केजरीवाल आणि आप नावाचा भास!

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि याआधीची (२०१३ची) निवडणूक तसेच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ४९ दिवसांच्या दिल्लीतील राजवटीच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा मी दिल्लीत ‘लोकमत’चा राजकीय संपादक होतो आणि ती निवडणूक मी एखाद्या तरुण, उत्सुक आणि उत्साही वार्ताहरासारखी कव्हर केली होती. ज्येष्ठ सहकारी हरीश गुप्ता, विकास झाडे आणि मला, त्या निवडणुकीत दिल्लीत कॉग्रेसचे पानिपत भाजप नाही तर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष करणार असे निवडणुका जाहीर होण्याआधीच वाटत होते. कारण ‘वाईट राजकारण आणि वाईट्ट राजकारण्यांना’ केजरीवाल म्हणजेच आम आदमी पार्टी (आप) हाच पर्याय, अशी हवा निर्माण झालेली होती. आमचे वाटणे चूक ठरो की बरोबर या निवडणुकीत ‘आप’च्या प्रचारावर काळजीपूर्वक नजर ठेवायची हे ठरवून दररोज केजरीवाल यांना किमान दोन तास तरी मी फॉलो करत असे.

१६ ऑगस्ट १९६८रोजी हरियाणातील सिवानी येथे गीतादेवी आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअर असलेल्या गोविंदरण या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या अरविंदचे बालपण सोनपत, गाझियाबाद, हिस्सार येथे गेले. आयआयटी खरगपूरसारख्या मातब्बर संस्थेतून इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केल्यावर अरविंद केजरीवाल यांनी टाटा उद्योग समुहात काही काळ नोकरी केली. नंतर १९९२साली त्यांनी भारतीय महसूल सेवेत प्रवेश केला. सहा वर्षाच्या आयकर खात्याच्या नोकरीत या देशातला पैसा सर्व सामान्य माणसासाठी खर्च न होता अन्यत्र कसा ‘मुरतो’ आहे आणि हाच भ्रष्टाचार आहे हे या कुशाग्र, महत्वाकांक्षी  (आणि काहीशा एकारलेल्याही) अधिका-याच्या लक्षात आले. त्यातून भ्रष्टाचार मुक्तीसाठी माहितीचा अधिकार तसेच जनलोकपाल या चळवळीकडे अरविंद केजरीवाल नावाचा संवेदनशील अधिकारी आकृष्ट झाला. या चळवळीसाठी त्याने रोल मॉडेल म्हणून अण्णा हजारे यांना निवडले आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किरण बेदी, कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण, योगेंद्र यादव अशी एक चमू जमवली. त्यातून अण्णा हजारे यांचे दिल्लीच्या रामलीला मैदानावर जनलोकपाल नियुक्तीसाठी आंदोलन उभे राहिले, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात खदखदणारा जनतेच्या मनातील असंतोष लक्षात आल्यावर अरविंद केजरीवाल यांच्यातील राजकीय महत्त्वाकांक्षा प्रखरपणे जागृत झाली. अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय यात्रेत सहभागी व्हायला अण्णा हजारे, किरण बेदी  (या बेदीबाई आणि शाझिया इल्मी या निवडणुकीत भाजपच्या वळचणीला गेल्या असून निवडणूक लढवणार आहेत. किरण बेदी तर भावी मुख्यमंत्री आहेत.) यांनी नकार दिला. जमलेली टीम फुटली. त्याची फिकीर न करता उलट अण्णांच्या नाकावर टिच्चून आम योगेन्द्र यादव, प्रशांत भूषण, बिन्नी, शाझिया इल्मी यांना साथीला घेत आदमी पार्टीची स्थापना झालीच…पाहता पाहता या पक्षाने दिल्लीच्या राजकारणात एक शक्ती आणि अरविंद केजरीवाल यांची राष्ट्रीय नेता म्हणून हवा निर्माण केली. प्रस्थापित व्यवस्थेवर मुद्देसूद कोरडे ओढणारा अरविंद केजरीवाल नावाचा बकरा आयताच मिळाल्यावर मीडियाचा झोतही टीआरपी नावाच्या मजबुरीतून आलेल्या अगतिक गरजेपोटीही केजरीवालांवर राहिला आणि भारताला जणू नवा मसीहा मिळाला असा भास निर्माण झाला. हा भास आहे हे कळण्याच्या आतच केजरीवाल नावाचा तारा दिल्लीच्या राजकीय क्षितिजावर उगवलाही!

भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारण्याची कळकळ, स्वच्छ प्रतिमा आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शीपणा ही आम आदमी पार्टीची शक्तीस्थळे होती. देशातीलच नव्हे तर परदेशस्थ भारतीयांनी या पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी केवळ घसघशीत आर्थिक मदतच केली नाही तर आर्थिक सुस्थितीत असणारे परदेशातील काही भारतीय दिल्लीत स्वखर्चाने आले आणि प्रचारासाठी तळ ठोकून बसले. निवडणुकीच्या आखाड्यातले डावपेच वेगळे असतात. भारतातील निवडणुकात जात-धर्म-धन तसेच गुंडशक्ती, पक्ष महत्वाचे असतात आणि लोकांचा प्रतिसाद, उमेदवाराचे चारित्र्य तसेच प्रतिमा हे मुद्दे नंतर येतात हे,  केजरीवाल विसरले तरी ती एक त्यांची जमेची बाजू ठरली आणि दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी तब्बल २८ जागांचे माप मतदारांनी ‘आप’च्या पदरात टाकले . ज्या काँग्रेसचा दारुण पराभव होण्यास आम आदमी पार्टी कारणीभूत ठरली त्याच काँग्रेसच्या ८ सदस्यांच्या बिनशर्त पाठिंब्यावर आपचे सरकार दिल्लीत सत्तारूढ झाले, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले. मात्र केवळ ४९ दिवसात हे सरकार कोसळले!

ती निवडणूक ते ही निवडणूक, या काळात राजकारणाच्या पुलाखालून केजरीवाल यांच्या संदर्भात बरेच पाणी धो-धो वाहून गेलेले आहे. मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल साफ अयशस्वी ठरले कारण लोकशाहीत राज्य सरकार चालवणे आणि एखादी स्वयंसेवी संस्था चालवणे यात महदंतर असते हे केजरीवाल यांनी लक्षात घेतले नाही. राजकारणातले सामुहिक नेतृत्वाचे तत्व आणि शह-काटशह त्यांना मान्यच नव्हते. विजेच्या दरात कपात केली आणि तूट भरून अनुदान वाढवले पण त्यासाठी आर्थिक तरतूदच केली नाही! दरमहा २० हजार लिटर्सपेक्षा कमी पाणी वापरणाऱ्या कुटुंबाना दारात सवलत दिली पण किमान तीन जणांच्या कुटुंबाचा मासिक पाणी वापर त्यापेक्षा जास्त असल्याने त्याचा फायदाच कोणाला मिळाला नाही. शिवाय झोपडपट्टीवासीय काही विकतचे पाणी घेतच नव्हते त्यामुळे त्यांना सवलत जाहीर झाली काय किंवा नाही याच्याशी काहीच घेणे-देणे नव्हते. एका पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्री असतानाही उपोषणाला बसण्याचा आणि केंद्र सरकर तसेच दिल्ली प्रशासनाला वेठीस धरण्याचा आचरट प्रकार त्यांनी केला. त्यामुळे जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आणि केजरीवाल यांचा उल्लेख ‘अराजक माजवणारा मुख्यमंत्री’ असा उल्लेख होऊ लागला, तो त्यांनी सन्मान म्हणून स्वीकारण्याचा उद्दामपणा दाखवला. लोकपाल नियुक्तीचे विधेयक मांडताना घटनेच्या तरतुदीनुसार नायब राज्यपाल आणि केंद्र सरकारची परवानगी घेण्यास साफ नकार दिला. घटना, कायदा, नियम आणि संसदीय संकेत तसेच शिष्टाचार यापेक्षा आपण मोठे, अशी मनमानी, आक्रस्ताळी आणि एकारली भूमिका घेतली. याच दरम्यान भाजप आणि काँग्रेस नेत्यांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करण्यात केजरीवाल यान अपयश आले, नितीन गडकरी प्रकरणात तर कायदा विसंगत भूमिका घेतल्याने त्यांना तुरुंगवासही घडला.. अरविंद केजरीवाल हुशार आहेत, भ्रष्टाचाराबद्दल त्यांना चीड आहे मात्र, लोकशाहीत आवश्यक असणारे राजकीय चातुर्य त्यांच्या नाही (काँग्रेसने पाठिंबा काढला नव्हता तरी केजरीवाल यांनी तावातावात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाकला यातून ते सिद्ध झाले !) आणि ते सर्वाना सोबत घेऊन चालू शकत नाहीत म्हणजे, दुसऱ्या शब्दात ते लोकशाहीवादी नाहीत तर एकाधिकारशाहीवादी आहेत  हेही याकाळात समोर आले. त्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या मिडिया आणि सुशिक्षित-समंजस समर्थकांना केजरीवाल यांनी भांडवलदारांचे हस्तक ठरवले. लोकशाहीवादी भूमिका घेऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करत संघटन मजबूत न करता केवळ निर्माण झालेल्या भासमान प्रतिमेच्या आधारे खेळलेला लोकसभा निवडणूक लढवण्याचा अंगलट आलेला जुगार केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांची लोकप्रियता झपाट्याने कमी करणारा ठरला. केजरीवाल यांच्या या वर्तन आणि व्यवहाराला कंटाळून त्यांची साथ सोडल्याने पक्ष संघटन विस्कळीत झाले, अशा अनेक चुका घडलेल्या असल्या तरीही अरविंद केजरीवाल प्रामाणिक आहेत, सध्याच्या स्वार्थाने बरबटलेल्या राजकारणाला पर्याय म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि तळागाळात त्यांची मोहिनी अजूनही मोठ्या प्रमाणात कायम आहे आणि हे त्यांचे मोठे शक्तीस्थळ आहे यात शंकाच नाही.

आता केजरीवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे त्यामुळे ही निवडणूक ‘आप विरुद्ध भाजप’ नव्हे तर ‘मोदी विरुद्ध केजरीवाल’ अशी होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील निवडणुकीचे भवितव्य कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासीय (त्यांना दिल्लीकर ‘झुग्गीवासीय’ म्हणतात) या मतदारांच्या हातात असते. या मतदारांच्यावर केजरीवाल यांचा असणारा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही. गेले वर्षभर सतत सक्रीय रहात आणि आता पुन्हा सत्ता मिळाली तर ते पाच वर्ष न सोडण्याची ग्वाही देत हा प्रभाव केजरीवाल यांनी चांगल्यापैकी संघटीत केलेला आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आधी  दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पानिपत झालेला काँग्रेस पक्ष अजूनही सावरलेला नाही. पक्षाची धुरा सोनिया गांधी यांच्याऐवजी राहुल गांधी यांच्याकडे द्यायची की नाही यासारखा महत्वाचा निर्णय तर सोडाच पण, संघटनात्मक पातळीवरचे छोटे-मोठे निर्णयही न घेता घेण्याइतका हा पक्ष गलितगात्र झालेला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला एकाच वेळी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशा दोघांसोबत नव्हे तर केवळ भारतीय जनता पक्ष (पक्षी: नरेंद्र मोदीही !) या एकाच प्रतिस्पर्ध्याचा सामना करावयाचा आहे, हे मोठी जमेची बाजू आहे. केजरीवाल यांच्या जमेच्या बाजू लक्षात घेता   ‘केजरीवाल संपले’ हे राजकीय भाकित आज तरी ठामपणे मांडता येणार नाही अशी परिस्थिती आहे. स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही तर दिल्ली विधानसभेला पुन्हा एकदा त्रिशंकू अवस्थेकडे नेण्याची क्षमता अरविंद केजरीवाल यांच्यात आहेच आहे. म्हणूनच मोदी आणि भाजपने केवळ केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे आणि किरण बेदी, शाझिया इल्मी यांना सन्मानाने जवळ केले आहे.

केजरीवाल संपले असे आज म्हणता येणार नाही असे म्हटलेले केजरीवाल विरोधकांना आवडणार नाही तसेच केजरीवाल समर्थकांना रुचणार नसले तरीही सांगितलेच पाहिजे, राजकारणाच्या खेळपट्टीवरुन स्वत:ची विकेट केव्हा फेकतील याची खात्री योगेंद्र यादव तर सोडाच खुद्द केजरीवालही देऊ शकणार नाहीत अशी अनिश्चितता कायम आहे! पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या एक दिवसीय जागतिक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात रोहित शर्मा आणि शिखर धवन हे जसे (गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकाने किमान कसब पणाला लावायच्या आतच) स्वस्तात विकेट फेकून हाराकिरी करू शकतात तसेच अरविंद केजरीवाल यांचे आहे. एकदा खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहावे आणि नंतर मोकळेपणाने फटकेबाजी करावी हे राहुल द्रविड, व्ही.एस.लक्ष्मण आणि सचिन तेंडूलकर यांचे क्रिकेटमधले तंत्र अरविंद केजरीवाल राजकीय कौशल्य म्हणून शिकतील आणि निवडणुकीत बहुमत मिळवतील   तेव्हाच ‘वाईट भारतीय राजकारण आणि वाईट्ट राजकारण्यांना’ आश्वासक पर्याय मिळाला असे म्हणता येईल. तोपर्यंत अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी हा एक राजकीय भासच आहे!

-प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९

praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट