राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते , संघाच्या हिंदुत्वाचे प्रखर भाष्यकार अशी ओळख असलेल्या मा. गो. वैद्य यांच्या व्यक्तीमत्वाचे एक साक्षेपी , निष्पक्ष , व्यावसायिक आणि कुशल संपादक , भाषा तज्ज्ञ , संस्कृतचे शिक्षक व अभ्यासक हेही असलेले पैलू अनेकांसाठी अज्ञात आहेत . मा. गो. वैद्य यांच्या या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारा हा लेख .
मा. गो. वैद्य यांनी आज ,११ मार्च २०२०ला वयाच्या ९८व्या वर्षात पदार्पण केलं आहे . त्यानिमित्त नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार श्यामकांत पात्रीकर यांनी संपादित केलेला ‘वैद्य’कीय हा गौरव ग्रंथ ७ मार्चला प्रकाशित झाला . त्या ग्रंथात समाविष्ट लेख –
मा . गो. वैद्य यांच्याशी झालेली पहिली भेट अजूनही आठवते . ते वर्ष होतं १९८१ . महिना डिसेंबर आणि स्थळ विधिमंडळाची इमारत . कविवर्य ना. धों . महानोर यांनी त्यांचे विधान परिषदेतील सहकारी असलेले मा . गो. वैद्य यांच्याशी ओळख करुन दिली आणि सांगितलं , ‘हा आमच्या मराठवाड्यातला बरं का!’ . मा. गो. वैद्य यांचं नाव आणि दरारा मी ऐकून होतो ; वर्षभरापासून नागपुरात असल्यानं त्यांना दुरून पाहिलेलंही होतं पण , समोरासमोर प्रथमच भेटत होतो . ‘तरुण भारत’ या दैनिकाचे संपादक , संस्कृतचे गाढे अभ्यासक , मराठीचे तज्ज्ञ , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी अशी बाबुराव वैद्य यांची ओळख होती .परखड प्रतिपादन करणारं त्यांचं लेखन लोकप्रिय होतं . प्रथम दर्शनी लक्षात आली ती त्यांची भेदक नजर . त्यामुळे हस्तांदोलन करण्याची गुस्ताखी न करता मी आपला हात जोडून त्यांना नमस्कार केला . ‘मी ओळखतो यांना , त्यांच्या काही बातम्या वाचल्या आहेत’ असं मा. गो. वैद्य त्यावर म्हणाले . कोण , कुठले , काय वाचता वगैरे जुजबी चौकश्या झाल्या आणि आमची भेट संपली . त्यांची ती भेदक नजर माझा नंतरही पाठलाग करतचराहिली . विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असल्यानं दिवसभरातून एकदा तरी महानोरांची भेट घ्यायचा शिरस्ता असल्यानं ‘मा.गों’नाही नमस्कार घडत होता . त्याच अधिवेशनाच्या काळात ‘मा.गों.’नी मराठी भाषेसंबंधी एक बातमीही मला दिली . मी काम करत असलेल्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात ती बातमीदुसर्या दिवशी प्रकाशित झाल्यावर त्या बातमीचा उ‘ेख करुन ना. धों . महानोर आणि मा.गो वैद्य या दोघांनीही विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित केला . पत्रकारितेत येऊन तेव्हा जेमतेम ४ वर्ष झालेली होती आणि विधिमंडळ वृत्तसंकलनाचं ते माझं पाहिलंच वर्ष होतं . दोन दिग्गजांनी आपल्या बातमीच्या आधारे विधान परिषदेत बोलावं हे मला फारच भारी वाटलं . नंतर अधूनमधूनभेटी होत गेल्या भीड चेपली आणि मा. गो. वैद्य यांना मीही बाबुराव म्हणू लागलो .
खरं तर , मी कांही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ज्या पक्षात अनेक जिवलग मित्र आहेत त्या भारतीय जनता पक्षाचा किमान समर्थकही नाही . शिवाय त्यांची विद्वत्ता आणि माझी समज यात मोठ्ठं अंतर होतं . त्यामुळे बाबुराव वैद्य यांच्याशी कितपत सूर जुळतील याबद्दल मी साशंकच होतो . ही साशंकता दूर करण्याचं सर्व श्रेय मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांचं . मध्यम उंची , शिडशिडीत बांधा , गव्हाळ वर्ण , धुवट धोतर आणि त्यावर सदरा घातलेल्या बाबुराव वैद्य यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भेदक नजर ; अशी की जणू त्यांचे डोळे समोरच्याला पूर्ण स्कॅन करत आहेत . शिवाय चेहेर्यावर विद्वता आणि अधिकारांचं तेज . त्यामुळे हा माणूस समोरच्याचं ऐकून घेईल की नाही अशी शंका प्रथमदर्शनी यायची पण , प्रत्यक्षात मात्र त्यांचं बोलणं आणि समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं याबाबतीत बाबुराव वैद्य उदार असल्याचा अनुभव नंतर येत गेला . महत्त्वाचं म्हणजे या माणसातले अनेक गुण समजत गेले , त्यांच्याकडून मराठी भाषा शिकायला मिळाली .
‘तरुण भारत’ या दैनिकासाठी मी कांही काळ पत्रकारिता केलेली आहे आणि मला तिथे बर्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत . निवडणुकीच्या काळात शिवराळ भाषेत करण्यात येत मोहिमेबद्दल मतभेद होऊन मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या मुख्य वार्ताहरपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला तेव्हा आर्थिक परिस्थिती फार कांही चांगली नव्हती . पत्नी मंगला नोकरी करत होती आणि माधव गडकरी यांच्यामुळे ‘मुंबई सकाळ’ या दैनिकाचा नागपूरचा वार्ताहर म्हणून काम करत होतो . मी बर्यापैकी अडचणीत होतो पण मुकुंदराव किर्लोस्कर यांच्यामुळे पुण्याच्या ‘सकाळ’चाही वार्ताहर म्हणून काम करु लागलो . दरम्यान माधव गडकरी ‘लोकसत्ता’चे संपादक झाले आणि तेही काम पत्नी मंगलाच्या नावाखाली करु लागलो . या तिन्ही दैनिकांचं मिळून मासिक मानधन १५०० रुपये होतं ; तेव्हा उपसंपादकाला सुमारे १३०० रुपये पगार मिळत असे . म्हणजे माझी प्राप्ती बर्यापैकी चांगली होऊ लागलेली होती . शिवाय मी सतत कोणत्या ना कोणत्या साप्ताहिक-मासिकासाठी लिहीत असे . तेव्हा दूरदर्शनचं प्रक्षेपण नुकतच नियमित सुरु झालेलं होतं आणि त्याचं अप्रूप होतं . माझा यारदोस्त प्रकाश देशपांडे तेव्हा ‘तरुण भारत’ या दैनिकाच्या ‘मध्यमा’ या पुरवणीचा संपादक होता . त्याच्यामुळे दूरदर्शनवरील कार्यक्रमांवर आधारित ‘साप्ताहिकी’ हा स्तंभ लिहायला सुरुवात केली . या मानधनातून पेट्रोल आणि बिडी-काडीचा खर्च सुटे . एकंदरीत आमचं चांगलं चाललेलं असतांना जगण्याला अचानक एक वळण मिळालं .
‘तरुण भारत’ या दैनिकाचे मुख्य संपादक तेव्हा ‘मामासाहेब’ या नावाने ओळखले जाणारे दि . भा. घुमरे होते आणि ल . त्र्यं . जोशी तेव्हा नंबर दोन होते . लक्ष्मणराव हे त्यांचं सर्वपरिचित संबोधन . एक दिवस सकाळी लक्ष्मणरावांचा फोन आला . सटरफटर बोलणं झाल्यावर त्यांनी सांगितलं ‘दुपारी जरा बाबूरावांना भेटून घ्या’.
‘प्रयोजन काय’ असं मी विचारलं तर लक्ष्मणराव म्हणाले ,‘भेटून तर घ्या . कांही चांगली बातमी असेल’ .
एव्हाना बाबुराव वैद्य यांच्याशी गप्पा मारण्याइतकी घसट निर्माण झालेली होती . एका नागपूर ते मुंबई रेल्वे प्रवासात आम्ही सोबत होतो आणि दोघांचीही तिकिटे कन्फर्म नव्हती . त्या डब्याचा टीसी बाबुराव यांच्या ओळखीचा होता आणि लवकरच तिकीट कन्फर्म करतो असं तो त्यांना म्हणाला . त्यावर ‘यांचंही बघा’ असं बाबूरावांनी त्याला सांगितलं . बर्थ मिळेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो . म्हणजे बाबुराव बोलत होते आणि मी श्रवण करत होतो . तर , लक्ष्मणरावांनी सांगितल्याप्रमाणं मी कार्यालयात गेलो . लक्ष्मणरावांना भेटलो . मला बाबुराव वैद्य यांच्या केबिनमधे सोडून लक्ष्मणराव लगेच बाहेर गेले . इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माझ्या संदर्भात बाबुराव वैद्य यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकश्या केल्या . शेवटी ते म्हणाले , ‘आमच्याकडे ‘तरुण भारत’मध्ये वार्ताहराची एक जागा रिकामी झाली आहे . तुम्ही येणार का ?’
मला हा धक्काच होता . ते स्पष्ट सांगून मी म्हणालो , ‘‘सकाळ आणि लोकसत्ता या दोन दैनिकांसाठी मी अर्धवेळ काम करतो आहे . पुढच्या करीयरसाठी आणि माझी मुळं महाराष्ट्रात टिकून राहण्यासाठी ते आवश्यक आहे . शिवाय मी काही संघ समर्थक नाही . म्हणून मला जरा वेळ द्या विचार करायला‘.
‘तुम्ही विचार करा , काही हरकत नाही . ‘लोकसत्ता’ आणि ‘सकाळ’चं काम करायला हरकत नाही . संघाबद्दल नंतर बोलू आधी काम तर करुन बघा’ , असं हसत हसत बाबुराव म्हणाले आणि आमची भेट संपली . जाण्याआधी दिगंबरराव आणि लक्ष्मणरावांना भेटून घ्या हे त्यांनी आवर्जून सांगितलं . बाबुराव हसतातसुद्धा हे सुखावणारं होतं आणि लक्ष्मणराव लगेच बाहेर का गेले या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं .
तेव्हा ‘तरुण भारत’मध्ये असणारा माझा दोस्तयार प्रकाश देशपांडे सेक्युलर विचाराचा होता . त्याच्याशी बोललो . प्रकाशनं सांगितलं , ‘तरुण भारत केवळ संघवाल्यांचा आहे हा तुझा गैरसमज आहे . मीच नाही तर कम्युनिस्ट अण्णासाहेब ( प्र . शं . ) देशमुख , आंबेडकरी ज्ञानेश्वर वाघमारे हेही आहेत संपादकीय विभागात’ . मग मी यथावकाश ‘तरुण भारत’ या दैनिकात रुजू झालो आणि एक वेगळे बाबुराव वैद्य मला अनुभवायला मिळाले . शिवाय माझ्यावर अचूक मराठी भाषेचा विस्तारित संस्कारही याच नोकरीच्या काळात झाला हे नमूद करायला मला आनंद वाटतो . शरदराव मोडक , प्रकाश देशपांडे , अण्णासाहेब देशमुख , वामन तेलंग , लक्ष्मणराव या मंडळींनी माझीच नाही तर सर्वांचीच भाषा तेव्हा घोटून घेतली . या संदर्भात बाबुराव वैद्य तर गुरुच होते .
बाबुराव वैद्य तेव्हा संघाच्या प्रकाशनांची शिखर संस्था असलेल्या तरुण भारत असोसिएट्सचे अध्यक्ष होते . ‘तरुण भारत’च्या संपादकीय विभागा लगतच त्यांची केबिन होती . दैनंदिन कामात त्यांचा हस्तक्षेप नव्हता मात्र त्यांची दैनंदिन कामावर गडद छायाआणि दराराही होता . तेव्हा बाबुराव किमान पंधरा-वीस दिवस तरी दौर्यावर असत . आल्यावर आठवडा-पंधरा दिवसातून एकदा तरी ते दुपारी चहाच्या वेळेस संपादकीय विभागात चक्कर मारत आणि गप्पा मारत . या गप्पा अंकाबाबत असत . भाषक चुकांवर बाबुराव त्या चुकीचा उल्लेख करुन कोरडे ओढत . चुका दाखवताना अचूक शब्द , भाषा रचना कशी हवी , त्याची व्युत्पत्ती याबद्दल सांगत . भाषा विषयक समज आणि जाणिवा विकसित करणारा तो अनुभव मी कधीही विसरु शकणार नाहीच . त्या ‘वर्गा’त शिकल्यानुसार अजूनही मी ‘तज्ज्ञ’ असाच शब्दप्रयोग करतो ,’तज्ञ’ नाही ; पोलीस या शब्दातलं ‘ली’ हे अक्षर ‘दीर्घ’च लिहितो ‘र्हस्व’ नाही आणि प्रत्यय लागल्यावरच ‘लि’ असा र्हस्व करतो ; ‘अस्मादिक’ लिहितो, ‘आस्मादिक’ नाही ; जर मराठीत अक्षरावरची वेलांटी दीर्घ असेल तर इंग्रजीत इ वापरतो…असं सांगावं तितकं थोडंच आहे .
एकदा या वर्गात बाबुरावांनी अचानक विचारलं , ‘गेल्या आठवड्यात झालेल्या ए . बी . बर्धन आणि श्री . वा . धाबे या पत्रकार परिषदा इतक्या त्रोटक का आल्या ?’ संबंधित वार्ताहरानं बचाव करतांना सांगितलं की , बर्धन भाजपच्या फारच विरोधात आणि अर्धवट माहितीवर आधारित बोलले म्हणून..त्याला ताड्कन तोडत बाबुराव म्हणाले , ‘तशीच बातमी द्यायची होती आणि नंतर लेख लिहून बर्धन यांना उघडं पाडायचं होतं . बातमीशी कधीच छेडछाड करु नका यापुढे ‘. बाबुराव वैद्य यांचं हे सांगणं तरुण भारत या दैनिकाच्या ( तेव्हाच्या ) यश आणि विश्वासार्हतेचं गुपित तर होतंच शिवाय पत्रकारितेचा तो एक धडाही होता .
बाबुराव यांच्या पत्रकार/संपादक म्हणून निकोप असणार्या काही आठवणी यानिमित्तानं नोंदवून ठेवायला हव्यात . ‘तरुण भारत’मध्ये असताना माझ्या वाट्याला राष्टीय स्वयंसेवक संघाच्या असाईनमेंट जास्त येत . मला तो छळ वाटत असे . एकदा त्या संदर्भात मी तक्रार केली तर लक्ष्मणराव म्हणाले , ‘त्या बाबुरावांच्या सूचना आहेत’ .
मग एकदा धाडस करुन ही तक्रार बाबुराव वैद्य यांच्याकडे मी केली . त्यावर बाबुराव शांतपणे म्हणाले , ‘तुम्ही त्या बातम्या भक्तिभावानं नाही तर रिपोर्टर म्हणून अतिशय व्यवस्थित लिहिता म्हणून मी तसं सुचवलेलं आहे . शिवाय उद्या संघावर तुम्ही लिहाल तेव्हा तुम्हाला बरंच काही नीट समजलेलं असेल’ . ते एक प्रशस्तीपत्र होतं , ते देण्याची ती खास बाबुरावांची शैली होती आणि शिकवणही .बाबुराव वैद्य यांचा हा दृष्टिकोन बरंच काही शिकवणारा ठरला .
रा . स्व . संघाचा तृतीय शिक्षा वर्ग आणि त्याचा जाहीर समारोप, ही नागपुरात एक मोठी इव्हेंट असते . ‘तरुण भारत’चेही अनेक सहकारी संघाच्या वेषात त्या कार्यक्रमाला श्रद्धेनं हजेरी लावत असतात . समारोपाच्या वृत्त संकलनाचं कामही माझ्याचकडे येत असे . हे घडलं तेव्हा बाळासाहेब देवरस सरसंघचालक होते . त्या वर्षीच्या समारोपाच्या कार्यक‘माला गेलो . बाळासाहेब देवरस यांची कार आल्यापासूनच कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले उठून उभे राहिले ; अपवाद केवळ मी आणि ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकाच्या अनिल शर्मा यांचा होता . कार्यक्रम संपल्यावर कार्यालयात येऊन मी बातमी दिली आणि घरी गेलो . दुसर्या दिवशी कार्यालयातून दोन-तीन फोन आले की माझ्या संदर्भात कांही तरी सुरु आहे . लक्ष्मणराव जोशी यांचा फोन आल्यावर बराच उलगडा झाला . कार्यालयात गेल्यावर माझी पेशी सरळ संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब टालाटूले यांच्या दरबारात झाली . मला उभं करुनच त्यांनी फायरिंग सुरु केली . लक्ष्मणराव गप्प होते ; तो त्यांचा नाईलाज असावा . शेवटी मला मेमो द्यावा असा निर्णय झाला . उपमर्द करणारी वागणूक मिळण्याचा माझ्या आयुष्यातला तो पहिलाच ( आणि शेवटचाहिं ! ) प्रसंग होता . उद्विग्न होऊन मी बाहेर पडलो . आपल्या नोकरीचा हा शेवटचा महिना या निर्णयाप्रत मी एव्हाना आलेलो होतो . संपादकीय विभागाकडे जाणारा जिना चढत असताना बाबुराव जिना उतरताना दिसले . माझ्या चेहेर्यावरचा तणाव त्यांना जाणवला असावा . त्यांनी काय झालं वगैरे चौकशी केली , मी त्यांना जिन्यातच उभ्या-उभ्या तावातावानं सांगू लागलो तर ते म्हणाले ,‘चला वर बसून बोलू’ . त्यांच्या केबीनमधे जाईपर्यंत मीही जरा सावरलो होतो . त्यांनी चहा मागवला . मग मी काय घडलं ते , माझी भूमिका आणि राजीनाम्याचा विचार वगैरे मोकळेपणानं सांगितलं . प्रकरण जरा गंभीर झालं असल्याचं मान्य करुन बाबुराव किंचित रागानंच म्हणाले , ‘आदर म्हणून उभे राहिले असतात तर काय बिघडलं असतं ? वाद ओढावून घेण्याचा तुमचा स्वभाव कांही जात नाही !’ थोडा वेळ शांततेत गेल्यावर बाबुराव म्हणाले , ‘‘जा कामाला लागा . मी बघतो काय करायचं ते आणि हो राजीनाम्याचा विचार काढून टाका मनातून’ .
पुढं या प्रकरणात काहीच घडलं नाही . स्वयंसेवक नसलेल्या पत्रकाराच्या बाजूनं बाबुराव वैद्य ठामपणे उभे राहिल्यानंच हे घडलं , हे मला चांगलं ठाऊक आहे .
आणखी एक प्रसंग – एका संततिनियमन गोळीची ( टुडे ) पत्रकार परिषद होती . कंपनी मुंबईची होती आणि त्या कंपनीचा जनसंपर्क अधिकारी माझा महाविद्यालयीन जीवनापासूनचा मित्र होता . मी काही बिझिनेस बीट कव्हर करत नव्हतो . अशा पत्रकार परिषदांना मी चुकूनही जात नसे पण , मित्र म्हणाला , ‘तुला पत्रकार परिषद कव्हर कर, असं म्हणतच नाहीये मी . परिषद संपल्यावर ये . आपण गप्पा मारु आणि जेवू या !’ . कल्पना चांगली होती . मी गेलो तेव्हा जेवणं आटोपत आलेली होती . दोघे-तिघे मंतरलेल्या पाण्यासोबत चाळा करत बसलेले होते . मी आणि माझा मित्र जरा दूर एका टेबलवर बसलो . खूप वर्षांनी भेटलो असल्यानं रात्री उशीरापर्यंत दोस्तीचे ‘गले शिकवे’ झाले .
तिसर्या दिवशी भलतंच लफडं वाट्याला आलं . एव्हाना लक्ष्मणराव जोशी संपादक झालेले होते . त्यांचं लगेच या असं बोलावणं आलं . गेलो तर जाहिरात विभागाचे अधिकारी बसलेले होते . ‘ती’ बातमी आमच्याकडे प्रकाशित झालेली नव्हती आणि त्याबद्दल मला दोषी धरण्यात आलेलं होतं . मी काय घडलं ते लक्ष्मणरावांना समजावून सांगितलं . त्यांना ते पटलंही . पण, प्रकरण आणखी चिघळलं . बाबुराव वैद्य यांच्या दरबारात पोहोचण्याची वर्दी आली . मी पोहोचलो तर बाकीचे त्यांचं म्हणणं सांगून गेलेले असावेत . मी जे काय सांगायचं ते सांगितलं . बाबुराव वैद्य यांच्या चेहेर्यावर मिश्कील हसू होतं . मला ते म्हणाले , ‘जायच्या आधीच लक्ष्मणरावांना सांगायला पाहिजे होतं, म्हणजे हा गोंधळ झाला नसता . असो ! ती प्रेसनोट आहे का तुमच्याकडे ?’ . मी नाही म्हणालो कारण मी पत्रकार परिषदेला गेलेलोच नव्हतो अशीही पुस्ती जोडली . बाबुराव वैद्य यांनी त्यांच्यासमोरची प्रेस नोट माझ्याकडे दिली आणि ते म्हणाले , ‘अडचण इथे आहे’ . मी पहिलं तर प्रेसनोट इंग्रजीत होती’ . ‘तरुण भारत’मधल्या प्रत्येकाला ते किती चांगलं ओळखून होते हे माझ्या लक्षात आलं . मी उठलो तर बाबुराव म्हणाले , ‘त्यांची अडचण ओळखून एक बातमी करुन द्या’. संपादकीय विभागात आलो तर लक्ष्मणराव समोरच गालातल्या गालात हसत उभे होते .
एक शेवटची आठवण सांगतो- माझी बदली ‘लोकसत्ता’च्या नागपूर कार्यालयातून मुंबईला झाली . शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत पत्नी मंगला आणि कन्या सायली नागपूरलाच राहणार होते . मुंबईला रुजू होण्याआधी नागपुरात बाबुराव वैद्य वगळता बहुतेक सर्वांच्या भेटी झाल्या . ते तेव्हा संघाच्या सर्वोच्च वरिष्ठ वर्तुळात होते . भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीतही होते आणि त्यांचा जास्त मुक्काम दिल्ली व उत्तर प्रदेशात असे . ते तेव्हा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या गडबडीत असावेत . त्या निवडणुका संपल्यावर बाबुराव नागपुरला आले तेव्हा नेमका मीही नागपूरला आलेलो होतो . रीतसर वेळ घेऊन ज्येष्ठ संपादक मनोहर अंधारे आणि मी बाबूरावांना भेटायला गेलो . माझी मुंबईला बदली झाल्याचा त्यांना आनंद झाला . बर्याच गप्पा झाल्या . त्यात उत्तरप्रदेशच्या निवडणुका आणि लागलेले निकाल हाही विषय होता . बोलता बोलता बाबुराव सहज बोलून गेले की भाजपच्या पाठिंब्यावर मायावती मु‘यमंत्री होऊ शकतात . मुंबईच्या प्रवासात तोच विषय माझ्या डोक्यात घोळत राहिला . ‘लूज टॉक’करण्यात बाबुराव नसतात हे मला चांगलं ठाऊक होतं . बहुजन समाजवादी पक्षाच्या मायावती मुख्यमंत्री होण्याचा संदर्भ त्यांनी मला हिंट म्हणून दिला होता अशी माझी खात्री होती . मग भाजपच्या पाठिंब्यावर मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री होणार असल्याची बातमी केली . ती बातमी मराठी , हिंदी , इंग्रजीत माझ्या नावानिशी प्रकाशित झाली . माझं राजकीय ज्ञान हे अज्ञान असल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला तरी कोणताही प्रतिवाद न करता मी ठाम होतो . नंतर काही दिवसांनी खरंच मायावती भाजपच्या पाठिंब्याने मु‘यमंत्री झाल्या . सांगायचं तात्पर्य हे की बाबुराव वैद्य बोलत असताना नीट ऐकलं तर काही तरी हाती येत असल्याचा माझा तरी अनुभव आहे .
अलीकडच्या काही वर्षात मी काही बाबुराव वैद्य यांच्या संपर्कात नाही . मात्र माझ्या लिहिण्याच्या मेजावर त्यांचं ‘शब्ददिठी शब्दमिठी’ हे पुस्तक मार्गदर्शनासाठी सदैव सज्ज आहे . आमचं शेवटचं बोलणं दोन वर्षापूर्वी झालं . पत्रमहर्षी अनंतराव भालेराव यांच्यासंबधी ‘कैवल्यज्ञानी’ या ग्रंथाचं संपादन मी करतो आहे . त्यासाठी लेख मागण्यासाठी मी बाबूरावांना फोन केला होता . त्यांना कल्पना आवडली पण ते म्हणाले , ‘अहो , इच्छा असूनही अनंतरावांसंबधी लिहिता येणं शक्य नाही कारण आता मी ९५ वर्षांचा आहे’. मग मीही फार काही आग्रह केला नाही . पण वयाच्या ९५व्या वर्षी सुद्धा त्यांची लिहिण्याची असोशी खूपच भावली .
बाबुराव वैद्य कट्टर हिंदुत्ववादी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्यांच्या रक्तातच भिनलेला पण , विरोधकांशी ते सुसंस्कृत उदारपणे वागतात , पत्रकारितेची मूल्ये जपतानाही ते त्यांची विचारसरणी आड आणत नाहीत आणि ज्ञानताठा न बाळगता ते सदैव शिक्षकाच्या भूमिकेत वावरतात हे मला खूपच महत्त्वाचं वाटतं . या अर्थानं ते लोकशिक्षक आहेत . त्यांचा प्रदीर्घ सहवास लाभला नाही ही रुखरुख माझ्या मनात कायम आहे ; तसं घडलं असतं तर माझं आकलन आणि मराठी भाषा नक्कीच आणखी समृद्ध झाली असती .