|| १ ||
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थापन करण्यामागे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा असलेला हेतू कितपत साध्य झाला या संदर्भातल्या चर्चा आता शिळ्या झाल्या आहेत . या मंडळाचा कारभार साहित्यानुकूल नाही , अगत्य आणि सुसंस्कृतपणाशी मंडळाला काहीही देणं-घेणं नाही , हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे . फार पूर्वी म्हणजे , डॉ . मधुकर आष्टीकर अध्यक्ष असताना या संदर्भात मीही बरंच लिहिलं होतं . साहित्य आणि संस्कृती मंडळाचा ताजा अनुभव फारसा सुखावह नाही तर आजवरच्या गलथान परंपरेला साजेसाच आहे .
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे एक अग्रगणी नेते असे शंकरराव चव्हाण ( १४ जुलै १९२० – २६ फेब्रुवारी २००४ ) यांची जन्मशताब्दी नुकतीच सुरु झाली . त्यानिमित्ताने ‘आधुनिक भगीरथ’ हा शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरव ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीनं प्रकाशित करण्यात आला . या ग्रंथासाठी लिहिण्याची संधी मलाही मिळाली . पत्रकारितेच्या धबडग्यात काही लोकांवर लिहायचं राहूनच गेलं होतं . त्यात विलासराव देशमुख आणि शंकरराव चव्हाण होते . विलासरावांवर तीन वर्षांपूर्वी एका पुस्तकासाठी एक प्रदीर्घ लेख लिहिला . पण , ते पुस्तक अजून प्रकाशितच झालेलं नाही आणि त्या पुस्तकाचं स्टेटस काय आहे , हेही कळत नाहीये .
शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरव ग्रंथासाठी लेख लिहिण्यासाठी या ग्रंथाचे संपादक डॉ . सुरेश सावंत बरेच मागे लागले . बेगमच्या प्रदीर्घ आजारपणामुळे ते काम बरंच रेंगाळलं ; परंतु डॉ . सावंत यांच्या चिवट पाठपुराव्यामुळे ते अखेर पूर्ण झालं हे मात्र खरं . सुमारे साडे चार हजार शब्दांचा तो ‘शंकरराव चव्हाण : कांही नोंदी’ हा लेख या ग्रंथात समाविष्ट झालेला आहे . डॉ. सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ग्रंथाचं संपादन अतिशय श्रमपूर्वक , कौतुकास्पद तपशीलवार केलेलं असून देखणा असा हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे . ( कांही राजकारण्यांचा अपवाद वगळता ) सर्वच लेख शंकरराव चव्हाण यांच्या विविध पैलूंचा आढवा घेणारे आहेत . राजकारणात रस असणार्या प्रत्येकाच्या संग्रहात असायला हवा , इतका हा ग्रंथ संदर्भ म्हणून महत्त्वपूर्ण आहे . शंकरराव चव्हाण यांच्या संदर्भातला ‘आधुनिक भगीरथ ‘ हा जवळजवळ ८०० पानांचा ग्रंथ १४ जुलै २०२० ला प्रकाशित झाला . त्याच्या बातम्या वगैरे आल्या तरी हा मजकूर लिहित असताना ४ डिसेंबरला , म्हणजे सुमारे सव्वाचार महिने उलटले तरी त्या ग्रंथाची प्रत अजून काही कुणाही लेखकाला मिळालेली नाही , मग मानधन तर लांबच राहिलं !
खरं तर , असे संदर्भ मूल्य असलेले अनेक महत्त्वाचे ग्रंथ साहित्य आणि संस्कृती मंडळानं आजवर प्रकाशित केलेले आहेत . मात्र हे ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचण्याची तसदी पाहिजे तितक्या किमान गांभीर्यानं कधीच घेतलेली नाही , हेही तेवढचं खरं . साहित्य संस्कृती मंडळ ग्रंथाचं प्रकाशन करतं . सरकारी पातळीवर त्याचा एखादा दणदणीत प्रकाशनाचा कार्यक्रम होतो . त्याच्या बातम्या वगैरे येतात . विशेषत: ज्या व्यक्तीची जन्मशब्तादी किंवा अन्य काही महत्त्वाची घटना असेल तर , शासनाचं मुखपत्रात असलेल्या ‘लोकराज्य’ च्या अंकात त्या ग्रंथातील कांही मजकुराचा समावेश असलेला केला जातो पण , पुढे तो ग्रंथ कुठे कुठे धूळ खात पडतो , हे फक्त साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या प्रशासनालाच माहीत असतं .
बरं , संस्कृती साहित्य मंडळात आपण जावं तर , ते ग्रंथ कुणाकडे आहेत , कोण ते विकणार आहेत , कुठे उपलब्ध आहेत याच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी कुणीही उत्सुक नसतं . फोन केले तर या माहितीच्या संदर्भात काही हाती पडेल असंही संभाषण होऊ शकत नाही . साहित्य आणि संस्कृती मंडळानं आजवर प्रकाशित केलेले ग्रंथ , त्या ग्रंथ
निर्मितीवर खर्च किती झाला आणि त्यापैकी किती ग्रंथांची नेमकी किती विक्री झाली , या संदर्भात खरं तर खास ऑडिट होण्याची आणि मंडळाच्या कामाची झाडाझडती घेतेली जाण्याची नितांत गरज आहे . खरं तर , साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कारभारात सगळंच काही निराशाजनक नाही . बरंच कांही समाधनकारकही आहे पण , आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचावं याची उर्मीच मंडळाच्या प्रशासनाला नाही . मंडळ व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारुन , गेला बाजार एखाद्या खाजगी यंत्रणेची मदत घेऊन या ग्रंथाचं वितरण का करत नाही ? या प्रश्नाचं उत्तरचं मिळत नाही .
पत्रकारितेतील माझे ज्येष्ठ सहकारी सुरेश द्वादशीवर या मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी या मंडळाला व्यावसायिक चेहरा देण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न माझ्या माहितीप्रमाणे केला होता कारण द्वादशीवार यांची दृष्टी संपादकाची होती . संपादकाला दररोजचं वृत्तपत्र विकलं कसं जातं आणि कसं विकलं जावं , याचं एक व्यावसायिकही भान असतं . विद्वत्तेसोबत ते भान सुरेश द्वादशीवार यांच्यामध्ये नक्कीच होतं पण , मंडळाच्या लालफितशाही कारभाराला सुरेश द्वादशीवार इतके कंटाळले की , अखेर त्यांनी राजीनामाच देऊन टाकला . माझी माहिती जर चूक नसेल तर ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचाही अनुभव असाच उद्वेगजनक होता . मात्र , द्वादशीवार आणि बोराडे यांच्यातलं सौजन्य असं की , या संदर्भात त्यांनी कधीही जाहीर वाच्यता केली नाही . आता या मंडळाच्या कारभाराच्या संदर्भात फेरविचार करण्याची आणि या मंडळाचा चेहरा-मोहरा बदलण्याची वेळ निर्णायक आली आहे असं ठामपणे वाटतं . लेखकाला पुस्तक पाठवलं न जाणं एखाद्या खाजगी प्रकाशकाकडून घडतं तर मोठं काहूर उठलं असतं पण , साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित झालेली पुस्तकं लेखकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्या संदर्भात काही चर्चा घडली , काही वादविवाद झाले तर त्याची दखलही मंडळाकडून घेतली जात नाही , हा अनुभव निश्चितच क्लेशदायक आहे ; या मंडळाच्या प्रशासनाची कातडी किती गेंड्याची बनलेली आहे याचं हे निदर्शक आहे . या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री , विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोक चव्हाण यांचा आलेला एक अनुभव आवर्जून नोंदवून ठेवण्यासारखा आहे .
|| २ ||
राजकारणी असुसंस्कृत असतात असा बहुसंख्य जनतेचा एक आवडता सिद्धांत आहे . माध्यमं आणि विशेषत: चित्रपटांनी हा समज फार मोठ्या प्रमाणात पसरवलेला आहे . इतकी वर्ष राजकीय वृत्तसंकलनात घालवल्याच्यानंतर मी एक ठामपणे सांगू शकतो की , सगळेच राजकारणी हा जो काही समज पसरलेला आहे तसे असुसंस्कृत नसतात . सगळेच राजकारणी असंवेदनशील , रांगडे , रासवट , दुष्ट , खुनशी आणि कट-कारस्थानं करणारे नसतात . या समजाचा एक उप भाग म्हणजे , राजकारणी वृत्तपत्रा व्यतिरिक्त आणि कांहीच वाचत नाहीत . माझा स्वत:चा अनुभव मात्र असा मुळीच नाही . अनेक राजकारण्यांना वाचनसोबतच संगीत , चित्रकलेची जानकारी असते , हे मला चांगलं ठाऊक आहे . ज्येष्ठतम नेते शरद पवार , सुशीलकुमार शिंदे , नितिन गडकरी अतिशय चांगले वाचकच नाहीत तर त्यांच्या संग्रहालयात मोठी ग्रंथ संपदा आहे . विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , मनसेचे नेते राज ठाकरे , देवेंद्र फडणवीस , सुधीर मुनगंटीवार , जयंत पाटील , छगन भुजबळ अशा कितीतरी विद्यमान मंत्र्यांची नावं , ते चांगले वाचक असण्याबद्दल घेता येतील . माझ्या एका पुस्तकावर एखाद्या समीक्षकाला लाजवेल इतकं अप्रतिम भाषण छगन भुजबळ आणि नितिन गडकरी यांनी केल्याचं स्मरणात आहे . सुमारे ३ वर्षांपूर्वी एकदा संगमनेरला विद्यमान मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला . त्यांना तर चक्क ग्रेसच्याही कविता पाठ आहेत . आता हयात नसलेल्या अनेक राजकारण्यांची नावेही या संदर्भात सांगता येतील . सांगायचं तात्पर्य माध्यमं आणि चित्रपट पसरवत असलेले सगळेच समज किंवा रंगवत असलेल्या सर्वच प्रतिमा खऱ्या असतात असं नव्हेच .
वर उल्लेख केलेल्या शंकरराव चव्हाण यांच्या संदर्भातल्या ‘आधुनिक भगीरथ’ या ग्रंथाच्या संदर्भात आलेला अनुभव म्हणूनच आवर्जून शेअर करावा असा आहे . गेल्या महिन्यात एक दिवस मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवर बोलणं सुरु असतांना त्यांना म्हणालो , ‘नानासाहेबांवरचं ( म्हणजे शंकरराव चव्हाण यांच्यावरचा ) गौरव ग्रंथ खूप चांगला निघाला आहे , असं ऐकण्यात येतं आहे . पण ,साहित्य संस्कृती मंडळावर अवलंबून राहाल तर तो ग्रंथ वाचकांपर्यंत तर पोहोचणारच नाही . एवढंच कशाला , ज्यांनी या पुस्तकासाठी ज्यांनी लेखन केलेलं आहे त्या लेखकांपर्यंतही ते पुस्तक लवकर पोहोचणार नाही , याची ठाम खात्री मला आहे .’
माझ्या म्हणण्याला अशोकराव चव्हाण यांनी उघड दुजोरा दिला नाही पण , ते सूचक हंसले. मी त्यांना पुढे म्हटलं , ‘अशोकराव, यापेक्षा या पुस्तकाच्या प्रती साहित्य संस्कृती
मंडळाकडून मागवून घ्या . तुम्ही मंत्री आहात . तुम्हाला मुंबईतील मुंबईत त्या प्रती सहज उपलब्ध होतील . लेखन करणाऱ्या सर्व लेखकांना एका छानशा प्रत्रासह त्या पुस्तकाची प्रत तुमच्या स्वाक्षरीनिशी तुम्हीच सप्रेम भेट म्हणून पाठवा . शंकररावांचे पुत्र , जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत , विद्यमान मंत्री आहेत , त्यांनी आवर्जून पाठवलेल्या या भेटीचा लेखकांना अतिशय आनंद होईल.’
अशोक चव्हाण गंभीरपणे ऐकत आहेत हे ओळखून मी पुढे म्हणालो , ‘सरकारमधला एक महत्त्वाचा मंत्री आपण केलेल्या लेखनाची अतिशय आवर्जून दखल घेतोय त्याला एक वेगळं असं परिमाण लागेल . तुम्ही सुसंस्कृत आहे त्याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल .’
अशोक चव्हाण यांना ती कल्पना पसंत पडली . ते ‘हो’ तर म्हणाले पण , ती सूचना अंमलात येईल का नाही याच्याविषयी माझ्या मनात किंचित शंका होती याच कारण
कोरोनाचं संकट गडद झालेलं होतं . राज्यातल्या मंत्री आणि प्रशासनावर कोरोनाच्या कामाचं मोठं दडपण होतं . गेल्या आठवड्यात माझी शंका खोटं ठरवणारं सुखद वर्तन म्हणा की अगत्य अशोक चव्हाण यांच्याकडून घडलं आणि त्या सुसंस्कृतपणाची दखल आपण घेतलीच पाहिजे असं आवर्जून वाटलं .
‘आधुनिक भगीरथ ’ हे चांगलं जाडजूड पुस्तक एका साध्या पण पुठ्ठ्याच्या अतिशय देखण्या बॅक्समध्ये , रिबिन बांधून अशोक चव्हाण यांनी सर्व लेखकांना पाठवलं . त्या पुस्तकासोबत अशोक चव्हाण याचं अतिशय एक छानसं पत्रही आहे . त्या पुस्तकासोबत जुलै महिन्यात राज्य सरकारचं मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ या नियतकालिकानं प्रकाशित केलेला शंकरराव चव्हाण यांच्यावरचा विशेषांक आणि त्यासोबत शंकरराव चव्हाण यांची मुद्रा कोरलेलं एक चांदीचं नाणंही आहे . एका अतिशय सुंदर , नक्षीदार आणि कलात्मक अशा डबीमध्ये ते नाणं पाठवलं आहे .
कोणत्या ना कोणत्या निमित्तानं सर्वच राजकारण्यांना नेहमीच टीकेच्या तोंडी धरणं आपल्याला आवडत असतं ; परंतु राजकारणी अनेकदा अनेक चांगल्या गोष्टी अगत्यानं करत असतात , त्याची सकारात्मक दखल मात्र फारशी घेतली जात नाही . एकीकडे साहित्य आणि संस्कृती मंडळाचा लालफितशाहीमध्ये अडकलेला हा अनागोंदी व ढिम्म कारभार आणि दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी एका सूचनेची केलेली अंमलबजावणी , हे निर्दशनास आणून देणं हाच या लेखनाचा हेतू आहे .
राज्यातला आणि देशातलाही प्रत्येक मंत्री असा सुसंस्कृतपणे आणि जनतेशी अगत्यानं जर वागेल तर किती छान होईल नाही का ?
-प्रवीण बर्दापूरकर
Cellphone +919822055799
www.praveenbardapurkar.com / praveen.bardapurkar@gmail.com
साहित्य आणि संस्कृती मंडळ :
एक खुलासा- दोन उत्तरे !
“ढिम्म साहित्य-संस्कृती मंडळ आणि अशोक चव्हाणांचं अगत्य !” या मी लिहिलेल्या लेखावर ( वाचा- https://bit.ly/3gdrkYu ) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी एक खुलासेवजा मजकूर ‘अक्षरनामा’ हा पोर्टलचे संपादक राम जगताप ( या पोर्टलवर माझा मजकूर नियमित प्रकाशित होतो ) यांना व्हॉटस-अपवर पाठवला . त्याला राम जगताप यांनी दिलेलं खणखणीत उत्तर सोबत जोडत आहे . स्वत:ला आलेला अनुभवही धादांत खोटा आहे , अशी अनेक तथ्यहीन विधाने या खुलाश्यात आहेत !
खरं तर , हा खुलासा मला पाठवला नसल्यानं त्याची दखल घेण्याचं कारण नाही पण , आमच्यावर असलेल्या पत्रकारितेच्या संस्कारानुसार , मूळ मजकूर माझा असल्यानं आणि माझ्या वाचकांना सचिव मीनाक्षी पाटील काय म्हणतात हे समजावं म्हणून तो खुलासा इथे देत आहे . शिवाय राम जगताप यांच्या उत्तरात न आलेल्या मुद्यांकडेही लक्ष वेधत आहे .
-प्रब
…..
From – मीनाक्षी पाटील, सचिव, साहित्य-संस्कृती मंडळ यांचा खुलासा 👇
नमस्कार ,
अक्षरनामामध्ये ‘ ढिम्म साहित्य संस्कृती मंडळ ‘ हा प्रवीण बर्दापूरकर यांचा लेख वाचला . कोणताही लेख प्रकाशित करण्यापूर्वी आपण त्या लेखातील माहिती सत्य आहे की धादांत चुकीची आहे हे तपासत नसल्याचे पाहून अत्यंत आश्चर्य आणि वाईट वाटले . मूलतः सदर ग्रंथ संपादनासाठी श्री सुरेश सावंत यांना देण्यात आला होता व त्यासाठी त्यांना एकरकमी मानधन देखील देण्यात आले होते ज्यातून ते संपादित ग्रंथातील लेखकांना त्यांच्या लेखनासाठी परस्पर मानधन देणार होते . सदर ग्रंथात संपादक नेमण्यापलीकडे मंडळाचा कोणताही हस्तक्षेप नव्हता . संपादकांना ग्रंथ छपाई झाल्यावर त्यांचे मानधन व सर्व लेखकांना ग्रंथ भेट देण्यासाठीच्या १०० प्रती सामंजस्य करारानुसार तात्काळ देण्यात आल्यात .त्यामूळे सदर लेखात बर्दापूरकरांनी मंडळावर केलेले सर्व आरोप धादांत चुकीचे , तथ्यहीन आहेत . त्यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराने अत्यंत पारदर्शी , स्वच्छ काम करणाऱ्या मंडळ प्रशासनावर असे तथ्यहिन आरोप करणं योग्य नाही व आपणही वस्तुस्थिती न तपासता असे तथ्यहीन मसालेदार लेख छापून मंडळाची प्रतिमा मलिन करणारा मजकूर छापावा हे अत्यंत क्लेशकारक आहे .
आता थोडं वैयक्तिक लिहिते — मी खेडयातून अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू घरातून आलेली बाई आहे . माझ्या वीस वर्षाच्या शासकीय नोकरीत मी एकाही कार्यालयातील साधं पाणीही मी एकदाही प्यालेले नाही , त्यामूळे शासकीय बैठका असो की कोणतेही शासकीय कार्यक्रम असो तेथील अन्नाच्या एका कणालाही मी आजतागायत स्पर्श केलेला नाही . माझ्या काटेकोर नियमानुसार चालायच्या प्रामाणिकपणामूळे कदाचित काही जणांना मंडळाचा कारभार त्रासदायक वाटणं स्वाभाविक आहे …. पण ईमानदारीने काम करायचा आपण पगार घेतो हे माझं तत्त्व आहे . त्यामूळे आपल्याला नम्र विनंती आहे की मंडळाविषयीच नव्हे तर कोणाविषयीपण कोणताही मजकूर छापतांना कृपया आपण तथ्य जाणून घ्यावं . सदर ग्रंथात अनेक मान्यवरांनी लेखन केलंय त्यांच्याशी बोलून तसेच सदर प्रकरणातील तथ्य जाणून घेण्यासाठी वाटल्यास संपादक श्री . सुरेश सावंत यांच्याशी बोलून आपण सत्य जाणून घ्यावं .
…..
‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप यांचे उत्तर-👇
नमस्कार .
तुमच्या म्हणण्यानुसार प्रवीण बर्दापूरकर यांचा लेख तथ्यहीन , मसालेदार लेख असेल तर तुमची प्रतिक्रियाही तशीच नाहीये का ? बर्दापूरकर हे अतिशय ज्येष्ठ संपादक आहेत. त्यामुळे ते जबाबदारीने लिहितात . तसेच त्यांनी लिहिलेले आहे. लेखकांना मानधन आणि प्रत पाठवण्याची जबाबदारी प्रकाशकाची असते , जगभर पण , मंडळ ते काम संपादकांवर सोपवून नामानिराळे राहते आणि संबंधित लेखकांना मानधन आणि प्रत मिळतेय की नाही , यापासून पळ काढते . त्यातून हे गैरसमज निर्माण होतात.
मी सुद्धा गदिमा आणि पुलं यांच्यावरील पुस्तकांत लेख लिहिलेले आहेत. मंडळाचा धीमा कारभार मला चांगला माहीत आहे . दोन्ही पुस्तकाच्या प्रती मिळवण्यासाठी संपादकांना मला भरपूर फोन करावे लागले . कारण त्यांनाही प्रती वेळेत मिळाल्या नाहीत . असो. त्यामुळे बर्दापूरकर यांना जो अनुभव आलाय तो त्यांनी लिहिलाय , ते मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे . त्यात धादांत खोटं काहीही नाही . त्याची दुसरी बाजू तुम्हाला मांडावीशी वाटते तर तुम्ही मांडा , पण आमच्यावर आणि बर्दापूरकर यांच्यावर आरोप करु नका. त्यातून आमचाच मुद्दा सिद्ध होतो.
आणि , महत्त्वाची गोष्ट, जरा कुणी थोडी टीका केली की, लगेच त्याच्यावर उलट आरोप करायचे नसतात. आपली बाजू संयतपणे मांडायची असते . ती अधिक प्रभावी असते . तुम्हाला वाटतं ना , सत्य वेगळं आहे , तर तुम्ही बर्दापूरकर यांच्या लेखाचा प्रतिवाद करणारा लेख लिहा आणि पाठवा. आम्ही तो आहे तसा छापू.
पण तुम्ही तथ्य तपासलं नाही , लेख मसालेदार आहे , धादांत खोटा आहे , हे तुमचे आरोप वावदूक आहेत आणि दुर्दैवीपण . याचा अर्थ असा होतो की , तुमच्यात आणि राजकीय पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांत काहीच फरक नाही.
तुम्ही बर्दापूरकर यांच्याशी बोलला का?
सावंत यांना खुलासा करायला सांगा.
वैयक्तीक टीका असल्यासारखा का समज करून घेताय ?
…..
माझे उत्तर – 👇
मुद्दा १ – साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित करत असलेल्या पुस्तकांच्या वितरणासाठी चांगली यंत्रणा का नाही ?
मुद्दा २ –आजवर प्रकाशित झालेली पुस्तके , त्यासाठी आलेला खर्च आणि त्याचे झालेले वितरण यासंदर्भात ऑडिट व्हावे . मंडळाचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी आहे तर या मागणीकडे कानाडोळा का ?
मुद्दा ३ –लेखकांना ग्रंथ आणि मानधन पाठवण्याची जबाबदारी संबंधित संपादकाची कशी , मंडळाची का नाही ? ही जबाबदारी संबंधित संपादकावर टाकण्याचे ( म्हणजे स्वत:वरचे काम दुसर्यावर ढकलण्याचे ) धोरण मंडळाने कधीपासून स्वीकारले आहे , या धोरणाला सरकारची मान्यता आहे का ?
मुद्दा ४ – मंडळाचा कारभार ढिम्म नसेल तर पुस्तक प्रकाशित झाल्यावर लेखकांना लगेच पुस्तक आणि मानधन का मिळत नाही ?
मुद्दा ५ – मंडळाच्या सचिव मंडळाच्या खर्चाने पाणी पितात का , मंडळाच्या खर्चाने आलेल्या अन्नाच्या कणाला त्या स्पर्श करतात किंवा नाही , त्या प्रामाणिक आहेत किंवा नाही हे मुद्दे माझ्या मजकुरात आलेले आहेत का ? सचिवच नाही तर मंडळातील कुणाच्याही वैयक्तीक बाबीचा उल्लेख माझ्या मजकुरात कुठे आहे ?
मुद्दा ६ – माझा लेख प्रकाशित झाल्यावर याच मंडळाच्या तीन माजी अध्यक्ष आणि हे मंडळ राज्य शासनाच्या ज्या खात्याच्या अखत्यारीत येते त्या सांस्कृतिक खात्याच्या ( आता निवृत्त ) दोन सचिवांनी या मंडळाचा कारभार ढिम्म ( आणि ढिसाळपणेही ) सुरु असल्याच्या माझ्या लेखात व्यक्त करण्यात आलेल्या मताला दुजोरा दिला आहे . हे मंडळ लेखकांचा सन्मान करत/ठेवत नाही ; तो सन्मान त्यांनी कधीच बासनात बांधून ठेवला आहे , असे मत मंडळाच्या एका माजी अध्यक्षाने व्यक्त केले . ही मते अत्यंत महत्वाची आहेत ( नाहीत का ? ) मात्र ती प्रकाशित करण्याची परवानगी न घेतल्याने या मान्यवरांची नावे मी उघड करत नाहीये !
असो , कोळसा उगाळावा तेवढा काळाच असतो , हे काय मला ठाऊक नाही ?
-प्रवीण बर्दापूरकर
( ६ डिसेंबर २०२० )