‘कोरोना’नुभव ..   

‘उद्याचा मराठवाडा’च्या २०२२ च्या दिवाळी अंकातील  लेख / चित्र- शिवानंद सुरकुटवार

|| १  ||

बेगम मंगलाचं निधन ६ मार्च २०२०ला झालं आणि लगेच कोरोना नावाच्या  महाप्रलयंकारी हिंस्र श्वापदानं जगावर हल्ला केला  . २०१६च्या साधारण जूनपासून बेगमची तब्येत ढासळायला सुरुवात झाली . आधी ती पाहता पाहता असाध्य कंपवाताचा ( पार्किसन्स ) बळी ठरली आणि लगेच तिला पक्षाघातानं ( प्रोग्रेसिव्ह सुप्रा न्यूक्लिअर पाल्सी ) ग्रासलं. या दोन्ही आजारांचा वेढा इतका घट्ट की, दररोज कणाकणानं शरीर झिजणं आणि क्षणाक्षणानं मृत्यूच्या दिशेनं तिचा प्रवास सुरु झाला आहे , हे असंख्य रिपोर्टस् वरुन स्पष्ट होत गेलं . आमच्या जगण्याच्या शैलीला अनुसरुन या सर्वांची कल्पना बेगमला पूर्णपणे देण्यात आलेली होती . अखेरचा प्रवास सुरु झाला तरी ती शांत होती . मृत्यूनंतर कोणतंही कर्मकांड न करता कांही निधी वितरित करण्याच्या आमच्या २०१२त ठरलेल्या निर्णयाची आठवण त्याच शांतपणे तिनं करुन दिली . त्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांची तरतूद तिनं करुन ठेवलेली होती .   १ एप्रिल २०१७ ला तिला व्हिलचेअरमध्ये शिफ्ट करण्यात आलं . इतका कंपवात आणि पक्षाघाताचा वेढा घट्ट होत चालला होता . कोरोनाची माझी कथा इथून सुरु होते .

एका रात्री कोंडलेला श्वास पूर्ववत झाल्यावर बेगमला प्रॉमिस केल्याप्रमाणे घराबाहेर पडणं मी बंद केलं , तो बहुदा २०१७चा ऑगस्ट महिना असावा  . नंतर कधी कधी तर मी दोन दोन महिने घराचा जिना उतरलो नाही . एक प्रकारे बेगमसाठी मी स्वत:ला घरातच स्वघोषित स्थानबद्ध करुन घेतलं. वैद्यक उपचाराची सोय पूर्णपणे घरीच करण्यात आलेली होती .  डॉ. अंजली व डॉ. मिलिंद देशपांडे , डॉ. प्रदीप मुळे घरी येऊनच उपचार करत .  त्यांच्याशिवाय काही मोजके मित्र , कन्या सायली आणि काही आप्तांचं अधूनमधून येणं-जाणं असे . मी खाली उतरण्या न उतरण्यानं फरक पडत नव्हता . कारण बेगमची काळजी घ्यायला शिफ्ट वाईज चौघी आणि घरकामासाठी पाशू अशी सहायकांची मोठी फौज होती . म्हणजे स्थानबद्ध असलो तरी घरात माणसांचा चांगल्यापैकी वावर होता . पुढची पाऊणे तीन वर्ष लेखन-वाचन , बेगमशी गप्पा मारत , मरणाच्या दाटून आलेल्या सावटात आमचं जगणं सुरु होतं.

बेगम गेली आणि पाठोपाठ कोरोनाचं आगमन झालं. टाळेबंदी लागली आणि एक महाभयानक आक्राळविक्राळ एकटेपण घोंगावत आलं . सुरुवातीच्या काळात सकाळी स्वयंपाक करायला बाई येऊन गेली की , पुढचे २४ तास एकाकीपण खायला उठायचं . फोनवर तरी किती वेळ बोलणार . बेगमचं मरण ताजं होतं आणि तोच विषय पुन्हा पुन्हा बोलण्यात यायचा आणि त्याचा मनस्वी त्रास व्हायचा .  अखेर  कन्या  सायली , मेव्हणा श्रीकांत ,  डॉ . अंजली  डॉ . मिलिंद आणि डॉ . प्रदीप मुळे यांच्यापुरताच संवाद मर्यादित केला . सुरुवातीच्या काळात तर लिहावं , वाचावं वाटत नव्हतं . रेखाटनं करण्याचा प्रयत्न  केला पण , आता बोटांवर पकडच उरलेली नव्हती . रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज सतत यायचा . पिनड्राप सायलेंस वातावरणात सायरनचे ते आवाज काळजावर चरा ओढत . डोळ्यांत कसली तरी अनामिक भीती दाटून येत असे . हळूहळू या वातावरणाची सवय झाली आणि लक्षात आलं , एकाकीपण म्हणा की, एकांतवास सहन करायला आपण सरावलो आहोत . त्याच ट्रान्समध्ये मग मी गाणी ऐकण्याकडे वळलो . एक दिवस फोनवर बोलतांना सायली खूपच कावली मग संगणक सुरु करुन की-बोर्डवर बोटं फिरवू लागलो . जगण्याचा  साचलेपणा प्रवाहित झाला . एव्हाना टाळेबंदी आणि कोरोनाच्या दहशतीची  अपरिहार्य संगत केवळ मी एकट्यानंच नाही तर संपूर्ण देशानं मान्य केलेली होती  .

।।२।।

बेगम नसण्याचं दु:ख आणि त्यातून आलेलं व वाढत गेलेलं अफाट एकाकीपण स्वीकारल्यागत झालं पण , या काळात मी व्यसनाधीन झालो नाही हे फार महत्त्वाचं . मद्याचा उल्लेख मी नेहमी ‘मंतरलेलं सोनेरी पाणी’ असा करतो. माझ्याकडे देश-विदेशातील अनेक व्हिस्की आणि वाईन्सचा साठा होता , अर्थात  याचं बहुतांश श्रेय मुकुंद बिलोलीकर या मित्राचं . कोणत्याही व्यसनाचं समर्थन  न करता सांगतो , हे घडत होतं तेव्हा घरात चाळीस एक तरी बाटल्या उत्तमोत्तम चवीच्या व्हिस्कीच्या होत्या आणि त्यात किमान सात-आठ तरी ब्लू लेबल होत्या . अनेक वर्ष शनिवार हा आमचा ड्रिंक्स डे असे . क्वचित इतर दिवशी मूड  लागला तर  एखादा पेग भरुन घेत वाचावं , लिहावं किंवा आवडीची गाणी ऐकावी हा आमच्या घरचा परिपाठ झालेला होता. दिल्ली सोडल्यावर आठवड्यातून दोन-तीन रात्री तरी मंतरलेल्या सोनरी पाण्यासोबत ‘सत्संग’  करत असे . मात्र, कधीही रात्री साडेआठच्या आत शिष्टाचार म्हणूनही ड्रिंक्सचा ग्लास हाती घेतला आहे , असं आजवर कधीच  घडलेलं नाही.

तर मुख्य मुद्दा असा की , कोरोनाचा एक व्यावसायिक पैलू अचानकपणे समजला . नागपूरला असतांना मी एका विशिष्ट दुकानातूनच व्हिस्की खरेदी करत असे . अर्थात खरेदीचं हे प्रमाण अल्प असे . त्या दुकानदाराचा एक दिवस फोन आला . एव्हाना नागपूर सोडून नऊ वर्षे झाली होती तरी त्याच्या मी स्मरणात होतो , असा त्या फोनचा अर्थ काढला . मी नागपुरातच आहे असं समजून त्यानं बोलायला सुरुवात केली आणि प्राथमिक जुजबी बोलणं झाल्यावर थेट विषयाला हात घालत त्यानं विचारलं, ‘काही पाठवू का?’ अत्यावश्यक वस्तू वगळता जगभरातला सर्व व्यापार ठप्प असताना हा व्यावसायिक कम मित्र आवर्जून काही पाठवू का ? असं विचारुन आपली किती काळजी घेतो आहे , या भावनेनं मी सुखावलो . चौकशी केली . माझ्या नियमितपैकी असलेल्या ब्रॅंडसच्या किमती  दोन ते अडीच पट आणि विदेशी स्कॉचेसच्या किमती साडेतीन पटीनं त्यानं वाढवलेल्या होत्या . ते भाव ऐकून थक्क झाल्यानं एवढ्या किमती का असा प्रश्न पडला .

तो म्हणाला, ‘मार्केट बंद है , तो सब चीजों के दाम डबल से जादा हुए हैं.  लेकिन जिसको जो कुछ चाहिए वो माल तो मिल जाता है , जरुरत है तो पैसा तो फेंकनाही पडेगा। ’

‘कोई अॅक्शन नहीं होती ? ‘ मी विचारलं .

‘उसका भी बंदोबस्त हो गया है , पाकीट के भी भाव डबल हो गये है ’ , असं तो म्हणाला .

आता नागपुरात राहात नाही, असं सांगून मी त्याला कटवला.

मग , माहिती काढायला सुरुवात केली तर टाळेबंदीमुळे बाजार ठप्प असला तरी व्यसनाशी संबंधित बहुसंख्य व्यवहार सुरुच होते , असं लक्षात आलं. अगदी पाहिजे त्या ब्रॅडची सिगारेट , विडी , गुटखा एवढंच नाही तर खर्रा या नावाखाली ‘जे’ काही एकत्र करुन आणि चांगलं मळून मिळतं ते सगळं उपलब्ध होतं . थोडक्यात काय तर कोरोनामुळे आलेल्या टाळेबंदीमुळे काही लोकांच्या व्यापारात तेजी आलेली होती आणि प्रशासकीय यंत्रणेत काम करणाऱ्यांच्या हप्त्यात वाढ झालेली होती .

‘सम पीपल आर मोअर ईक्वल’ या विधानाची आठवण झाली कारण टाळेबंदीमुळे धंदा बंद पडून मरणारे पुन्हा गरीबच होते.

।।३।।

कोरोनाचा फारच इरसाल अनुभव दुसऱ्या लाटेत आला . एका जीवलग मित्राचा भाऊ आरोग्य खात्यात कोरोना काळात वरिष्ठ पदावर होता . राज्याच्याच एका बड्या शहरात पॉश एरियात या दोन्ही बंधूंचा मिळून एक दुमजली बंगला होता . माझा मित्रही शासकीय सेवेतून एका वरिष्ठ पदावरुन तीन चार वर्षांपूर्वी निवृत्त झालेला होता.

एक दिवस या मित्राचा फोन आला की, त्यांच्या भावाच्या नवीन घराचा वास्तु आहे .  आम्ही यावं असा त्याचा खूप आग्रह होता .  त्याच्याशी मैत्रीही बऱ्यापैकी ‘गाढी’ म्हणता येईल अशी होती . कांही  समान मित्र त्यानिमित्तानं जमणार होतं .शिवाय वास्तुशांतीच्या आदल्याच दिवशी तो औरंगाबादहून निघणार होता त्यामुळे प्रवासाचा काही ताण वगैरे नव्हता . ठरल्याप्रमाणे आम्ही त्याच्या गावी पोहोचलो . त्याच्या अगदी बंगल्यालगतच एक नवी अलिशान वास्तु मोठ्या ऐटीत उभी होती . ‘हेच आमचं नवं घर . त्याबद्दल आरामात बोलूच’ , असं तो म्हणाला .

वास्तुच्या आदल्या रात्री शेजारी असलेल्या नवीन वास्तुच्या शांतीसाठी जुन्या वास्तुत काही निवडक मित्रांसाठी पार्टी होती . पार्टीआधी मित्रांना नवीन वास्तुची सैर करवण्यात आली . बंगला कसला व्हिलाचं होता तो . त्यातील ऐश्वर्यशाली  सजावट बघून माझं मध्यमवर्गीय पांढरपेशी मन खरं तर ओशाळूनच गेलं . पार्टी सुरु झाली. दुर्मीळ किमती मद्य होतं . अतिशय रुचकर पंचतारांकित खाद्यपदार्थांची रेलचेल होती आणि गप्पा नवीन वास्तुच्या कौतुकाच्या होत्या . हा नेमका शेजारचाच प्लॉट कसा नशिबानं मिळाला , त्यासाठी जादा पैसे मोजावे लागले तरी आम्ही मागे कसे हटलो नाही , सजावटीच्या कोणत्या वस्तू कुठून कशा मिळवल्या वगैरे वगैरे गप्पांना उधाण आलं आणि पहिला  राऊंड संपेस्तोवर  ते निवलंही . त्या दोन्ही बंधूंच्या आर्थिक क्षमतेविषयी मला चांगलंच ठाऊक होतं . कनिष्ठ मध्यम वर्गीय घरात त्यांची झालेली जडणघडण आणि आर्थिक परिस्थिती अगदी आमच्यासारखी होती . म्हणून तर त्यांच्या त्या नवीन वास्तुच्या ऐश्वर्यशील असण्याचं फारच कौतुक वाटलं.

गप्पांच्या ओघात मी त्याच्या भावाला विचारलं, ‘कसं काय जमवलंस रे हे?’ व्हिस्कीच्या अंमलानं आधीच उत्तेजित असलेल्या त्याच्या डोळ्यांत कन्फेशनची जणू वीजच चमकली . किंचित खालच्या पट्टीत तो म्हणाला, ‘हे सगळं कोरोनामुळे शक्य झालं रे बाबा .’

‘कसं काय?’ मी विचारलं .

‘आमच्या रिजनची औषध खरेदी माझ्या हातात होती . ( एका जिल्ह्यासाठी  साधारण शंभर कोटी रुपयांच्या औषधांची दरवर्षी खरेदी करावी लागते. हा आकडा ढोबळमानानं मला ठाऊक होता .) कोरोना काळात खरेदीवर कोणतेही निर्बंध नव्हते . कमाईची ती  सुवर्ण संधीच होती ’ वगैरे वगैरे त्यानं  सांगितलं . दरम्यान त्यानं पुढचा पेग भरुन ग्लास माझ्या हातात दिला .

एक घोट  घेत त्याला म्हटलं, ‘कोरोना ही तुझ्यासाठी तर इष्टापत्तीचं ठरली की . तू घराला कोरोना कृपा नाव दे ,’ असंही  सुचवलं.

प्रतिसाद म्हणून टाळीसाठी हात पुढे करत तो म्हणाला , ‘ सजेशन छान आहे पण ते नाव अशुभ आहे ! ’

पैशात शुभ अशुभ कांहीच नसतं , नावात मात्र ते असतं हे मला त्या दिवशी समजलं .

।।४।।

मी लिहिलेला  दर आठवड्याचा ब्लॉग राज्यातील काही वृत्तपत्रांच्या रविवार पुरवणीतही प्रकाशित होतो . त्या वृत्तपत्रात पत्रमहर्षि रंगा वैद्य यांच्या नावानं ओळखलं जाणारं सोलापूरचं ‘संचार’ हेही दैनिक आहे . २०२०चा बहुधा नोव्हेंबर महिना असावा . वेळ रात्री साडे-आठ पावणेनऊची असावी . संगणकावर मी काही बाही चिवडवत होतो . अचानक सेलफोनची बेल वाजली . कॉलर आयडीच्या माहितीनुसार दिसणारं नाव अनोळखी होतं, तरी फोन घेतला . पलीकडच्या माणसानं त्याची ओळख दिली. त्याच्या खऱ्या नावाचं सोडून द्या. आपण त्याला गोवर्धन म्हणू यात. काळजात खूप दाटून यावं आणि भावनांचा कल्लोळ माजलेला असावा त्यातच बोलावं की न बोलावं असा जडशीळ संभ्रम निर्माण झालेला असावा , अशा अवस्थेत जसा एक निराश , अश्रूंच्या सीमेवर असलेला येतो तसा त्याचा स्वर होता . ‘संचार मधला लेख वाचून का कोण जाणे तुमच्याशी बोलावसं वाटलं ,’ असं म्हणत त्यानं बोलायला सुरुवात केली आणि मग त्याची दर्दभरी दास्ता रोंरावत एखादा प्रपात कोसळावा तशी सुरु झाली .

त्याच्या म्हणण्याचा अर्थ , तो अतिशय संकटात आहे. घरात केवळ उद्यापुरता किराणा शिल्लक , गॅस कोणत्याही क्षणी संपेल अशी स्थिती . नोकरी सुटून आठ  महिने झालेले . एव्हाना असली नसली साठलेली सगळी शिल्लक संपलेली होती . नवी नोकरी मिळण्याची  कोणतीही शक्यता नव्हती कारण टाळेबंदी लागलेली . घरात एकूण पाच माणसं आणि ती या सहाव्या कंगाल माणसावर पूर्णपणे अवलंबून . ‘मी माझं पोट भरु शकत नाही . बायको-मुलाचं नाही. आई-वडिलांचं नाही . मी जगण्याला पूर्णपणे नालायक आहे ‘ , असं बरंच काही तो बोलत होता . बोलण्यात असंबद्धता होती आणि माझी खात्री आहे तिकडे त्याचे डोळेही घळाघळा बोलत होते .

त्याचं बोलणं ऐकत क्षणाक्षणाला मी आक्रसत होतो . कांहीसा  फ्रिज्ड आणि नि:शब्दही होत चाललो होतो पण , फोन कट केला नाही त्याला बोलू दिलं . काही वेळानं तो ढसाढसा रडू लागला . फोनमधून येणारा तो आवाज भेसूर वाटत  होता . रडता रडताच ‘मी जीव देतो’ असं तो म्हणू लागला आणि अंगावर सर्रकन काटाचा उभा राहिला .

‘मी काहीतरी मदत करतो तुला पण , सोलापूरला औरंगाबादहून मदत पाठवणार कशी  ?’ असं त्याला म्हणालो.

‘काही तरी करा, काही तरी करा’ असा जप त्यानं सुरु केला.

त्याला अर्ध्या तासांत फोन करतो असं सांगून फोन बंद केला आणि डोकं गच्च पकडून , वर्क स्टेशनवर दोन्ही  कोपरं  रोवून बसून राहिलो . माझ्या डोक्यात हजारो घणांच्या प्रहारांचे आवाज होत होते . भोवंडून आल्यासारखं होत होतं . काही वेळ त्याच अवस्थेत गेला .  भानावर आलो तेव्हा लक्षात आलं आपणही रडतो आहोत.

मग मला सोलापूरच्या समीर गायकवाडची आठवण झाली . समीर हा तिथला व्यावसायिक . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगतांना आलेल्या सर्व अनुभवांना बेडरपणे भिडलेला . पुढे जाऊन ते सर्व अनुभव विलक्षण समंजसपणे लिहिणारा . इतका जीवघेणा लिहितो की , आपलं काळीज लक्ककन हलतं . ‘अक्षरांच्या झाडावर विहरणारा पक्षी’ असं मी त्याला नेहमीच म्हणतो . या म्हणण्याला एक झालर अशी की , तो माझा चाहता आहे.

समीरला फोन केला. एव्हाना रात्रीचे दहा वाजत आले असावे . काय घडलं ते त्याला सांगितलं आणि ताबडतोब गोवर्धनला गाठ असं म्हणत त्याचा फोन नंबर समीरला दिला . ‘तुझा फोन आल्याशिवाय झोपणार नाही.’ हेही समीरला बजावलं . गोवर्धनला फोन करुन समीर गायकवाडचा तुला फोन येईल असं सांगितलं आणि समीर येईपर्यंत घराच्या बाहेर न पडण्याची कडक शब्दांत समज दिली . हा जर बाहेर पडला तर आत्महत्या करु शकतो , अशी भीती मला वाटत होती.

समीरमधल्या संवेदनशीलतेची गतीही तेज असल्याचा अनुभव अवघ्या अर्ध्या पाऊण तासात आला . समीरनं त्याच्याशी संपर्क साधून  त्याचं घर शोधून काढलं होतं . त्याला समजवलंही होतं आणि एव्हाना तो बराच शांत झालायं असा समीरचा दावा होता . दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरी दोन महिन्याचा किराणा नेऊन देतो आणि काही आर्थिक मदतही करतो , असं समीरनं आश्वस्त केलं . शिवाय त्याच्या नोकरीचंही बघतो असं तो म्हणाला.

समीरला म्हटलं, ‘तुझे  अकाउंट डिटेल्स पाठव मी काही पैसे ट्रान्सफर करतो.’  समीरनं त्याला ठाम नकार दिला . माझ्यात असला नसला दिलदारपणा ओशाळूनच गेला…दुसऱ्या दिवशी सकाळी समीर गायकवाडचा फोन आला . गोवर्धननं पैसे आणि किराणा घ्यायला ठाम नकार दिलेला होता . समीर म्हणाला , त्याला हवीये  ती फक्त चरितार्थाची सोय . फार स्वाभिमानी वाटला तो’ .

‘काल रात्री त्या साहेबांशी ( माझ्याशी-त्याला माझं नावही आठवत नव्हतं ! ) बोललो आणि जगण्याचा धीर आला’ असं तो म्हणाला असल्याचं समीरनं सांगितलं . मग समीरनं आग्रह करुन किराणा तिथेच सोडला आणि त्याला त्याच्यासाठी नोकरी शोधण्याचं मान्य केलं.

‘सर, काल  रात्री काय झालं असतं ते नाही सांगता येणार इतका तो कोसळलेला होता पण , आता तो आत्महत्या करत नाही, हे नक्की‘, असं समीर गायकवाडनं दृढपणे सांगितलं . शब्द जेव्हा समंजस होतात तेव्हा , मरण्याच्या इच्छेला जगण्याच्या सावलीत घेऊन जाण्याची  त्या शब्दांमधली शक्ती काय जबरदस्त असते ते समजलं  . शब्दांच्या त्या शक्तीला मी मनोमन नमस्कार केला.

दोन दिवसानंतर गोवर्धनचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की , त्याला नोकरी लागली आहे . खूप गहिवरल्या शब्दांत तो बोलत होता .

त्यानंतर आमच्यात काही बोलणं नाही . हा मजकूर लिहिण्यापूर्वी त्याला फोन केला तर तो आऊट ऑफ रेंज असल्याचा निरोप सेलफोन ऑपरेटर कंपनीनं दिला…

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com
blog.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट