मल्टीप्लेक्स चित्रपटगृह ही बदलत्या तंत्रज्ञान आणि आवडी-निवडीची गरज आहे. त्या व्यवसायातून इतर छोट्या-मोठ्या पूरक व्यवसायांना मिळणाऱ्या संधी ओळखून महाराष्ट्र सरकारने करात सूट देण्यापासून ते वाढीव एफएसआयपर्यंत अशा अनेक सवलती मल्टीप्लेक्स उभारणी करणारांना दिल्या. या सवलती देतांना मल्टीप्लेक्सनी ‘प्राईम टाईम’मध्ये वर्षातून किमान ३० दिवस मराठी चित्रपटांसाठी राखून ठेवण्याची अट २००१साली राज्यात तेव्हा सत्तारूढ असणाऱ्या (म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी) सरकारने टाकली होती. ती अट अर्थातच मल्टीप्लेक्सच्या मालकांनी आजवर कधीच पाळली नाही. मराठी चित्रपटासाठी कायम अत्यंत गैरसोयीच्या वेळा मल्टीप्लेक्सच्या मालकांकडून मिळत गेल्या. त्यामुळे मराठी चित्रपट उद्योग आणि प्रेक्षक अशा दोन्ही वर्गात मोठी नाराजी होती. हा ‘प्राईम टाईम’ मराठी चित्रपटांसाठी देण्यात येण्याच्या त्या अटींची अंमलबजावणी करावी असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळात जाहीर करताच कायम मराठीला दुय्यम लेखणाऱ्या समाजाच्या एका गटात पोटशूळ उठला. हा वर्ग धड अभिजन नाही की इंग्रजी किंवा अन्य भाषां किंवा संस्कृतीचा मुलभूत अभ्यासक नाही, तर पंचतारांकित संस्कृतीत वावरण्याचे समाधान मानत ‘पेज थ्री’ वातावरणात वावरणारा आणि कोणत्याही एका भाषेत धडपणे न लिहू किंवा/आणि बोलू न शकणारा हिडगा वर्ग आहे. राज्य सरकारच्यावतीने मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट योग्य वेळेत दाखविण्याच्या अटींची आठवण विनोद तावडे यांनी करून देताच पोटात मळमळू लागलेला नेमका हाच वर्ग आहे. अनेकजण ज्यांचा उल्लेख कायम हयवदनी असा करतात त्या स्तंभलेखक शोभा डे यांचा या मळमळ झालेल्यात वरचा क्रम आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील आमीर खान आणि अन्य अनेकांचाही अशीच अवस्था झालेल्यांत समावेश आहे. याच वर्गातील शोभा डे यांनी हा निर्णय घेतल्याने सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस यांना ‘हुकुमशहा’ संबोधले आहे. “देवेंद्र ‘हुकुमशहा’ फडणवीस” असा तो उल्लेख आहे म्हणजे; देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांचे नाव गंगाधरराव नव्हे तर हुकुमशहा आहे असाच अत्यंत अपमानास्पद अर्थ त्याचा आहे! ‘मल्टीप्लेक्समध्ये यापुढे पॉपकॉर्न नव्हेत तर वडापाव आणि मिसळ खावी लागणार’, अशा शब्दात या मराठी खाद्य पदार्थांची हेटाळणी करत हे दोन पदार्थ ‘पेज थ्री’ संस्कृतीच्या प्रतिष्ठेचे तर नाहीतच नाही तर, ते माणसाने खाण्याच्या लायकीचे नाहीत असे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणूनच कायमच मराठीबद्दल बाष्कळ बडबड करणाऱ्या या ‘हिडग्यां’ना सुनावणे आवश्यक झालेले आहे.
मराठी भाषेची टवाळी हा या ‘पेज थ्री’ संस्कृतीचा स्थायी भाव असला तरी मराठी माणसांच्या असणाऱ्या आणि सर्व भाषकांना सन्मान देणाऱ्या राज्याच्या प्रमुखाला ‘हुकुमशहा’ संबोधने आणि त्या राज्याच्या खाद्य संस्कृतीत महत्वाचे स्थान असणाऱ्या पदार्थांची हेटाळणी हा पूर्ण मराठी अस्मिता-संस्कृती-संचिताचा अपमान आहे असे जर म्हटले गेले तर त्यात गैर मुळीच नाही. शोभा डे या जन्माने मराठी आहेत असे सांगितले जाते. इंग्रजी लेखक आणि स्तंभलेखक अशी त्यांची ख्याती आहे अशी त्यांची ओळख असल्याचे सांगितले जाते. पण, इंग्रजी साहित्यातले अभिजन तर सोडाच जाणकारही त्यांची गंभीर दाखल घेत नाहीत. सामाजिक भानाचा पूर्णपणे अभाव असणारे, मानवी मूल्य आणि माणुसकीबद्दल बांधिलकी नसणारे तसेच सामाजिक वास्तवाला थेट न भिडणारे ‘हिंग्लिश’ (म्हणजे हिंदी मिश्रित इंग्रजी) स्तंभलेखन करणाऱ्या अशी शोभा डे यांची प्रत्यक्षातली प्रतिमा आहे. हे स्तंभलेखन प्रामुख्याने ‘पेज थ्री’ संस्कृतीबद्दल चटपटीत शैलीत गॉसिप सदरात मोडणारे आहे. नातेधिष्टीत परंपरागत भावभावनांचा सन्मान तसेच कदर न करणाऱ्या बटबटीत संस्कृतीत वावरणाऱ्यापुरते ते लेखन मर्यादित असते. ‘पेज थ्री’ संस्कृती ही विविध जाती-धर्मातील काही श्रीमंत आणि नवश्रीमंत अशा उथळ लोकांचा संकर असतो. साहजिकच त्यामुळे त्यात अस्सल काहीच नसते. अशा काहीच अस्सल नसणाऱ्या हिडग्या वर्गाचे एक स्तंभलेखक म्हणून प्रतिनिधित्व शोभा डे करतात एवढेच त्यांचे त्या वर्गात महत्व आहे. एखाद्या राखी सावंत, पूजा पांडे (…अशा अनेक नट-नट्या) आणि शोभा डे यांच्यात काहीच फरक नसतो. काही तरी खळबळजनक लिहून, बोलून किंवा वागून किंवा वर्तन करून समाजाचे लक्ष वेधून घेणे हे या वर्गाचे वैशिष्टय असते आणि त्याला शोभा डे अपवाद नाहीत! फरक असला तर तो केवळ इंग्रजी आणि हिंग्लीश सफाईने लिहिता-बोलता येण्याचा आहे! लेखन प्रकाशित करणे माध्यमांनी बंद केल्यास पेज थ्री संस्कृतीत वावरणारा वर्ग शोभा डे सारख्यांना लगेच उचलून ‘डस्टबिन’मध्ये फेकून देईल. मराठीला खुजे लेखण्याची शोभा डे यांची ही काही पहिलीच वेळ नाही. आता तर मराठी टक्क्याला राजधानी मुंबईतही धोका निर्माण झालेला असताना शोभा डे यांच्यासारख्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करता कामा नये. नेहेमीप्रमाणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे असा कांगावा शोभा डे करतील आणि त्यांच्या त्या सुरात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणारे अनेक ‘तथाकथित बुद्धिवंत’ सूर मिसळत सामूहिक रुदन करतील. पण या कांगाव्याला मराठी कोणीच बळी पडता कामा नये. मराठीला दुय्यम लेखणारी ही प्रवृत्ती ठेचूनच काढायला हवी.
याचा अर्थ, मराठी भाषा आणि संस्कृती रक्षण ही काही केवळ सरकारची जबाबदारी असे म्हणून गप्प बसून राहण्याच्या मराठी संकुचित वृत्तीचे आणि प्रत्येक मराठी उपक्रमाचे कोणा-न-कोणा मराठी माणसाकडूनच पाय ओढले जाण्याच्या कायमच हिरीरीने समोर येणाऱ्या प्रवृत्तीचेही समर्थन करता येणार नाही. कोणत्याही सरकारचे प्राधान्य कधीच ‘संस्कृती’ नव्हे तर ‘स्वसत्ता’ रक्षण हेच असते. भाषा आणि संस्कृती जपणे सरकारपेक्षा जास्त संपूर्ण समाजावर परंपरेने चालत आलेली जबाबदारी तसेच त्या प्रत्येक माणसाचे जन्मजात दायित्व असते. आपण मराठी बोलतो का, मराठी पुस्तके-वर्तमानपत्रे विकत घेतो का, मराठी वाचतो का, मराठी ऐकतो का, मराठी चित्रपट पाहतो-मराठी गाणी ऐकतो का… या प्रश्नांचे उत्तर संपूर्णपणे होकारार्थी येत नाही हे वास्तवातले विदारक चित्र आहे. आपण आपल्यातल्या ‘मराठीपणा’ला जपतो का हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने स्वत:ला विचारायला हवा आणि त्याचे उत्तर होकारार्थी येण्यासाठी प्रयत्न करायला हवा. प्रत्येक मराठी माणसाकडून वर उल्लेख केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ज्या दिवशी होकारार्थी येईल त्या दिवशीपासून मराठीकडे डोळा तिरका करूनही पाहण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.
एक चिनी कथा आहे – एक गाव असते. दर दोन वर्षानी भेट देण्याच्या प्रथेप्रमाणे त्या गावात एक चिनी संत पोहोचतो. ग्रामस्थ त्या संताभोवती जमा होतात. सद्वर्तन, सदविचार, नैतिकता आणि धर्माचरणाचा उपदेश तो संत करतो. तशा वर्तनाचे पालन गावात कसे इमाने-इतबारे होत आहे याची साक्ष गाव देतो आणि यापुढेही तशाच वर्तन आणि विचाराची ग्वाही दिली जाते. सभा संपता संपता ग्रामस्थ एक खंत सांगतात, “अन्य गावांच्या तुलनेत एक कमतरता मात्र आहे आमच्या गावात. आमच्या गावाने पक्ष्यांचे मंजुळ गाणेच ऐकू येत नाही”.
संत विचारात पडतो. दुसऱ्या दिवशीच्या उपदेशाप्रसंगी तोडगा सुचवण्याचे वचन देतो. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांशी बोलताना संत सांगतो, “ मी दिवसभर संपूर्ण गाव फिरलो, घर न घर आणि संपूर्ण परिसर बघितला पण, गावात एकही झाड दिसलं नाही. झाड नसेल तर पक्षी येतील कसे? झाड असलं की ते बहरेल, त्याला फुले येतील, फळे येतील. फुलांतील मधुकंद आणि फळांसाठी पक्षी येतील. फुले-फळे बघून पक्षी आनंदित होतील आणि त्या फुलं-फळांचा आस्वाद घेण्यासाठी झाडांवर गर्दी करतील. तृप्त झाल्यावर त्याच झाडांवर बसून ते पक्षी गाणी गातील. त्यांच्या मंजुळ स्वराने हे गाव उजळून निघेल. म्हणून प्रत्येकाने अंगणात झाडे लावावीत”, असे सांगून तो संत प्रयाण करतो.
नंतर दोन वर्षानी तो संत त्या गावात येतो तेव्हा ग्रामस्थ सांगतात, “आता आमच्या गावात पक्ष्यांचे गाणे ऐकू येवू लागले आहे.
संत सांगतो, “आणखी दोन वर्ष थांबा हे वृक्ष मोठे झाले की तुमचे क्षितिजही पक्ष्यांच्या गाण्यांनी सुरेल झालेले असेल”.
आपण मराठी भाषा आणि संस्काराचे झाड आधी आपल्या मनात लावायला हवे. आपल्या घरात त्याचा बहर आपसूक येईल. घरा-घरातला मराठी भाषा आणि संस्कृतीचा हा बहर सर्वत्र लख्ख पसरायला मग वेळ लागणार नाही….
-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com