सुषमा आणि विजय सातोकर – सरळ रेषेतलं मैत्र !


 

 

 

|| नोंद …७ ||

‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकाच्या नागपूर आवृत्तीतला विजूचा स्तंभ सध्या वाचायला   मिळतोय  . सव्वाचारपेक्षा जास्त दशकं इंग्रजी आणि तेही राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील  पत्रकारितेत घालवलेला विजू मराठीशी इतकी घट्ट नाळ जोडून आहे कौतुक वाटलं , विस्मयही वाटला .
विजू म्हणजे विजय सातोकर . निवृत्तीनंतर , तो सध्या केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय जन संचार संस्थेचा  पश्चिम विभागीय संचालक म्हणून अमरावती येथे काम करतो आहे . सणसणीत सहा फुटावर ऊंची , गोरा वर्ण , अजूनही सडपातळ म्हणावी अशी शरीरयष्टी , जरा वांड असणारे डोईवरचे केस , आमच्यासारखा ‘ओवी’ म्हणून शिव्या न वापरता केवळ ‘अबे , गधे’ किंवा ‘क्या बेवकूफ है’ पुरता भाषेच्या सीमेत बंदिस्त ठेवणारा , वृत्तीनं लाघवी , कायम उत्सुकता चाळवलेला , उत्साहानं  सळसळणारा आणि केवळ पत्रकारिता करण्यासाठीच जन्माला आलेला मनुष्य प्राणी म्हणजे विजय सातोकर . ‘विजू’ असा दोन शब्दात त्याचा उल्लेख करणारा या पृथ्वीतलावरील  मी त्याचा एकमेव मित्र असणार . कोणताही गुंता तसंच  देवाण-घेवाण  नसलेली , सरळ रेषेत चालणारी आमची आजवरची मैत्री आहे . त्याची पत्नी सुषमा आणि माझी बेगम मंगला याही या सरळ रेषेवरच आमच्यासोबत तितक्याच ममत्वानं आजवर चालल्या .
‘नागपूर टाईम्स’ आणि ‘नागपूर पत्रिका’ ही दैनिके प्रकाशित करणार्‍या नवसमाज लिमिटेड या संस्थेत , अगदी नेमकं सांगायचं तर २७  जानेवारी १९८१ रोजी मी रुजू झालो तेव्हा नागपूर टाईम्स सोडून विजू देशातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ‘पीटीआय’ म्हणजे- प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेसाठी दिल्लीला प्रयाण करता झालेला होता  पण , तोवर नागपूरच्या पत्रकारितेत विजय सातोकर हे नाव आघाडीवर आलेलं होतं ! पोलिस दलातील शिपाई व अधिकार्‍यांनी निरोप दिलेला तो कसा पहिला पत्रकार आहे , हे तेव्हा फार कौतुक भरल्या स्वरात सांगितलं जायचं . रिपोर्टरची भाषा कशी असावी , त्यानं समाजात मिळून-मिसळून वागावं कसं , एवढंच कशाला टापटीप राहावं कसं , यासाठी तेव्हा नागपूरच्या वृत्तपत्रसृष्टीत ज्येष्ठांकडून कनिष्ठ पत्रकारांना दाखला दिला जायचा तो विजय सातोकर   याचा , इतका तो मापदंड बनलेला होता . त्याच्या विषयी इतकं ऐकायला मिळायचं की , किमान मला तरी विजय सातोकर ही एक दंतकथा वाटू लागली !
विजूचे आई-वडील शासकीय नोकरीत अधिकाराच्या पदावर . घरात वातावरण वाचतं . मुळचं हे कुटुंब अकोल्याचं . पुढे नागपुरात आलं . लक्ष्मी नगरात त्यांचा बंगला वगैरे म्हणजे एकुणात कुटुंब सुखी . विजूचं शिक्षण हडस आणि हिस्लॉपमध्ये झालं . सुरुवातीपासूनच इंग्रजीवर विजूची पकड . इंग्रजी विषयात त्यांनं पदवी आणि पुढे  पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी संपादन केली .  विजूनं शासकीय सेवेत जावं , असं त्याच्या आई-वडिलांना वाटायचं पण , ठरवून तो पत्रकारितेत आला . नागपूर टाईम्समधून त्यानं पत्रकारितेला सुरुवात केली आणि अल्पावधीतच जमही बसवला .   
नागपूरला परतलेला विजू पत्रकार संघाच्या कार्यकमात रमून गेला . रिकामं बसणं त्याच्या स्वभावतच नाही ( म्हणूनच पुढे दिल्लीतही त्यानं दिल्लीतील मराठी  संचिताचा शोध घेणारा ‘आमची दिल्ली’ हा उपक्रम सुरु केला ) . पत्रकार संघानं आयोजित केलेल्या  गुलाम अली यांच्या केलेल्या कार्यक्रमात मी आणि विजूनं कार्यक्रम स्थळीच्या काऊन्टवर चक्क तिकीट विक्रीपासून अनेक उचापती एकत्र केल्या . विजू पूर्ण पत्रकार होता . पत्रकार परिषदेला येताना तो तयारी करुन आलेला असायचा . त्याच्यात आक्रस्ताळा नव्हे तर अत्यंत संयत असा आक्रमकपणा होता . स्वरातून पटकन तो चिडला किंवा रागावलाय हे लक्षात येण्यासाठी जरा वेळच लागायचा .  समोरचा माणूस त्याच्याच नाही तर कुणा अन्य पत्रकारांच्या प्रश्नांवर उडवाउडवी करतो आहे किंवा विचारणारा नवखा असं बघून त्याकडे दुर्लक्ष आहे , असं लक्षात आल्यावर विजू ते मुद्दे/प्रश्न  लाऊन धरत असे . इंग्रजीत जर कांही प्रश्नोत्तरे झाली असली तर ज्यांना अडचण आहे त्या पत्रकारांना  कोणताही आव न आणता समजावून सांगणं ही त्याची खासीयत . कोणतीही शेरेबाजी न करता व्याख्यान किंवा जाहीर कार्यक्रम नीट लक्ष देऊन ऐकण्याची , एखादा मुद्दा किंवा विषय न समजला  तर ‘काय , होता तो मुद्दा ?’ असं म्हणत जाणून घेण्याची संवय त्याला होती .  पत्रकाराचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे  त्याची उत्सुकता कायम चाळवलेली असायला हवी , असं आम्ही जे शिकलो ते त्याच्यात अजूनही ओतप्रोत  आहे . इंग्रजी पत्रकारितेत असणाऱ्या बहुसंख्य पत्रकारांत प्रादेशिक भाषातील पत्रकारांना दुय्यम लेखण्याची  ‘खोड’ असते ; विजू मात्र त्याला अपवाद होता . विजूकडे तेव्हा एक जावा मोटरसायकल होती . लंबू विजूच्या टांगांतून कधीही सुळकण निघून जाईल असं वाटायचं .   
सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विजूचा स्वभाव आहे . आपण भेटतो पार्ट्या करतो , डिनरला जातो पण घरचे त्या आनंदापासून वंचित राहतात . त्यासाठी पत्रकार मित्रांनी  कौटुंबिक पातळीवर महिन्यातून एकदा तरी एकत्र यावं . एकत्र ‘खावं-प्यावं ‘आणि कौटुंबिक पातळीवर मैत्री व्हावी अशी कल्पना विजूनं मांडली . आम्ही ती उचलून धरली . पहिलं    गेट-टुगेदर विजूच्याच घरी झालं आणि त्याला १८ जोडपी आली . अनेक नवरोबांना पत्नी समोर असतांना  ‘मंतरलेलं सोनेरी पाणी’  घेणं , तर कांहीना समीष भोजन घेणं अवघड जाऊ लागलं ; दोन संस्कृती रक्षकांना इतक्या उघडपणे ‘ड्रिंक्स’ हा संस्कृती डुबत असल्याचा साक्षात्कार झाला आणि नंतर ही संख्या रोडावत  गेली . सुषमा-विजय ,     सुषमा-प्रकाश देशपांडे आणि मंगला-मी एवढीच ती मर्यादित झाली . पत्रकारांना कौटुंबिक पातळीवर एकत्र आणण्याचा आणि परस्परात सौहार्द निर्माण करण्याचा विजूच्या पुढाकारानं सुरु झालेला आमचा प्रयोग असा न फुलताच  कोमेजून गेला .
सुषमा आणि विजय सातोकर
आमचे लवकरच सूर जुळले . अनेक ठिकाणी आम्ही सोबत जाऊ लागलो . माझी भाषेवरची पकड पत्रकारांपैकी  सर्वात प्रथम हेरली ती विजूनंच . मी इंग्रजीचा सराव करावा आणि मराठी पत्रकारिता सोडावी असा लकडा त्यानं लावला पण , त्यासंदर्भात गंभीर न झाल्याची  रुखरुख आता वाटते …असो . विजूमधल्या पत्रकाराची  एक हकीकत सांगतो- एकदा भंडाऱ्याजवळ कांही तरी खूप  महत्वाचं  घडलंय याची टीप मला मिळाली . ते मी लगेच  विजूला सांगितलं . त्यानंही त्याच्या परीनं प्रयत्न केले पण , आमच्या हाती नेमकं  लागेना . आम्ही दोघंही अस्वस्थ होतो , कारण टीप पक्की होती . नेमकी विजूची मोटरसायकल आणि माझी स्कूटर सर्व्हिसिंगला गेलेली होती . शरण जाऊन एका मित्राची मोटरसायकल घेऊन आम्ही दोघं भंडार्‍यात पोहोचलो . रस्ताभर पोलीस  बंदोबस्त होता  . दाटून आलेल्या संध्याकाळला पावसाचा गच्च ओला  रंग होता . पोलिस मुख्यालयात एकही वरिष्ठ अधिकारी नव्हता . जे हजर होते  ते ताकास तूर लागू देत नव्हते . अखेर जिथपर्यंत बंदोबस्त असेल तिथंपर्यंत जाऊ असं विजून ठरवलं .
आम्ही भंडार्‍याच्या पुढे निघालो . अर्धा तास प्रवास केल्यावर अचानक पोलिस दिसेनासे  झाले . आम्ही परत फिरलो आणि पुन्हा जिथून बंदोबस्त सुरु झाला तिथपर्यंत आलो . तिथून आंत जाणारा एक छोटा रस्ता  दिसला . आम्ही तिकडे गेलो . काही अंतरावर एक विश्रामगृह आणि तिथे मोठा बंदोबस्त होता , अंबर दिवा डोईवर मिरवत  पांच-सहा अम्बेसडर कार उभ्या होत्या . हीच ‘ती’ जागा याची खात्री पटली पण , कुणी आंत जाऊ देईना . पोलीस अधीक्षक सुभाष आवटे  आमच्या दोघांच्याही ओळखीचे होते . आवटे म्हणजे सज्जन अधिकारी . मिन्नतवार्‍या करुन आमची व्हिजिटिंग कार्डस त्यांना पाठवली . ते दहा मिनिटांनी आले आणि गेटवर उभे राहून बोलू लागले . आम्ही केव्हा तिथून ‘कटतो’ असं त्यांना झालेलं होतं . आमच्या तिथपर्यंत येण्याच्या धाडसाचं त्यांनी कौतुक केलं पण , नेमकं कांहीही बोलायला ते तयार नव्हते आणि आमची माहिती नाकारतही नव्हते . ( पत्रकारसाठी ही स्थिती नाकात झालेल्या पुरळासारखी म्हणजे नाक दुखतं , श्वासाला त्रास होतो पण , त्या पुरळाला हात लावला की ठसठस वाढते , अशी असते  !)  आवटेंशी बोलणं कातळावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे याची खात्री पटली .  एव्हाना रात्रीचे नऊ वाजत आलेले  होते . परत निघतांना ‘न्यूज कन्फर्म केव्हा होणार ?’ असं विजूंनं विचारलं तर हंसत हंसत सुभाष आवटे म्हणाले , ‘इतक्यात नाही .’ तो अप्रत्यक्ष दुजोरा आम्हाला समजला . 
परतीच्या प्रवासात रस्त्यात पाऊस लागला . आम्ही पूर्ण ओले झालो ; हळूहळू ड्राइव्ह करत नागपूरजवळ पोहोचलो अन पुन्हा अंबर दिवे लागलेल्या पांच-सहा  कार्स भंडार्‍याकडे जाताना दिसल्या . आमची शक्यता आणखी बळावली . नाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त होता . चौकशी आणि झडती सुरु होती . आमचीही झाली . आमच्या प्रश्नाला शिपाई मंडळी ‘साहेबांना विचारा’ एवढंच उत्तर देत होती . ‘साहेब कोण आहे ?’ विचारलं तर समजलं ज्येष्ठ इन्स्पेक्टर वसंत पाटील आहेत . चांगली प्रतिमा असणारे वसंतराव  वयानं आम्हाला ज्येष्ठ होते . माझ्या  ते चांगल्या परिचयाचे होते . वसंतदादा पाटील दुसर्‍यांदा  मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांना ‘काय मुख्यमंत्री’ म्हणत असे .
आम्हाला पाहिल्यावर ते जरा चमकले पण आमची अवस्था पाहून त्यांना किंव आली   असावी  . शेजारच्या  हॉटेलात नेऊन त्यांनी चहाची ऑर्डर दिली आणि तिथले  टिश्यू पेपरचे दोन-तीन बॉक्स ओढत अंग पुसायला दिले . आमची कथा ऐकल्यावर ते म्हणाले , ‘अवेळी एवढी मोठी रिस्क घ्यायला नको होती तुम्ही . दिवस चांगले नाहीत . आपल्या भागातही कांही स्लीपर सेल असल्याचं कळतंय’ . गप्पा सुरु असतांना  बोलता बोलता ते म्हणाले , ‘फक्त ताब्यात घेतलेल्या कुणाबद्दल खातरजमा झाल्याशिवाय कुणीच अधिकारी बोलणार नाही .’ आम्ही समजायचं ते समजलो .
कार्यालयात येऊन भंडार्‍याजवळ  दोन अत्यंत महत्वाचे संशयित खतरनाक दहशतवादी ताब्यात घेतल्याची  बातमी दिली . मी तीच बातमी ‘सकाळ’ आणि ‘लोकसत्ता’ला पाठवली . विजूला फोन केला आणि सांगितलं . मग  त्यांनं बातमी रिलीज केली . त्याची बातमी पांचच मिनिटात देशभर  पसरणार म्हणून मी काम करत असलेल्या वृत्तपत्रात ती बातमी आधी दिली जावी म्हणजे मी ती बातमी वृत्तसंस्थेकडून उचलेली नाही हे स्पष्ट होणार , ही काळजी घेण्याचा विजूचा समंजसपणा मला प्रचंड भावला . पुढे यथावकाश दुजोरा मिळाला की ते पकडलेले दोघेजण भारताचे निवृत्त लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी होते . ‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचे आदेश दिले होते पण , राज्य सरकारनं कसे पाळले नाहीत या माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री राजेश पायलट यांच्या खळबळजनक मुलाखतीसह  अनेक प्रसंगी त्याच्यातल्या या समंजसपणाचा पुढे अनुभव आला . पत्रकारितेसारख्या  व्यवसायात  असा समंजसपणा  दुर्मीळच . नागपूरच्या
समकालीन पत्रकार  मित्रांमध्ये विजू आणि माझं  ‘समान गोत्र’ म्हणजे मिळालेली कोणतीही असाईनमेंट आम्ही कधीच अव्हेरली नाही , आलेल्या संधीला कध्धीच पाठ दाखवली नाही . त्यामुळे  राज्यात , देशात आणि परदेशात पत्रकारितेच्या निमित्तानं भटकंती करता आली . विजूनं हे सर्व अनुभव लिहायला हवेत .   
Reporting India
मग , विजूची बदली युद्ध पेटलेल्या अफगाणिस्तानात झाली . तिथून तो श्रीलंकेत गेला आणि बदलून पुन्हा मुंबईला आला तेव्हा माझीही  बदली मुंबईला झालेली होती . मग आम्ही दोघंही मनोरा या आमदार निवासात कांही महिने सोबत राहिलो . खूप भटकलो . निरुद्देशही भटकलो . घरुन आणलेली एक पोळी अर्धी-अर्धी वाटून खाल्ली . विजूला मिळालेल्या फ्लॅटची ‘शांत’ आम्ही दोघांनीच केली . आम्ही दोघंही धूम्र आणि मद्यपानाचे  शौकीन ; मात्र मर्यादा ओलांडायची नाही ही आम्हाची दोघांची  ( इतरांसाठी जाचक असलेली )  समान मजबूरी , त्यामुळे आम्ही वाहावत गेलो नाही ! पत्नी सुषमा आल्यावर विजू तिकडे शिफ्ट झाला . नंतर दिल्लीला आणखी वरच्या पदावर बदलून गेला . शिष्यवृत्ती मिळाल्यावर जपानला दीर्घ काळ राहून आला . मग , आणखी वरच्या पदावर गेला आणि शेवटी सर्वोच्च पदावरुन निवृत्त झाला  . कोणत्याही वृत्त संस्थेच्या इतक्या सर्वोच्च पदावर पोहोचलेला विजय सातोकर  हा पहिला मराठी माणूस आणि तो आपला मित्रा असावा याचा हर्ष मनी दाटून आला तर ते स्वाभाविक नाही का ?
विजू तसा अबोल पण निर्विकार ( Poker Faced ) मात्र नव्हे . अनेकदा काम करताना गुणगुण्याची त्याला आवड .  सर्वांशी सूर जुळतातच असं नसतं तरी , ज्यांच्याशी जुळत नाहीत त्यांच्याशी कोरडेपणानं वागणं त्याच्या वृत्तीत नाहीच . प्रचंड बोअर मारणार्‍या माणसालाही सहन करण्याची त्याची क्षमता अफाट आहे .  तो अतिशय चांगला वाचक   आहे . इंग्रजी वाचतो ; मराठीही आवर्जून वाचतो . त्यामुळे त्याच्यासोबत मैफिल रंगवणं आनंदादयी असतं ; सोबत ‘मंतरलेलं सोनेरी पाणी’ असेल तर हा आनंद द्विगुणित होतो . त्याला फोटोग्राफीचा नाद आहे आणि इतरांचे फोटो कसे मांडावेत याचा जबरा  ‘डोळा’  आहे . स्थापनेला साठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल  पीटीआयनं त्या काळात देशात घडलेल्या  प्रमुख घटनांचा एक अल्बम प्रकाशित केला आहे . ते कॉफी टेबल बुक पत्रकारांसाठी अतिशय महत्वाचा ऐवजच आहे .  त्या महत्त्वाकांक्षी फोटो अल्बमचा विजू संपादक होता .  ते फोटो आणि त्यासंबंधी इंग्रजीत लिहिलेला चपखल शब्दातला  मजकूर वाचला की , विजूच्या संपादकीय  क्षमतेची खात्री पटते . 
सदैव हंसतमुख असणार्‍या सुषमाच्या ट्रॅकवर गेल्याशिवाय विजूची कथा पूर्ण होऊ शकत नाही . ती लाघवी आहे आणि माझी आवडती मैत्रीण आहे . सुषमा आणि विजू धाडसी आहेत इतके की , वयाच्या साठीनंतरही ते दोघंच दिल्ली ते नागपूर आणि परत हा प्रवास  कारनं स्वत:  ड्राइव्ह करत करतात . त्यांचा प्रेमविवाह आहे का ठरवून केलेला , हे गुपित राखण्यात आजवर त्यांना यश आलेलं आहे .
माझ्या आजवरच्या जगण्याच्या पोतडीत सुषमा आणि विजय सातोकर दांपत्याच्या असंख्य आठवणी आहेत . कधी तरी ती पोतडी पुन्हा उघडेन आणि ती उरलेली गुजं सांगेनच .   
( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत  )
-प्रवीण बर्दापूरकर
( २१ जून २०२० )
Cellphone  ​+919822055799
​praveen.bardapurkar@gmail.com​ / www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट