अपेक्षेप्रमाणे राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी पुरस्कृत सरकार विधानसभेत आवाजी बहुमत प्राप्त करते झाले आणि त्याहीपेक्षा जास्त अपेक्षेबाहेर हे बहुमत मिडियात गाजले! इतके की, या आवाजात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले या घटनेच्या राजकीय पैलूकडे मात्र दुर्लक्ष झाले. एक लक्षात घ्यायला हवे की, दिल्लीच्या राजकीय वर्तुळात गोव्याला महाराष्ट्रासोबतच गृहीत धरले जाते. याचे कारण ही राज्ये भौगोलिकदृष्ट्या एकमेकाच्या सीमेला लागून वसलेली आहेत हे जितके खरे आहे तितकेच या दोन राज्याच्या साहित्य कला, संस्कृती, भाषा यांच्यातील अनेक साम्यस्थळे हेही आहे. गोव्याच्या निसर्गरम्यतेणे जगाला भुरळ घातली तरीही तेथील अलिकडच्या दोन-अडीच दशकातील अस्थिर राजकीय परिस्थिती केंद्र सरकार तसेच (सत्तेसाठी सतत आसुसलेल्या) काँग्रेससाठी कायम डोकेदुखी ठरली. कोण कोणाचा पाठिंबा घेऊन राज्यात सत्तारूढ आहे आणि कोण कोणाला विरोध करत सरकार गडगडवत आहे याचे आकलन दिल्लीच्या राजकीय वर्तुळाला पटकन आणि नीटसे होत नसे. चुकून समजा ते झाले… असा सुस्कारा टाकण्याच्या आतच सरकार कोसळलेले असे, इतकी ही अस्थिरता होती आणि ती दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बहुसंख्य वेळा चर्चेचा आणि क्वचित चेष्टेचाही विषय असे. एखादा आमदार फारच राजकीय संभ्रमात असला तर ‘गोव्याच्या आमदारासारखा का वागतोय’ असा सवाल त्याला विचारला जात असे. गोवा राज्यातील ही राजकीय अस्थिरता संपवणारा ‘नायक’ म्हणून मनोहर पर्रीकर यांचे नाव अलिकडच्या काळात दिल्लीत राजकीय सीमारेषा पार करून सर्वतोमुखी झाले. त्यांची स्वच्छ प्रतिमा, साधी राहणी, पारदर्शी कारभार याबद्दल दिल्लीच्या सोशल मिडियात कायम चर्चा झडत असे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या साध्या राहणीबाबत जेव्हा प्रचारवजा चर्चा भक्तीभावाने सुरु करण्यात आली तेव्हा त्याला काउंटर म्हणून भाजपचे समर्थक कायम पर्रीकर यांच्या कथा म्हणा की आख्यायिकांचे दाखले देत असत.
भाजपच्या अध्यक्षपदी नवा चेहेरा आणत अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी युगाचा अस्त करण्याचे ऑपरेशन संघाने करायचे ठरवले तेव्हा अध्यक्षपदासाठी नितीन गडकरी आणि मनोहर पर्रिकर यांची नावे आघाडीवर होती. खरे सांगायचे तर प्रतिमा, वय, अनुभव आणि समंजसपणा या चार निकषावर या प्रक्रियेत सुरुवातीला पर्रिकर यांचे पारडे जरा जडच होते, हे तेव्हा मिडियात प्रकाशित झालेल्या बातम्यांतून स्पष्ट दिसत होते आणि ती वस्तुस्थितीही होती. एका गाफील क्षणी अडवाणी यांच्याबद्दल ‘अतिमुरलेले लोणचे’ अशी कमेंट मनोहर पर्रिकर यांच्याकडून केली गेली आणि मोठा गदारोळ उठला. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (पक्षी : मोहन भागवत) लालकृष्ण अडवाणी यांना न दुखावता ‘ऑपरेशन अध्यक्ष’ यशस्वी करायचे होते आणि पर्रिकर यांनी तर लालकृष्ण अडवाणी यांच्यावरच वार केलेला होता त्यामुळे बिनसले. ‘सर्व संमत सहमतीचा’ उमेदवार म्हणून नितीन गडकरी यांचे नाव समोर आले आणि ते अध्यक्ष झाले. नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वर्तुळात मनोहर पर्रिकर यांच्याऐवजी नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याबद्दल कायम उसासे टाकले जात असल्याचा अनुभव आस्मादिकानी घेतला आहे.
नितीन गडकरी वादग्रस्त ठरले (खरे तर ठरवले गेले!) पक्षाच्या घटनेत त्यांच्या अध्यक्षपदासाठी दुरुस्ती करण्यात आल्यावरही दुसरी टर्म त्यांना मिळू न देण्यासाठी काय आणि कसे राजकारण खेळले गेले हे आता सर्वश्रुत झालेले आहे. असे असले तरी दिल्लीच्या राजकारणात नितीन गडकरी यांनी जम बसवला, राष्ट्रीय राजकारणात प्रतिमा निर्माण केली तसेच दुसऱ्यांदा अध्यक्षपद स्वीकारायचे नाही हे ठरवल्यावर स्वभावाला मुरड घालत शांतपणे काम करत दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमताच्याजवळ नेऊन ठेवले. याच काळात नरेंद्र मोदी यांचा पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणू उदय होत होता आणि त्याला अडवाणी तसेच त्यांच्या गोटाचा म्हणजे सुषमा स्वराज, जसवंतसिंह आदींचा विरोध होता. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी आणि पक्ष, अडवाणी आणि संघ, अडवाणी आणि मोहन भागवत यांच्यातील दुवा म्हणून केलेल्या शिष्टाईच्या कामगिरीने गडकरी यांच्या प्रतिमेला आणखी उजाळा मिळाला. या त्यांच्या शिष्टाईमुळे अडवाणी यांचे तथाकथित बंड आकाराला आलेच नाही ते मिडियातील बातम्यांपुरतेच मर्यादित राहिले. त्यामुळे कोणाला आवडो न आवडो, नितीन गडकरी यांचे नाव पक्षाच्या प्रमुख नेत्यात घेतले जाऊ लागले, पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड, कार्यकारिणी अशा सर्वोच्च समितीत माजी अध्यक्ष म्हणून त्यांचा समावेश कायम होताच. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उदय होण्याआधीच गडकरी यांचे नाव प्रमुख नेत्यात आलेले होते. मोदी आणि गडकरी यांच्यात कोणताही स्पर्धा किंवा तणाव नसला तरी सूक्ष्म अढी असल्याची जी काही चर्चा आहे, त्याची पार्श्वभूमी ही अशी आहे.
नरेंद्र मोदी नावाचा झंझावात भारतीय जनता पक्ष आणि देशाच्या राजकारणात सुरु होण्याआधी आणि सुरु झाल्यावरही प्रारंभीच्या काळात तरी पक्षाला २०० तरी जागांचा पल्ला गाठता येईल किंवा नाहे याबद्दल साशंकता होती. जर पक्षाला लोकसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाही तर अन्य काही काही पक्षांची एनडीए नावाची मोळी बांधून लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी म्हणून पर्याय म्हणून राजनाथसिंह यांना बाशिंग बांधण्यात आलेले होते. ( घटक पक्ष त्या परिस्थितीत राजनाथसिंह यांच्याऐवजी आपल्या नावाला पसंती देतील ही आशा बाळगून नितीन गडकरी यांच्या शिष्टाईला प्रतिसाद देत बंडाची अर्धवट उपसलेली तलवार अडवाणी यांनी म्यान केली होती!) मात्र, नरेंद्र मोदी यांनी पक्षातील आणि पक्षाबाहेरील प्रतिस्पर्ध्यांचे एकूणएक अंदाज पार धुळीला मिळवत स्वबळावर बहुमत प्राप्त केले. नितीन गडकरी यांनी नाही म्हणताच राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी अमित शहा यांची प्रतिष्ठापना करून सरकार आणि पक्ष अशा दोन्ही आघाड्यांवर मांड ठोकली. पक्षाध्यक्ष म्हणून ज्या राजनाथसिंह आणि नितीन गडकरी यांना एकेकाळी नरेंद्र मोदी यांनी ‘रिपोर्ट’ केले त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक मंत्री म्हणून ‘रिपोर्ट’ करण्याची वेळ आता राजनाथसिंह आणि नितीन गडकरी यांच्यावर आलेली आहे; राजकारणात हे घडतच असते आणि ते अपरिहार्यही असते. राजनाथसिंह आणि गडकरी यांना जरी त्यांच्या मताप्रमाणे हवी असलेली खाती पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी बहाल केलेली असली तरी सत्तेच्या तरी स्पर्धा वृत्ती काही त्यामुळे लोप पावत नाही. त्यातही एक ठळक बाब म्हणजे राजनाथसिंह यांना आज लगेच थेट हात लावणे मोदी यांना शक्य नाही कारण, उत्तर भारतातल्या राजकारणात राजनाथसिंह यांचा प्रभाव उल्लेखनीय आहे, त्यांचे पाठीराखे पक्षातही मोठ्या संख्येने आहेत. त्या तुलनेत नितीन गडकरी यांचे दिल्लीच्या राजकारणातील वय आणि प्रभाव कमी आहे. शिवाय आजवरचा राजकीय इतिहास लक्षात घेता त्यांचे ‘मराठी’पण आड येणारे आहेच. नरेंद्र मोदी यांना आत्ताच कोणते आव्हान मिळणार नसले भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सत्तेच्या दालनातील अदृश्य ताण-तणाव हे असे आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकर यांचा प्रवेश झालेला आहे आणि त्यामागे नरेंद्र मोदी यांची तिरकी चाल आहे!
मनोहर पर्रिकर जरी गोव्याचे असले तरी ते महाराष्ट्राचेही आहेत असे कायम समजले गेले आणि जाते. पर्रिकर यांना थेट संरक्षण मंत्री करून त्यांना सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळात स्थान देण्यामागे मोदी यांची राजकीय चाल नितीन गडकरी यांना चाप लावणे ही असल्याची चर्चा आता वेग पकडू लागली असल्याचे मूळ हे आहे. मनोहर पर्रिकर यांचा दिल्लीच्या राजकारणातला प्रवेश करवून नरेंद्र मोदी यांनी नितीन गडकरी यांना जसा शह दिला तसाच योग्य वेळ येताच ते राजनाथसिंह यांनाही शह देतील यात शंकाच नाही. एकीकडे पर्रिकर यांच्या कार्यक्षमता, स्वच्छ प्रतिमा यांचा वापर केंद्र सरकारात करून घेण्याची भाषा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात तसेच मुशीत तयार झालेल्या स्वयंसेवकाची नियुक्ती थेट संरक्षण मंत्री करून संघाला खूष करणे आणि दुसरीकडे सरकारमध्ये माझ्या विश्वासातील नंबर दोन पर्रिकर आहेत असा संदेश पक्ष पातळीवर देत राजनाथ आणि गडकरी यांना ‘योग्य’ इशारा देणे असे दोन पक्षी नरेंद्र मोदी यांनी एकच बाण मारून साध्य केले आहेत.
थोडक्यात काय तर, दिल्लीत एकदा बस्तान बसवल्यावर मंत्री मंडळाचा पहिला विस्तार करताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच स्वत:चाही अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे. ही केवळ सुरुवात आहे… आगे आगे देखो होता है क्या!
=प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com