आधीच सांगून टाकायला हवं की , समाजमाध्यमांवरची एक पोस्ट वाचून हा मजकूर सुचला आहे . त्या पोस्टचा आशय असा – “त्या पोस्टकर्त्याचे वडील प्रदीर्घ आजाराने निधन पावले . कोणत्यातरी दोन-तीन ग्रहांची अशुभ छाया (?) पडल्यामुळे त्याचे वडील अत्यंत कठीण अशा काळातून जात होते . मृत्यूनंतर तरी ती अशुभ छाया दूर व्हावी आणि त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी , अशी तो पोस्टकर्ता आणि त्याच्या कुटुंबियांची इच्छा होती . त्यासाठी त्यांनी एका भटजीशी संपर्क साधला . मृत्यूपश्चात ती अशुभ छाया दूर व्हावी म्हणून त्या भटजीनं काही विधी आणि अकरा ब्राह्मणांना भरघोस दक्षिणेसह भोजन असा उपाय सुचवला . त्याप्रमाणे पोस्टकर्त्यानं कोरोनाच्या त्या कठीण समयी कसेबसे सात ब्राह्मण जमवले . मग त्याच्या भटजीनं सांगितल्याप्रमाणे ११ ब्राह्मणांची दक्षिणा त्या सात ब्राह्मणांत वाटप केली . ब्राह्मण आले आणि भोजनाचा आस्वाद घेण्याऐवजी अन्न चिवडून निघून गेले, अशी पोस्टकर्त्याची तक्रार होती . दक्षिणा घेऊनही ब्राह्मणांनी भोजन करण्याऐवजी अन्न चिवडले आणि असे विधी करायला लावून ब्राह्मण समाजाला कसे लुटतात , याचा त्याला प्रचंड संताप आलेला होता . तो संताप व्यक्त करताना त्यानं एकजात सर्व ब्राह्मणांना शिव्यांची लाखोळी वाहिली होती .
ब्राह्मणांना झालेल्या शिव्याशापांचं फारसं आश्चर्य वाटलं नाही ; अगदी खरं सांगायचं तर ते आता सवयीचं झालेलं आहे . त्याबद्दल किंचितही वैषम्य वाटण्याचा तर प्रश्नच नव्हता . मात्र , आधी आपणच दगड शोधायचा मग चिखल शोधायचा आणि तो दगड त्या चिखलात टाकून चिखल स्वत:च्या अंगावर उडवून घ्यायचा , असाच हा सर्व प्रकार असल्यासारखा वाटला . असं का वाटावं यासाठी थोडसं भूतकाळात जायला हवं –
■■
हा १९६०चा काळ सांगतो आहे . माझी आई नर्स होती . तिला आम्ही माई म्हणत असू तिच्या बदल्या अतिशय छोट्या गावात होत . अनेक गावं इतकी लहान होती की , त्या गावात एसटीची बसही जात नसे . रस्त्यावरच्या फाट्यावर उतरुन किमान किलोमीटर-दीड किलोमीटर पायी जावं लागत असे . गावात वीज , नळाचं पाणी या सोयी नसण्याचा तो काळ होता . अशा सर्वच गावात आम्हाला ब्राह्मण आळीत कधीच भाड्यानं घर मिळालं नाही कारण माझ्या आईची ऊठबस कायम अब्राह्मण स्त्रियांत असायची ; ब्राह्मणी म्हणून ओळखले जाणारे कुळाचार , सण आमच्या घरी कधी होतही नसत . तसं तर , काही छोट्या गावात ब्राह्मणांची आळीही स्वतंत्र नसे . जेमतेम एखादं-दुसरंच घर ब्राह्मणाचं असे पण , त्यांच्या शेजारी आम्हाला कधीच घर मिळू शकलं नाही . त्यामुळे माझं लहानपण अब्राह्मण मुलांच्या सहवासात गेलं . पत्रमहर्षी अनंतराव भालेराव यांच्या खंडाळा या गावी तर आम्ही कुंभारवाड्यात राहिलो . त्या वाड्यात चिखल , राडारोडा , गाढवं आणि त्यांच्या मलमूत्र विसर्जनाचे वास वातावरणात गच्च भरुन राहिलेले असत . मात्र त्यात काही वावगं आहे असं कधी वाटलं नाही . कारण आहे त्या परिस्थितीत आनंदानं राहावं अशी माईची शिकवण होती . खरं तर , तेव्हा ती बहुसंख्य समाजाची जीवनशैलीच म्हणा की रीत होती .
कन्नड तालुक्यातल्या अंधानेर या गावातून मी १९७१ साली मॅट्रीक झालो . अंधानेरला आमचा भिंतीपलीकडचा शेजार माळी होता . आमच्या गल्लीत न्हावी , माळी , सुतार अशा लोकांची वस्ती होती आणि त्यांच्या मुलांसोबतच हुंदडण्यात आमचा दिवस जात असे ; जातीपातीचा स्पर्श माईनं आम्हाला कधी होऊच दिलेला नव्हता .
मासिक वेतन आणण्यासाठी माईला औरंगाबाद जिल्ह्यातल्या अंधानेरपासून सुमारे १०० किलोमीटर असलेल्या अडूळ या गावी जावे लागत असे . बसने या प्रवासाला सुरुवात करण्याआधी अंधानेर ते कन्नड असा सुमारे साडेचार-पाच किलोमीटरचा प्रवास पाणंदीतून ( हा उच्चार अनेक भागात पांद असंही केला जातो ) पायी करावा लागत असे . पावसाळ्यात पाणंद चिखल आणि पाण्यानं भरलेली असे आणि अतिशय कष्टाचा असं तो प्रवास असे . अंधानेर ते अडुळ जाणं-येणं करायला किमान दोन दिवस लागत . त्यात औरंगाबादला आल्यावर अडुळला जाण्यासाठी बस बदलावी लागे . दरम्यान , एक दिवस औरंगाबादला थांबून माई माझ्या दोन मोठ्या भावांची महिनाभराची सर्व तरतूद करुन येत असे . म्हणजे , मी आणि धाकटा भाऊ या तीन दिवसांत एकटे असूत . अंधानेरला आमच्याकडे माईला सहायक म्हणून ठगनाबाई ही कोळी महिला होती . तिनं सांगितली म्हणून आम्हाला तिची जात कळली . पहिल्या महिन्यात पगारासाठी माई अडूळला जायला निघाली तेव्हा आम्हा दोघांची जबाबदारी माईनं ठगनाबाईवर टाकली . तेव्हा ठगनाबाई म्हणाली , ‘कसं जमन हे , तुम्ही भट आम्ही कोळी .’
आमच्या घरात जातबीत काही नसते हे तोवरच्या अनुभवाचे दाखले देऊन माईनं समाजावून सांगितलं . अखेर मोठ्या कष्टानं ठगनाबाई तयार झाली .
आळीतल्या सर्वच कुटुंबांकडे आमचं जाणं-येणं , खाणं-पिणं असे आणि त्यात जातीचा अडसर आम्हाला कधीच जाणवला नाही . रामराव मालकर हा माझ्या वर्गातला आणि जीवाभावाचा दोस्तही . एकदा त्याच्या घरी खेळत असताना त्याची वहिनी पाट्यावर जे वाटण करत होती त्याचा भुकेला आमंत्रित करणारा फारच सुवास सुटला होता . काही वेळानं घरभर काहीतरी शिजत असल्याचा भूक चेतवणारा घमघमाट पसरला . मी रामरावला ‘हा घमघमाट कशाचा ?’ हे विचारलं , तेव्हा त्यानं सांगितलं , ‘घरी भाजी बनते आहे’ .
मला काहीच न समजल्यानं , शाकाहारी म्हणजे कालवण आणि मांसाहारी म्हणजे भाजी , असा त्यातला फरक रामरावानं समजावून सांगितला . चिकन , मटन अन्य मांसाहारी वगैरे अन्न शब्दप्रयोग तेव्हा किमान माझ्या तरी जगण्यात रुढ व्हायचे होते .
‘मी पण तुझ्यासोबत जेवतो’ , असं मी म्हणालो तेव्हा रामरावच्या मोठ्या भावानं ‘तू आधी माईला विचारुन घे बा . भटाला बाटवल्याचं पाप नको आम्हाला ,’ असं निक्षून सांगितलं . तो हे सांगत असतानाच शेजारच्या गावातलं अडलेल्या बाईचं बाळंतपण उरकून घरी परत येणारी माई आणि ठगनाबाई दिसले . पळत जाऊन , ‘मी रामरावकडे जेवू का ? त्याच्याकडे होणाऱ्या भाजीचा खूप मस्त वास येतोय’ , असं सांगितलं .
भाजी प्रकार माईलाही मुळीच कळला नाही . तो ठगणाबाईनी समजावून सांगितल्यावर , माई म्हणाली , ‘जेव की . भुकेला कुठे जात , धर्म , शाकाहारी-मांसाहारी थोडीच असतं . भुकेला लागतं ते अन्न .’
हे सर्व सांगण्याचं तात्पर्य हे की , माझ्यावर ब्राह्मण्याचा म्हणून जो काही एक प्रचलित संस्कार असतो म्हणतात , तो कधीच नव्हता . माईनं तो कधीच होऊ दिला नाही . समता , लोकशाही , फुले ,आंबेडकर , ज्ञानेश्वर , तुकाराम , टिळक-आगरकर यांची ओळख मला त्या शाळकरी माईकडून झाली . ती स्वयंपाक किंवा घरातली अन्य कामं करत असताना आमच्याकडे असणारी पुस्तकं तिला वाचून दाखवावी लागत . माझ्यावरचा वाचन आणि न-जात संस्कार असा माईचा आणि लहानपणीच झालेला .
थोडसं विषयांतर होईल तरी सांगायलाच हवं-माझ्या जडणघडणीत माई इतकाच आणखी एका स्त्रीचा वाटा आहे . तिचं नाव मंगला . ती आधी माझी पत्रकारीतेतली ज्येष्ठ सहकारी आणि नंतर आम्ही प्रेमविवाह केला . तिचा उल्लेख मी कायमच बेगम असा करत असे . मंगला धार्मिक संस्कार असलेल्या कुटुंबातून आलेली . ती पक्की धार्मिक आणि मी अधार्मिक . मात्र आमच्याकडे काम करणाऱ्या कोणत्याही जातीचा माणूस किंवा बाई तिला सवाष्ण म्हणून चालत असे ; किंबहुना त्यासाठी कुणा ब्राह्मणाला कधीच बोलावतच नसे . विवाहानंतर सुरुवातीचे दोन तीन महिने तिच्या पूजा-अर्चाची मी टर उडवत असे . पण , ती कधीच काही बोलत नसे . खरं तर माझ्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्ष करत असे .
एक दिवस साक्षात्कार की काय होतो म्हणतात तसं लक्षात आलं की , जसा अधार्मिक असण्याचा मला अधिकार आहे , तसाच अधिकार बेगमला धार्मिक असण्याचा आहे . काही न बोलता बेगमनं मला हे शिकवलं . माईनं केलेल्या वाचन संस्काराला शब्दांच्या लळ्यात बदलणारी बेगमच होती . मला बातमीच्या बाहेर येऊन लेखन करायला लावणारीही मंगला आणि श्याम देशपांडेच . आमच्या घरात कोणतेही धार्मिक विधी झाले नाहीत किंवा इतर अनेक पुरोगाम्याप्रमाणं दरवाजा बंद करुन सत्यनारायणाची किंवा अन्य कोणतीही पूजा आमच्या घरात झाली नाही . मंगला आणि माझा प्रेमविवाह ; आमच्या कन्येलाही आम्ही ते स्वातंत्र्य न कुरकुरता दिलं . जातीच्या बाहेर जाऊन विवाह करण्याचा तिचा निर्णयही आम्ही आनंदानं स्वीकारला . या दोन्ही विवाहातही भटजी नव्हते कारण ते नोंदणी पद्धतीनं करण्यात आलेले होते !
कट्टर धार्मिक असणारी बेगम मंगला उत्तर आयुष्यात माझ्यासारखीच पूर्ण अधार्मिक नाही झाली पण , देव-धर्मापासून हळूहळू अनपेक्षितपणे खूपशी अलिप्त होत गेली . शेवटी शेवटी तर , म्हणजे रुग्णशय्येला खिळल्यावर आणि कंप तसंच वाढत्या पक्षघातामुळे तिचं शरीर झिजत जाऊ लागल्यावर तर तिची देवावरची श्रद्धाच उडत गेली . शेवटचा प्रवास सुरु झाला तेव्हा तर देव-धर्माच्या प्रार्थना , स्तोत्रे , पूजा यापेक्षा उस्ताद अमजद अली खान , पंडित हरिप्रसाद चौरसिया , शिवकुमार यांचं वादन , कुमार गंधर्व , राशीद खान यांच्या गाण्यात ती गुंगून जात असे .
तत्पूर्वी , २०१२ मध्ये तिच्या हृदयावर फार मोठी शस्त्रक्रिया झाली . त्या शस्त्रक्रियेनंतर तिच्या रिकव्हरीच्या काळात एकदा आम्ही अशाच गप्पा मारत असताना मरणाचा विषय निघाला . दोघांपैकी आधी जो मृत्यू पावेल त्यानंतर काय , असं बोलणं सुरु झाल्यावर , अत्यंसंस्कारायच्या प्रसंगी माझ्यावर कोणतेही विधी आणि कर्मकांड करायचं नाही , कोणताही दिवस मुळीच पाळायचा नाही , त्या दिवसाचे कोणतेही विधी करायचे नाही . हा एकूण जो काही खर्च असेल तो आनंदवन , सर्च आणि अन्य काही संस्थांना प्रदान करायचा , याची मी आठवण करुन दिल्यावर बेगम मंगला शांतपणे म्हणाली ,’तुझ्या मताशी आता मीही अनुकूल झाली आहे . आणि हो , हे तुलाच करावं लागणार आहे , कारण वयानं मोठी असल्यानं मरणार मी लवकर आहे .’ तिच्या बोलण्याच्या उत्तरार्धाकडे मी दुर्लक्ष केलं कारण ती वयानं मोठी असली तरी आता हृदयाच्या मोठ्या दुखण्यातून बाहेर आली होती.
सप्टेबर २०१९ मध्ये एका रात्री मंगलला खूप जोराची ढास लागली आणि तिचा जीव घाबराघुबरा झाला . घरात आम्ही दोघंच . डॉ . मिलिंद देशपांडे याला फोन केला पण त्याला पोहोचायला किमान अर्धा तरी तास लागणार होता . त्यानं सांगितलं तसं बेगमच्या पाठीवर हळूहळू चोळणं सुरु केलं . एव्हाना बेगमच्या शरीरानं मृत्यूच्या वाटेवर चालायला सुरुवात केलेली होती आणि हे तिला ( आणि आम्हा निकटच्या काहींना ) चांगलं ठाऊक होतं . ती ढास ओसरल्यावर काही वेळानं मंगल शांत झाली आणि म्हणाली , ‘मी मेल्यावर कोणतेही विधी न करण्याचं , दिवस न पाळण्याचं आणि त्या पैशातून कुणाला काय द्यायचं आपण जे ठरवलं होतं ते तुझ्या लक्षात आहे ना .’ तिच्या कपाळावर थोपटतं इमोशनल झाल्याचं न दाखवत मी म्हणालो , ‘आहे माझ्या लक्षात .’ तेव्हा तिनं सांगितलं की , आमचं मागे बोलणं झालं तेव्हाच तिनं यासाठी वेगळी तरतूद करुन ठेवलेली आहे . तिच्यात झालेल्या या परिवर्तनानं मी दिग्मूढ झालो…
माई वारल्यावर मी कोणतेही विधी केले नाही . काही वर्ष तिच्या मृत्यू दिनी काही संस्थांना निधी दिला . पाच-सहा वर्षांनंतर तो उपक्रम बंद पडला . माई मनात अजूनही कायम आहे . ठरल्याप्रमाणे बेगम मंगलाच्या निधनानंतरही आम्ही म्हणजे मी आणि कन्या सायली वागलो . मंगलाचा भाऊ श्रीकांत विंचुर्णे खरं तर , कडक धार्मिक ; वेद आणि शास्त्रांचा त्याचा अभ्यास आहे , पौरोहित्याचाही अभ्यासक्रम त्यानं केलेला आहे पण , त्यानं आणि त्यांची पत्नी श्रुती हिनं आमच्या निर्णयाला कोणताही विरोध केला नाही . ठरल्याप्रमाणे मित्रांच्या संस्थांना रकमा रवाना केल्या ; मित्रांच्या संस्थांनी तिच्या स्मृत्यर्थ वृक्ष लावले. ठरल्याप्रमाणं रकमा पाठवल्यावरही काही रक्कम शिल्लक राहिली तेव्हा त्यात भर घालून आम्ही बेगम मंगला हिच्या नावानं महात्मा गांधी मिशन विद्यापीठात महिला पत्रकारासाठी एक पारितोषिक सुरु केलं .
कुणाला जेवायला घालून किंवा काही विधी करुन कोणाची स्मृती चिरंतन राहत नाही अशी बेगम मंगलाची आणि माझी धारणा होती आणि त्याप्रमाणे आम्ही वागलो .
■■
जन्माने माझा धर्म हिंदू आणि जात ब्राह्मण आहे . पण , तो माझा दोष नाही . माझाच काय अन्य कोणाचाही तो ज्या कोणत्या जातधर्मात जन्माला आला त्याबद्दल त्याचाही नाईलाज आहे . एक स्पष्ट केलं पाहिजे , मला ना माझ्या धर्माचा आणि जातीचा माज आहे , ना त्याची लाज आहे . अन्य कोणत्याही जाती-धर्मात जन्माला आलो असतो तरी माझी भूमिका अगदी अशीच राहिली असती . आणखी एक मोकळेपणानं सांगायला हवं , वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षांपर्यंत मी बऱ्यापैकी आस्तिक होतो . देवधर्मही भरपूर करायचो . त्या काळचं गावखेड्यातलं आणि कदाचित ब्राह्मणांच्या घरातलं वातावरणही तसंच असल्याचा तो स्वभावाविक परिणाम असणार . आमच्या घरात बाकीचे भाऊ आणि वडीलही विविध धर्मकार्यांत सहभागी होत पण , माई मात्र त्यापासून कटाक्षानं दूर राहात असे .
वयाच्या त्याच काळात माझ्या वडिलांना ; त्यांना आम्ही अण्णा म्हणत असूत ; क्षयरोगाचं निदान झालं . तेव्हा आम्ही औरंगाबादला रोकडिया हनुमान कॉलनीत राहात होतो . एका रात्री तब्येत फारच बिघडली म्हणून कॉलनीतल्या डॉ. देवकर यांच्याकडे अण्णांना नेलं . डॉ. देवकरांना वेगळी शंका आली . पुन्हा सर्व वैद्यकीय चाचण्या झाल्या आणि अण्णांना क्षयरोग नसून पोटाचा कर्करोग असल्याचं लक्षात आलं . फार तपशीलात न जाता सांगतो की , ती त्यांची कर्करोगाची शेवटची स्टेज होती . प्रश्न जेमतेम चार-सहा महिन्यांचा होता . जर घरातल्या कुणी निर्जळी संकष्टी केल्या तर अण्णांच्या प्रकृतीला चांगला उतार पडू शकतो असं आमच्या एका नातलगानं सांगितलं . ( पुढे काही वर्षांनी त्या नातलगांनी सांगितलं की, हे त्यांनी त्यावेळी गाजणाऱ्या ‘स्वामी’ या कादंबरीत वाचलं होतं म्हणे ! ) मी ते फार म्हणजे फारच गंभीरपणे घेतलं . महिन्यातल्या संकष्टी व विनायकी अशा दोन्ही चतुर्थी निर्जळी करु लागलो . इतकं की मी आवंढाही गिळत नसे . इकडे अण्णांची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच होती ; मृत्यूच्या दिशेनं त्यांचा प्रवास निर्णायकपणे सुरु होता . एका चतुर्थीला भल्या पहाटे उठून पूजेत मी मग्न असताना अण्णांच्या मृत्यूची बातमी आली . माझा देववरचा विश्वासच उडाला . त्या क्षणापासून मी पूजा-अर्चा बंद केली . सर्व देव उचलून एका कपड्यात बांधले आणि माळ्यावर टाकून दिले . तेव्हापासून कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होणंही बंद केलं ते आजवर .
इथे आणखी एक उपकथा सांगायला हवी , मंगलाचं देव वेड जवळजवळ ९९ टक्के ओसरलं तरी तिला गणपती जमवण्याची हौस होती आणि त्यात माझाही हातभार असे . देशात , परदेशात फिरताना काही वेगळा गणपती दिसला तर मी तिच्यासाठी आणत असे . १९९९ मध्ये आम्हाला एका प्रदर्शनात झाडाखाली बसून वीणा वादन करणाऱ्या गणपतीची एक छानशी पितळी मूर्ती एका प्रदर्शनात सापडली . त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात या गणपतीची पूजा करण्याव्यतिरिक्त कोणतंही कर्मकांड तिनं केलं नाही .
माईला धार्मिकतेचा वाराही लागलेला नव्हता . आम्ही ब्राह्मण असून त्या काळात आमच्या घरात देव्हारा नव्हता की , कोणत्या देव किंवा महाराजांचा एखादा फोटो . अण्णांच्या मृत्यूनंतर मी या बाबतीत माईच्या गोटात सहभागी झालो आणि तिच्या मृत्यूनंतर तिचा तो अधार्मिक असण्याचा वसा मी चालवतोय . माई नेहमीच म्हणायची , “श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातल्या सीमारेषा इतक्या अस्पष्ट आणि निसरड्या आहेत की , धार्मिकतेच्या बाबतीत माणूस केव्हाही अंधश्रद्ध होऊ शकतो . अंधश्रद्ध होऊन एकदा का माणूस कर्मकांडात गुंतला की तो आंधळा होतो . तो त्याचा सारासार विवेक गमावतो आणि अनेकदा हिंस्त्रही होतो . अनेक घरात जन्मत:च याच श्रद्धेपोटी मुलीला कसं मारुन टाकलं जातं हे मी पाहिलेलं आहे . ही हिंसाच आहे . म्हणूनच देवाधर्माशी माझं काहीही घेणं देणं नाही” .
माई किंवा बेगम मंगला वारल्यावर आम्ही कोणतंही कर्मकांड केलं नाही , कोणतेही दिवस पाळले नाहीत , कुणाला जेवू घातलं नाही . त्यासाठी खर्ची पडणाऱ्या रकमेचा विनियोग मंगला आणि मला , अपेक्षित जसा होता तसा केला . हे जर ब्राह्मण असून मी करु शकतो तर समाजातले सर्व घटक का नाही करु शकत , असा प्रश्न मला नेहमीच पडतो . विधी करा , कर्मकांड पाळा , अंधश्रद्धा जोपासा , त्यासाठी भटजींचा बोलवा , येण्यासाठी त्यांची मिन्नतवारी करा , त्यांना भरपूर दक्षिणा द्या , सुग्रास भोजन द्या . इतकं सगळं करायचं . त्यावर हजारो-लाखो रुपये खर्च करायचे आणि ते संपल्यावर ब्राह्मणांनी विधी नीट केले नाहीत . अन्नाची चिवड-चिवड केली वगैरे मन:स्ताप करुन घ्यायचाच कशाला . हे म्हणजे चिखलात दगड आपणच फेकायचा , तो चिखल अंगावर उडवून घ्यायचा आणि मग शिव्यांची लाखोळी वाहायची असं झालं . ब्राह्मणांना कोणत्याच विधीसाठी बोलावण्याचा आणि शिव्याशाप देण्याचा चिखल स्वत:च्या अंगावर उडवून घ्यायचाच कशाला ? मुळात ही कर्मकांडं पाळूच नका , आपल्या जातीत असणाऱ्या अंधश्रद्धांना खतपाणी घालूच नका की . त्यामुळे काहीही अडत नाही , हा स्वानुभव सांगतोय मी तुम्हाला . पण , आपल्यापैकी बहुसंख्यांना अशा देव-देव , पूजा , विधी , उपास-तापास आणि त्यातून येणारी कर्मकांडं यात खूपच रस असतो आणि त्यात कोणतीही जात , उपजात , पोटजात , पोटपोटजात अपवाद नाही पण , त्यातून काही मनस्ताप झाला की शिव्याशाप द्यायला मोकळे होतो !
एक बाब ब्राह्मणेतर कधीच लक्षात घेत नाहीत . ब्राह्मणातले ‘धार्मिक विधी वेदोक्त’ पद्धतीने होतात आणि ब्राह्मणेतरांचे विधी ‘शास्त्रोक्त’ पद्धतीने होतात म्हणजे विधी करुनही ब्राह्मणेत्तरांना धार्मिकता पाळल्याचं , त्यांना अपेक्षित असलेलं ‘धर्म कार्य’ केल्याचं समाधान म्हणा की पुण्य (?) , मिळतं नाही . तरी सुद्धा आंधळेपणानं ब्राह्मणेतर ब्राह्मणांना फॉलो करत राहतात ; चिखलात दगड मारत राहतात . एकजात सर्व ब्राह्मण चिखल नाहीत ; त्यापैकी जाती-भेद पाळणाऱ्या , कर्मकांड करणाऱ्या परंपरागत ब्राह्मण्यापासून असंख्य कधीचेच कोसो दूर गेलेले आहेत , हे लक्षात घेतलं न जाण्याइतकं बहुसंख्य ब्राह्मणेत्तरांच्या सारासार विवेकबुद्धीचं दिवाळं वाजलं आहे , असं जर त्यावर म्हटलं तर त्यात गैर काय ?
मुळात कुणीच कुणाची जातिधर्मावरुन हेटाळणी करायला नको , धर्म-देव-जात असेपर्यंत समता प्रस्थापित होणार नाही , अशी माझी मातृ संस्कारी ठाम धारणा आहे . ‘या देशाची घटना हाच माझा धर्म आणि तीच माझी जात’ यावर जोपर्यंत आपलं एकमत होत नाही तोपर्यंत आपला समाज जात आणि धर्माच्या तुकड्या तुकड्यात विभागलेला राहणार आहे . एकमेकांना जात-धर्मावरुन शिव्याशाप देत जगत , स्वत:च्याच अंगावर स्वत:च चिखल उडवून घेण्याची आपल्या समाजाची खोड मिटणार कधी ?
( ‘उद्याचा मराठवाडा’ दिवाळी अंकातील लेख )
■प्रवीण बर्दापूरकर
भ्रमणध्वनी – ९८२२०५५७९९
praveen.bardapurkar@gmail.com
किंवा – www.praveenbardapurkar.com