लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान आता नजरेत आलेले आहे आणि त्यात दिल्लीच्या सातही जागा आहेत. त्यामुळे उर्वरित सर्व टप्प्यातील उमेदवार जाहीर झाले आणि पहिल्या टप्प्यातले मतदान संपले आणि की दिल्लीतील राजकीय वर्दळ शांत होईल ती थेट मे महिन्याच्या १०-१२ तारखेपर्यंत. तोपर्यंत कोण सत्तेत येणार याचा साधारण अंदाज आलेला असेल आणि कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास (ती शक्यता जास्त आहे ) निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्ली राजकीय घाईत आकंठ बुडून जाईल. आता म्हणजे, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हवामान दिवसा किंचित गरम आणि रात्री सुखद गारवा, असे असले तरी राजकीय आघाडीवर मात्र २४ तास हवा गरमच आहे. प्रत्येक जरी नाही तरी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षात तरी प्रत्येक यादी जाहीर होण्याआधी दबाव, शह-काटशह, लॉबिंगचे राजकारण जोरात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ लोकसभा मतदार संघात शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी मिळवून देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना कात्रजचा घाट दाखवला याचे राजकारणातील जाणकारांना आश्चर्य वाटलेले नाही! दिल्लीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात होणा-या सर्व राजकीय मोहिमांचे, विरोधी खेळीचे सूत्रधार माणिकराव ठाकरे असतात हे जगाला कळते आणि पृथ्वीराज चव्हाण यांना नाही, असे नाहीच. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी संबध मधुर असल्याने माणिकराव ठाकरे यांच्या विरोधातली एकही मोहीम यशस्वी होत नाही, हेही काही पृथ्वीराज चव्हाण यांना समजत नाही असे तर मुळीच नाही. फक्त ते आपल्याला माहित नाही, असे पृथ्वीराज चव्हाण दाखवतात आणि वेळ आल्यावर जशी महाराष्ट्रात राष्ट्रवादीवर कुरघोडी करतात तशी त्यांनी यावेळी माणिकराव ठाकरे यांची केली. आदर्श अहवाल दडपण्याचा प्रयत्न झाला तेव्हाच नांदेड लोकसभा मतदार संघात अशोक चव्हाण यांना काँग्रेस उमेदवारी देणार हे संकेत मिळालेले होते. ‘समझनेवाले अशोक चव्हाण सब समझ गये थे’ म्हणूनच ते उमेदवारीबाबत संयमाने वागत होते. औरंगाबादला राहुल गांधी यांच्यासोबत अशोक चव्हाण व्यासपीठावर येणे हा काही योगायोग नव्हता तर ते ठरवून करण्यात आलेले होते. याशिवाय चिदंबरम यांनी लोकसभा निवडणूक न लढवणे, काँग्रेसचे वाचाळ-ए-आलम दिग्विजयसिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढण्यास कां-कू करणे, मनीष तिवारी यांनी निवडणुकीतून माघार घेणे या अपेक्षितच घडामोडी होत्या. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे लेबल बदलेली मद्याची बाटली असणार हेही उघड होते त्यामुळे त्यावर फार मोठी चर्चा मिडियात घडली नाही म्हणा की घडवून आणली गेली नाही म्हणा, दोन्ही सारखेच आहे. काँग्रेसमध्ये यापेक्षा जास्त काही बातम्या मिळणार नाहीत हे अपेक्षितच होते कारण विजयाच्या शर्यतीत हा पक्ष आहे असे मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरु झालेला असला तरी दिल्लीचा सट्टा बाजार मान्य करायला तयार नाही शिवाय देशातील बहुसंख्य उद्योगपतींना नरेंद्र मोदी यांना सत्तेत आणण्याची घाई झालेली आहे हे वास्तव आहे.
साहजिकच घडामोडी सध्या भारतीय जनता पक्षाच्या गोटात जास्त आहेत आणि म्हणून बातम्याही. भाजपात होणा-या निर्णयांचे आणि त्यामुळे बातम्यांचे केंद्रही नरेंद्र मोदी हेच आहेत. कोणत्याही परस्थितीत सत्ता प्राप्त करावयाची असल्यानेच हरिभाऊ जावळे (जळगाव) यांची उमेदवारी जाहीर झाल्यावरही विजयाचा निकष लाऊन कापली गेली. मी दिल्लीतून निघालो तेव्हा भाजपचे एकेकाळी लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे लालकृष्ण अडवाणी हवा तो मतदार संघ मिळवण्यासाठी अगतिक झालेले होते. मोदी आणि राजनाथसिंह यांनी लालकृष्ण अडवाणी यांचा पूर्ण चिवडा करू टाकला आहे आहे आणि ते पाहणे ( आस्मादिक हिंदुत्ववादी नसले तरी ) वेदनादायी होते…! तेच हाल मुरली मनोहर जोशी आणि जसवंतसिंह यांचे झालेले होते. पत्रकारांशी बोलताना जसवंतसिंह यांच्या डोळ्यात चक्क अश्रू दाटून आलेले होते. जुने-जाणते कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकारही त्याबद्दल हळवा सूर काढत होते तर नवीन पिढीतील कार्यकर्ते (म्हणजे अर्थातच ‘हर हर मोदी’ ही घोषणा देण्यासाठी उतावीळ झालेले मोदी समर्थक!) तसेच पत्रकारही ‘मोदींना त्यांची टीम निवडण्याचा अधिकार मिळायला हवाच’ असे समर्थन करत होते. थोडक्यात काय तर, भारतीय जनता पक्षाचे ‘श्रेष्ठी’ बदलल्याचा संदेश देणारी निवडणूक म्हणून या लोकसभा निवडणुकीची आणखी एक ओळख कायम राहील हे मात्र नक्की.
जसवंतसिंह यांनी बारमेर लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यावर दिल्लीतील एका समकालीन आणि समवयीन मित्राच्या नुकत्याच पदव्युत्तर पदवी घेतलेल्या मुलग्याशी गपा मारण्याची संधी मिळाली. हे कुटुंब तसे भाजपानुकुल आहे आणि राजकीय वाद-प्रतिवाद करताना ही बाब लपवून न ठेवण्याइतका मोकळेपणा त्यांच्यात आहे. मूळ विषय असा की, मित्राचा मुलगा म्हणाला, ‘काका, या लोकसभा निवडणुकीत देशात ८३ कोटीवर मतदार आहेत. त्यापैकी वयाच्या तिशीच्या आतील मतदार २९ कोटीपेक्षा थोडेसे जास्तच आहेत आणि वयाच्या साठीपार असणारे सर्व मतदार १० कोटीच्या आसपास आहेत . तुम्हाला जे कोणी पंतप्रधान म्हणून हवे आहेत किंवा ज्याना पंतप्रधान होण्याची इच्छा आहे किंवा ज्यांची नावे या पदासाठी घेतली जातात किंवा जे कोणी ज्येष्ठ विविध पक्षीय नेते आज देशाच्या राजकारणात अग्रणी आहेत ते सर्व वयाची सत्तरी पार केलेले आहेत. या नेत्यांची यादीही आम्ही तयार केलेली आहे. आम्हाला आमच्या आवडीचा नेता निवडू द्या आता. ३५ टक्के इतके बहुमत असलेल्या आम्हा तरुण मतदारांना, आमच्या आवडीचा नेता निवडण्याच्या अधिकार मिळणार आहे का नाही ? तुम्ही वयाची साठी पार केलेले मतदार आमच्यावर तुमचा नेता कायम लादतच राहणार का ?’
मित्राच्या चिरंजीवांचा हा प्रश्न निरुत्तर करणारा नसला तरी नवीन मतदार कोणत्या दिशेने विचार करतात याची जाणीव करून देणारा होता यात शंकाच नाही. त्याने दिलेली देशातील आघाडीवरील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची यादी अशी , कंसात त्या नेत्याचे वय – अटलबिहारी वाजपेयी (८९), मनमोहनसिंग (८१), लालकृष्ण आडवाणी (८१), मुरली मनोहर जोशी (८०), मोतीलाल व्होरा (८५), मुलायमसिंग (७५), जसवंतसिंह (७६), शरद पवार (७३ ),करुणानिधी (८९), जयपाल रेड्डी (७२), जॉर्ज फर्नांडिस (८२) , सुशीलकुमार शिंदे (७२), शिवराज पाटील-चाकूरकर (७८), प्रकाशसिंग बादल (८६), बासुदेव आचार्य (७१), गुरुदास गुप्ता (७७), सिसिर अधिकारी (७२), डॉ. फारुख अब्दुल्ला (७६). यापैकी अटलबिहारी वाजपेयी आणि जॉर्ज फर्नांडिस आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून बाद झाले आहेत तर मनमोहनसिंग आता (इलाजच नसल्याने) निवृत्त होणार आहेत. उर्वरित सर्व नेते वयाची सत्तरी पार केलेले आहेत. अडवाणी यांच्यासारख्या बुझुर्ग नेत्याने पक्ष उभारणीसाठी केलेला त्याग, त्यांनी राजकारणात हे स्थान प्राप्त करण्यासाठी उपसलेले अफाट कष्ट याची जाणीव तरुण पिढीला नाही असेही नाही पण, ‘थिस इज परफेक्ट टाईम टू एंड द इंनिंग’, असे त्यांना वाटते.
‘आता भारतातही पंतप्रधानपदासाठीच नाही तर खासदार-आमदार होण्यासाठी वयाची अट असली पाहिजे आणि निवृत्तीचे वयही नक्की केले पाहिजे. राजकीय विचारापेक्षा देशहित, विकासाची दृष्टी आणि स्वच्छ प्रतिमा महत्वाची मानली गेली पाहिजे’, मित्राचा मुलगा म्हणाला.
‘तुला काय राहुल गांधी पंतप्रधान म्हणून हवे आहेत काय?’ मी विचारले
‘वुईल नॉट डिस्क्लोज इट, आम्हाला काय वाटतं ते सांगितलं’, तो म्हणाला. मित्राच्या घरून बाहेर पडताना तरुणांना काय वाटते हे जसे मला उमगले होते तसेच या वयोगटातील मतदारांचा देशाचे नेतृत्व कोणी करावे याबाबतचा दृष्टीकोन (आमच्या पिढीपेक्षा अ-राजकीय आणि) ठाम कसा आहे हेही कळलेले होते. राजकारणी हे लक्षात घेणार आहेत का ?
-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क- ९८२२०५५७९९