तुळजाभवानीचे मंदिर असलेले गाव, ही उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या गावाची ओळख सर्वसामान्यपणे आहे. या गावाच्या कुशीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (‘टिस’) नावाची एक राष्ट्रीय स्तरावरची नामांकित संस्था आहे याची माहिती मराठवाड्यातही अनेक विद्यार्थी, पालक, पत्रकार, बुद्धिवंतांना नाही. या संस्थेत ‘Media and Politics in India: with reference to Electoral Politics’ या विषयावर व्याख्यानासाठी जातोय असे सांगितले तेव्हा, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेतही बहुतेकजण या संस्थेबाबत अनभिज्ञ होते. मग, ही संस्था १९८६ साली तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यानुसार आली, अन्य राज्यांचे प्रस्ताव नाकारत ही जागा टाटा ट्रस्टने कशी निवडली, हा शंभर एकराचा परिसर कसा टुमदार आहे, तिथे प्रवेश कसे होतात अशी आणि इत्यादी माहिती देण्यात बराच वेळ जाऊ लागला. अन्यथा, ‘तुळजापूरला चाललो म्हणजे देवीच्या दर्शनासाठी जातोय म्हणजे, मी सुधारलो, देव-धर्म मानण्यास सुरुवात केली अखेर’ असे समजून बहुतेकजन सुटकेचा आणि समाधानाचा सुस्कारा सोडत. त्यांचे हे समाधान अल्पजीवी ठरवण्यासाठी ‘टिस’विषयी ही माहिती देण्यात हा वेळ खर्च करणे भाग होते!
केवळ भाषण करण्यापेक्षा मुलांशी संवाद साधावा, त्यांच्या मनात असणारे प्रश्न जाणून घ्यावेत असे आयोजक असलेल्या डॉ. रमेश झारे, संशोधक खालीद आणि संतोष यादव यांना सुचविले. संतोष हा या संस्थेचा विद्यार्थी. उस्मानाबाद जिल्ह्यातला. अभियांत्रिकी सोडून सोशल सायन्सेस आलेला. स्वभाव शांत, बोलणं मृदू, हळू आवाज पण स्वर मात्र ठाम. माझ्या ब्लॉगला तुळजापूरचा एकमेव कोण वाचक आहे ही उत्सुकता संतोष ठरली! राजकारण आणि माध्यमांसंबधी सुमारे पाऊन तासांची मांडणी केल्यावर देशभरातून आलेल्या उपस्थितीत सुमारे तरुण-तरुणींशी झालेला संवाद हे एक वेगळे आकलन होते . त्यातून नव्या पिढीचा दृष्टीकोन उमगला. त्या तरुण-तरुणींच्या प्रश्नांमध्ये समंजस तसेच भारदस्त गांभीर्य होते. हे तरुण राजकारण आणि त्याहीपेक्षा मिडियाबाबत खूप जागरूक तर होतेच, त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ‘सॉलिड’ चिंतित होते. अलिकडच्या काळात राजकारण हे एक करियर झाले आहे, सारे काही मतांसाठी, मत सत्तेसाठी, सत्ता बहुसंख्येने गैरमार्गाने पैसा कमावण्यासाठी, त्यामुळे निवडणुका जिंकणे ही एक व्यवस्थापन कला ठरली आहे, निवडणुकीत मोजके अपवाद वगळता उमेदवाराच्या कर्तृत्वापेक्षा जात, धर्म आणि धन तसेच गुंडशक्ती महत्वाचे घटक झालेले आहे. उमेदवार, त्यांचे काम, चारित्र्य, राजकीय विचार, विकासाची दृष्टी हे मुद्दे नंतर आणि खूपसे दुय्यम आहेत. राजकारणाच्या क्षितिजावर खूप सारे निराशाजनक आणि आशादायक कमी आहे. एका पक्षाचे सरकार जाऊन दुसऱ्या पक्षाचे सरकार येणे हा सर्वसाधारणतः ‘नवीन बाटलीत जुनीच दारू’ हा अनुभव असतो… हे प्रतिपादन या तरुणांना मान्य होते पण, आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी फार मोठा अपेक्षाभंग केला ही सल होती. आम आणि केजरीवाल यांच्या या उदय-उत्कर्ष आणि घसरणीच्या काळात मी दिल्लीत असल्याने या विषयावर चर्चा बरीच रेंगाळली. केजरीवाल यांच्या उक्ती आणि कृतीत अंतर होते. सामान्य माणसासारखे लहान घरात राहू म्हणत त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर दिल्लीच्या अत्यंत लब्धप्रतिष्ठीत ल्यूटन भागात भला मोठा बंगला घेतला, पोलिसांच्या गराड्यात राहणार नाही म्हणाले पण, साध्या वेशातील पोलिसांचा त्यांना गराडा असे. भावनेच्या भरात निर्णय घेताना तारतम्य आणि परिणामांची फिकीर त्यांना नव्हती. ‘मी म्हणेन तीच पूर्वदिशा’ अशी त्यांच्यातली एकारलीवृत्ती डोके वर काढत असे.. त्यामुळे केजरीवाल लाट का ठरले हे मी सांगितले. मात्र, प्रामाणिक माणूस चांगला राजकारणी ठरावाच, अशी या मुलांची रास्त अपेक्षा होती; राजकारण करताना तसे घडत नाही, घडत नसते हे स्वीकारणे या तरुणांना जड जात होते. म्हणणे मांडताना या तरुणांचा राजकारणासोबतच स्थानिक परिस्थितीचा असलेला आवाका थक्क करणारा आणि राष्ट्रीय स्तरावर खडतर परीक्षा देऊन ‘टिस’सारख्या संस्थेत सामाजिक शास्त्र सारख्या शाखेत त्यांनी घेतलेला प्रवेश समर्थनीय ठरवणारा होता. कोणताही अडथळा निर्माण न करता समोरच्याला संयमाने श्रवण करणारी ही तरुण मुले त्यांच्या मतावर ठाम होती पण, आततायी किंवा आक्रस्ताळी मुळीच नव्हती; हेही मला फारच लोभस आणि आशादायी वाटले, म्हणून भावले.
माध्यमांचा प्रवास ‘मिशन टू प्रोफेशन टू बिझिनेस’ कसा झाला, त्यासाठी व्यवस्थापनाच्या स्तरावर झालेले बदल आणि त्याचा झालेला परिणाम, शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरण तसेच सुलभीकरणामुळे वाढलेले वाचक आणि त्यातून झालेले माध्यमांचे मध्यमवर्गीयीकरण, त्यामुळे माध्यमांची बदललेली मानसिकता, गळेकापू स्पर्धा आणि राजकारण्यांपासून ते उद्योगपतीपर्यंत अशा सर्व ‘मार्केटचे प्रेशर’, त्यामुळे माध्यमांचा ढळलेला तोल, माध्यमे ही समाजाचा आरसा असल्याने समाजात असणाऱ्या चांगल्या आणि वाईटाचे प्रतिबिंब समाजात असलेल्या प्रमाणात या आरशात उमटणार, ही माझी मांडणी झाल्यावर ही तरुण मंडळी माझ्यावर एकदम तुटूनच पडली! समाज बदलला आणि बिघडला, कितीही अध:पतित झाला तरीही माध्यमांनी मात्र स्वच्छ राहून निरपेक्षपणे समाजावर अंकुश ठेवण्याची भूमिका निभवायलाच हवी अशी ठाम अपेक्षा या तरुणांची आहे. पैसा कमावणे हेच ध्येय ठरल्याने माध्यमांचे बाजारीकरण आणि सुमारीकरण झालेले आहे, मिडियात समाजाची नकारात्मक, काळी बाजूच जास्त येते.. असा हल्लाच अनेक उदाहरणे देऊन या मुलांनी केला. त्यांच्या म्हणण्यात असणारे तथ्य नाकारण्यात हंशील नव्हतेच. म्हणून त्यांचे म्हणणे प्रामाणिकपणे मान्य करून टाकले. हे मान्य करतानाच जर समाजाचे विविधस्तरावर सुमारीकरण झालेले आहे तर त्यांचे प्रतिबिंब माध्यमात उमटणारच असा बचाव अर्थातच केला. माध्यमात सर्वच काही वाईट प्रकाशित किंवा टेलिकास्ट होते असे नाही तर अनेक चांगल्या बाबी असतात. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुध्द मोहीम सुरु करण्याआधीपासून माध्यमांनीच भ्रष्टाचाराची अनेक, अत्याचारांची तर अगणित प्रकरणे उघडकीस आणली आहेत याकडे लक्ष वेधत माध्यमांनी दिलेल्या अनेक चांगल्या बातम्या, लेख याची उदाहरणे दिली. शिवाय माध्यमांवर असलेल्या लोकशाहीतील अन्य तीन स्तंभांच्या अंकुशांची माहिती देत त्यामुळे येणाऱ्या मर्यादा सांगितल्या. मुलांना माझे हे म्हणणे मान्य होते पण, माध्यमे कमी वेळा चांगली, सकारात्मक आणि आश्वासक आहेत, ती जास्त वेळा बिनधास्त तसेच बेफाट एकांगीपणे सुसाट सुटली आहेत या त्यांच्या मतावर ते ठाम होते.. तसे मत करून घेण्याचा त्यांचा अधिकार होता!
काही पत्रकार-संपादक दलितांवर झालेल्या अत्याचाराचा संबध कायम नक्षलवादी चळवळीशी का जोडतात, वस्तुस्थिती जाणून न घेता शेतकऱ्यांबद्दल तुच्छतेची भावना का बाळगतात, असा प्रश्न राजू केंद्रे याने अनेक बातम्या आणि अग्रलेखाची उदाहरणे देत केला तेव्हा, त्याचा रोख सहज लक्षात येणारा होता. लोकशाही समाज रचनेत प्रत्येकाला अर्धज्ञानाधारीतही मत स्वातंत्र्याचा अधिकार असतोच शिवाय, त्या मताचा प्रतिवाद करण्याचा आपला हक्क शाबूत असतोच अशी प्रश्नाला मी दिलेली बगल काही त्याला आवडली नाही. कार्यक्रम संपल्यावर ते त्याने आक्रमकपणे बोलून दाखवले आणि नंतरही तो त्यांचे म्हणणे मांडत राहिला.. मनातली असंतोषाची धुम्मस डोळ्यातून जाणवून देणाऱ्या सत्तरीच्या दशकातल्या अमिताभ बच्चनसारखा तो मला वाटला. त्याचा असंतोष प्रांजळ वाटला मला, पटलाही आणि तो व्यक्त करण्याचा आत्मविश्वास मनापासून आवडला. हे मोकळेपणाने सांगत हा अंगार भलतीकडेच वाया घालवू नको असा फुकटचा सल्ला त्याला दिला. यानिमित्ताने संतोष यादवपाठोपाठ तुळजापूरच्या त्या अरण्यशांततेत राजू केंद्रे आणि काहीसा अबोल असलेला राहुल पोखरकर हे युवक मित्र भेटले!
समाजाचे बहुसंख्येने सुमारीकरण झाले, राजकारण भरकटले आणि पत्रकारिताही समतोल राहिलेली नाही मग आशा बाळगायची कोणाकडून? एका तरुणीने शेवटी विचारले. मी म्हणालो, तुमच्या पिढीकडून. सर्वच क्षेत्रातल्या तुमच्यासारख्या चांगल्या, सुसंस्कृत युवकांच्या हातात भारतीय लोकशाही आणि समाज सुरक्षित आहे असा मला ठाम विश्वास आहे.
‘टिस’चा निरोप घेताना वाटलं, तुळजापूरची ओळख केवळ मंदिराचे गाव एवढ्यापुरती मर्यादित राहायला नको. टाटा समाज विज्ञान संस्थेचे गाव अशी दुसरीही ओळख निर्माण व्हायला पाहिजे. शिवाय इथे मराठी टक्का वाढायला हवा.
//२//
औरंगाबादहून विनायक भालेसोबत तुळजापूरचा प्रवास सकाळी सुरु झाला. जानेवारीचा जेमतेम तिसरा आठवडा सुरु झालेला असूनही उन्हं चटचटत होती. कारचा एसी सकाळपासूनच सुरु होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाव लागले की रस्ता मोठा होत असे. राजकीय नेत्यांच्या वाढदिवसांच्या किंवा स्वागताच्या फ्लेक्सची रेलचेल होती. पान-विडीची दुकाने, चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स, मोबाईल शॉपी, हॉटेल्स, बार, खते आणि बियाणांच्या अशा अनेक दुकानांची रांग सर्वत्र दिसे. पुढचे गाव येईपर्यंत रस्त्यालगत शेत कोरून सुरु झालेले ढाबे, बार वैपुल्याने दिसत. बहुतेक सर्व ढाबे आणि बार बंद होते. रात्र उशीरा संपल्याने त्यांची सकाळ आणि धंद्याची वेळ व्हायची होती. गेवराई ते बीड दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला कापसाची अर्धवट उमलेली बोंडे रांगोळी घातल्यागत उडून पडलेली होती. बऱ्याच बैलगाड्या दिसल्या पण, बैल काही धष्टपुष्ट नव्हते. बहुतेक बैलगाडी चालकांच्या चेहेऱ्यावर हास्य नव्हते, चिंताच स्पष्ट दिसत होती. शेतीत रस्त्याच्या दुतर्फा सतेज, गच्च हिरवेगार काही म्हणजे काहीच नव्हते. शेतीत चैतन्यही जाणवत नव्हते. हरबरा, कापूस, गहू अशी पिके दिसली पण मैलो-न-मैल पिके तसेच शेतीही म्लान होती. दक्षिण गंगा गोदावरीत शहागडला पाण्याचे ५/७ डोह दोन्ही बाजूला दिसले. बीडजवळचे बिंदुसरा धरण एका डबक्यापुरते उरलेले होते. वातावरणात एकूणच औदासिन्याचे गडद मळभ होते. १९७२ चा दुष्काळ आठवला, तेव्हा असेच वातावरण होते. रापलेल्या आणि ओढग्रस्त चेहेऱ्यांच्या आणि खंगलेल्या पोटांच्या रांगा दिसायच्या.. त्या आता दिसत नव्हत्या.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीचा राहुल कुळकर्णी याची कधी भेट नाही, केवळ ‘फोनओळख’ आहे. सध्याच्या मराठी चंकमधला मोजक्या चांगल्यापैकी एक तरुण पत्रकार असे त्याच्याविषयी आम्हा उभयतांचे मत आहे. बातमी असो एखादे की फिचर, तो तयारी करून, माहिती मिळवून बोलतो . प्रेझेंटेशन नेमके असते. भाषेची समज तर उत्तमच आहे हे जास्त महत्वाचे. मी जर काही कामात अडकून बघत नसेन तर त्याच्या रिपोर्टबद्दल पत्नी आवर्जून सांगते. मग मी रिपीट टेलीकास्ट नक्की पाहतो. राहुलशी पाण्याबद्दल बोललो तर तो म्हणाला, शहरी भाग सोडला तर पाण्यासाठी प्रचंड हा शब्द थिटा पडावा अशी वणवण आहे. तुम्ही विश्वास ठेवणार नाही सर, पण मुली शिक्षण सोडताहेत पाण्यापायी… आणि बरंच काही. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार नवीन आहे, या सरकारला दुष्काळाची तीव्रता अजून समजलेली नाही. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी भागाचा दौरा मेजवानी करण्यात आणि शेतकऱ्यांची मोबाईलची बिले काढण्यात कसा ‘घालवला’ याची दृश्ये प्रकाशवृत्त वाहिन्यांवर बघायला मिळाली आहे. सरकार पातळीवर अशी स्थिती असताना विरोधी पक्षाला तरी कुठे हा दुष्काळ उमजला आहे? विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे अस्तित्व अहमदनगर जिल्ह्यातही जाणवत नाही आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे परळीपुरते मर्यादित झाले आहेत. (अनेकदा आवश्यकता नसतानाही) काही प्रश्नांवर धनंजय मुंडे पत्रक काढण्याची तरी पोपटपंछी करतात, विखे पाटलांना तेही सुचत नसावे.. असा उद्वेगजनक आनंदी-आनंद आहे!
परतीचा प्रवास सुरु झाला. संध्याछाया दाट होऊ झाल्या. रस्त्यावरच्या ढाबे आणि दारूच्या दुकाने-बार्सना जाग आलेली होती. त्यांच्या पेटलेल्या चुल्ह्याच्या धुराच्या रेषा दिसू लागलेल्या होत्या. पाण्याच्या टंचाईबाबतचे राहुलचे शब्द आठवले. जानेवारीत ही स्थिती आणि अजून पाच महिने जायचे आहेत.. अंगावर कांटा उभा राहिला, काळजावर चरा उमटला. सकाळी शेतीवर जाणवलेले औदासिन्याचे गडद मळभ माझ्यावरही दाटून आले…
-प्रवीण बर्दापूरकर / ९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
(पाणी छायाचित्र दैनिक ‘दिव्य मराठी’च्या सौजन्याने. छायाचित्रकार-हाफीज खान पठाण)