““ एकदा एक बिनशिडाचं तारु भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी! होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा! होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि’नारा’ गाठणार यावर मात्र तिघांचही एकमत होतं. अशातच समुद्र खवळला. वादळ उठलं. होडी हेलकावे खाऊ लागली. आता आपण काही तरत नाही, या भयानं तिघंही हादरले. लांबवर एक भव्य जहाज खवळलेल्या समुद्रातही संथपणे पुढे सरकत होतं. तिघांनी त्याकडे पाहून हातवारे सुरू केले. शिट्ट्या वाजवल्या. ‘आम्हाला वाचवा’ असा आक्रोशही सुरू केला. पण वादळ आणि लाटांच्या तांडवात तो केविलवाणा आवाज तिकडे पोचलाच नाही. मग आसपास आणखी कुणी आपल्यास वाचविण्यासाठी भेटतं का याचाही शोध सुरू झाला.
कुणीच दिसत नव्हतं.
अखेर नाईलाज झाला. होडीचं काय होईल ते आता नशीबावर सोपवावं असा स्वाभिमानी विचार करून तिघेही खवळलेल्या समुद्राकडे हतबलपणे पाहात राहिले.
होडी भरकटतच होती.
लांबवर एक कि’नारा’ दिसत होता. होडी हळुहळू तिकडेच जात होती.
सुदैवाने सारे कि’नाऱ्या’वर उतरले.
जीव वाचल्याचा आनंद तिघांनाही लपवतां येत नव्हता.
काही वेळ विश्रांती घेऊन ते आत शिरले आणि त्यांना धक्का बसला!
त्या बेटावर एकही प्राणी दिसत नव्हता. माणसाचा तर मागमूसही नव्हता…
तिघेही काही क्षण घाबरले. मधल्याने दाढीवरून उगीचच हात फिरवला.
‘आता दाढी वाढवावीच लागणार!’ तो पुटपुटला आणि मोठ्याने त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर दिला.
आता आपणच काहीतरी केलं पाहिजे हे ओळखून आवाजात उसना उत्साह आणून तो म्हणाला,
‘चला… आजपासून आपणच या बेटावर राज्य करू! आपण इथले राजे!’
उरलेल्या दोघांचे डोळे चमकले!
आणि तिघंही हातात हात घेऊन उंच आवाजात नारा दिला, ‘हा कि’नारा’ आमचा आहे!’….
बेटावर चहुबाजूंनी त्या नाऱ्याचा एकमुखी आवाज घुमला!! ””
====
नारायण राणे यांनी कॉंग्रेस सोडण्यापूर्वी पत्रकारितेतील माझा जुना प्रिय सहकारी दिनेश गुणे यांनं ‘किनारा’यण!’ ही; नारायण राणे किंवा त्यांच्या पुत्रांचा नामोल्लेखही नसलेली पण, त्यां तिघांनाच उद्देशून असलेली संकेतकथा फेसबुकवर पोस्ट केलेली आहे. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देतांना नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केलेली वक्तव्ये ऐकली आणि दिनेश गुणेची कथा वास्तव व बोचरेपणा यांचं अफलातून उदाहरण आहे याची खात्री पटली.
नारायण राणे यांना भाजपत नेण्याची घाई मिडियाला कितीही झालेली असली तरी काही महिन्यापूर्वी मी लिहिलं होतं की, त्यांना पक्षात घेण्याची भाजपला मात्र मुळीच घाई नाही; कारण ज्या वस्तूची उपयोगिता संपलेली असते तिचे मूल्य शून्य असते. टीआरपीच्या नादात किंवा नारायण राणे यांच्याच ‘टीप’वरुन बातम्या देताना बाजारपेठेचा हा नियम ठाऊक नसावा अन्यथा राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या इतक्या वावड्या उठवण्याचा इतका उठावळ छचोरपणा मिडियानं केला नसता. सुमारे बारा वर्षापूर्वी शिवसेना सोडतांना नारायण राणे यांची जी वट राजकारणात होती ती आता पार उतरलेली आहे आणि ती मिळवल्याशिवाय त्यांना पुन्हा उठाव मिळणार नाही याचं भान या वावड्या उठवताना राहिलं नाही. एक लोकसभा आणि सलग दोन विधानसभा निवडणुकात पराभव चाखावा लागल्यानं आणि राहुल गांधी यांनी फेकलेला विधान परिषद सदस्यत्वाचा ‘तुकडा’ लाचारागत स्वीकारल्यावर, नारायण राणे यांचे हे असे हाल होणं अटळच होतं; ते फक्त राणे यांना कळत नव्हतं ही गोम होती. त्यामुळेच कॉंग्रेस सोडण्याची घोषणा करतांना नारायण राणे जे काही बोलले आहेत, त्याचं वर्णन ‘रुदन’ अशा एकाच शब्दात करावं लागेल.
एकिकडे वैयक्तीक आकांक्षा काहीच नव्हती आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीपद दिलं नाही, असा गळा काढायचा, अशोक चव्हाण यांच्यामुळे पक्ष वाढत नाही असं म्हणतांना जहाज सोडण्याचा निर्णय जाहीर करायचा, कॉंग्रेस पक्षानं दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणतांना नऊ वर्ष मंत्रीपद, एकाच घरात दोन आमदार आणि एक खासदार, सलग दोन निवडणुका हरल्यावरही मिळालेलं विधान परिषद सदस्यत्व, याचा पडलेला विसर पडणं हे नारायण राणे यांचं राजकीय भान सुटल्याचं लक्षण आहे; नारायण राणे यांना राजकारणाचं आकलन पक्कं आहे किंवा नाही असाही प्रश्न त्यातून निर्माण झालेला आहे. अहमद (अमद नव्हे!) यांच्या सांगण्यावरुन आपण विलासराव देशमुख यांच्या विरोधात बोललो ही जाहीरपणे सांगून आपल्याला स्वत:च्या मताने नव्हे तर कुणाच्या न कुणाच्या इशाऱ्यावर वागायची संवय आहे, अशी दिवाळखोरी नारायण राणे यांनी जाहीर केली; म्हणजे शिवसेनेसारखं भक्कम कवच आणि कायम बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाछत्राखाली वावरल्यानं त्यांचं तोकडेपण उघडकीला आलेलं नव्हतं, असाच याचा अर्थ आहे आणि हे दस्तुरखुद्द नारायण राणे यांनीच चव्हाट्यावर आणलेलं आहे. कॉंग्रेसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ घालण्याची पध्दत नसून ‘मुजरा’ करावा लागतो, कॉंग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठींचा कल ओळखून सूर्योदयाचीही दिशा ठरवण्याची प्रथा आणि परंपरा आहे, कोणत्याही मोठ्या पदाची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्याला कॉंग्रेस पक्षात कायम दुर्लक्ष, उपेक्षा आणि अवहेलनाच सहन करावं लागण्याची परंपरा आहे, शिवसेना सोडून राणे यांच्यासोबत जे आले त्यांची काँग्रेसी शैलीत कधीच वाताहत करून टाकण्यात आलेलेली आहे, हे नारायण यांना कळू नये आणि त्यांच्या सल्लागारांनीही हे सांगू नये ही तर भीषण शोकांतिकाच म्हणायला हवी.
नारायण राणे यांचं उघडकीला आलेलं तोकडेपण कसं आहे तर – कॉंग्रेसच्या सलग पराभवासाठी राज्यातील नेत्यांना राणे जबाबदार धरतात पण, देश पातळीवर झालेल्या कॉंग्रेसच्या सुपडा-साफसाठी ते राहुल गांधी किंवा सोनिया यांना दोषी ठरवत नाहीत; (आम्ही सोनिया गांधी यांनी सांगितलं तरच ऐकू. अशोक चव्हाण यांचं ऐकणार नाही, असं तद्दन भोंगळ राजकीय विधान नीलेश राणे यांनी केलंय!) कॉंग्रेसच्या विस्तारासाठी जीव तोडून प्रयत्न होत नाहीत असं म्हणत असतानांच, आपण त्यासाठी काय केलं हे ते न सांगता कॉंग्रेसनं मुख्यमंत्री करण्याचा शब्द पाळला नाही, हेच केविलवाणं रुदन नारायण राणे करत राहतात.
खूप बोल लावूनही अखेर अशोक चव्हाण यांच्या मंत्री मंडळात उद्योग मंत्रीपद स्वीकारून नारायण राणे यांनी ते पदासाठी आसुसलेले असल्याचं सिध्द केलं आणि तेव्हापासून त्यांची कॉंग्रेसमधली वट आणि प्रभाव ओसरण्यास सुरुवात झाली. राणे यांना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याला कोणी रोखलं नव्हतं पण, जो कोकण हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो त्याच किल्ल्यात स्वत:चा आणि पुत्राचा पराभव राणे रोखू शकले नाहीत; लग्गेच झालेल्या पोटनिवडणुकीत मुंबईतही बांद्रा मतदार संघातून नारायण राणे दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभवाला आणि तेही शिवसेनेकडूच सामोरे गेले; याचा अर्थ असा की, कोणत्याही सभागृहात स्वबळावर निवडून येण्याइतपतही नारायण राणे यांचा प्रभाव उरलेला नाही, दोन पुत्र आणि एक आमदार वगळता त्यांचा कोणी समर्थक आता उरलेला नाही अशी आजची स्थिती आहे. त्यात या सुपुत्रांनी जे काही ‘कर्तृत्व’ कोकणात दाखवलं (त्याला जनसामान्यांच्या भाषेत मग्रुरी आणि माजोरीपणा म्हणतात) तेही नारायण राणे यांचा कोकणातील प्रभाव ओसरण्याचं एक मुख्य कारण आहे; हे नारायण राणे यांनी नाही तरी भाजपनंही चांगलं ओळखलेलं आहे. भाजपतील एका बड्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांना भाजपत प्रवेश मिळणारच आहे. पण, बहुदा ग्राम पंचायत निवडणुकात प्रभाव सिध्द केल्यावरच नारायण राणे यांना भाजपत प्रवेश मिळेल असं जे बोललं जात त्यात तथ्य वाटतंय. हे म्हणजे पद्मविभूषण सन्मान मिळाल्यावर मानद वॉर्ड कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासारखं झालंय!
युतीत असतांना नारायण राणे यांना ज्युनिअर असणारे भारतीय जनता पक्षातले राज्यातले बहुसंख्य नेते आता निर्णयाधिकारी झालेले आहेत. एके काळी ‘ज्युनिअर’ असणारे भाजपचे देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचा महाराष्ट्राचा चेहेरा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे (आज्ञाधारकपणे) काम करतील का, भाजपची वेगळ्या विदर्भाची भूमिका राणे यांना (निमुटपणे) मान्य असेल का, मुख्यमंत्री नसलेल्या पण, त्या पदाचे दावेदार असणाऱ्या नारायण राणे यांचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना मान्य असेल का, दरवषी एकदा रेशीमबागेत हजेरी लावण्याचा संयम राणे यांच्यात आहे का, राणे यांना तातडीनं एखाद्या सभागृहात निवडून आणायचं कसं…असे अनेक जर-तर, पण-परंतु राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या मार्गात आहेत.
कमी बोलावं आणि संयमानं वागावं ही समजही अजून राणे यांना राजकारणात राहून आलेली नाही, असाही त्यांनी कॉंग्रेसचा त्याग करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस आणि सेनेवर तसेच सर्वच नेत्यावर जी काही सरबत्ती केली त्यातून समोर आलेलं आहे. या स्वभावामुळे एकतरी मित्र राजकारणात उरेल का असा प्रश्न नारायण राणे का पडत नाही, हे काही समजत नाही. शिवसेना सोडतांना शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणे यांनी केलेली होती प्रत्यक्षात शिवसेना वाढली. सुमारे १३० वर्षांचा कॉंग्रेस नावाचा विचार, या देशाला राजकारण आणि विकासाचं मॉडेल देणारा कॉंग्रेस पक्ष आपल्या शापामुळे संपेल, हा नारायण राणे यांचा आशावाद भाबडाच म्हणावा लागेल. असे तळतळाट देऊन काहीच साध्य होत नाही हे, तिसऱ्या पक्षांतराच्या तयारीत असलेल्या नारायण राणे यांना उमजलेलं नाही, हाही या तोकडेपणाचा आणखी एक अर्थ आहे.
-म्हणूनच कॉंग्रेस पक्ष सोडतांना नारायण राणे यांनी एखादं शौर्यगीत गायलेलं नाहीये तर रुदन केल्याचं महाराष्ट्रासमोर आलंय. या रुदनातून अमृत निघालं नाही तर दिनेश गुणे म्हणतो त्याप्रमाणे आणखी एखादा नवा ‘किनारा’ शोधण्याची वेळ नारायण राणे यांच्यासाठी भविष्यात येईल. ती वेळ नारायण राणे यांच्यावर येऊ नये यासाठी शुभेच्छा!
(छायाचित्रे सौजन्य- गुगल)
-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९ | praveen.bardapurkar@gmail.com
============================
‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी
लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
============================