१६व्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वात झालेला खांदेपालट. यात फरक इतकाच की काँग्रेसमधला नेतृत्वबदल परिस्थितीच्या रेट्याने हतबल झाल्याने तर भारतीय जनता पक्षातला नेतृत्वबदल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (की सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ?) सत्ताप्राप्तीच्या महत्वाकांक्षेमुळे होतो आहे . देशाच्या स्वांतत्र्य लढ्यात अतुलनीय योगदान असणा-या, १२८ वर्ष जुन्या आणि जाणत्या काँग्रेसचे सत्ताकेंद्र सोनिया गांधी यांच्याकडून राहुल गांधी यांच्याकडे या लोकसभा निवडणुकीत सरकलेले असतानाच देशातील दुस-या क्रमांकाचा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षातले अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे नेतृत्व पर्व संपुष्टात आणले गेले आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.
आणीबाणीच्या नंतर, गेल्या ३५-४० वर्षात काँग्रेसचे नेतृत्व श्रीमती इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी केले. प्रत्येकाची कामाची शैली अर्थातच वेगळी मात्र गांधी नावाचे वलय कायम आणि त्याचे फायदे कॉंग्रेसला सदैव मिळत राहिले. ‘गांधी’ ब्रांडमुळेच काँग्रेसला केंद्रात तसेच अनेक राज्यात प्रदीर्घ काळ सत्ताधारी रहाता आले. राजकारणात सक्रीय असतानाच संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू झाला तर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना प्राणाचे मोल द्यावे लागले. राजीव गांधी यांच्या नंतर ते सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे घेण्याचा कालखंड हा कॉंग्रेससाठी विना गांधी नेतृत्वाचा राहिला. (या काळात नरसिंहराव आणि सीताराम केसरी काँग्रेसचे नेतृत्व केले, हा अपवाद.) पक्षाची होणारी खस्ता हालत तसेच संकोच लक्षात घेऊन आणि खरे म्हणजे त्यामुळे सत्तेपासून वंचित राहावे लागत असल्याचे दु:ख जास्त तीव्र, टोकदार आणि सहन करण्यापलीकडचे असल्याने अनेक तथाकथित ‘धुरंधर’ नेत्यांनी नेतृत्वासाठी गळ घातल्याने सोनिया गांधी पक्षाध्यक्षपद स्वीकारले. राजीव गांधी आणि सोनिया गांधी या दोघांनीही राजकारणाची हौस म्हणून नव्हे तर पक्षाची तसेच पक्षातल्या नेत्यांची अपरिहार्यता आणि अगतिकता म्हणून नेतृत्व स्वीकारले होते हेही विसरता येणार नाही. राजीव यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी प्रदीर्घ काळ राजकारणापासून दूर होत्या. त्यांनी नेतृत्व स्वीकारल्यावरच काँग्रेसला संयुक्त पुरोगामी आघाडी स्थापन करून का होईना केंद्रात सत्ता संपादन करता आली आणि गेली दहा वर्ष मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपद भूषवता आले. आता काँग्रेसच्याच हातून सत्ता जाण्याचे वारे वाहत असल्याचे वातावरण असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी यांनी पक्षाची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे देण्यास सुरुवात केली आहे, गांधी घराण्याची तिसरी पिढी भारतीय काँग्रेसच्या नेतृत्वाचा क्रूस आणि पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज झाली आहे. पक्ष आणि सत्ता यात आपण आणि मनमोहनसिंग अशी विभागणी चाणाक्षपणे केल्याचे दर्शवून सोनिया गांधी यांनी दोन्ही सत्तासूत्रे स्वत:च्या या काळात ठेवली हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य! इंदिरा गांधी ते राहुल गांधी या नेतृत्वाच्या कालखंडात काँग्रेसचा राष्ट्रीय प्रभाव कमी होत गेला हे खरे असले तरी गांधी घराण्याचा करिष्मा मात्र कायम राहिला परिणामी केंद्रात आणि अनेक राज्यातही सत्तेचा मार्ग काँग्रेससाठी कायमच खुला राहिला यात शंकाच नाही. राहुल गांधी यांचे नेतृत्व काँग्रेसला या मार्गावर कायम ठेवण्यात यशस्वी होते किंवा नाही हे कळण्यासाठी जरा वेळ द्यायला हवा .
भारतीय जनता पक्षाची स्थापना कॉंग्रेसच्या तुलनेत खूपच अलिकडची म्हणजे, १९८०च्या डिसेंबरमधली. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हेच वर्तमान भारतीय राजकारणातील एकमेकाचे प्रमुख प्रतिस्पर्धी आणि या दोन्ही पक्षांची स्थापना डिसेंबर महिन्यातीलच; तीही मुंबई शहरातच! आणीबाणीनंतर जनमताच्या रेट्यामुळे स्थापन झालेल्या जनता पक्ष नावाच्या कडबोळ्यात सहभागी झालेल्या जनसंघाचे पुनरुज्जीवन भारतीय जनता पक्ष नावाने झाले मात्र, भाजप तसेच संघ परिवाराला कितीही आवडले नाही तरीही भारतीय जनता पक्ष कायमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय आघाडी म्हणून ओळखला गेला, ओळखला जातो आहे आणि ओळखला जाईल. लोकसभा निवडणुकीत केवळ दोन सदस्य विजयी होण्यापासून ते देशाच्या केंद्र सरकारचे नेतृत्व करण्याची मजल या पक्षाने मारली त्याचे श्रेय अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाला जाते. अटलबिहारी वाजपेयी उदारमतवादी तर लालकृष्ण अडवाणी हे संघाला अपेक्षित असणारे उग्र आणि हिंस्र हिंदुत्ववादी असा ‘दुहेरी तसेच सोयीचा’ मुखवटा चेहे-यावर कायम घालणा-या भारतीय जनता पक्षाने सत्ता संपादनासाठी अनेक कोलांटउड्या मारल्या. भारतीय जनता पक्षाने राजकीय वाटचालीला सुरुवात ‘गांधीवादी समाजवादा’चा आधार घेत केली आणि नंतर राम मंदिरसारखा धार्मिक मुद्दा घेऊन जनमत स्वत:कडे वळविले. जनमत मिळवण्यासाठी धर्माचा आधार घेऊन राष्ट्रव्यापी झालेला हा भारताच्या लोकशाहीतील पहिला आणि एकमेव पक्ष. आता या निवडणुकीत विकास अशी आणखी एक कोलांटउडी या पक्षाने मारली आहे. स्वबळावर सत्तासंपादन करता येत नाही हे लक्षात आल्यावर अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा मवाळ चेहरा घाई-घाईत समोर करून केंद्रात सरकार स्थापन करण्याइतपत मजल तीन वेळा (यापैकी पहिल्यांदा तेरा दिवस, नंतर तेरा महिने आणि नंतर पूर्ण टर्म) या पक्षाने मारली. याचे श्रेय अर्थातच वाजपेयी-अडवाणी यांच्या नेतृत्वाला, अथक परिश्रमाला, संघटन कौशल्याला आणि राजकीय दूरदृष्टीलाही. केंद्रात सरकार असण्याच्या काळात जनमानस तसेच पक्षावर वाजपेयी-अडवाणी यांची निर्माण झालेली पकड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वापेक्षा वाजपेयी-अडवाणी यांची उंचावलेली , उजळलेली तसेच मोठी झालेली प्रतिमा संघाला सहन होणे शक्यच नव्हते. ( अधिक माहिती आणि संदर्भासाठी प्रस्तुत लेखकाचा ‘सुदर्शन यांच्याशी पंगा’ हा लेख ‘दिवस असे की…’ या पुस्तकात किंवा ब्लॉगवर बघावा ) २००४च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सत्तेपासून वंचित राहिला. वाजपेयी सक्रीय राजकारणातून बाजूला झाले, अडवाणी यांच्या हाती पक्षाची सूत्रे एकवटली. पुढची लोकसभा निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली लढवण्याची आणि त्यात विजयी होऊन पंतप्रधान होण्याचे मनसुबे लालकृष्ण अडवाणी यांनी आखले. नंतर संघाच्याही नेतृत्वात आणि त्यामुळे विचार करण्याच्याही दृष्टी व दिशेत बदल झाला … मोहन भागवत सरसंघचालक झाले. दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे अटलबिहारी वाजपेयी पूर्णपणे बाजूला झाले हे पाहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आक्रमक भूमिका स्वीकारली. आधी जीना प्रकरणावरून अडवाणींना कोंडीत पकडले. २००९ मध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाला अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, पंतप्रधान होण्याचे लालकृष्ण अडवाणी यांचे स्वप्न भंग पावले. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी टाकून लोकसभेतले विरोधी पक्ष नेतेपद सुषमा स्वराज यांना देण्यास बाध्य करून अडवाणी यांना जणू काळ्या पाण्यावर जाण्याची शिक्षा ठोठावली. नंतर संघाने राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन गडकरी हा मोहोरा समोर केला आणि अडवाणी यांना आणखी एक शह दिला. नितीन गडकरी नावाचा हा मोहोरा अडवाणी गटाने चीत केल्यावर संघाने भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पुढे केले आणि अपमानित करून अडवाणी यांना मोडीतच काढले. इतके मोडीत काढले की, लोकसभा मतदार संघ निश्चित करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांना नरेंद्र मोदी, राजनाथसिंह यांच्यासमोर नाक घासावे लागले. आणखी एक जुने नेते जसवंतसिंह यांना असे अवमानित केले की ते अखेर पक्ष सोडून गेले. लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठोपाठ सुषमा स्वराज, अरुण जेटली अशा अडवाणी यांच्या ‘गुड बुक्स’मध्ये असणारांची वाट लावली जाणार आणि भारतीय जनता पक्षातले वाजपेयी-अडवाणी पर्व कायमचे संपवले जाणार हे आता स्पष्ट झालेले आहे. त्यासाठी आणखी काही कालावधी लागेल पण, या निवडणुकीने ते संकेत देऊन ठेवले आहेत हे विसरता येणार नाही.
या सर्व घडामोडी लक्षात घेता केंद्रात सरकार स्थापनेसाठी दावा करणा-या देशातल्या दोन प्रमुख राजकीय पक्षातले प्रस्थापित नेतृत्व बाजूला सारणारी निवडणूक म्हणूनही २०१४च्या लोकसभा निवडणुकीची राजकीय इतिहासात नोंद होईल यात शंकाच नाही.
-प्रवीण बर्दापूरकर
09822055799
www.praveenbardapurkar.com/blog