम मला करता आलं . विशेषतः त्यावेळी जे टेबल टॉप-कॉम्प्युटर आयबीएम पीसी चे होते , त्या संगणकामध्ये आम्ही काही पार्ट  नवीन टाकले . खूप पॉवरफुल असे ते कॉम्प्युटर होते . त्यामुळे एका वेळी सर्व भारतीय भाषा वापरता यायला लागल्या आणि ती सुरुवात तिथून झाली . त्याचा जो मराठी भाषेचा कोड असतो , तो कोड घडवणे , कळफलक (की-बोर्ड) डिझाईन करणे या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी करता आल्या.

रा. खां. : त्याला ‘कळफलक’ म्हणतात पण , ते किती जणांना कळतं ? तुम्ही की-बोर्ड म्हणा मराठीत !

पृथ्वीराज चव्हाण : ते चांगले दिवस होते. मी इंजिनियर म्हणून खरं काम करत होतो आणि ते इंजिनिअरिंगची इनिंग्स ही १९९१ मध्ये संपली . म्हणजे एका अर्थानं तेव्हा राजकारणात प्रवेश केला . राजीव गांधींच्यामुळे मला थेट कराडून लोकसभेचे तिकीट देण्यात आलं .

प्र. ब. : अनेकांना माहिती नसेल की पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे फार मोठे पुढारी होते . त्यात तुम्ही बर्कले विद्यापीठाचा संदर्भ दिला, म्हणजे खरं तर तुमच्यावरचा मूळ संस्कार डाव्या विचारसरणीचा ( लेफ्टिस्ट ) म्हणायला हवा . अर्थात तुम्ही उजव्या विचारसरणीचे झाला नाहीत हा फार चांगला भाग आहे ! तुम्ही हा जो मध्यममार्ग निवडला याचं काय कारण होतं ?

पृथ्वीराज चव्हाण : तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माझे आई-वडील दोघांनाही शेतकरी कामगार पक्षाची पार्श्वभूमी होती. मी फारसा लेफ्टिस्ट नव्हतो  पण , लेफ्ट ऑफ सेंटर म्हणायला हरकत नाही . वडील खूप उच्च शिक्षित होते , नामांकित

दिल्ली साहित्य संमेलनात पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत करताना डॉ . दादा गोरे . शेजारी मुलाखतकार राजीव खांडेकर आणि प्रवीण बर्दापूरकर

वकील होते आणि तो संस्कार माझ्यावर नक्कीच झाला . त्यानंतर बर्कले विद्यापीठात गेल्यावर त्यावेळची विद्यार्थ्यांची चळवळ होती , ती जवळून पाहायला मिळाली. बर्कले हे इतकं एक्स्ट्रीम लेफ्ट आहे की तिथे होणाऱ्या विचारांचा प्रभाव नक्कीच पडतो . मी मास्टर्स डिग्री घेत असताना आमच्या विद्यापीठामध्ये नोबेल पारितोषिक विजेते १२ प्राध्यापक होते . आजही माझ्याकडे त्या ‘Berkley Nobles’ ग्रुपचा फोटो आहे . हे विद्यापीठ अत्यंत चांगलं होतं आणि डाव्या विचारांचं केंद्र होतं . त्याचा थोडासा प्रभाव नक्कीच झाला.

प्र. ब. : तुमच्या घरामध्ये आई-वडील दोघेही एवढे मोठे राजकारणी असताना तुम्हाला लहानपणापासूनच राजकारणात यावं असं का वाटलं नाही किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही राजकारणात यावं असं वाटत होतं का ?

पृथ्वीराज चव्हाण : माझं प्राथमिक शिक्षण हे कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत झालं . कराड हे तसं लहान गाव होतं , नुकतंच खेड्यातून शहराकडे स्वरूप बदलत होतं . मी सातवीची ‘व्हर्न्याक्युलर फायनल’ परीक्षा दिली आणि पास झालो . पुढे शिक्षण कुठे घ्यायचं हा प्रश्न होता . कराडमध्ये त्या काळी एक-दोन हायस्कूल होती . पाचगणीला बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याची फॅशन होती . आईने मात्र पाचगणीला पाठवण्यास विरोध केला आणि मग पर्याय म्हणून टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हे तेच टिळक हायस्कूल आहे जिथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनीही शिक्षण घेतलं होतं .

त्यानंतर , त्याचवेळी वडील १९५७ मध्ये खासदार झाले आणि दिल्लीला आमचं स्थायिक घर होतं . त्यामुळे मी  माध्यमिक शिक्षण दिल्लीला घ्यावं असा विचार झाला आणि मग मी दिल्लीला गेलो .

प्र. ब. : पण , दिल्लीत तुमचं शिक्षण सुरळीत झालं का ?

पृथ्वीराज चव्हाण : अगदीच सुरळीत नव्हतं. मी आठवीत जायला आलो तेव्हा दिल्लीतील शाळांनी मला अक्षरशः हाकलून दिलं ! कारण मला हिंदी येत नव्हतं , इंग्रजी देखील फारसं येत नव्हतं , संस्कृत नव्हतं आणि आठवीत विषय कठीण होते . त्यामुळे त्यांनी मला आठवीत घेणं शक्य नाही असं सांगितलं. वडील खूप नाराज झाले आणि मला परत कराडला पाठवायचं ठरवलं . मात्र , कोणीतरी सुचवलं की दिल्लीत पहाडगंज भागात नूतन मराठी विद्यालय नावाची एक मराठी शाळा आहे .  आई-वडील दोघंही थकले होते . त्या शाळेच्या मुख्याध्यापिका वराडपांडे मॅडम यांना आम्ही भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला दिल्लीच्या शिक्षणाबाबत व्यवस्थित माहिती दिली . त्यांनी मला सांगितलं की , माझा शैक्षणिक पाया फारच कच्चा आहे आणि आठवीसाठी तयार होण्यासाठी मला सातवीत बसावं लागेल . माझ्या वयाचा फायदा घेऊन १६ वर्ष पूर्ण होताच मी अकरावीला परीक्षेला बसू शकेन असं त्यांनी समजावलं . त्यामुळे मी नूतन मराठी विद्यालयात दाखल झालो. खूप त्रास झाला पण , माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं .

प्र. ब. : नूतन मराठी विद्यालयाबद्दल ऐकताना एक गोष्ट आठवली . हल्ली त्या शाळेची अवस्था वाईट आहे , ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तीत तुम्ही लक्ष घालावं हे या निमित्तानं मी सुचवतो .

पृथ्वीराज चव्हाण : हो, मला माहिती आहे . त्या शाळेचे अध्यक्ष चव्हाण साहेब होते , शिंदे साहेब होते . सगळे मुख्यमंत्री त्या शाळेचे अध्यक्ष होते . त्या शाळेची स्थिती सुधारण्यासाठी मी काही दिवस त्या शाळेच्या कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून काम केलं आहे पण , दुर्दैवाने ती स्थिती अजूनही काहीशी बिकट आहे .

रा. खां. : दिल्लीत राजकारण करणं मराठी माणसासाठी सोपं नसतं असं म्हणतात . दिल्लीच्या राजकारणात तुम्हाला त्रास झाला का ?

पृथ्वीराज चव्हाण : हो, कारण मराठी माणसाची मानसिकता वेगळी आहे . दिल्लीमध्ये अनेकांना ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करण्याची प्रवृत्ती असते . कोण पुढे जाणार हे आधीच ओळखून त्याला जवळ करणं ही दिल्लीची संस्कृती आहे . महाराष्ट्रातसुद्धा थोड्याफार प्रमाणात ही प्रवृत्ती असते  पण , दिल्लीमध्ये ती खूप जास्त आहे . महाराष्ट्रातील लोकांना तिथं जुळवून घेणं कठीण जातं .

प्र. ब. : तुम्हाला दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात राजकारण करणं सोयीस्कर वाटलं का ?

पृथ्वीराज चव्हाण : हो, दिल्लीत विषय वेगळे असतात , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करावा लागतो . महाराष्ट्रात मात्र दृष्टिकोन राज्यापुरता मर्यादित राहतो . पण मला पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे मला संपूर्ण देशाकडे पाहण्याची दृष्टी आणि संधी मिळाली . सर्व राज्यांशी संपर्क, मुख्यमंत्र्यांशी संवाद , मंत्रिपदाची जबाबदारी आणि सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी होती . हे काम मला खूप महत्त्वाचं वाटलं कारण संपूर्ण देशाची परिस्थिती ओळखण्याची संधी मिळाली.

रा. खां. : दिल्लीत मराठी माणसांची उपस्थिती फारशी का जाणवत नाही ?

पृथ्वीराज चव्हाण : मला असं वाटतं की , मराठी माणसांमध्ये दिल्लीवर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा फारशी दिसत नाही . महाराष्ट्रातील राजकारणी दिल्लीला आले तरी लगेच परत जाण्याची प्रवृत्ती असते . दिल्लीत इथल्या हवामानाची , थंडीची , उन्हाळ्याची सवय होईपर्यंतच अनेक नेते परत जातात. उत्तरेतील राजकारणी मात्र दिल्लीच्या राजकारणात राहून पुढे जातात . महाराष्ट्रात कोणी मोठं होण्यासाठी जनतेने अशा नेत्यांना पाठिंबा दिला पाहिजे जे दिल्लीसाठी कष्ट घ्यायला तयार असतील . अन्यथा, महाराष्ट्राला दिल्लीवर प्रभाव टाकणारा नेता मिळणं कठीण आहे.

रा. खां . : मी असं म्हणणार होतो की , जेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्हाला आठवीच्या ऐवजी सातवीतच बसवलं .  तुमच्या बाबतीत दिल्लीमध्ये हे असं फार घडलं . वेळानंतरही घडलं की जे योग्य आहे त्याच्या ऐवजी वाट बघायला लावणं..

पृथ्वीराज चव्हाण : शक्य आहे…

रा . खां . : पण बाबा, दिल्लीच्या राजकारणाबद्दल असं खूप म्हटलं जातं एक फार प्रसिद्ध गोष्ट आहे की , दिल्लीत एका बादशहाचा लाडका श्वान , त्याचा कुत्रा मेला तर त्याच्या अंत्यसंस्काराला अख्खी दिल्ली लोटली होती . मात्र, काही वर्षांनी बंड झालं आणि तो बादशाह पदच्युत झाला . नंतर तो जेव्हा मेला, तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेला कुत्राही गेला नव्हता . तर ही जी दिल्लीची खासीयत आहे,  तुम्ही आलेली , गेलेली , परत आलेली सत्ता बघितली. तुमचा दिल्लीच्या राजकारणाचा अनुभव काय आहे ? आपण  आता तालकटोरा या ऐतिहासिक भूमीमध्ये आहोत, तिथे तुमचा अनुभव काय सांगता येईल ?

पृथ्वीराज चव्हाण : दिल्लीतलं जे दरबारी राजकारण आहे आणि दरबारी प्रवृत्ती देखील — नुसतं राजकारण नाही तर माणसांची प्रवृत्ती मी जवळून पाहिलेली आहे . मला वाटतं , इतर ठिकाणी थोड्या फार प्रमाणात ही प्रवृत्ती असते, महाराष्ट्रातही आहे . पण दिल्लीमध्ये मात्र जरा जास्त आहे . हा कदाचित इथल्या आजूबाजूच्या संस्कृतीचा परिणाम असावा . पण वस्तुस्थिती हीच आहे की , ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करायची प्रवृत्ती दिल्लीमध्ये प्रकर्षानं जाणवते . दिल्लीमध्ये कोण पुढे जाण्याची शक्यता आहे , कोणाचे ‘स्टार्स’ चांगले आहेत , हे आधीच ओळखून त्याला जवळ करणं , ही दिल्लीची संस्कृती आहे . इतर राज्यांमध्ये हे प्रमाण कमी आहे  पण , दिल्लीमध्ये हे फार जास्त आहे.

प्र . ब . : तुम्हाला या प्रवृत्तीमुळे त्रास झाला का?

पृथ्वीराज चव्हाण : हो, थोडा त्रास झाला. कारण मराठी माणसाची मानसिकता वेगळी असते. माझ्यातही तीच मानसिकता होती . त्यामुळे दिल्लीच्या लोकांसारखं विचार करायची सवय लागली नाही . त्यांच काहीसं  नुकसानही झालं . पण , ते बहुतेक मराठी माणसांचं होतं , ते अॅडजस्ट होत नाहीत . पण मला त्याचा फायदा झाला असंही वाटतं.

प्र. ब. : पण , तुम्ही दिल्लीत चांगले रमलात कुठे ? अजूनही तुम्हाला जर राजकारण करायचं झालं तर तुम्हाला दिल्लीतच करायला आवडेल का, की महाराष्ट्रात ?

पृथ्वीराज चव्हाण : कधीही दिल्लीत . कारण दिल्लीमध्ये विषय वेगळे असतात . दिल्लीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन ठेवून काम करावं लागतं . महाराष्ट्रात मात्र आपल्या राजकारणाचा फोकस राज्यापुरता मर्यादित असतो . पण , दोन्ही अनुभव महत्त्वाचे आहेत . फार थोड्या लोकांना म्हणजे मला दिल्लीत राहून पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करायची संधी मिळाली आणि ती जबाबदारीही खूप मोठी होती .

मी २००४ ते २०१० पर्यंत पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री होतो. तेव्हा आमचं आघाडी सरकार होतं . सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षा होत्या आणि डॉ. मनमोहन सिंग हे सरकारचे प्रमुख होते . या दोघांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी माझ्यावर होती . सर्व राज्यांशी संपर्क ठेवणं , मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधणं, मंत्रालयातले वाद मिटवणं, राज्यातले वाद मिटवणं ही मोठी जबाबदारी होती . सहा वर्ष मी तिथं होतो . संपूर्ण देशाकडे तिथून पाहण्याची संधी मिळाली. इतर कुठल्याही केंद्रीय मंत्र्याला ही संधी मिळत नाही . त्यांचा कारभार एखाद्या खात्यापुरता मर्यादित असतो . मला मात्र पंतप्रधान कार्यालयातून सर्व देशावर नजर ठेवण्याची संधी मिळाली . शिवाय आंतरराष्ट्रीय संबंध .

दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी . २००४ चा मतदारांचा लोकसभेचा कौल सोनिया गांधी आणि त्यांच्या जाहीरनाम्याला मिळालेला होता . तो जाहीरनामा अंमलात आणण्याची जबाबदारी सरकारवर पडत आहे की नाही यावर त्या अंकुश  ठेऊन असत . ती जबाबदारी फार महत्त्वाची होती . त्याचवेळी मी पक्षाचा महासचिवही होतो .

रा. खां. : दरबारी राजकारणाबद्दल तुम्ही बोललात . खरं तर दिल्ली ही अशी जागा आहे  की , जिथं एक से एक इरसाल माणसं , राजकारणी तर असतातच. उत्तरेकडचे राजकारणी तयार आणखी  इरसाल असतात . त्यांच्याशी ‘डील’ करतांना एक राजकारणी म्हणून मराठी माणूस आणि उत्तरेकडचा माणूस , राजकारणी आणि  दिल्लीत मराठी माणसांचं काय वेगळेपण जाणवलं ?

पृथ्वीराज चव्हाण : एक महत्त्वाचं इथं सांगितलं पाहिजे की , मला असं वाटतं की, आजच्या किंवा त्यावेळच्यासुद्धा मराठी माणसात दिल्लीत जाऊन राज्य करावं किंवा दिल्लीत मोठी भूमिका घ्यावी अशी महत्त्वाकांक्षा कमी असते . आपण आपलं साम्राज्य सांभाळावं अशी त्यांची भूमिका असते . स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे दिल्लीत प्रभावी राजकारणी होते . त्यानंतर थोडेसे शरद पवार , अलीकडे नितीन गडकरी आहेत . पण , महाराष्ट्राच्या इतर नेत्यांना दिल्लीत स्थिरावणं जमत नाही . याचं एक कारण म्हणजे दिल्लीमध्ये हवामान, खाण्यापिण्याच्या सवयी आणि राजकीय वातावरण यांची सवय होईपर्यंत थांबत नाहीत . आले सही केली की परत निघून जातात . याच्या उलट उत्तरेकडच्या राज्यांतील नेते मात्र दिल्लीतच राहतात . ते दिल्लीचे केंद्रीय राजकारण करतात , महाराष्ट्राची माणसं तसं करत नाहीत  .

प्र. ब . : पण का बरं मराठी नेत्यांमध्ये दिल्लीला स्थिरावण्याची प्रवृत्ती नाही ?

पृथ्वीराज चव्हाण : मराठी माणसांची मानसिकता ‘आपलं बरं चाललंय , सगळं सुरळीत आहे’ अशी असते . त्यांना दिल्लीत येऊन आपला प्रभाव टाकावा असं वाटत नाही . एखादी शिक्षणसंस्था आहे , साखर कारखाना आहे , ही स्थिरता त्यांना पुरेशी वाटते . दिल्लीत येऊन आपली ठाण मांडावी अशी महत्त्वाकांक्षा क्वचितच मराठी नेत्यांमध्ये दिसते . त्यामुळेच महाराष्ट्राचा दिल्लीत फारसा प्रभाव जाणवत नाही.

प्र. ब. : मग दिल्लीच्या राजकारणात प्रभावी होण्यासाठी नेमकं काय करायला हवं ?

पृथ्वीराज चव्हाण : महाराष्ट्राच्या जनतेनं जे दिल्लीमध्ये स्थिर राहून आपली छाप पाडू शकतील अशा नेत्यांना चालना द्यायला हवी . तिथं तुम्हाला पाच-दहा वर्षे सतत मेहनत करावी लागते . पाच वर्ष तर , संसद भवनात कोणता खांब कुठे आहे हेच कळायला पाच वर्षे जातात . त्याशिवाय दिल्ली समजत नाही . तिथं थांबायचं ठरवलं तरच यश मिळतं  पण , दुर्दैवाने आपली नेतेमंडळी लगेच दिल्ली सोडतात .

प्र. ब. : म्हणजे दिल्लीचं राजकारण समजायला आणि तिथे स्थान मिळवायला खूप वेळ द्यावा लागतो, असं म्हणायचंय का ?

पृथ्वीराज चव्हाण : अगदी बरोबर . दिल्लीचं वातावरण , तिथली थंडी , उन्हाळा , लोकांची मानसिकता , सत्ता खेळवण्याच्या पद्धत  हे सर्व समजायला वेळ लागतो . तेव्हा महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवलं पाहिजे की काही मोजके नेते दिल्लीत मोठी भूमिका बजावतील आणि त्यांना संधी दिली पाहिजे . संगीत खुर्चीच्या खेळात वेळ घालवत राहिलो , तर आपल्या राज्याला दिल्लीमध्ये मोठं स्थान मिळवणं कठीण होईल.

प्र. ब. : म्हणजे मराठी माणसाची अल्पसंतुष्ट वृत्ती ही राजकारणात मध्ये मोठा अडसर आहे का?

पृथ्वीराज चव्हाण : हो , मराठी माणसाचा हा कमी समाधान मानणारा स्वभाव मोठा अडसर आहे . मधु दंडवते, विदर्भातील काही मोठे नेते, यांनी दिल्लीत खूप चांगलं काम केलं होतं  पण , नंतर संगीत खुर्चीचा खेळ झाला आणि ते राजकारणातून बाजूला झाले . हीच मराठी माणसांची एक मोठी समस्या आहे . त्यांना मिळालेल्या स्थानावर समाधानी राहण्याची सवय आहे पण , मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली नाही तर दिल्लीवर मराठी प्रभाव प्रस्थापित करणे कठीणच आहे .

प्र. ब. : दिल्लीच्या दरबारी राजकारणाची शैली अशी सांगितली जाते की, ‘डोक्यावर बर्फ , जिभेवर खडीसाखर आणि चेहऱ्यावरचा हावभाव हलू न देता जो राजकारण करतो, तो दिल्लीचा दरबारी राजकारणी असतो ’ , हे मराठी माणसाला जमत नाही का ?

पृथ्वीराज चव्हाण : जमत नाही का त्याला आवडत नाही  किंवा आपलं तिथं स्थान टिकवण्यासाठी प्रत्येक लग्नाला गेलं पाहिजे , प्रत्येक सांत्वन भेटीला गेलं पाहिजे… नाहीतर लोक लगेच म्हणतात की , ‘तुम्ही कुठे दिसत नाही , दिल्लीला गेलात आणि आता मतदारसंघात दिसत नाही .’  हे जे  मतदारसंघातलं प्रेशर आहे , त्यामुळे हे करता येत नाही .

दिल्लीमध्ये तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर सतत सामाजिक वर्तुळात राहावं लागतं . दिल्लीमध्ये जर तुम्ही काही दिवस दिसलात नाहीत , तर लगेच चर्चा सुरु होते की , ‘ यांना आता घरी पाठवा, ते कुठे दिसत नाहीत .’ माझ्यासोबत असाच एक अनुभव १९९९ च्या सुमारास आला होता.

प्र. ब. :  काय घडलं होतं त्यावेळी?

पृथ्वीराज चव्हाण : त्यावेळी एका पाकिस्तानी वर्तमानपत्राकडून काही दिल्लीतील खासदारांना पाकिस्तानला भेट देण्यासाठी निमंत्रण मिळालं होतं . त्याकाळी पाकिस्तानला जाणं फार कठीण होतं , कारण तणावाचं वातावरण होतं . त्यामुळे त्या निमंत्रणाबद्दल खूप उत्सुकता होती . त्या शिष्टमंडळात माझं नाव नव्हतं  पण , त्यामध्ये सुषमा स्वराज, बलराम जाखड , कपिल सिब्बल, हरिशंकर अय्यर , मुकुल वासनिक हे सगळे मोठे नेते होते . आम्ही तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे परवानगीसाठी गेलो . पंतप्रधान म्हणाले, ‘ नाही, तुम्ही काही जाऊ नका . हे खाजगी आमंत्रण आहे . तुमची सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार ? मी त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही .माझी इच्छा आहे  की तुम्ही काही जाऊ नये ’ त्यामुळे सर्वांचे चेहरे पडले. सगळ्यांचा हिरमोड झाला . मग सुषमाजी आणि इतर काही नेत्यांनी मला बाजूला बोलावून सांगितलं की  ,’आम्ही पंतप्रधानांकडे बोलणार नाही. तुम्ही काँग्रेसकडून काहीतरी दबाव टाका .’

मी मग सांगितलं की, ‘ठीक आहे  पण , माझ्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना विचारल्याशिवाय मी काही निर्णय घेऊ शकत नाही .’ मी सोनिया गांधींना सांगितलं की, ‘भाजपची मंडळी जात नाहीत, तर आपण जाऊ .’ आमची पाकिस्तान भेट सुरु झाली . आम्ही लाहोरला गेलो , रावळपिंडीला गेलो . पाकिस्तानला ती पहिलीच खासदारांची भेट होती .  छान भेट झाली आमची . त्या दरम्यान कराडला एका लग्नाला मी हजर राहू शकलो नव्हतो . कराडला परत आल्यावर कार्यकर्त्यांनी मला नाराजीने सांगितलं की , ‘आता पुढच्या वेळेस पाकिस्तानची मते घ्या !’

रा . खां . : व्यक्तिगत पातळीवर दरबारी राजकारण करताना काही चांगले-वाईट अनुभव आले असतीलच ना ?

पृथ्वीराज चव्हाण : हो, निश्चितच आले. आमच्या पक्षांतर्गत देखील आले.

रा . खां . :  अजूनही सुरुच आहेत ?

पृथ्वीराज चव्हाण : आजच्या राजकरणाबद्दयाल बोलणं कांही योग्य ठरणार नाही . जे चाललं आहे ते चालू द्या . पण , हो,  ते प्रत्येक पक्षामध्ये आहेच . दिल्ली विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली त्यावेळी मुख्यमंत्री कोणाला करायचं यावर पक्षांतर्गत चढाओढ दिसली . हे फक्त दिल्लीपुरतं मर्यादित नाही पण , दिल्लीमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे.

 प्र . ब . : मराठी विद्यमान राजकारण्यांपैकी तुम्ही एक अतिशय चांगले वाचक म्हणून ओळखले जाता . या अनुषंगानं मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत . हा वाचनाचा संस्कार कुठून आला आणि तुम्ही मराठी विशेषत: कुणाचं वाचता ?

पृथ्वीराज चव्हाण : ते संस्कार लहानपणी कराडला शाळेतमध्ये असतांना झाले . त्यावेळी नाथ माधव यांचे  ऐतिहासिक ग्रंथ , आपट्यांच्या कादंबऱ्या वाचायचो . लहानपणी इंग्रजी भाषांतरं . ‘टारझन’ चे मराठीतले सगळे खंड वाचले . चांदोबा हे मासिक तर माझं अत्यंत आवडतं होतं. पहिल्यांदा ‘चांदोबा’ हाती आलं तेव्हा मी अर्ध्या-एक तासात पूर्ण वाचून काढलं आणि लगेच एस टी स्टँडवर दुकान होतं त्या दुकानात नवीन अंक विचारायला गेलो. तेव्हा दुकानदार म्हणाले, ‘हे मासिक महिन्यातून एकदाच येतं .’ त्यावेळी वाटायचं की, अजून काहीतरी मिळावं . मग मी वाचनाची सवय लागली त्यावेळी मराठीच शक्य होतं . नंतर मराठी वाचन कमी झालं .

प्र. ब. : मी तुम्हाला अनेकदा पुस्तकांच्या दुकानात मराठी पुस्तकं घेताना पहिलं आहे…

पृथ्वीराज चव्हाण : पुस्तकं घेणं , चांगले चांगले मराठी ग्रंथ घेणं , वेळ काढून वाचणं होतंच . पण , माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण , विज्ञानविषयक वाचन हे इंग्रजीतच झालं . नंतर त्यामुळे मराठी वाचन कमी झालं .

प्र. ब. : तुम्ही प्रशासनात इतकं प्रदीर्घ काळ  काम केलं त्या अनुषंगानं विचारतो . सध्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल बरीच चर्चा आहे . माझी अशी माहिती आहे की किंवा मला जेवढं कांही कळलं आहे त्याप्रमाणं मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा  प्रस्ताव तुमच्या कारकीर्दीत म्हणजे , काँग्रेसच्या राजवटीत पहिल्यांदा सादर झाला होता . हे खरं आहे का ? का याचं सगळं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय ?

पृथ्वीराज चव्हाण : . मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल सर्वांचं अभिनंदन . मला  वाटतं त्याबद्दल आपण पार्श्वभूमीकडे नाही गेलो तर तो मनमोहनसिंगजी यांच्यावर अन्याय ठरेल याबद्दल थोडी पार्श्वभूमी सांगतो . अभिजात भाषेचा दर्जा देण्याची संकल्पना २००४  मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये आली . तामिळनाडू सरकारच्या आग्रहास्तव  हा विषय चर्चेला आला . सांस्कृतिक मंत्रालयानं पंतप्रधानांच्या आदेशावरुन ‘क्लासिकल  लँग्वेज’ म्हणजे काय , कुणाला  ‘अभिजात भाषा’ म्हणायचं याबद्दल नियमावली ठरवली . मनमोहनसिंग यांच्या कॅबिनेटनं ; त्यात शरद पवार होते , महाराष्ट्रांचे अनेक दिग्गज होते ; २००४मध्ये  निर्णय घेतला . त्यानंतर  २००४ मध्ये तामिळ भाषेला पहिल्यांदा हा दर्जा केंद्र सरकारकडून देण्यात आला . त्यानंतर २००५ मध्ये संस्कृत, मग मल्याळम , कन्नड, तेलगू, आणि शेवटी २०१५ मध्ये ओडिया भाषेला हा दर्जा मिळाला.

मी जेव्हा  मुख्यमंत्री म्हणून २०१० साली महाराष्ट्रात आलो तेव्हा हा विषय मला माहिती होता कारण मी ही सर्व कागदपत्रे २००४ साली पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून हाताळली होती . मी जेव्हा मराठी भाषेचा आढावा घेतला आणि विचारलं की मराठी भाषेचं काय झालं ? तर कुणाला कांही माहिती नव्हतं . म्हणजे २००४ ते २०१०पर्यंत या विषयाबद्दल कुणीही ऐकलं नव्हतं , कुणाला कांही माहिती नव्हतं असंच म्हणावं लागेल .  मग मी अधिकारी आणि तज्ज्ञांना बोलावलं , चर्चा केली आणि  मी २०११ साली डॉ . रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली . त्यामध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. कल्याण काळे, प्रा. हरी नरके यांच्यासह अनेक तज्ज्ञांचा समावेश होता . अन् त्यांना सांगितलं की आपण लवकरात लवकर अर्ज केला पाहिजे . कारण अभिजातसाठी मराठी सर्व नियमात बसते आहे . त्या समितीनं सात-आठ बैठका घेतल्या . मग अहवाल तयार करण्यासाठी एक उपसमिती नेमली . त्या समितीनं  मे २०१३ मध्ये मला ४३५ पानांचा अहवाल सादर केला . त्या अहवालात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का द्यावा हे पुराव्यासह दिलेलं होतं . तो अहवाल केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला पाठवायचा तर अधिकाऱ्यांनी सांगितलं , हा अहवाल इंग्रजी भाषेत करावा लागेल , तिथं मराठी समजेल कसं ? त्यासाठी आणखी सात-आठ महिने लागले कारण ते जुने संदर्भ भाषांतरित करणं कांही सोपं नव्हतं . मला वाटतं २०१३च्या शेवटी तो केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे मी स्वत: दिला . मला आठवतं तेव्हा श्रीमती शैलजा त्या खात्याच्या मंत्री होत्या आणि त्यांना सांगितलं की त्यावर लवकर प्रोसेसिंग करा . मग नियमाप्रामानं तो अहवाल साहित्य अकादमीकडे दिला गेला . त्यांनाही मी विनंती केली की लवकर करा . साहित्य अकादमीनं २०१४ च्या फेब्रुवारीमध्ये की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे , अशी शिफारस केंद्र सरकारला केली .

प्र. ब. : मग मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी एवढा उशीर का झाला?

पृथ्वीराज चव्हाण: दुर्दैवानं फेब्रुवारी ते २०१४ कांहीच झालं नाही . नंतर पांच वर्ष आमचं सरकार नव्हतं . २०१४ मध्ये केंद्र सरकार बदललं. मग उद्धवजीचं सरकार आलं . मग कोविड आला . मग शिंदेचं सरकार आलं ; त्यांची प्राथमिकता वेगळी होती ! अखेर २०२४ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर एकदम ३/४ भाषांना हा दर्जा दिला . ठीक आहे , देर से आये , दुरुस्त आये .

प्र . ब . : पण , अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय मिळालं ?

पृथ्वीराज चव्हाण : एक आर्थिक तरतूद असते . माझ्या माहितीप्रमाणं ५०० कोटी रुपये त्या भाषेच्या विकासासाठी दिले जातात . अंधुक आठवतं  त्याप्रमाणं  भाषेच्या संवर्धनासाठी , जगात प्रसार करण्यासाठी कांही सवलती दिल्या जातात .

रा. खां. : खरं तर बाबा, म्हणजे तुमच्याशी संवाद साधणं , गप्पा मारणं हे कायमच आनंदाची एक पर्वणी राहिलेली आहे, त्यामुळे आपण खूप बोलू शकतो. पण एकूणच सगळे कार्यक्रम आज उशिरा सुरु  झालेत आणि वेळेत संपवायचेत त्यामुळे आपल्याला थांबायला लागेल. धन्यवाद.

पृथ्वीराज चव्हाण : धन्यवाद !

प्र. ब. : तुमच्यासारखा सुसंस्कृत आणि वाचक मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा मिळो अशा शुभेच्छा देतो . नमस्कार .

( शब्दांकन – द पीआर टाइम्स , नागपूर   )

संबंधित पोस्ट