■ साडेचार दशकातील माझ्या पत्रकारितेच्या अनुभवांवर आधारित , नुकत्याच प्रकाशित झालेल्या नवीन पुस्तकांचं मुखपृष्ठ .■
अत्यंत कनिष्ठ मध्यम वर्गीय असं आमचं कुटुंब होतं . आई -म्हणजे माई नर्स, पदरी चार मुलगे. १९६० पूर्वीचा तो काळ. तीन आकडीच्या आतला तिचा पगार आणि खाणारी तोंड पाच. शिवाय त्या चौघांची शिक्षणं, जगणं इत्यादी. थोडक्यात काय तर अत्यंत तुटपुंज्या साधन सामग्रीत कसंबसं जगणारं , सकाळचं वरण संध्याकाळी गरम करुन जेवणारं आमचं कुटुंब. त्यामुळे सातवी-आठवीपासूनच उन्हाळ्याच्या सुटीत कुठे तरी काम करावं आणि वर्षभराच्या शिक्षणाची सोय करावी अशी शिस्त आम्हाला लागली होती. त्यातही एक समाधानाची आणि पुढे आयुष्यभर पुरत आलेली शिदोरी म्हणजे माईनं लावलेली वाचनाची सवय. या सवयीनंच पुढचं जगणं सुकर होत गेलं.
एक प्रामाणिकपणे सांगून टाकायला हवं की , तेव्हाच्या बहुसंख्य मुलांना वाटायचं तसं ना मला बस कंडक्टर व्हायचं होतं , ना डॉक्टर किंवा इंजिनिअरही . मॅट्रिकच्या सहामाही परीक्षेत ‘ मी मुख्यमंत्री झालो तर..’ हा प्रश्नही मी सोडवायला नव्हता म्हणून ‘महत्त्वाकांक्षा नसलेला मुलगा’ अशी हेटाळणी ऐकावी लागली होती . तेव्हा हायर मॅट्रिक होतं . मॅट्रिकला ५५ किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर हमखास नोकरी मिळत असे . त्यापेक्षा कमी मिळाले तर टायपिंग आणि शॉर्टहॅण्डचा कोर्स केल्यावर नोकरीची हमखास हमी असे. त्यातच मी ज्या अंधानेर या गावाहून मॅट्रिक झालो त्या गावच्या अख्ख्या तालुक्यात पुढच्या शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे मॅट्रिकला ५३ टक्के मिळायच्या आधीच अंधानेरजवळ सुरु असलेल्या अंबाडी सिंचन प्रकल्पाच्या कामावर रोड कारकून म्हणून मला चिकटवून देण्याची तयारी माईनं करुन ठेवलेली होती . पण , हे काही घडायचंच नव्हतं. मी मॅट्रिक झालो त्याच वर्षी कन्नड या तालुक्याच्या गावी महाविद्यालय सुरु झालं आणि पुढील शिक्षणाची सोय झाली . ग्रंथालय नावाचं अफाट विश्व इथंच खुलं झालं . मग मी काहीबाही लिहायला लागलो. पहिली कथा याच वयात लिहिली आणि ती कथा महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात प्रकाशितही झाली. अर्थात ते लेखन टुकार भाबडेपणा होता, हे आता प्रामाणिकपणे मान्य करायलाच हवं . पुढच्या वाचनातून कथालेखन हा एक गंभीर प्रकार असल्याचं आपसूकचं लक्षात आलं . दरम्यान पत्रकारितेत आलो . पणजी, कोल्हापूर, सातारा, चिपळूण अशी मजल दरमजल करत नागपूरला पडाव पडला . पत्रकारितेमुळे अनुभवविश्व अधिक व्यापक झालं . दरम्यान वाचनही वाढलं . परिणामी घाट , शैली , आशय असा लेखनाचा आकृतीबंध समजत गेला आणि कथालेखनही हळूहळू समंजस होत गेलं. कथा विविध ठिकाणी प्रकाशित होऊ लागल्या . कथेसोबतच त्या वयाला अनुसरून अधूनमधून कविताही करु लागलो पण , मराठी साहित्य एका दर्जेदार (?) कवीला कसं मुकलं ती कथा फारच मनोरंजक आहे. ती आधी सांगून टाकतो –
■■■
‘नागपूर पत्रिका’ दैनिकात माझी निवड झाली ती त्या वृत्तपत्रासाठी चिपळूणहून लिहिलेल्या काही ललित लेखांमुळे . ‘ नागपूर पत्रिका‘ दैनिकाची रविवार पुरवणी ‘साकवि‘ ( साहित्य , कला आणि विज्ञानाचं लघुरुप ) आणि ‘तरुण भारत’च्या रविवार पुरवणीत तेव्हा स्पर्धा असे . ‘नागपूर पत्रिका’ची पुरवणी यमुनाताई शेवडे आणि मंगला विंचुर्णे तर ‘तरुण भारत’ची रविवार पुरवणी वामन तेलंग बघत असतं . वामन तेलंग हे तेव्हा साहित्यिक उलाढालीशी संबंधित असलेलं एक दिग्गज नाव होतं . ते स्वत: उत्तम लेखक होते ; त्यांनी आणि प्रभाकर सिरास यांनी मिळून ‘वामन प्रभू’ या नावानं केलेल्या लेखनाची साहित्य जगतात आवर्जून नोंद घेतली जात असे . शिवाय आशा बगे , ग्रेस , द . भि . कुलकर्णी असे अनेक मान्यवर त्या रविवार पुरवणीत लिहित .साहित्य जगतात ‘तरुण भारत’ची रविवार पुरवणी आणि वामन तेलंग हे त्या काळातलं एक मिथक होतं .
एका रणरणत्या उन्हाळयात प्रसिद्धी खात्यातर्फे गोंदिया , भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास कामांना पत्रकारांच्या भेटीचा दौरा ठरला . त्या दौऱ्यात माझी वर्णी लागली ; रणरणती ऊन्ह आणि त्यामुळे रखरखीत होणारे डोळे असा तो अनुभव होता . त्यात समाधान एकच होतं आणि ते म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा बहुसंख्येनी फुललेली पळसाची फुलं . तो जणू पळस फुलांचा उत्सवच होता .
लाल , केशरी आणि अधूनमधून पिवळ्या रंगाचे भडक , मध्यम आणि सौम्य असे ते संमोहित करणारे रंगकल्लोळ होते . त्या फुलांनी वेडचं लावलं . दुष्काळग्रस्त मराठवाडयात पळस फुलांचे असे रंग कल्लोळ कधीच बघायला न मिळाल्यानं मी कदाचित जास्तच संमोहित झालेला असू शकेल . नंतर दोन-तीनवेळा एकटाच त्या प्रदेशात फिरुन त्या रंग कल्लोळात हरवून गेलो आणि परिणामी ‘पळस फुलांच्या प्रदेशात‘ नावाची एक दीर्घ कविता आकाराला आली . रजिस्टरमधील दीडशेपेक्षा जास्त पानं त्या प्रदेशाचा विस्तार होता .
पळस फुलांचे प्रदेश आणि समकालीन कायदे–कानून , घटना , लोकशाही , सामाजिक स्थिती असं बरंच काही मी रंगवलं होतं . त्यात बोचकारे होते , उपहास होता आणि सर्वसामान्यांचं दु:खही होतं , असा माझं ठाम मत होतं . माझ्या दृष्टिकोनातून ती निर्मिती अर्थातच अत्यंत कसदार आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी काव्यातला तो तसा पहिलाच प्रयोग होता . पुढचे काही महिने जगण्यासाठी ती धुंदी मला पुरेशी ठरली .
त्या प्रदीर्घ कवितेच्या संदर्भात मी , मंगला विंचुर्णेशी काहीच बोललो नाही ; कारण ते वाचून लग्नाचा बेत ती बदलणार तर नाही , ना अशा एक धारदार भीती का , कोण जाणे मनात दाटून आलेली होती . मात्र , एका संध्याकाळी विदर्भ साहित्य संघाच्या धनवटे रंग मंदिराच्या कट्टयावर रंगलेल्या मैफिलीत ‘पळस फुलांच्या प्रदेश’ विषयी मी वामन तेलंग यांना सांगितलं . हे प्रदेश ‘नागपूर पत्रिका’ नव्हे तर ‘तरुण भारत’च्या रविवार पुरवणीत प्रकाशित व्हावेत ही इच्छा , कोणताही संकोच बाळगता सांगितली . वामनराव त्यांच्या शैलीत हंसले . हंसण्यातून होकार किंवा नकार व्यक्त न होऊ देणं म्हणजे ‘नॉन कमिटल’ राहणं ही वामनरावांच्या हंसण्याची खासीयत होती . मग थोडं फार इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर परस्परांचा निरोप घेतांना , ‘दे , तुझे ते पळस फुलांचे की काय ते प्रदेश वाचायला ,’ असं वामनरावांनी सांगितलं आणि लुनावर बसून ते निघून गेले .
पुढे दोन – चार दिवसांनी फोन करुन रीतसर भेटेची वेळ ठरवून एक दिवस वामनरावांना भेटलो . मी गेलो तेव्हा योगी ध्यानमग्न असावा तसे कोणत्यातरी लेखावर संपादकीय संस्कार करण्यात वामनराव मग्न होते . त्यांची मग्नता संपल्यावर मी अतिशय भक्ती भावानं शबनम बॅगमधून काढून ते रजिस्टर वामरावांना दिलं . उघडूनही न पाहता ड्रावर उघडून त्यात ते ‘पळस फुलांचे प्रदेश’ ठेवून ड्रावर पुन्हा बंद करुन वामनराव म्हणाले , ‘ठीक आहे . सावकाशीनं वाचेन मी हे आणि कळवेन तुला .’ मी थोडावेळ घुटमळलो पण , ‘मी आता कामात आहे , तू निघ’ असं वामनरांवांनी स्पष्टच सांगितलं .
दिवस , महिने आणि वर्ष उलटलं तरी वामनराव पळस फुलांच्या प्रदेशाबद्दल काहीच बोलले नाहीत . मग मी त्यांना आधी आडवळणांनी विचारायला सुरुवात केली . एक दिवस त्यांनी धनवटे रंग मंदिराच्या समोरच ‘तुझं बाड हरवलं ब्बुवा माझ्याकडून’ असं म्हणत हातातल्या सिगारेटची राख आणि तो विषय वामनरावांनी झटकून टाकला . पुढे पाच – सहा वर्षांनी एकदा मी वामनरावांना त्याबददल थोडं टोकलं तेव्हा , चष्म्याआडून माझ्याकडे नजर रोखून बघत वामनराव म्हणाले , ‘गड्या, तुझ्या त्या निर्मितीत की काय ते , मन लावून वाचावं असं काहीच नव्हतं , हे एकदा सांगून टाकायला हवं तुला !’
पण , मला वामनरावांचा राग आला नाही ; कारण कविता हा आपला प्रांत नाही हे तोवर मी मनोमन स्वीकारलेलं होतं . दरम्यान सभोवताली कवितेचं अत्यंत कसदार पीक तरारुन आलेलं होतं . जगण्याचा श्वास झाला तरच कसदार कवितेची निर्मिती होते हे तोवर मला चांगलं आकळलेलं होतं . जे माझं होणारचं नाही त्याची असोशी बाळगण्यात काहीच हंशील नाही , हे भान तोवर प्रबळ झालेलं होतं . शिवाय तोवर पत्रकारिता माझ्या जगण्याचा श्वास झाली होती .
याचा शेवट आणखी शोकात्म होता…एकदा बोलता बोलता ही दर्दभरी हकीकत मी बेगम मंगलाला , ‘तुम क्या जानो तुम्हारी याद मे हम कितना रोये’ च्या चालीवर सांगितली आणि म्हटलं , ‘एका कवीचं अशा प्रकारे आकस्मिक निधन झालं…’
माझं ऐकून घेतल्यावर बेगम शांतपणे म्हणाली , ‘तुझी ती दीर्घ आणि अन्यही कविता मी वाचल्या आहेत . तुझ्या कविता एकूणच बेकार आहेत . वामनरावांच्या निर्णयामुळे एका कवीचं आकस्मिक निधन झालं हे खरं पण , त्यामुळे दु:ख होण्याचं कारण नाही आणि आपत्ती तर मुळीच कोसळलेली नाही . हे निधन ही एक इष्टापत्ती समजते मी . तू पत्रकारिता कर नीट , कारण तेच तुझं भवितव्य आहे…’
■■■
नागपूरचा प्रातिभ आवाका त्या काळात फारच मोठा होतो. वि. भि. कोलते , वा. कृ. चोरघडे , पु . य. देशपांडे , राजा बडे , पुरुषोत्तम दारव्हेकर , राम शेवाळकर प्रभृतींचा जमाना संपून सुरेश भट , महेश एलकुंचवार , ग्रेस, यशवंत मनोहर , भास्कर लक्ष्मण भोळे आदींचा साहित्य प्रांती दबदबा निर्माण होऊ लागला होता. अशा अनेकांच्या सहवासात माझीही कथा घासूनपुसून अधिक प्रौढ होत होती पण, का कोण जाणे , नागपूरला आल्यापासून तसं कथालेखन तसं कमी झालेलं होतं . तरी तेव्हाच्या बहुतेक सर्व नियतकालिकात कथा प्रकाशित होत होत्या . ‘राजस’ च्या दिवाळी अंकात तर एक दीर्घकथा कम लघु कादंबरीही प्रकाशित झाली होती . ते वयचं असं होतं की , लेखनाचं म्हटलं तर समाधान होतं पण , त्यात तृप्ती नव्हती असा घोळ होता .
त्यातच एक घटना घडली . विदर्भ साहित्य संघाचं मुखपत्र असलेल्या ‘युगवाणी’चा संपादक तेव्हा प्रकाश देशपांडे होता . तो मुळचा कवी. माझा पत्रकारितेतला पण वेगळ्या वृत्तपत्रातला समकालीन . तो , त्याची पत्नी पल्लवी , मी आणि माझी बेगम मंगला असा आमचा दोस्तीचा एक मस्त चौकोन होता . कथालेखनाची माझी गती मंदावली आहे यावरुन प्रकाशनं सोनेरी मंतरलेल्या पाण्याच्या एका मैफलीत मला आठ दिवसांत एक नवीन कथा लिहून देण्याचं आव्हान दिलं . कथा आवडली तर ‘युगवाणी’च्या दिवाळी अंकात प्रकाशित करण्याची हमी पण दिली. कथा जर चांगली उतरली तर स्पर्धेतलं २०० रुपयांचं ( तेव्हा ही रक्कम फार मोठी होती . ) पारितोषिकही देण्याचं मान्य केलं . गंमत म्हणून झालेलं हे बोलणं मला चांगलचं खुपलं .
रात्री घरी आल्यावर उशिरापर्यंत मी त्याचाच विचार करत होतो. पहाटे केव्हा तरी त्याच तिरीमिरीत उठून पत्रकारितेतील एका अनुभवावर आधारित एक कथा लिहून काढली . निबीड अंधारात अचानक प्रकाश दिसावा तसा आनंद ती कथा पुन्हा वाचताना मला आला . दुसऱ्या दिवशी ती कथा टाइप करुन युगवाणीला पाठवूनही दिली. आलेल्या सर्व कथा नावाची गोपनीयता बाळगून प्रकाशनं परीक्षकांकडे पाठवल्या . माझीच कथा सर्वोत्कृष्ट ठरली . परीक्षकांचेही कौतुकाचे चार शब्द वाट्याला आले . मराठी कथा प्रांतातील उगवता तेजस्वी तारा वगैरे स्वप्न मला पडू लागली. पण… हाय कंबख्त , ये तो होना ही न था…
युगवाणीतील कथा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनी म्हणजे , १४ जानेवारीला होणार होता . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माधव गडकरी यांना बोलवावं असं ठरलं . तेव्हा ते ‘मुंबई सकाळ’चे संपादक आणि प्रसिद्धीच्या कळसावर होते . माधवरावांमुळेच ‘मुंबई सकाळ’चा नागपूरचा वार्ताहर म्हणून मी काम बघत होतो . शिवाय त्यांची माझी जुनी ओळख . ( खरं तर, पत्रकारितेत ‘गडकरी स्कूल’चा विद्यार्थी म्हणूनच मी अजूनही ओळखला जातो. ) स्वाभाविकच माधवरावांना आमंत्रित करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि ती मी पारही पाडली. कार्यक्रमात माधवरावांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारलं . तेव्हा गडकरी काहीच बोलले नाहीत पण, कार्यक्रमानंतर झालेल्या मैफिलीत गडकरी माझ्यावर अक्षरश: भडकले . मी मुळचा मराठवाड्यातला पण , तोपर्यंत विदर्भात स्थिरावलेलो होतो . लेखन तसंच चळवळीच्या निमित्तानं उर्वरित महाराष्ट्राशी माझा चांगला संपर्क होता . चळवळीच्या पार्श्वभूमीमुळे येणारी एक राजकीय समज आपसूक माझ्यात आली होती , असं गडकरी साहेबांचं म्हणणं होतं . मी राजकीय वृत्तसंकलनाच्या बीटमध्ये काम करावं असं फर्मानच त्यांनी सर्वांच्या उपस्थितीत सोडलं . एवढंच नाहीतर समोरचा फोन ओढून घेत ‘मुंबई सकाळ’चे तत्कालीन वृत्तसंपादक राधाकृष्ण नार्वेकर यांना बजावून सांगितलं की , यापुढे प्रवीणकडून फक्त राजकीय बातम्या घ्यायच्या .
नंतर लगेच सहा-आठ महिन्यांतच माधव गडकरींनी ‘लोकसत्ता’चे संपादक म्हणून सूत्र हाती घेतली . सहाजिकच माझाही ‘लोकसत्ता’त प्रवेश झाला . ‘लोकसत्ता’ तेव्हा मराठीतलं सर्वाधिक खपाचं वृत्तपत्र आणि माधव गडकरी प्रचंड लोकप्रिय संपादक होते . ‘लोकसत्ता’तला प्रवेश हे माझ्या पत्रकारितेला लाभलेलं निर्णायक वळण ठरलं . पुढच्या काळात जिथे जातील तिथे गडकरी मला सोबत घेऊन जात आणि ‘हा आमचा प्रवीण . पोलिटिकल बीट बघतो’ , असा माझा परिचय करुन देत . राजकीय वृत्तसंकलनामुळे सत्तेच्या दालनात आणि या दालनाबाहेर काय चालतं हे समजून घेता घेता मी त्यात आकंठ बुडालो. ‘लोकसत्ता’मुळे राज्य, देश आणि परदेशातही वृत्तसंकलनाची संधी मिळाली . ते सर्व अनुभव अद्भूत होते , त्या अनुभवांची गती भेलकावंडणारी होती . मी त्या अनुभवांना बेडरपणे सामोरे गेलो . या सर्व प्रक्रियेत कथालेखक म्हणून माझं अनुभवविश्व किती तोकडं आहे हे लक्षात येत गेलं . मग , एकदा हे सर्व अनुभव घेतले की, पुन्हा कथालेखनाकडे वळू या असं मी ठरवलं.
२००१ मधला एक प्रसंग… ‘लोकप्रभा’चा तत्कालीन संपादक तसंच माझा ज्येष्ठ मित्र प्रदीप वर्मा आणि टाइम्स ऑफ इंडियाचा दिलीप चावरे यांच्यासोबत औरंगाबादच्या आमच्या घरी गप्पा मारत बसलो होतो . त्यावेळी आचार्य विनोबा भावे यांच्या प्रायोपवेशनाची हकिकत मी ज्या पद्धतीनं सांगितली त्यामुळे प्रदीप वर्मा खूपच इम्प्रेस झाला . त्यानं मला वृत्तकथा लिहिण्यासाठी टुमणं लावून प्रोत्साहन दिलं. त्याप्रमाणे मी काही वृत्तकथा लिहिल्याही पण, त्या काही अस्सल ललितबंधातल्या कथा नव्हत्या. पुढे मी नागपूर आवृत्तीचा आधी निवासी संपादक आणि नंतर संपादक झालो. माझी भटकंती खूपच वाढली आणि वृत्तकथालेखनही थांबलं. दरम्यान प्रदीपनंही ‘लोकप्रभा’ सोडलं . वृत्तकथा लिहिण्यासाठी टुमणं लावणारं आणि प्रोत्साहित करणारं कुणी उरलंच नाही .
दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झाल्यावर स्त्री नायिका असलेली एक राजकीय कादंबरी लिहिण्याचा किडा कांही महिने मला सतत चावत होता . तीन-चार वेळा प्रयत्न केले . प्रत्येक वेळी चार-पाच हजारावर शब्द लिहूनही झाले पण , खर्डा काही मनासारखा जमेना . ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन्ही कादंबऱ्यांच्या प्रभावाखालील ते लेखन होत होतं . एक वेळ पूर्ण प्रभावाखाली लेखन झालं असतं तर ते समजू शकत होतं पण , माझा प्रत्येक खर्डा अरुण साधूंच्या लेखनाच्या तुलनेत फारच खुरटा आहे हेही जाणवत होतं . एकूण काय तर मराठी राजकीय कादंबरी म्हणा की, कथा अजून अरुण साधूंच्या गारुडातून मुक्त झालेली नाही हे जाणवलं . एका भेटीत हे अरुण साधूंना सांगितलं. तेव्हा त्यांच्या परिचित मंद शैलीत हसत ते म्हणाले, ‘पुन्हा प्रयत्न करा . यश येईलच कधी ना कधी .’
ते यश अजून आलेलंच नाही . कादंबरी तर सोडाच कथालेखनही थांबलं ते थांबलंच…
■■■
आणखी एक करायचं राहून गेलं , तेही या निमित्तानं सांगून टाकायला हवं . आमच्या कुटुंबाला कोणतीही चित्रकलेची पार्श्वभूमी नाही पण, कन्नडच्या दिवसापासून जे काही वाचत गेलो त्या मजकूरासोबत विशेषत: रेखाचित्रांचा प्रभाव माझ्यावर पडत गेला . त्या काळात दिवाळी अंकात वाचलेल्या अनेक कथा-कादंबऱ्यातील रेखाचित्र अजूनही आठवतात . कसा कोण जाणे मीही रेखाचित्र करु लागलो . रमण त्रिफळे आणि हेमंत नागदिवे हे त्या काळातील माझे मित्र कला महाविद्यालयात प्राध्यापक होते . ( हेमंत पुढे राज्याचा कला संचालक झाला . ) त्यांच्या विद्यार्थ्यासोबत रात्री उशीरा औरंगाबादच्या रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकावर रेखाचित्र करायला मी अनेकदा जात असे . वृत्तसंकलनाच्या काळात माझी एक सवय होती. एखाद्या भाषणाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केलं की , मला त्या भाषण किंवा कार्यक्रमाची टिपणं घेण्याची गरज नसायची . लक्षात राहात नसत म्हणून मी फक्त सहभागींची नावं टिपून घेत असे . भाषण किंवा कार्यक्रम सुरु झाला की अनेकदा. स्पायरल पॅडवर मी रेखाटन करत बसे . नागपूरला गेल्यावर प्रख्यात चित्रकार भाऊ समर्थ भेटले . त्यांच्याशी दोस्ती झाल्यावर त्यांनी कांही टिप्स दिल्या . मग वेळ मिळेल तेव्हा मी रेखाटन भरपूर करत असे पण , तेही हळूहळू मावळत गेलं . अशात आठवण झाली म्हणून पुन्हा रेखाटन करायला घेतलं तर हात स्थिरच राहात नव्हता . वय , वयानुसार आलेल्या व्याधी म्हणजे, स्पॉडेलायटिस, सायटिका तसंच सोनेरी मंतरलेल्या पाण्याचाही कदाचित परिणाम असेल , हातातलं चित्र काढण्याचं स्थैर्य गमावलेलं आहे .
-थोडक्यात काय तर जगणं हे कधीच दोन अधिक दोन बरोबर चार असं नसतं , त्यात खूप वळणं आणि चढ-उतार असतात हेच खरं . म्हणूनच , ना कवी , ना कथालेखक , ना रेखाटनकार…शेवटी मी झालो पत्रकार . पण जे करायचं राहून गेलं त्याची हुरहुर अधूनमधून टोचणी देतच असते .
( ब्रेल लिपीतील ‘स्पर्शज्ञान’ या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख .)
■प्रवीण बर्दापूरकर
Cellphone +919822055799
www.praveenbardapurkar.com