सुनीती देव : जशी होती तशी…

|| नोंद | १२ ||

त्त्वज्ञानाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक , नागपूरच्या डॉ . सुनीती देव यांचं निधन  झाल्याचे पत्रकार पीयूष पाटील आणि पाठोपाठ श्रीपाद अपराजित यांचे फोन आले तेव्हा संध्याकाळ दाटून आलेली होती . बेगम मंगला गेल्यापासून ‘एकटा राहण्याची सवय  झालीये’ असं , चारचौघात कितीही म्हटलं तरी आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे म्हणूनही असेल कदाचित , संध्याकाळ सरणं आजकाल कठीण झालेलं आहे , हे मान्य करण्यात मुळीच कमकुवतपणा आहे असं  वाटत नाही . त्यात सुनीती देवची बातमी आली आणि सुन्न होऊन किती तरी वेळ बसून राहिलो . आठवणींचे कल्लोळ गडद झाले .

सुनीतीची आणि माझी ओळख बऱ्यापैकी जुनी ; ऐंशी ते नव्वदीच्या दशकातली . एकदा यदुनाथजी थत्ते नागपूरला आले तेव्हा बहुदा लिलाताई चितळे यांच्या घरी झालेली . ( नागपूरला आले की यदुनाथजी ‘साधना’चे कांही अंक देत , ते मी अनेकांना घरपोहोच करत असे , तेव्हढीच टपाल खर्चात बचत ! ) महात्मा गांधी , समाजवाद , ‘साधना’ परिवाराशी असणारा भावबंध आणि लोकशाहीवादी असणं हाही सुनीती आणि माझ्यातला बळकट दुवा होता ; आमच्यातला आणखी एक समान धागा म्हणजे , ती नियतीवादी किंवा दैववादी नव्हे तर कट्टर विवेकनिष्ठ होती .  तेव्हा मी रिपोर्टिंगमधे होतो आणि अनेक कार्यक्रमात आमची भेट होत असे . साधारण १९९५ पर्यंतचा तो काळ . मात्र ही ओळख फार कांही जवळीक असणारी नव्हती . आमची भेट  झाली आणि माझी बेगम सोबत असेल तर जरा मोकळ्या गप्पा होत . भेटी बऱ्याच होत कारण नागपूरच्या सामाजिक चळवळीत आम्हा दोघांचाही सक्रिय सहभाग होता व सांस्कृतिक जगतातील अनेकजन आमचे कॉमन मित्र होते . या क्षेत्रातील बहुसंख्य कार्यक्रमांना हजेरी लावण्यात , खांद्यावर शबनम कायम असणारी सुनीती एक असायची . तेव्हा मी आणि बेगम तिला ‘मॅडम’ म्हणायचो . पण , मैत्रीपुराण तेवढ्यापुरतच मर्यादित होतं . याच दरम्यान केव्हा तरी सुनीती आणि मंगला एकाच वयाच्या असल्याचं गप्पा मारतांना त्यांच्या लक्षात आलं . त्या दोघी एकमेकांना ‘अरे-तुरे’ करु  लागल्या . त्या दोघींपेक्षा मी वय आणि ज्ञानानंही लहान ; एखाद्या शब्दाच्या व्युत्पत्ती ,   मुळार्थ , संधी-विग्रह याबद्दल त्या दोघी बोलू लागल्या की , मी एकदम गुमसुम होऊन जात असे .

आमची दोस्ती जमली २००० आणि पक्क सूत जुळलं ते २००३ नंतर . मुंबई , औरंगाबाद असे पडाव टाकत ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा निवासी संपादक म्हणून मी पुन्हा नागपूरला परतलो आणि भेटीदाखल एक पुस्तक घेऊन सुनीती घरी आली . तोवर  सुनीती विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाची प्रमुख झालेली होती . मधे सुमारे आठ-दहा  वर्ष उलटली तरी तिच्यातला उत्साह तस्साच तजेलदार , अगत्य आणि बोलण्यातली वरची पट्टी कायम होती . एव्हाना आम्हा तिघांच्याही वय आणि अनुभवाच्या पुलाखालून पाणी बरंच वाहून गेलेलं होतं . त्या भेटीत आम्ही दोघं एकेरीवर आलो  . त्यानंतर बेगम मंगला , सुनीती आणि मी असं मैत्रीचं एक त्रिकुट तयार झालं . आमच्यातल्या दोस्तीच्या मेतकुटाची भट्टी झकासच जमली  . वाचन , श्रवण , खादाडी , अखंड बडबड आणि भटकंती हे आमच्यातले आणखी कांही समान दुवे बनले . २००४ नंतर नागपुरातलं एकही पुस्तक , हातमाग , शिल्प , चित्र आणि खाद्य प्रदर्शन आम्ही तिघांनी चुकवलेलं नाहीच . तिथे जाऊन कांही खरेदी केली की नाही हा मुद्दाच नसायचा  पण , खादाडी करण्याची संधी मात्र नक्कीच हुकवलेली नाही . महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकाला विनाकारण अनेकदा भेटवस्तू  दिल्या पण , त्यात पुस्तकाशिवाय दुसऱ्या कशाचाही समावेश नाही ! भेट घेण्या-देण्याआधी ते पुस्तक आहे की नाही याची खातरजमा करायची किंवा सरळ कोणतं पुस्तक हवं , अशी विचारणा करायची , अशी आमच्यातली प्रथा होती  . पुढे आम्ही दिल्ली , नंतर औरंगाबादला आल्यावरही ही प्रथा वाहती राहिली . एकमेकाला भेटीदखल दिलेल्या पुस्तकांची आम्ही कधीच मोजदाद केलेली नाही .

वयानं ज्येष्ठ असण्याची  कुर्रेबाज खुन्नस उठवत सुनीती आणि बेगम दोघीही मला छळत . म्हणजे सेल्फ सर्व्हिस  असेल तर त्या दोघी गप्पा मारत बसून राहात आणि दिलेली ऑर्डर आणण्यासाठी नेहेमीच मला जावं लागत असे ; हा त्या दोघींचा मला छळण्याचा एक जाम आवडता प्रकार असायचा . दुसरं म्हणजे , आम्ही तिघं असलो की ,  मी कार ड्राईव्ह करायची आणि त्या दोघींनी मागच्या सीटवर बसायचं किंवा  सुनीती कार ड्राईव्ह करत असेल तर माझी रवानगी मागच्या सीटवर होत असे . त्या दोघींच्या बोलण्यात मी काही जरी हस्तक्षेप केला तर , ‘मालकांच्या बोलण्यात चालकानं तोंड मारायचं नसतं ,’ हा डायलॉग हमखास ऐकायला मिळत असे . या प्रकाराला वैतागून एकदा सुनीतीची मी मस्त फिरकी घेतली  . एका वाढदिवसाला ती भेटायला आली तेव्हा खट्याळपणा म्हणून मी तिच्या पाया पडलो . तेव्हा गांगरुन गोरामोरा झालेला  तिचा चेहेरा अजूनही माझ्या नजरेसमोर तरळतो आहे . ‘पुन्हा असा कांही प्रकार करशील तर कध्धीच बोलणार नाही तुझ्याशी ,’ असा  सज्जड दम मग तिनं दिला .

अमरावती आणि यवतमाळला घालवलेले कांही दिवस वगळता सुनीती ‘बॉर्न  अँड  ब्रॉट अप’ नागपूरकर . पावणेसहा फुटावर उंची , लख्ख गव्हाळ वर्ण , उजव्या मनगटावर घडयाळ , सूती पेहेराव आणि कायम कोणत्या नं कोणत्या उपक्रमात आकंठ बुडालेलं असणं , हे सुनीतीचं वैशिष्ट्य . ती माझ्यापेक्षा वय आणि शिक्षणानं ज्येष्ठ . शिक्षण आणि विद्वत्ता या बाबतीत सुनीतीशी माझी कोणतीही बरोबरी नाही . तत्त्वज्ञान या विषयात ती एम.ए. आणि त्याचं विषयात पीएच.डी.ही केलेली . विद्यमान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे पूर्वाश्रमीच्या नागपूर विद्यापीठाच्या याच विभागाची मुख्य म्हणून सुनीती निवृत्त झाली . या विषयाबाबत माझी लायकी म्हणा की पात्रता , तत्त्वज्ञान हा शब्द नीट ( बहुसंख्य तत्वज्ञान असा लिहितात ! ) लिहिता येतो यात समाधान असणारी . तिचे पती बा. य. देशपांडे ( पतीचा उल्लेख सुनीती कायम बाळ असा करत असे  !) हेही याच विषयात उच्चपदवी प्राप्त आणि ज्ञानाधिकारी . तिचे मोठे दीर डॉ. दि. य. देशपांडे हे तर तत्त्वज्ञान या विषयातील एक मोठ्ठं नाव . डॉ.  दि . य . देशपांडे यांनी तत्त्वज्ञानाच्या जागतिक नकाशावर अमरावती आणि नागपूरला स्थान मिळवून दिलं ; इतकं हे नाव बडं . ‘आजचा सुधारक’ नावाचं वैचारिक मासिकही याच कुटुंबांची देण आहे .

सुनीतीचे राग-लोभ तीव्र होते . रागावताना म्हणा की रुसताना अनेकदा तिच्यात  अनेकदा एक मस्त भाबडेपणाही  असे . क्षुल्लकशा कारणानंही ती नाराज होत असे मग त्या माणसाशी तिचं कोरडेपणानं वागणं सुरु होई , तो का तसा वागला किंवा बोलला यांची टेप सुरु होई . काय  घडलं ते जाणून घेऊन सुनीतीची समजूत काढण्यात मग बेगम आणि माझा फारच वेळ जात असे . मात्र , तिचा उल्लेखनीय  गुण म्हणजे कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न करणं . मंतरलेल्या सोनेरी पाण्यावरचं माझं प्रेम तिला रुचत  नसेच पण , एकदा नापसंती व्यक्त केल्यावर तो विषय तिनं नंतर कधीच काढला नाही .

आमचं त्रिकुट , अनेकदा भावनात्मक पातळीवर एकमेकांशी शेअरिंग करत असे तरी समोरच्याची स्पेस जपण्याचा तिचा गुण जाम फिदा व्हावा असाच होता . मला संपादक म्हणून पदोन्नती मिळाली ही बातमी सर्वात प्रथम  समजणारी सुनीतीच होती कारण तेव्हा कार्यालयात माझ्या समोरच होती  मात्र , ती बातमी मंगलाला कळवण्याचा चोंबडेपणा कांही तिनं दाखवला  नाही . कधीही कुणाला  तुझा पगार किती , घरी कोण कोण आहे , वगैरे चौकशा नाहीत . तरी बेगम मंगलाच्या आधी हृदयाच्या बायपासच्या आणि नंतरच्या दीर्घ आजारात सुनीती बरीच हळवी झालेली पहायला मिळाली . बायपासनंतर सकाळी फिरुन येताना ती हमखास डोकावायची आणि तेही ब्रेकफास्ट घेऊनच .  ‘काय म्हणते माझी सखू ?’ या तिच्या विचारण्यानं त्या दोघीतील गप्पांना सुरुवात होत असे .

भूमिका म्हणून सुनीती कशी ठाम होती यांची एक आठवण आहे  . सर्वच प्राध्यापकाचं निवृत्तीचं वय एक प्रयोग म्हणून तेव्हा वाढवलं गेलं होतं पण , त्याचा शासकीय आदेश यायचा होता . तेव्हा तिची मुदतवाढीची फाईल मंत्रालयात  अडकली . त्यामुळे जुन्या नियमाप्रमाणं तिनं निवृत्ती घेतली . हे समजल्यावर तेव्हा शिक्षण सचिव असलेल्या मित्रांशी बोलू का , असं मी तिला विचारलं  . पण सुनीतीनं ठाम नकार दिला . ‘तू माझ्यासाठी शब्द टाकलेला मला आवडणार नाही आणि मला न सांगता तू असा वशिला लावला  तर मी  पुन्हा जॉईन होणारच  नाही ,’ असं तिनं स्पष्टच सांगितलं . तेव्हा शिक्षण खात्याचा प्रधान सचिव आनंद कुळकर्णी हा माझा दोस्त होता , त्याची कामाची तडफदार शैली लक्षात घेता एका फोनवर सुनीतीचं झटक्यात काम झालं असतं पण , तिचा नकार ठाम होता . नंतर महिना-सव्वा महिनाभरानं आदेश निघाले आणि सुनीती पुन्हा विभाग प्रमुख म्हणून रुजू झाली .

समोरच्याचा प्रतिवादाचा हक्क सुनीतीला मान्य होता तरी  , अशात तिच्या एका आवडत्या कथा लेखकावर केलेल्या टीकेमुळे ती माझ्यावर बऱ्यापैकी रुसलेली होती . तो आजारी असतांना मी टीका करायला नको होती , असं तिचं म्हणणं होतं पण तो लेखक आजारी आहे हे मला कुठे माहिती होतं ? नंतर सुनीतीचा हा रुसवा ओसरला हेही तेवढंच खरं . रुसवा होता तरी आमच्या संवादात खंड पडलेला नव्हता . कोणताही गाजावाजा न करता चळवळीतल्या लोकांना यथाशक्ती नियमित सहाय्य करण्याची सुनीतीची वृत्ती वसा घेतल्यासारखी होती .  नव्याची तिला कायम आस असायची . आमच्या टेबलवर ‘चिन्ह’चा अंक पाहिल्यावर द ग्रेट चित्रकार गायतोंडे प्रकल्पात ती सहभागी झाली . पुढे तर सतीश नाईक आणि ‘चिन्ह’ परिवाराची सक्रिय सदस्य झाली . त्याही ग्रुपमध्ये ती मस्त रमली . असा महाराष्ट्रभर तिचा व्यापक  संपर्क होता .

‘लोकसत्ता’च्या  विदर्भ आवृत्तीसाठी  सुनीतीनं भरपूर लेखन केलं . तिनं लेखनासाठी कधीच नाही म्हटलं नाही . ( ‘लोकसत्ता’च्या बातमीत नेमका हा उल्लेख का नाही , हे कांही समजलं नाही . ) सांगितलेली शब्द मर्यादा आणि वेळेचं भान पाळण्याची तिची सवय दाद देण्यासारखीच असायची . वाचन अफाट आणि चिकित्सक असल्यानं तिला कोणताच विषय वर्ज्य  नसायचा . संवेदनशील विषयावरील नाटक , सिनेमा , पुस्तक असे तिचे लेखनाचे विषय असतं . आमच्यासाठी बाबा आमटे , ग . प्र . प्रधान अशी कांही मरण स्मरणेही तिनं भावपूर्ण  लिहिली पण , मोठं लेखन तिनं केलं नाही . त्याबाबत वारंवार मागे लागूनही सुनीतीनं दाद लागूच दिली नाही .

एकीकडे कांहीशी भाबडी असली तरी सुनीती त्याचवेळी  खमकी आणि कणखरही होती . जगण्याच्या तिच्या कांही टर्म्स होत्या . कुणाला आवडो वा  न आवडो त्या टर्म्सशी तिनं कोणतीही तडजोड केली नाही . विवाहानंतर ‘देशपांडे’ झाली तरी ती ‘देव’ म्हणूनच जगली . पतीच्या निधनानंतर प्रदीर्घ काळ एकटी राहिल्यावर सुनीती नुकतीच  मुलगा , सून आणि तिच्या प्रिय नातीकडे राहायला गेली होती ; ते तिनं तिच्या वरच्या पट्टीतल्या खळाळत्या आवाजात मलाही कळवलं होतं . पण , ते सहजीवन एन्जॉय न करताच सुनीती गेली .

सुनीती जशी होती तशीच छान होती म्हणून आमच्यात मैत्री बहरली . आधी बेगम मंगला आणि आता सुनीती गेली , मी एकटा उरलो . आमचं त्रिकुट मोडून पडलं आहे…

( छायाचित्रे वृषाली देशपांडे यांच्या सौजन्याने . )

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट