राणे नावाची शोकांतिका !

नारायण राणे यांच्याशी पहिली भेट झाली ती १९९६साली. विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरु असताना तत्कालीन महसूल मंत्री सुधीर जोशी यांच्या रवी भवनातील निवासस्थानी आम्ही ब्रेकफास्ट घेत असताना पांढरे बूट, पांढरी विजार आणि अर्ध्या बाह्यांचा पांढरा शुभ्र सदरा घातलेले, लहान चणीचे नारायण राणे तेथे आले. सुधीर जोशी यांनी ओळख करून दिली तेव्हा सर्वात मनावर ठसली ती त्यांची भेदक नजर आणि ओतप्रोत भरलेला आत्मविश्वास. नंतर हळूहळू राणे जोशात येत गेले.. त्यांच्याविषयी अनेक कथा आणि दंतकथा प्रसारित होऊ लागल्या. सुधीर जोशी यांच्या अपघातानंतर महसूल खात्याचा कारभार राणेंकडे आला. या कथात आणि दंतकथात आणखी भर पडली.. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नावं चर्चेत आले आणि दर पंधरा-वीस दिवसांनी त्यांच्या शपथविधीच्या तारखा प्रसारित होऊ लागल्या. एकदा अशीच तारीख जाहीर झालेली असताना महसूल मंत्री म्हणून नारायण राणे घेतलेल्या एका नागपूरच्या भूखंडाबाबतच्या वादग्रस्त निर्णयाची बातमी मी दिली आणि गहजब झाला. उच्च न्यायालयात त्या निर्णयाविरुद्ध एक जनहित याचिका दाखल झाली. राणे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलला गेला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ती बातमी माझ्यामार्फत पेरली असा राणे यांचा समज झाल्याचे काही पत्रकारांनी मला सांगितले. ती बातमी मला एका सनदी अधिका-याने दिलेली होती आणि ते कागद मी राणे यांच्याच कार्यालयातून मिळवले होते (माझ्या ‘डायरी’ या पुस्तकात ती हकिकत सविस्तरपणे आलेली आहे). नंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत शासकीय विमानात प्रवास करताना दोन वेळा आणि मुख्यमंत्री झाल्यावर पत्रकार परिषदेनंतर २/३ वेळा राणे यांची भेट झाली पण बोलणे नाही.. केवळ नमस्कार घेणे-देणे वगैरे घडले.

मुख्यमंत्री झाल्यावर राणे यांच्या कर्तबगारीचे पोवाडे काही मंत्री, काही सनदी अधिकारी आणि काही पत्रकार गाऊ लागले. त्यांची धडाकेबाज निर्णयक्षमता, एखाद्या विषयाचा अभ्यास करण्याची चिकाटी, त्यांचे दातृत्व आणि जनसंपर्क, वक्तृत्व प्रभावी होण्यासाठी ते घेत असलेले श्रम… अशा अनेक बाबी त्यात ओसंडून वाहात असत. मग निवडणुका झाल्या, राणे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांची तोफ सभागृहात गरजू लागली.. त्यांचे विस्तृत सांसदीय आकलन आणि जनाधार अफाट कसा आहे, याच्या कथा प्रसारित होऊ लागल्या..नंतर त्यांनी शिवसेनेत केलेले बंड.. उद्धव ठाकरेंवर असंस्कृत पातळीवरचा चढवलेला तुफानी हल्ला.. काँग्रेस प्रवेश.. मग त्यांची त्या पक्षात झालेली यांनी घुसमट.. काँग्रेसमध्ये त्यांनी केलेले आणि फसलेले बंड… भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या संघाला कसोटी सामन्यात लॉर्ड्सच्या मैदानावर तब्बल २८ वर्षांनी धूळ चारत असताना नारायण राणे यांचा हा, १९९६पासून मी एक वार्ताहर ते संपादक अशा वेगवेळ्या भूमिकातून, नागपूर-मुंबई-औरंगाबाद आणि दिल्लीतून पाहिलेला प्रवास आठवला.

नारायण राणे हे खरेच धडाकेबाज कार्यक्षम मुख्यमंत्री होते आणि (किमान कोकणात तरी) जनाधार असलेले नेते आहेत की, ते तसे आहेत हे सिद्ध होण्याच्या आतच त्यांची तशी प्रतिमा निर्माण करण्यात आली हा खरा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे पर्व सुरु झाल्यावर सेनेत पहिले बंड नारायण राणे यांनी केले आणि मुंबईच्या मिडियाने ते बंड रंगवले. ‘सेना फुटते आहे याचा आनंद मुंबईच्या बहुसंख्य मिडियाला जास्त आहे, राणे खरे कसे आहेत याच्याशी मिडियाला काही घेणेदेणे नाही’, असे त्यावेळी एक (माजी) कम्युनिस्ट स्नेही नेहेमी म्हणत. मुख्यमंत्री म्हणून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी चार महिन्याचा काळ अत्यंत अल्प असतानाही पोवाडे म्हणणा-या त्या काही मंत्री-सनदी अधिकारी आणि पत्रकारांनी राणे यांना तथाकथित कर्तबगारीच्या मिथकात अडकवले आणि बंडाच्या वेळीही तसेच रंगवले. त्या स्वकर्तृत्वाच्या कथित प्रतिमेच्या प्रेमात राणे जे पडले ते अजून बाहेर आलेच नाहीत. स्वप्रतिमेच्या प्रेमात माणूस आंधळा झाला की तो चौफेर चिकित्सक विचारबुद्धी हरवून बसतो असे जे म्हणतात तसेच, राणे यांचे झाले. (malignant narcissism म्हणून ही थेअरी ओळखली जाते.) हे कमी की काय म्हणून, भाटांनी केलेल्या कौतुकाच्या लाटेवरचे नियंत्रण सुटून राणे मग स्वत:च निर्माण केलेल्या राजकीय चुकांच्या चक्रव्यूहातही अडकत गेले. शिवसेनेत घराणेशाही आणि उद्धव ठाकरे यांची एकाधिकारशाही चालते अशी टीका सेना सोडताना करणा-या राणे यांची घराणेशाही आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांचीही एकाधिकारशाही (आणि उग्र मग्रुरीही!) कोकणात लोकांनी अनुभवली. बाळासाहेब ठाकरे यांनी सोबतच्या लोकांना सत्तेची फळे वाटली, राणे मात्र पुत्रप्रेमाने आंधळे झाले. ‘सेनेसोबत कोणी नाही’ अशी टीका राणे करत राहिले पण, त्याचवेळी सेना सोडून आलेले आपल्यापासून दूर जात आहेत हे राणे यांच्या लक्षात आले नाही. आता जसे वाटते तसे, समर्थकांचे काँग्रेसमध्ये पुनर्वसन झाले नाही म्हणून आवाज उठवावा असे काही नारायण राणे यांना गेल्या नऊ वर्षात वाटले नाही. ‘एक गेले तर सात आले’ हे टाळ्या मिळवणारे विधान त्यावर राणे यांनी केले असले तरी हा त्यांचा दोष नसून ते ज्या कचकडी स्वप्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडाले त्या प्रतिमेचा आणि ती प्रतिमा निर्माण करणा-यांचा हा दोष आहे.

अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद स्वीकारून काँग्रेसने टाकलेल्या आणखी एका जाळ्यात अलगद नारायण राणे अडकले. त्यावेळी जर ‘मी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे म्हणून मला मंत्री व्हायचे नाही, माझ्या समर्थकांना मंत्री करा’, अशी बाणेदार भूमिका राणे यांनी घेतली असती आणि राज्यभर फिरून स्वत:चा (तथाकथित असलेला) जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला असता तर काँग्रेसवरचा दबाव वाढला असता. दिलेला शब्द काँग्रेस पाळत नाहीये म्हणून जनतेत तेव्हा राणे यांच्याविषयी असणारी हळहळ दृश्य स्वरुपात होती, त्याचे रुपांतर आधार तसेच पाठिंब्यात करून न घेण्याची चूक राणे यांनी केली. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून राणे यांनी आधी आक्रस्ताळी आणि बेलगाम टीका पक्षश्रेष्ठींवर केली आणि मग चक्क शरणागती पत्करून मंत्रीपद स्वीकारले. तेव्हाच सर्वार्थाने ‘बनचुके’ असलेल्या कॉंग्रेसने राणे यांच्या मर्यादा आणि अपेक्षा ओळखल्या. ‘थंडा कर के खाना’, ही कॉंग्रेसची संस्कृती आहे आणि गेंड्याची कातडी मृदू वाटावी अशी टणक-निबर कार्यशैली या पक्षाच्या सर्वच पातळीवरच्या नेतृत्वात असते. पक्ष नेतृत्वावर टीका करणा-यांना तर त्यांच्यातील स्वाभिमान, संयम आणि सहिष्णुतेचा चुथडा-चुथडा करून संपवले जाते. काँग्रेसच्या या शैलीपुढे राजकारणातल्या अनेक वाघांची शेळी झालेली भारतीय राजकारणाने पहिले आहे. ‘आयाराम गयाराम’चे प्रणेते भजनलाल, मध्य प्रदेशचे शुक्ला बंधू तसेच कुटनीतीचे भीष्माचार्य समजले जाणारे मिश्रा, दिग्विजयसिंग आणि महाराष्ट्रात मोठा जनाधार असलेले वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण ही काही वानगीदाखल नावे. याच काँग्रेसने यशवंतराव चव्हाण यांचे पंतप्रधान होण्याचे मार्ग शिताफीने बंद केले, पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी वसंतदादा यांना राज्यपाल करून टांगवून ठेवले आणि शरद पवार यांनी पंतप्रधान पदावर दावा केला तेव्हा तहात हरवले, हा इतिहास राणे यांना ते शिवसेनेत असल्याने माहीत नसावा आणि त्यांच्या कोणी भाटानेही त्यांना तो सांगितला नसावा. एकदा मंत्रीपदाची टोपी स्वीकारल्यावर कॉंग्रेसने मुख्यमंत्रीपदाच्या मुकुटासाठी राणे यांना कायम तंगडवत ठेवले आणि त्यांची पक्षात येताना असणारी कथित समर्थकांची रसद तोडून टाकली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने तर कोकणातही राणे यांचा जनाधार तुटला असल्याचे समोर आले आणि राणे एकाकी पडले, जे की काँग्रेसला हवेच होते. त्यामुळेच भाषा बंडाची पण कृती तडजोडीची असे न पटणारे तसेच केविलवाणे झालेले नारायण राणे आता पाह्यला मिळत आहेत.

काँग्रेसी कोडगेपणा नारायण राणे यांच्या रक्तात नाही. अलिकडची नऊ वर्षे वगळता दोन ‘घ्यावे-दोन द्यावे’ अशा शैलीच्या राजकारणात ते वावरले. शब्द द्यायचा आणि तो पाळायचा, ही रीत राजकारणातही असते ही शिकवण त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. बाळासाहेब ठाकरे हेही सर्वांना झोडपत असत पण, त्यांना सत्तेत यायचे नव्हते तर रिमोट कंट्रोल व्हायचे होते, त्यामुळे राजकारणात सेनेच्या सत्ता संपादनाचे मार्ग कायम मोकळे रहात पण, नेमके हेच विसरून आपण नक्की मुख्यमंत्री होणार असे गृहीत धरून राणे यांनी काँग्रेससकट सर्वच पक्षातील नेत्यांना त्यांनी अकारण दुखावून ठेवले. आताही काँग्रेसेतर पक्षांची ‘चिंध्या’ अशी शेलकी हेटाळणी त्यांनी केली! (विरोधी पक्ष चिंध्या असतील तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवाची चिन्हे राणे यांना का दिसत आहेत?) कॉंग्रेसला हेच नेमके हवे होते कारण, अन्य दरवाजे बंद झाले की पक्षत्याग करण्याचा विचारही राणे यांना मनात आणता येणार नव्हता, अन्य पक्षाचे दरवाजे त्यांना कायम बंद असल्याने करावी लागणार होती केवळ बंडखोरीची पोकळ भाषा आणि घडले तसेच! कर्तबगारी सिद्ध होण्याआधीच स्वप्रतिमेच्या प्रेमात हरवणे व चक्रव्यूहात सापडणे अशा दुहेरी संकटात नारायण राणे सापडले आहेत. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न विसरून घुसमट सहन करत राहाणे हाच पर्याय आता त्यांच्या समोर शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय शोकांतिका लिहिल्या जातील तेव्हा नारायण राणे यांचे नावं अग्रक्रमाने घेतले जाईल. असे काहीच राणे यांच्या बाबतीत घडायला नको होते, असे मला मनापासून वाटते…

(मंत्रीपदाच्या राजीनाम्यावर आणि काँग्रेसमधील अस्तित्वाबाबत नारायण राणे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यावरही कोणताच निर्णय झालेला नसताना शनिवार, २६ जुलै २०१४ला केलेले भाष्य)

=प्रवीण बर्दापूरकरसंपर्क- ९१९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

    संबंधित पोस्ट