अंधाराची फुलं…

बेगम हयात असती तर आज , ९ डिसेंबरला तिचा ६७वा वाढदिवस आम्ही साजरा  केला असता… 
〈 या वर्षी दिवाळी अंकासाठी फारच कमी लेखन केलं .
त्यात एक लेख अविनाश दुधे याच्या आग्रहामुळे ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंकासाठी  ‘मी आणि माझं एकटेपण’ या परिसंवादासाठी लिहिला .
माझ्या एकटेपणाचा संबंध केवळ कोरोनाशी नाही तर , बेगम -मंगलाचा प्रवास जसजसा मृत्यूच्या दिशेने सुरु झाला तसतसं माझ्यावरचं एकटेपणाचं सावट गडद होत गेलं .
हे लेखन  केवळ त्या एकटेपणाचं नाही तर , त्यात आमच्यातलं समंजस सहचर्यही कांही प्रमाणात आलेलं  आहे .〉
याच्या १३ व्या वर्षीच घराबाहेर पडल्यापासून ते विवाह होईपर्यंत म्हणजे , वयाची तिशी पार करेपर्यंत मी एकटा होतो . मात्र , हे विधान तसं अचूक आहे असं नाही कारण मी एकलकोंडा किंवा एकांतप्रिय नाही तर  मित्र , पुस्तक , गाणं , झाडं यात रमणारा आहे . त्यामुळे या १६-१७ वर्षांत दिवसा माणसांच्या गराड्यात असे . रात्रीही अनेकदा कुणी ना कुणी मित्र सोबतीला असे . तरी अनेक रात्री एकटेपण वाट्याला येत असेच पण , या एकटेपणात विरहाची उदास गाणी आळवावीत किंवा माई म्हणजे आईच्या आठवणींनी कातर व्हावं , असंही कधी घडलं नाही , याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वाचन आणि श्रवणाची असलेली सवय .
यापूर्वी अनेकदा लिहिलंय – वाचनाचा संस्कार माईकडून माझ्या वयाच्या सात-आठव्या वर्षीच झाला . गाणं ऐकणं कुठून आलं ते आठवत नाही पण , आमच्या पिढीच्या वयाचा तो काळ विशेषतः हिंदी चित्रपटांतील अवीट चालीच्या गाण्यांचा सुवर्णकाळ होता . त्यातून उपशास्त्रीय , शास्त्रीय गायन तसंच गझलकडे कधी ओढला गेला आणि श्रवणानंद घेऊ लागलो , हे समजलंच नाही . नंतर विवाह झाल्याच्या काळातही वाचन हा श्वास होता आणि त्या श्वासाची वाटेकरी बेगम मंगलाही होती . अनेकदा मी अक्षरक्ष: पहाटे चार–पाच वाजेपर्यंत वाचत असे ; त्या जागरणाचा कोणताही परिणाम दिवसाच्या कामावर होत नसे . वयाच्या चौदा ते साधारण पन्नाशीचा हा काळच मुळी माझ्यातल्या वाचनाला आलेल्या बहराचा होता असं म्हणायला हरकत नाही . बहुसंख्य वेळा वाचन आणि श्रवण एकाचवेळी सुरु असे . या काळात वाचलेल्या पुस्तकांची आणि विषयांची यादी करायची म्हटलं तर हा लेख त्यासाठीच खर्च होईल .
याचा अर्थ वयाच्या पन्नाशीपर्यंत वाट्याला कधीकाळी एकटेपण आलंच नाही असं नाही , पण ते वाचन आणि श्रवणात कधी विलीन झालं हे लक्षातच आलं नाही .  ख-या अर्थानं एकटेपणा वाट्याला आला तो सप्टेंबर २०१७ पासून . बेगम म्हणजे माझी पत्नी मंगला असाध्य पार्किसन्स आणि पक्षाघात म्हणजे ( progressive supra nuclear plasy ) या दोन आजारांची शिकार ठरल्यावर .         क्षणा-क्षणानं तिची मृत्यूकडे वाटचाल सुरु होती आणि कणा-कणानं तिचं शरीर कंपवात व पक्षाघाताच्या विळख्यात जखडलं जात होतं . २०१७च्या सप्टेंबरमध्ये एका दिवशी रात्री तिला खूप जोरदार ढास लागली ; इतकी जबरदस्त की , तिच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहू लागले . मी तिच्या पाठीवरुन एक हात फिरवत होतो आणि माझा एक हात तिनं घट्ट धरुन ठेवला होता . काही वेळानं ती जीवघेणी ढास शांत होत गेली . काही वेळ शांततेत गेल्यावर बेगम म्हणाली , ‘मला एक प्रॉमिस दे , आता यानंतर मी शेवटचा श्वास घेईपर्यंत तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस . मी आता या घरातसुद्धा एकटी राहू शकत नाही .’’
चित्र- विवेक रानडे
तिचं म्हणणं माझ्यासाठी अनपेक्षित , धक्कादायक आणि सुन्न करणारं होतं . आपण दररोज मृत्यूच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकतो आहे , याची पूर्ण जाणीव बेगमला होती . कारण तिचे सर्व वैद्यकीय अहवाल तिनं वाचलेले होते . मृत्युच्या दिशेनं विलक्षण निर्धारानं बेगमची वाटचाल सुरु होती . येणा-या मृत्यूच्या संदर्भात कोणतंही भय तिच्या ना डोळ्यांत होतं ना सर्वस्व हरवल्याची तिची देहबोली होती .
मनाला आलेला सुन्नपणा ओसरल्यावर आमच्या अतिशय समंजस सहचर्याची तोवर झालेली सुमारे ३३ वर्षे डोळ्यांसमोर तरळली . अन्य कुणाच्याही संसारात असतं तसं परस्परांसाठी केलेलं समर्पण आमच्यतही होतं . फरक इतकाच की , या समर्पणाचा कधी उच्चार केला गेला नव्हता तर एकमेकांच्या मनात त्या विषयी कृतज्ञता होती . माझ्या मनात ही कृतज्ञता जास्तच होती , कारण तिचं समर्पण माझ्यापेक्षा जास्त होतं . मराठवाड्यासारख्या दुष्काळी प्रदेशातून आलेल्या , अत्यंत अभावग्रस्त भावजीवन जगलेल्या , रोजगार हमी योजनेवर काम करुन शिक्षण घेतलेल्या , पुरेसा पगार न मिळणारी पत्रकारिता करणारा पण , डोळ्यांत उमेद आणि वर्तनात दृढ निर्धार असणा-या माझ्यासारख्या एका भणंगाच्या प्रेमात , आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातील ही मंगला आली आणि माझी बेगम झाली . माझ्या जगण्याला आकार , रुप , जगण्यात स्थैर्य आणि समाधान आलं . हे सर्व तिनं न बोलता केलं . त्यामुळेच बेगमविषयी माझ्या मनात कायमच डोहखोल कृतज्ञता होती . आमच्या सहचर्याला आत्यंतिक समंजसपणाची बेगम ही झालर होती . माझ्यातला सगळा स्खलनशील वांडपणा तिनं मुकाट सोसला , अनेकांना उद्धटपणासदृश्य वाटणारा माझा स्पष्टवक्तेपणा तिनं अलंकारापेक्षा जास्त मिरवला , आम्ही सोबत जगताना माझे दोन निर्णय साफ चुकले आणि जोरदार फटका बसला पण , तिनं निराश न होता उमेदीचा प्रकाश कायम तेवता ठेवला…हे सगळं आठवत त्या रात्री त्या सहजीवनाची अनेक दृश्य , अनेक गूजं डोळ्यांसमोर आली .
आमच्या सहचर्याची आणखी एक उपकथा इथे सांगायला हवी–बेगम आणि माझं सहजीवन एका सरळ रेषेत आणि आनंदाने सुरु होतं हे म्हणणं भंपकपणा ठरेल ; तसं म्हणणार्‍यांची आम्ही यथेच्छा टवाळी करत असूत . कोणतंच आणि कोणाही सोबत जगणं  एका रेषेत आणि कायम आनंदात नसतं , मानवी जगण्याच्या वाटेवर वळणं आणि चढ-उतार ही अपरिहार्य असतात आणि ते तसे आमच्याही जगण्यातही होते . तरी एकमेकासाठी आपण शुभ शकुनाच्या ओल्या रेषा आहोत , यावर आम्हा दोघांचं एकमत होतं . वाद , प्रतिवाद , राजकीय मतभेद अशा वाटा आणि वळणांवरचा आम्हा दोघांचा तो  शकुनाचा प्रवास होता मात्र , त्यात  बेबनाव परस्परांविषयी अविश्वास किंवा नफरत मुळीच नव्हती . बहुसंख्य वेळा शब्दांचे  मुळार्थ , व्याकरणाच्या दृष्टीने चूक–अचूक लेखन , एखादं गाणं किंवा गायन दोघांपैकी एखाद्याला आवडणं आणि दुस-याला न आवडणं , ही आमच्यातल्या वादाची कारणं असत . आमच्या संसारात ‘भांड्याला भांडं’ नाही तर ‘शब्दाला शब्द’ लागून आवाज  होतो , असं आम्ही नेहमीच गंमतीनं म्हणत असू . असा प्रत्येक वाद , मतभेद किंवा आणखी काही कलह असेल तर त्याचा शेवट कसा करायचा हे आम्ही दोघांनी लग्नाआधीच ठरवलेलं  होतं . सकाळी लवकर जाग ज्याला येईल , त्यानं निद्रेत असणा-याच्या कपाळाला हलकेच किस करायचं , सॉरी म्हणायचं आणि आदल्या दिवशी काय झालं ते इतकं गडद विसरायचं की , पुन्हा त्याचा आठवसुद्धा आला नाही पाहिजे . सकाळी लवकर उठण्याची पाळी बहुसंख्य वेळा माझीच असे . त्यामुळे हे सॉरी म्हणणं माझ्याकडूनच जास्त वेळा घडलं . त्याही दिवशी सकाळी मी उठलो . झोपेच्या औषधाच्या प्रभावाखाली बेगम शांतपणे झोपलेली होती . तिच्या कपाळावर हलकेच ओठ ठेवत प्रॉमिस केलं की , तिला सोडून मी घराबाहेरही पडणार नाही .
सकाळची लगबग संपल्यानंतर पुढील दोन–तीन महिन्यांसाठी स्वीकारलेले कार्यक्रम , व्याख्यानं , भाषणं , दौरे असे सर्व कार्यक्रम रद्द केले . त्यासंदर्भात सर्व संबंधितांना असमर्थता कळवून दिलगिरी व्यक्त केली . पक्कं आठवतं ती तारीख  २० सप्टेंबर होती . त्यानंतर म्हणजे ६ मार्च २०२० ला बेगमनं अखेरचा श्वास घेईपर्यंत मी केवळ तीनच वेळा घराचा उंबरठा ओलांडला . बेगमच्या निधनानंतर लगेच कोरोनाचा कहर सुरु झाला . २० ऑक्टोबर २०१७पासून सुरु झालेला माझा एकटेपणा २०२० चा सप्टेंबर महिना संपला तरी संपलेला नाहीये .
बेगम आणि कॅन्डी , दोघंही आता हयात नाहीत …
एव्हाना मंगलाची सर्व सुश्रूषा मी एकटाच करत होतो . यात सकाळी ब्रश करणं ते रात्री झोपायला नेणं असा कामाचा तो व्यापक पट होता . दिवसातून तीन वेळा कपडे बदलणं , गंध-पावडर , विशिष्ट परफ्यूम हा तिचा कांटेकोरपणा अनेकदा जाचक वाटत असे . तरी त्यामुळे आलेल्या एकाकीपणाची टोचणी जाणवत नव्हती .  स्वयंपाकासाठी मात्र बाई होती . १ एप्रिल २०१८ ला डॉक्टरांनी बेगमला व्हिलचेअरवर शिफ्ट केलं कारण कंपवात आणि पक्षाघात यांनी घातलेला तिच्या देहाला घातलेला विळखा घट्ट होत चालला होता . बेगम मंगलाचा मेंदू मात्र ठणठणीत होता . हे आश्चर्यजनक होतं . ती वाचत होती . टॅबवर तिच्या आवडीची नाटकं पाहात होती , संगीताच्या मैफली ऐकत होती . संतूर आणि बासरी वादन ऐकण्यात तिला कायमच रस असायचा . कुमार गंधर्व , वसंतराव देशपांडे यांचं गायन तिला आवडायचं . तिला अशात तिला राशीद खान यांचं गाणं जास्तच आवडू लागलेलं होतं . आरती प्रभू , ग्रेस यांच्या तिच्या आवडीच्या कविता ती नियमित ऐकत असे . महेश एलकुंचवार यांचं ‘मौनराग’ तिच्या उशाशी कायमच असे . तिचं हे असं आत्ममग्न होत जाणं आणि न घाबरता मृत्यूच्या स्वाधीन होणं माझी अस्वस्थता वाढवत होतं . मला एकाकीपणाकडे ढकलत होतं . बेगम व्हिलचेअरवर गेल्यावर तिच्या सुश्रूषेसाठी २४ तास नर्सेसची नियुक्ती झाली . मी कामातून मोकळा झालो पण , अक्षरशः एकाकीपणाच्या गर्तेत कोसळलो .
या एकाकीपणातून मार्ग तर काढायला हवा होता , पण काही सुचत नव्हतं . सोबतीला मित्र होते . ते सर्व डॉक्टर होते , पण मार्ग निघत नव्हता . वयाच्या पन्नाशीनंतर मला ज्याचा उल्लेख मी नेहेमीच ‘मंतरलेलं सोनेरी पाणी’ असा करतो त्या ड्रिंक्सची आवड निर्माण झाली . अलीकडच्या १२–१५ वर्षात ती अंगी रुळली . तोवर असंख्य दुर्मिळ व्हिस्की माझ्याकडे जमा झालेल्या होत्या . एखादं-दीड पेग घ्यावा . तो घेताना वाचणं , ऐकणं  किंवा लिहिणं मला मनापासून आवडायचं . मात्र , टोकाचं एकाकीपण जाणवत असूनही मदिरेच्या आहारी जावं असं मुळीचं  वाटलं नाही . हळूहळू मंगलाची वाचाही क्षीण होत गेली कारण जडशीळ होत जाणा-या जीभेमुळे तिला बोलणं बंद होऊ लागलं . तरी डोळे आणि स्पशार्तून ती काय म्हणत असे , हे मला तरी कळत असे . ’शब्दावाचून कळले सारे’ अशी ती अवस्था जीवाची घालमेल वाढवणारी होती . तिच्या व्याकुळल्या नेत्रात माझा एकाकीपणा विरघळून जात असे . न व्यक्त करता येणारा विलक्षण असा कोंडमारा त्या काळात झालेला होता .
मग , पहाटे जाग आल्यावर राहिलेले लेखनाचे प्रकल्प हाती घेतले . पर्यायच नव्हता . मला गाता येत नाही , नृत्य करता येत नाही . चित्र करता येत नाही आणि मूर्तीकलाही ज्ञात नाही . तोवरच्या ६२–६३ वर्षाच्या आयुष्यात लळा लागला तो केवळ शब्दांचा . खेळता येत होतं ते शब्दांशी , मन रमत होत तेही शब्दांतच . मात्र , वाचनाचा मूड लागत नव्हता . याच काळात ‘डायरी’ , ‘नोंदी डायरीनंतरच्या’ , ‘क्लोजअप’ या पुस्तकांचं पुनर्लेखन आणि संपादन केलं . मराठी पत्रकारितेतील महिला पत्रकारांची जडणघडण शब्दबध्द करणारा ‘माध्यमातील ती‘ हा प्रकल्प केला. ‘डायरी’ आणि ‘नोंदी डायरीनंतरच्या’ ही दोन्ही पुस्तकं एकत्र केली . ‘डायरी‘ , ‘क्लोजअप‘ आणि ‘माध्यमातील ती‘ ही तिन्ही पुस्तकं देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केली . त्याचा प्रकाशन समारंभ करावा आणि महाराष्ट्रातील मंगलाच्या आवडत्या मित्र–मैत्रिणींना त्यासाठी बोलवावं असं ठरलं . आमचे प्रिय महेश एलकुंचवार , डॉ. सुधीर रसाळ , सेवानिवृत्त न्यायमूर्ती नानासाहेब उपाख्य नरेंद्र चपळगावकर , महात्मा गांधी मिशान विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम हेही त्या समारंभात ममत्वानं सहभागी झाले . व्यासपीठावर त्यांच्यासोबत मी नव्हे तर बेगम बसलेली होती . त्याप्रसंगी तिनं एक मनोगत मांडलं . ते मनोगत छोटसं आहे , पण तिच्यात असलेली  भाषेची जाण आणि व्यक्त होण्यातला व्यापक ताकदीचा समंजसपणा स्पष्ट करणारं ते मनोगत होतं . तिनं मजकूर डिक्टेट केला . मी तो ऑपरेट करुन तिला दाखवला . त्या ऑपरेट केलेल्या मजकुरातील एक व्याकरणाची चूक दुरुस्त करताना तिनं दोन शब्द गाळले आणि अगदी मोजून दोनच शब्दांची भर टाकली . मजकूर संपादित करताना जितके शब्द गाळले तेवढ्याच शब्दांची भर घातली जावी असा तिचा संपादक म्हणून नेहमीच आग्रह असायचा . शेवटच्या दिवसांतही शेवटपर्यंत ती त्यापासून ढळलेली नव्हती . सायलीनं ते मनोगत वाचून दाखवलं आणि ते ऐकल्यावर सा-यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या…
♦♦♦♦
त्या मनोगतात बेगम म्हणाली –
माझं बोलणं आपणा सर्वांच्या लक्षात येणार नाही म्हणून सायली हे दोन शब्द वाचून दाखवत आहे.
आपण सर्व अगत्यानं आलात , त्याबद्दल आभारी आहे असं कसं म्हणू ? जीवाभावाच्या मित्रांचे आभार कसे आणि कोणत्या शब्दात मानता येतील ?
बाहेर संध्याकाळ दाटून आलीये ; ही दिवेलागणीची वेळ पण , या आजारपणामुळे  खरोखरच्या संध्याछाया दाटून आल्या आहेत असं मला वाटतंय…
तुम्ही आलात , खूप वर्षांनी भेट झाली , खूप आनंद झाला .
तुम्हा सर्वांच्या भेटीतून मन जुन्या दिवसांच्या प्रदेशात उडत गेलं , अनेक आठवणींची किलबिल ऐकू आली , जीवाला उभारी   मिळाली .
लव्ह यू ऑल .
असंच भेटत राहू यात आपण .
नमस्कार 
♦♦♦♦
बेगम जरी निर्भयानं मृत्यूच्या स्वाधीन होत असली तरी तिला मृत्यूच्या अधीन व्हायचं नव्हतं , हे तिच्या मनोगतातून स्पष्ट होत होतं . पुढं जगण्यासाठी तिनं त्या मनोगतात लावलेला आशेचा सूर कातर करणारा होता . त्या कार्यक्रमानंतर मी आणखी एकाकी झालो , कारण बेगम अंथरुणाला खिळलीच .
एकाकीपणाच्या काळात मी घरातल्या बारीक-सारीक गोष्टीत एखाद्या गृहिणीसारखं लक्ष देऊ लागलो . अपवाद फक्त स्वयंपाकाचा . गृहिणीचं काम किती अवघड आणि किती कौशल्याचं असतं हे मला त्या तीन-पावणेतीन वर्षांत उमगत गेलं आणि प्रत्येक गृहिणीविषयी आदराची भावना दृढ होत गेली . त्याविषयी याआधीच लिहिलंय म्हणून पुन्हा पुनरावृत्ती टाळतो . विशेष म्हणजे स्वत:च्या

बेगम मंगला – २०१७च्या ऑक्टोबरमध्ये

बाबतीत खूप शिस्तबद्ध , नीटनेटकेपणा अंगात असूनही कुटुंब म्हणून जगताना त्यासाठी होणारी गृहिणीची अविश्रांत धडपड जाणवली . हा या एकाकीपणाचा फायदाच होता . पहाटे तीन साडेतीनला एकदा उठायची मंगलाची सवय होती . ती आजारी झाल्यापासून त्यावेळी मीही जागा होऊन तिला मदत करु लागलो . रात्रीची नर्स आल्यावर माझ्या  मदतीची गरज नव्हती पण , मला जाग येत असे . एकदा जाग आली की , पुन्हा झोप न येणं ही खोड माझ्यात आहे . मग त्यावर तोडगा म्हणून बेगमला पुन्हा एकदा झोपवल्यावर मी कामाला बसू लागलो . कित्येकदा लेखनाचा विषय सुचला नाही तर वॉर्डरोब आवरणं किंवा फर्निचर पुसणं , पुस्तकं नीट लावणं असं काहीतरी काम मी करत बसत असे . या काळात ‘दिवस असे की’ या माझ्या  पुस्तकात आणखी सुमारे १६हजार शब्दांची भर घातली गेली . पत्रमहर्षी अनंतराव भालेराव स्मृती ग्रंथही याच  काळात सिद्ध झाला . असं बरंच काही या एककीपणात घडत गेलं ; एक प्रकारे ती इष्टापत्तीच ठरली म्हणा . घरात जिता जागता माणूस आहे . तो आपल्या जीवाभावाचा आहे . तो आणि आपण एकमेकांत विरुन गेलेलो आहोत पण , त्याच्या मरणाची छाया घरावर पसरलेली आहे…एकाकीपणाचं हे रुप आणि त्याला सामोरं जाणं नेमकं कसं व्यक्त करता येणार ? असं वाटायचं तो खूप घनगर्द दाटून आलेला अंधार आहे . तो आपण पिऊन टाकला आहे आणि स्वत:ला जमिनीत गाडून घेतलंय . तो अंधार आणि आपण , याचं एक झाड झालयं . ते झाड बहरुन त्याला अंधाराचीच फुलंलं आलेली आहेत…असं ते सगळं अमूर्त फिलिंग दाटून आलेलं असायचं, श्वास कोंडला जायचा , नाडीच्या ठोक्यांची गती आणि आवाज वाढल्याचं स्पष्ट ऐकू यायचं…ते कुणाच्याही वाट्याला न येवो .
सप्टेंबर २०१९ पासून बेगम अधूनमधून कोमात जाऊ लागली . डिसेंबरनंतर जवळजवळ पूर्णच कोमात गेली . एकाकीपणातल्या अंधाराची फुलं काळ्याच रंगात प्रकाशमान झाली आहेत असं वाटू लागलं . या काळात अश्रू जणू सुकूनच गेले होते . निर्विकार चेहेर्‍यानं  ( Poker Face ) माझा वावर सुरु राहिला . मी कुणाशी तरी बोलत असे  पण , चेहेरा मात्र निर्विकार असे . ६ मार्च २०२० ला सकाळी कन्या सायलीच्या मांडीवर मंगला शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन झाली . सायली येण्याची वाटच जणू बेगम पाहत होती…तिच्या चेहेर्‍यावर कोणतेही दु;खी भाव नव्हते , वेदनेची रेषा नव्हती .
‘जगण्याने छळले होते , मरणाने केली सुटका केली’
अशी कांहीशी तृप्ततेची लकेर तिच्या चेहेर्‍यावर होती …
१५ मार्चला सायली मुंबईला परतली . दरम्यान कोरोनाचा विळखा आक्राळ-विक्राळ होत गेला . जनजीवन ठप्प झालं . इतरांप्रमाणे मीही , जे घर बेगम मंगलाचं अतिशय आवडतं होतं , त्या घरात बंदिस्त झालो . आठवणींचे कल्लोळ हल्ला करु लागले . त्या कल्लोळांनी अनेक काळे विभ्रम निर्माण केले . हळूहळू त्याची सवय झाली…एक दिवस लक्षात आलं , हा एकाकीपणा आता जणू आपल्या देहात विरुन गेलाय…
आणखी एक , मृत्यूच्या छायेतला एकाकीपणा किती आत्मकेंद्रित असतो हे , हा मजकूर लिहिल्यावर जाणवलं . आई गमावलेल्या सायलीचं दु:ख मी समजून घेतलंच नाही , किमान पाठीवर हात फिरवून तिचं सांत्वन करावं हेही सुचलं नाही…
♦♦♦♦
( डॉ. अंजली/डॉ.  मिलिंद देशपांडे , विद्या/डॉ . प्रदीप मुळे , शुभांगी/ ‘स्वामी’श्याम देशपांडे , अनिता/रवी वैद्य , रसिका/नितीन  दातार , कविता आणि सतीश गोडसे  ,डॉ . आश्विनी रोटे ( सर्व  औरंगाबाद ) ,  पुष्पा/डॉ. रवी जोशी , नासिक, शिवसेना नेते  व            ज्येष्ठ मित्रवर्य व दिवाकरराव रावते , स्मिता / मुकंदा बिलोलीकर , हेमलता/कमल ग्यानानी , सायली/दीपक ग्यानानी ( सर्व  मुंबई ) , केंद्रीय मंत्री  , दोस्तयार नितीन गडकरी , सुप्रिया/विवेक रानडे आणि श्रुती/ श्रीकांत विंचुर्णे , नागपूर, अशा अनेकांचं  ,बेगमच्या आजारपणाशी आणि त्या काळात निर्माण झालेल्या भावकल्लोळाशी घट्ट नातं आहे . या सर्वांच्या उल्लेखा शिवाय मृत्यूच्या छायेतले ते दिवस आणि त्यातून आलेल्या एकाकीपणाची ही कहाणी अधुरी आहे . )

( ‘मिडिया वॉच’ दिवाळी अंक लेखातील चित्रे – विवेक रानडे  )

-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट