औरंगाबाद महापालिकेच्या येत्या निवडणुकीच्या चाचपणीसाठी आलेल्या राज ठाकरे यांची भेट झाली. अर्थातच भरपूर गप्पा झाल्या. मी म्हणालो, ‘फार उशीर केला तुम्ही औरंगाबादची निवडणूक लढवण्यासाठी यायला. या शहराची वाट लावली आहे. एके काळी टुमदार आणि देखणं असणारं हे गाव बकाल करून टाकलंय लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा-बारा वर्षात’.
राज ठाकरे म्हणाले, ‘म्हणूनच नाही आलो. राज्यात आमच्या पक्षाचं सरकार नाही, केंद्रातही नाही म्हणजे दररोज वाद घालत काम करावं लागणार. नाशकात तर आठ महिने आयुक्तच दिला नाही सरकारनं. टीका केलेल्या पत्रकारांना माझं सांगणं आहे, आता नाशकात बघा की येऊन, आम्ही काय केलंय ते. कर्जमुक्त केलंय शहर…’ आणि आणखी बरंच काही.
‘विधानसभा निवडणुकीनंतर इथे परिस्थिती फारच अनुकूल होती तुमच्यासाठी. एमआयएमच्या अस्तित्वामुळे सर्वच पक्ष घाबरलेले होते. सेना-भाजप युती तुटल्यानं आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीत विस्तवही जात नसल्यानं लोकांना पर्याय हवा होता. महापालिकेचा कारभार कोसळलेला होता, रस्ते-वीज-पाणी-आक्रमण हे प्रश्न अत्यंत बिकट झालेले होते. विकास कामात ४०-४५ टक्के कमिशनबाजी चालते अशी उघड चर्चा होती. सत्ताधारी कॉंग्रेस आणि सेनेच्या नेत्यांत असलेल्या ‘परस्पर सहकार्या’मुळेच हे घडतं आहे असं लोक बोलत… दोनेक महिने आधी येऊन हा असंतोष संघटित केला असता तर चित्र मनसेच्या बाजूने दिसलं असतं’, मी म्हणालो.
‘अजूनही उशीर झालेला नाही’, राज ठाकरे आत्मविश्वासपूर्वक स्वरात म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनतेने नाकारल्यानंतर आम्ही प्रथमच भेटत होतो. शरद पवार आणि राज ठाकरे यांचा उल्लेख करून कोणताही राजकीय पक्ष आणि त्याचे नेतृत्व अशा एका पराभवामुळे एका रात्रीत संपत नसते, असं प्रतिपादन मी विधानसभा निकालाच्या दिवशी एबीपीमाझा वृत्तवाहिनीवर केलं होतं.
‘खरं तर, त्या पराभवानंतर औरंगाबाद महापालिका निवडणूक मनसेसाठी लिटमस टेस्ट ठरली असती कारण परिस्थिती मनसेसाठी खूपच अनुकूल होती’, असं मी म्हटल्यावर राज ठाकरे त्याच ठाम विश्वासानं म्हणाले, ‘मी ठिय्या देऊन बसलो तर अजूनही महापालिका निवडणुकीचं चित्र बदलू शकतो!’
राजकीय विचार आणि भाषक अभिनिवेश काही काळ बाजूला ठेवले तर या तेजतर्रार नजरेच्या, कधीही चुरगळलेल्या नसलेल्या व्यक्तिमत्वाच्या, परिधान केलेल्या कपड्यांबाबत रंगभान आणि आवाजात जरब असणाऱ्या राज ठाकरे यांचा हा आत्मविश्वास मला कायम आवडतो. औरंगाबाद निवडणुकीबाबत कोणतीही निश्चित भूमिका जाहीर न करता त्या आत्मविश्वासी स्वरातून राज ठाकरे यांनी दिलेला संदेश मला समजला ; पटला मात्र नाही हा भाग वेगळा कारण, देर हुयी आने में उनको… पण ते असो.
त्याचवेळी एक नवविवाहित दांपत्य आशीर्वाद घेऊन आणि काही मुले-माणसे-स्त्रिया राज ठाकरे यांच्यासोबत फोटो काढून गेले. ‘त्यांना कशाला उगीच ताटकळवायचं? आपल्या गप्पा तर सुरुच राहतील, असं त्या फोटोसेशनचं समर्थन करत परतलेल्या राज ठाकरे यांना मी म्हणालो, ‘ तुमची क्रेझ आहे राज्याच्या सर्वच भागात. पण, राज्यात ठिकठिकाणी फिरताना तुमच्याबद्दल एक सार्वत्रिक तक्रार असते हल्ली असंख्य लोकांच्या बोलण्यात..’, असं म्हणत मी सुरुवात केली तर राज ठाकरे यांनी प्रश्नांकित चेहेरा करून नजर रोखून माझ्याकडे बघितलं. त्यांच्या नजरेला नजर देत मी म्हणालो, ‘ही राज नावाची क्रेझ राज्याच्या ग्रामीण भागात आहे, दूरदुर्गम आदिवासी भागात आहे, निमशहरी भागात आहे आणि शहरी भागात तर आहेच आहे.. ती लहानात आहे, तरुणात जास्त आहे, स्त्रिया आणि पुरुषात आहे, अगदी अबाल-वृद्ध अशा सर्व स्तरांत ती आहे..सर्व जाती धर्मात आहे पण, ही क्रेझ राजकीय भांडवलात रुपांतरीत करवून घेण्यात तुम्ही यशस्वी झाला नाहीत, राज. तुमच्या सभांना होणारी गर्दी विकतची नव्हती याची खात्री पटल्यावर ‘प्रतिसाद की पाठिंबा?’ असा मजकूर मी लिहिला होता ते आठवते का तुम्हाला?’ या माझ्या प्रश्नाला केवळ मान डोलावून रुकार देणाऱ्या राज ठाकरे यांना मी पुढे म्हणालो, ‘तो केवळ प्रतिसाद होता, तो तुम्हाला पाठिंब्यात बदलता आला नाही अशी अनेकांची तक्रार आहे. यू आर नॉट सिरीयस पोलिटीशियन असंही अनेकांना वाटू लागलं आहे… ही प्रतिमा तुम्ही बदलायला हवी’, मी एका दमात बोलून टाकलं. क्षणभर वाटलं हा माणूस आपल्या वयाचा आणि पत्रकारितेतील अनुभवाचा मान राखून कानाखाली आवाज नाही काढणार पण, ‘पुरे झाला उपदेश’ असे म्हणत ‘जय महाराष्ट्र’ नक्कीकरणार आता.
पण, तसं काहीच घडलं नाही. बाळा नांदगावकर यांना ‘बाळा ये रे, बस तूही’, असं म्हणत राज ठाकरे यांनी शांतपणे सिगारेट पेटवली. त्यांना माझं म्हणणं ऐकण्यात रुची वाटत आहे याची यादरम्यान खात्री पटलेली होती. मी पुढे बोलू लागलो, ‘आपल्यातले राजकीय अंतर बाजूला ठेऊन सांगतो, विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या पराभवानंतरही तरुणांत तुमची क्रेझ मोठी आहे. बहुसंख्य लोकांना तुमचं वक्तृत्व आवडतं.. अनेकांना तुमचा स्पष्टवक्तेपणा आवडतो.. तुम्ही प्रश्न ज्या तळमळीने मांडता ती तळमळ खूप लोकांना भावते.अख्खा महाराष्ट्र हा माझा मतदार संघ आहे ही तुमची भाषा असंख्य मराठी मनांना ऊभारी देते.. तुम्ही एकमेव असे राजकीय नेते आहात की जे म्हणतात “मला सत्ता पैसे कमावण्यासाठी नको आहे तर माझ्या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हवी आहे”.. तुम्ही एक असे नेते आहात की भले कितीही वाद होवो पण राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडे आहे.. हे लोकाना अपील होतं. लोक तुमच्यामागे धावतात आणि तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून देता अशी लोकांची तक्रार आहे…’ असं बरंच काही मी बोललो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीतही अमराठी लोकांना राज ठाकरे विषयी कशी उत्सुकता आहे, याचे स्वानुभव सांगितले. राज ठाकरे यांनी स्पष्ट काहीच उत्तर दिलं नाही पण, जनमनात काय भावना आहेत याचा अंदाज त्यांना माझ्या म्हणण्यातून काहीसा आला असावा. (आधीच माहिती असले तरी काही त्यांनी ते त्यांनी चेहेऱ्यावर पुसटसेही उमटू दिलं नाही हे मात्र नक्की.) इतक्या स्पष्टपणे मी ते सांगितलं तरी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते काहीसे गूढ हंसले. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. वातावरण सैल होत गेलं. दुबईत झालेल्या मिक्ता या मराठी चित्रपट महोत्सवातील गमतीजमती निघाल्या. अन्य काही कॉमन राजकारणी मित्रांची आठवण निघाली. नवीन वाचन काय, सोशल साईटस वरच्या उथळ प्रतिक्रिया वगैरे माहितीची देवाणघेवाण झाली.
‘तुम्ही दैनिकाच्या धबडग्यात का पडता आहात? राज नावाचा ब्रांड एनकॅश करायचा आहे का?’ असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले, ‘मी तर त्याबद्दल काहीच बोललो नाहीये. राज नावाच्या युएसपीची सगळी चर्चा तुम्ही पत्रकारांनी सुरु केली आणि ती पत्रकारांतच सुरु आहे. माझा तर अजून अभ्यासच सुरु आहे. साप्ताहिकाने सुरुवात करायची का हाही एक मुद्दा आहे..’ गंभीरपणे राज ठाकरे बरंच काही बोलले. या विषयाच्या निमित्ताने चर्चा आणखी पुढे गेली अशात राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्रे. त्यांना मिळालेला प्रतिसाद हेही विषय गप्पात आले एकेकाळी माधव गडकरी संपादक असताना ‘लोकसत्ता’त केलेली उमेदवारी, ‘मार्मिक’ आणि ‘सामना’चे दिवस अशा आठवणी निघाल्या. इकडे गर्दी वाढू लागलेली होती. लवकरच पुन्हा नक्की भेटण्याचं ठरवत आम्ही परस्परांचा निरोप घेतला.
राज यांची भेट झाली त्यावेळी काय घडले हे कथन करणे हेच एकमेव कारण हा मजकूर लिहिण्यामागे आहे! या निमित्तानं शिशिर शिंदे यांचीही बऱ्याच वर्षांनी भेट झाली. शिशिर शिंदे माझ्या लेखनाचे चांगले वाचक. ते ‘वाचणार आणि आवर्जून कळवणार’ असं आमच्यातलं एकेकाळी नातं होतं. ते कडवे शिवसैनिक असताना ओळख झाली. नंतर ते आमदार वगैरे झाले. आता मनसेत आहेत.
शेवटचा शिलेदार…
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात मांडलेला अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानिमित्ताने बरीच चर्चा झाली. भाजपने आम्ही सत्तेसाठी तुमच्यावर अवलंबून नाही असा इशारा शिवसेनेला जाताजाता कसा दिला, राष्ट्रवादीने कॉंग्रेसवर कसा सूड उगवला, शिवेसेनेने कशी चोख भूमिका घेतली, कॉंग्रेसची कशी कोंडी झाली… इत्यादी, इत्यादी अनेक पैलू चर्चेत आले. सत्तेच्या राजकारणात शेवटी आकड्यांनाच महत्व असते.
एक शेर आहे-
जम्हुरीयत वो तर्जे हुकमत है,
जिसमे बंदे को गिना करते है, तोला नही करते
(शायर म्हणतो, लोकशाही अशी राज्यपद्धत आहे जिथे माणसाचे मोल/गुण नाही मोजले जात तर, केवळ त्याची ‘गणती’ केली जाते!)
या न्यायाने शिवाजीराव देशमुख यांच्यामागे शिरगणती नव्हती (बहुमत नव्ह्ते) म्हणून त्यांना पद गमवावे लागले.. यालाच राजकारण म्हणतात! ‘पंत जाणार आणि राव चढणार’ हे राजकारणात चालतच असते.
एक मुद्दा मात्र कुठेच आलेला दिसला नाही आणि तो म्हणजे वसंतदादा पाटील यांचा शेवटचा शिलेदार शिवाजीराव देशमुख यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेतून पायउतार झाला, वसंतदादा पाटील यांच्या गटाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले. तीन वेळा विधानसभा सदस्य आणि तीन वेळा विधानपरिषद सदस्य अशी विधी मंडळातील प्रदीर्घ कामगिरी शिवाजीराव देशमुख यांच्या राजकीय खात्यावर जमा आहे. राज्यमंत्री ते पूर्णवेळ अभ्यासू मंत्री असा त्यांचा सत्तेतला प्रवास आहे, मंत्रीपद सोडून प्रदेशाध्यक्षपदाला महत्व देणारा राजकारणी अशी प्रतिमा शिवाजीराव यांची होती आणि महत्वाचे म्हणजे राजकारणात ते वसंतदादा पाटील यांचे निष्ठावंत होते. शासकीय नोकरी सोडून वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेने तसेच पुढाकाराने ते राजकारणात आले आणि निष्ठावंत कॉंग्रेसजनच राहिले. त्यांचा करारी आवाज, दणकट शरीरयष्टी आणि प्रशासनावरील पकड आमच्या पिढीच्या पत्रकारांच्या परिचयाची आहे . आता हा आवाज एक सदस्य म्हणून सभागृहात उमटेल हे खरे असले तरी, सत्तेच्या राजकारणातून वसंतदादा गटाचा शेवटचा शिलेदार पायउतार झाला याची कुठे तरी नोंद व्हायला हवी होती असे वाटते!
-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com