मराठी एकं मराठी !

आम्ही मराठीचे कट्टर पुरस्कर्ते असलो तरी आम्हा दोघां पत्नी-पतीची, पार्श्वभूमी मात्र केवळ मराठीची नाही. मी मूळचा मराठवाड्यातील; १९४७साली देश ब्रिटिशांच्या जोखंडातून स्वतंत्र झाला तरी सप्टेबर १९४८ पर्यंत आमचा मराठवाडा निझामाच्याच अंमलाखाली होता. आमच्या पिढीपर्यंत शिक्षणातही उर्दू माध्यम होतं. माझी आई नर्स होती आणि तिची जिथं पोस्टिंग असे तिथं आमचं शिक्षण सुरु राहिलं. चौथी-पाचवीपर्यंत आम्ही मुलं संध्याकाळी मराठीच्या गुरुजीकडे ‘परवचा’ म्हणून उर्दू शिक्षकांकडे ‘अलीफ-बे’ म्हणायला रोज जात असू. नंतर उर्दू माध्यम बंद झालं (उर्दूविषयी अजूनही प्रेम वाटतं, ती भाषा शिकायची राहिली याची आजही खंत आहे…) आणि अभ्यासक्रमात उर्दू एक भाषा विषय राहिला; तरी अजूनही आमच्या पिढीच्या बोलण्यात अधून-मधून एखादा खास ‘मराठवाडी लहेजा’ असलेला एखादा उर्दू शब्द येतोच. उर्दूची कसर पुढे हिंदीच्या अनेक परीक्षा देवून मी भरुन काढली.

माझी पत्नी मंगला विंचुर्णे ही अस्सल नागपुरी; म्हणजे अगदी ‘बॉर्न ​अँड ब्रॉट अप धंतोलीकर!’ नागपुरी हिंदी पार्श्वभूमीवर ती पदव्युत्तर शिक्षण मराठीत घेती झाली. तिला शिकवणा-यात मुक्तिबोध, ग्रेस, सुरेश डोळके वगैरे होते. ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात यमुनाताई शेवडे यांच्या हाताखाली रविवार पुरवणीचे काम पाहत असल्याने तत्कालिन बड्या मराठी साहित्यिकात तिची चांगली उठ-बस होती; तिचं मराठी आणि इंग्रजी वाचन अफाट होतं… आजही आहे. तिचं इंग्रजी इतकं चांगलं की कोणतीही महत्वाची इंग्रजीतील बातमी किंवा लेख मराठीत भाषांतर करण्याची जबाबदारी मंगलवर असायची आणि हे भाषांतर इतकं हुकमी असायचं की त्या लेखकाने तो मजकूर मूळ मराठीतच लिहिला असणार आणि त्याचा इंग्रजीत अनुवाद झाला असणार याची खात्री वाचकांना व्हायची! आमचे ‘सूर’ जुळत असतानाच मराठीसाठी जी काही आंदोलनं नागपुरात उभी राहत होती, त्यात मी आघाडीवर होतो. आघाडीवर कसला? मी तर त्या चळवळीचा एक मुख्य सूत्रधार होतो आणि आघाडीवर होते ते डॉ. भाऊसाहेब कोलते, राम शेवाळकर, भास्कर लक्ष्मण भोळे, मनोहर असे मान्यवर. त्यामुळे मराठी भाषा चळवळीला धार होती आणि विश्वासार्हताही. या चळवळीचे आम्ही तरुण आणि सडेफटिंग चौघे-पाच सूत्रधार अक्षरश: पेटलेलो होतो. मराठीचं भवितव्य आपल्याच हाती, आपणच मराठीचे ‘उध्दारकर्ते’ अशी आमची ठाम धारणा तेव्हा होती! महत्वाचं म्हणजे, आपण जरी मराठीसाठी आग्रही असलो आणि लढे उभारत असलो आणि अन्य भाषांचा द्वेष करायचा नाही हे भान या आघाडीवरील मान्यवरांना होतं. तेच भान आम्हालाही आलं. शिवाय मराठी भाषा आणि संस्कृती कशी ऐश्वर्यशाली आहे हे या सर्व मान्यवरांकडून उमगलं. मी आणि मंगलानी विवाह करण्याचा निर्णय घेतला घेतला तेव्हा आमची पार्श्वभूमी मराठवाडी मराठी, उर्दू, नागपुरी हिंदी, वैदर्भीय मराठी तसंच इंग्रजी, अशी बहुपेडी आणि समंजस होती तरी, आम्ही कट्टर मराठीवादी होतो.

‘मराठीच्या तथाकथित उध्दारकर्त्या’ असलेल्या आम्हा त्या सडेफटिंग सर्व तरुणांची साधारण एकाच वेळी लग्न झाली आणि साधारण आगेमागे सर्वाना मुलं झाली. आम्हाला मुलगी झाली, सायली हे तिचं नाव. आधीच ठरल्याप्रमाणे आम्ही तिचं प्राथमिक शिक्षण मराठीत करायचं ठरवलं. माझ्यासोबतचे ‘मराठीचे उध्दारकर्ते’ त्यांच्या मुला-मुलीना ‘नर्सरी’त प्रवेश घेवून आणि ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार’चे बोल आणि ‘मम्मा-पप्पा’ या हाका ऐकायला मोकळे झाले… आम्ही मात्र मराठी ‘बालवाडी’चा शोध घेत होतो. जिथं शिक्षक मराठीत बोलतात, मराठीतून पाढे, बडबड आणि बालगाणी शिकवतात, संस्कृत श्लोक म्हणवून घेतात, रामायण महाभारत, इसापनीतीतील गोष्टी सांगतात अशा नर्सरी नव्हे तर बालवाडीचा आम्हाला शोध होता. तेव्हा आम्ही बजाज नगरला राहत होतो. जीव अगदी मेटाकुटीला आल्यावर एक दिवस आम्हाला हव्या असलेल्या बालवाडीचा शोध अगदी घराजवळ लागला. काखेत कळसा आणि गावाला वळसा असा हा प्रकार होता ! अत्रे नावाच्या बाई ते शिशु मंदिर चालवत असत आणि ती बालवाडी अस्सल मराठी होती. सायलीचे मराठी बोल ऐकून आमच्या इमारतीतील अन्य तिघा-चौघांनीही मग अत्रे शिशुमंदिरचा पकडला. अत्रेबाईची बालवाडी संपल्याबरोबर सोमलवार शाळेत सायलीला विनासायास प्रवेश मिळाला. इंग्रजी शिक्षणाचा खर्च परवडत नाही, वगैरे मुद्देच आमच्यासमोर नव्हते. मराठी माध्यमातील शाळांचा दर्जा इंग्रजीपेक्षा कमी असतो असे कातडीबचाऊ प्रश्नही आम्हाला पडले नाही. ते ढोंग आमच्या आसपासही कुठे नव्हतेच. एक विषय नव्हे तर पूर्ण मराठी माध्यम हेच आमचं प्राधान्य होतं आणि ते का आहे हे आम्ही सायलीला सतत समजावून सांगत असूत, तेव्हा आमचं ते म्हणणं किती कळलं हे तिलाच ठावूक ! प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सायलीनं पूर्ण मराठीत घेतलं. त्या काळात मी रिपोर्टींगला आणि मंगला उपसंपादक होती; त्यामुळे आमच्या कामाच्या वेळा भिन्न असत. माझी दुपार साधारण मोकळी आणि घरी यायची वेळ रात्री उशिरा; तीही अनिश्चित तर लेक दिवसा शाळेत आणि संध्याकाळी घरी. मी येईपर्यंत ती झोपी गेलेली असे आणि मी उठेपर्यंत ती शाळेच्या वाटेवर असे. त्यामुळे आम्ही तिघं एकत्र असूत ते रविवार दुपारनंतर. तिचं शुभंकरोती, परवचा मला रविवारीच ऐकायला मिळे.

‘सात सक्क किती?’ किंवा ‘त्रेचाळीस म्हणजे हाऊ मच?’ किंवा ‘आस्वाद म्हणजे काय?’, ‘हाऊ टू स्पेल स्वीकार?’ किंवा ‘बाबा, हाऊ मम्मा प्रिपेअर थालीपीठ?’ किंवा ‘अभ्यंगस्नान म्हणजे काय रे बाबा’ किंवा घराला लागून असलेल्या दीक्षाभूमीवर सुरु असलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा अर्थ काय? असे काही चारचौघात अडचणीत आणणारे हिडगे ‘मिंग्लिश’ प्रश्न सायलीकडून आमच्यावर कोसळले नाहीत. उल्लेखनीय म्हणजे, सोमलवार शाळेत इंग्रजी एक भाषा विषय म्हणून चांगला घोटून घेतला जात असे. शिवाय याच दरम्यान एक चांगली बाब घडत होती. मराठी आणि हिंदीसोबतच आमच्या घरात ३ इंग्रजी वृत्तपत्र येत. आमच्यासोबत ती इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याची सवय सायलीला हळूहळू पण अगदी आपसूक लागली. इंग्रजी-मराठी, मराठी-इंग्रजी असे चार-पाच तरी शब्दकोश आमच्या बैठकीत सोफा आणि टीपॉयवर किंवा इकडे-तिकडे कायमच आरामात पहुडलेले असत (आजही असतात ! आता ही संख्या दहाच्या वर गेलीये, इतकाच काय तो फरक.) आणि आम्ही त्यांचा सढळ वापर करत असूत; ती सवय सायलीला लागली. मराठी सारखीच इंग्रजी वृत्तपत्रे ती चौथी पाचवीत असतानापासून सहजपणे वाचू लागली, अडचण भासली तर आमच्यासारखंच शब्दकोश हाताळू लागली… या सवयीने तिला इंग्रजी फिक्शनकडे केव्हा वळवलं हे आम्हाला कळलंच नाही!! आमच्या कौंटुंबिक ग्रुप मधील किंवा माझ्याकडे येणा-या आयएएस, आयपीएस अधिकारी, एक्सप्रेस ग्रुपमधील घरी येणारे मुंबईचे जाहिरात किंवा वितरण विभागाचे बडे अधिकारी यासारख्या कोणाहीसोबत इंग्रजीतून बोलतांना तिला अवघडल्यासारखं वाटलं नाही किंबहुना तिची इंग्रजी संवादातली ती सफाई पाहून तिचं शिक्षण मराठी माध्यमातून सुरु आहे यावर समोरच्याचा सांगूनही विश्वास बसत नसे. अगदी कवी ग्रेस, भास्कर लक्ष्मण भोळे, डॉ.अभय बंग, राम शेवाळकर, माधव गडकरी, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी नंतरच्या काळात कुमार केतकर, महेश एलकुंचवार यांच्यासारख्या दिग्गजांसोबत मराठीत बोलताना तिला घाम फुटला नाही !

आमच्या घरात असलेल्या सर्वभाषक वाचनानुकुल वातावरणाचा फायदा सायलीला झाला. त्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठीत घेऊनही तिच्यात कोणताही न्यूनगंड किंचितही कधीच निर्माण झाला नाही. ( मराठीतून शिक्षण घेतलं मुलांत की न्यूनगंड निर्माण होतो, त्याला/तिला इंग्रजीची भीती वाटते किंवा शिक्षणात मूल मागे राहण्याची शक्यता असते; असा भ्रामक भयगंड निर्माण करणा-या समाजात आपण राहतो म्हणून हा उल्लेख अगदी जाणीवपूर्वक केला आहे. ) हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यम घेण्याचा निर्णय सायलीने घेतला तेव्हा आम्ही मुळीच विरोध केला नाही, कारण निर्णय घेण्याच्या कळत्या वयात ती आलेली होती; आमची भूमिका तेव्हा मार्गदर्शकाची झालेली होता. हायस्कूलच्या प्रवेशाच्या मुलाखतीसाठी ती एकटी शाळेत गेली आणि अस्सखलित इंग्रजीत मुलाखत देवून आली. पुढे महाविद्यालयीन आणि नंतर एमबीएसाठी प्रवेश घेताना केवळ एकदा आईची लाभलेली सोबत हा अपवाद वगळता ती एकटीच सर्व प्रवेश प्रक्रियांना सामोरी गेली. नंतर नोकरीसाठी मुलाखत आणि कंपनी निवडतानाही ती एकटीच होती; मराठीत शिक्षण घेतल्यानं तिचा आत्मविश्वास कुठेही डळमळीत झालेला नव्हता; अजूनही झालेला नाही. आता एका अस्सल इंग्रजाळलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकाराच्या पदावर काम करताना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात पक्का झालेला मराठीचा तिचा पाया हे तिचं अतिरिक्त भांडवल आहे. मराठी भाषा-संस्कृती तिला मुळातून बऱ्यापैकी माहिती आहे; ती माहिती इंग्रजीत अनुवाद सांगणारी तिच्या ग्रुपमधील ती एकटी आहे आणि त्यामुळे ग्रुपमध्ये साहजिकच तिचा ‘रुबाब’ अर्तातच जादा आहे ! मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी आणि पुढे जाऊन सिंधी भाषकाशी प्रेम विवाह केल्यानं सिंधी; अशा पाच भाषा तिच्या पोतडीत जमा झालेल्या आहेत. मातृभाषेवर प्रेम करताना इतर भाषांचा द्वेष नको हा संस्कार मराठीनं तिच्यावर केला असल्यानं तिच्यात भाषेबाबत एक स्वाभाविक उदारपण आलेलं आहे !

// ‘म’ रेखाचित्र सतीश भावसार यांच्या सौजन्याने / पुस्तकांची छायाचित्रे संग्रहातील आहेत //
(या आमच्या प्रयोगाचा उल्लेख “ न उरला ‘म’ मराठीचा ! ” या ब्लॉगमधे केल्यावर अनेकांनी त्याबाबत विचारणा केली; नेमकं काय केलं याबाबत उत्सुकता दाखवली म्हणून हा लेखनप्रपंच. मराठी अभ्यास केंद्र, मुंबईच्या एका प्रकाशनासाठी केलेल्या मजकुराचा हा विस्तार आहे.)

– प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९

[email protected]

 

संबंधित पोस्ट

 • Sameer Gaikwad….
  जडण घडणीचा समृद्ध आलेख…

 • Sharad Deshpande….
  माझे प्राथमिक शिक्षण अमळनेरच्या म्युनिसिपल बोर्डाच्या शाळेत झाले. तिथे कांहीच शिकवत नसत.आम्ही दिवसभर दंगा करीत असू. त्यावेळच्या सरकारी धोरणानुसार इंग्रजी हा विषय (माध्यम नव्हे) यत्ता ८ वी पासून असे. तेंव्हा इंग्रजीची पहिल्यांदा ओळख झाली. पण तरीही पुढच्या आयुष्यात उशिरा सुरु झालेल्या इंग्रजीच्या शिक्षणामुळे काहीही अडचण आली नाही. त्यामुळे मी दोन्ही बाजूनी इंग्रजीचा बाऊ करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतो.

  • माझं शिक्षण नेकनूर, डोंगरकिन्ही , धोंडराई, खंडाळा, अंधानेर अशा तेव्हा कदाचित नकाशावरही नसणा-या गावी झालं . मॅट्रिकची परीक्षा द्यायला कन्नडला जाऊन मुक्काम करावा लागला . पण, शिकलो आणि लिहिलं-लिहितोय, पत्रकारिता केली-करतोय , ग्रंथ लेखन झालं , जगात अनेक ठिकाणी देशात भ्रमंती झाली …थोडक्यात शिक्षण कुठं झालं हे महत्वाचं नाही तर ‘कसं’ झालं हे महत्वाचं आहे . आमच्या पिढीच्या शिक्षणाचा पाया ज्ञान होता आता ज्ञानाच्या जागी माहिती आलीये !

 • Vivek Mahankal ·….
  गुरुजी, रामदासपेठेतील सोमलवार शाळा आजही तशीच आहे. यावर्षी सुदधा त्यांचेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सर्वात जास्त आहेत. आपल्या उपरोक्त लेखात प्रा. म. शं. वाबगावकर यांचा उल्लेख नाही. एम. ए. ला ज्ञानेश्वरी शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता।

  • अहो, मी नागपुरात नाही शिकलो ; थेट पत्रकारिता करायलाच पोहोचलो . पण, वाबगावकर यांच्याविषयी मला माहिती आहे .

  • अहो, मी नागपुरात नाही शिकलो ; थेट पत्रकारिता करायलाच पोहोचलो . पण, वाबगावकर यांच्याविषयी मला माहिती आहे आणि त्यांच्या शिकविण्याच्या ख्यातीबद्दल मी ज्ञात आहे .

 • Rajesh Kulkarni ….
  अगदी खरे. या बाबतीत भरत दाभोळकरांचे उदाहरण अतिशय चपखल आहे.
  ते सांगतात की कॉलेजमधील मुली ‘चल, चहाला चलतोस का?’ असे इंग्रजीतून विचारत तेव्हा यांची ततपप होत असे. मराठीतून विचार करून मग इंग्रजीतून उत्तर देईपर्यंत मुली निघून जात. त्यानंतर मात्र त्यांनी ठरवून इंग्रजी सुधारले व त्यानंतर त्यांना कसलीच अडचण आली नाही.

 • Mahesh Bardapurkar ….
  आम्हीही मुलीला ठरवून मराठी माध्यमाच्या शाळेत (हुजुरपागा, पुणे) टाकलं आहे.

  • व्वा ! म्हणजे आणखी एक बर्दापूरकर सच्चा कृतीशील निघाला तर .

 • Madhav Bhokarikar ….
  छान !

 • Narendra Gangakhedkar ….
  ‘मराठी एकं मराठी ‘,हा अभिमान एकदम मान्य . त्यासाठीची चळवळ ही मान्य . दुर्दैवाने आपण मराठीच्या विकासासाठी लंब्याचवड्या गप्पा मारतो . पण मराठीला आजच्या युगाची ज्ञानभाषा बनविण्याचा फारसा प्रयत्न केलाच नाही .केवळ ललित साहित्य म्हणजे मराठी नव्हे . फार थोड्या मराठी साहित्यिकांनी मराठीला ज्ञान – विज्ञान भाषा बनविण्याचा प्रयत्न केला आहे . युरोपातील अनेक भाषा ज्ञानभाषा आहेत . रशियन , चिनी आणि जपानी भाषा ज्ञानभाषा आहेत . मराठीचे सोडून द्या . हिंदीसुद्धा ज्ञानभाषा झालेली नाही . विज्ञानामध्ये इंग्रजीशिवाय पर्याय नाही . त्यामुळे विज्ञान – तंत्रज्ञान ह्या विषयाकरिता तरी इंग्रजी भाषेतून शिक्षण आवश्यक होऊन बसले आहे . सामाजिक विज्ञान – अर्थशास्त्र इत्यादी विषयासाठी सुद्धा इंग्रजीशिवाय पर्याय नाही . त्रिभाषी सूत्र – इंग्रजी – प्रादेशिक भाषा – हिंदी हाच एक मध्यम मार्ग आहे . तो ज्यांनी स्वीकारला त्यांना फारशी अडचण पडत नाही . मराठी ज्ञानवंतांनी त्यांनी अवगत केलेले ज्ञान मराठीत वेगाने आणले नाही म्हणून मराठी भाषेचा विकास झालेला नाही .

  • Ramesh Ghode

   तुम्ही मराठीला हिंदीपेक्षा कमी का लेखताय? ‘हिंदीसुद्धा ज्ञानभाषा झाली नाही, मराठीचे तर सोडूनच द्या’ म्हणजे काय? हिंदी हा काय ज्ञानभाषेसाठीचा मापदंड वगैरे आहे की काय? म्हणजे हिंदी ज्ञानभाषा झाली तरच इतर भाषा होतील असं म्हणायचंय का तुम्हाला? मराठी ही बंगाली नंतर सर्वाधिक वैज्ञानिक साहित्य उपलब्ध असलेली भाषा आहे. मराठीत काही प्रमाणात का होईना पण मौलिक वैज्ञानिक साहित्य निर्माण होत आहे, हिंदीसारखे नुसते अनुवाद होत नाहीत. मराठी ही हिंदीपेक्षाही कमकुवत आहे असं मानण्याचं काही एक कारण नाही. हिंदी ही भारतातली एखादी युरोपियन भाषा असल्यासारखे समजून तिला अवास्तव महत्त्व देणं बंद करा.

  • Ramesh Ghode

   तुम्ही मराठीला हिंदीपेक्षा कमी का लेखताय? ‘हिंदीसुद्धा ज्ञानभाषा झाली नाही, मराठीचे तर सोडूनच द्या’ म्हणजे काय? हिंदी हा काय ज्ञानभाषेसाठीचा मापदंड वगैरे आहे की काय? म्हणजे हिंदी ज्ञानभाषा झाली तरच इतर भाषा होतील असं म्हणायचंय का तुम्हाला? मराठी ही बंगाली नंतर सर्वाधिक वैज्ञानिक साहित्य उपलब्ध असलेली भाषा आहे. मराठीत काही प्रमाणात का होईना पण मौलिक वैज्ञानिक साहित्य निर्माण होत आहे, हिंदीसारखे नुसते अनुवाद होत नाहीत. मराठी ही हिंदीपेक्षाही कमकुवत आहे असं मानण्याचं काही एक कारण नाही. हिंदी ही भारतातली एखादी युरोपियन भाषा असल्यासारखे समजून तिला अवास्तव महत्त्व देणं बंद करा. मराठी ही सामर्थ्यवान भाषा आहे.

 • Prakash Paranjape….
  माझ्या दोन्ही मुलींची शिक्षणं मराठी माध्यमातूनच झाली .एक हट्टाने कला शाखेत गेली .इंग्रजी भाषेतच पदवी मिळवली छान मार्काने. नंतर औरंगाबादला विद्यापिठातून जर्नालिझम ची पदवी मीळवली ,त्यात ती पहिली आली .आज दोन्ही भाषेत ती माजघरातून स्वयपाकघरात जावे ईतक्या सहजपणे संचार करते . भाषांतर छानच करते .एका मराठी न्युज पोर्टेलची कार्यकारी संपादक आहे .मराठीतून माध्यमीक शिक्षण घेउनही ती कुठेही कमी पडलेली नाही .दुसरी मुलगी वकील आहे .इग्रजीवरही प्रभुत्व आहेच .

 • Radhakrishna B. Muli….
  माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण मराठी माध्यमांच्या शाळेतून झाले .मात्र हेही सांगितले पाहिजे की त्यांनी विज्ञान आणि गणित या विषयांसाठी सातवीनंतर इंग्रजी मध्यम निवडले. थोरल्या मुलाचा अनुभव सांगतो की जगात वावरताना त्याला भाषेची फार अडचण वाटत नसली तरी त्याचे कारण त्याने पुरेसे वाचलेले आहे , हे आहे …. नव्या जगात संपर्क भाषा म्हणून इंग्रजीच उपयोगात येते ..मात्र मराठी चांगली येते म्हणून इंग्रजीही चांगली येते , हे त्याचे म्हणणे ..

  • Radhakrishna B. Muli ….
   आणखी एक – दोन बाबी….माझी मुलं जालना – औरंगाबादेत स.भु.त शिकली आणि यात काहीही जगावेगळं नाही..पण माझ्या एका मित्राला त्याचे कारण ” आर्थिक ” वाटले तर एका मैत्रिणीने तुझ्या किती मित्रांची मुलं या शाळेत आहेत असा प्रश्न केला…आपण आपल्या सर्वच बाबी जरा वेगळ्याच परिमाणात मोजतो का , असा प्रश्न पडतो. मी औरंगाबादेत सहसा E – square ला सिनेमा पाहतो. ते चांगले आणि सोयीचे थिएटर आहे. परवा एक मित्र म्हणाला अंबा – अप्सराचा जमाना संपलाय …अरे pvr / prozone prefer करत जा….जे महाग ते चांगले असेच आपण मानतो..इंग्रजी शाळांचा दर्जा आणि त्यांच्याकडून आकारली जाणारी फी याची तपासणी कोण करणार ?

 • Nishikant Anant Bhalerao ….
  मराठी एके मराठी मस्तच

 • Narayan Alies Dilip Deodhar ….
  मी मराठी माध्यमातून नागपूर विद्यापीठाचा BA/B.Com पदवीधर आहे. तरीही पुढे काहीही त्रास झाला नाही.

 • Balaji Sutar….
  सांप्रत तणासारख्या माजोर झालेल्या इंग्रजी शाळांच्या फोफावत्या पिकाच्या पार्श्वभूमीवर हा लेख आणि यातलं म्हणणं अत्यंत महत्वाचं आहे. Ravindra Hunnure, हा ब्लॉग वाचा. आपला सकाळचा विषय.

 • Sarang Takalkar ….
  अगदी बरोबर आहे…

 • विजय तरवडे….
  पोस्ट वाचली. पण वरील छायाचित्रातला राजहंसचा शब्दकोश म्हणजे मराठीवर अमानुष अत्याचारच आहे. किमान पन्नास शब्दांचे अर्थ चुकीचे दिले आहेत. यावर मी ‘राजहंस माझा निजला’ या शीर्षकाची पोस्ट देखील लिहिली होती.

  • मला अस्पष्ट आठवते ती पोस्ट ; पुन्हा टाकता आली तर बघा . दुसरा भाग तरी राजहंस कोश पूर्णपणे निरुपयोगी आहे असं नाही . माझ्याकडे बरेच म्हणजे बारापेक्षा जास्त कोश आहेत . त्यापैकी हातात आले ते टाकले . त्यात वाईन आणि बिअरचा एनसायक्लोपिडीआ पण आला चुकून की !

   • विजय तरवडे….
    तीच शोधतोय. पण नाही सापडली तरी माझ्याकडे शब्दकोश आहे आणि त्यात त्या शब्दांवर खुणा केल्यात. तुम्हाला उद्या यादी पाठवतो

 • Vrinda Kulkarni ….
  प्रवीण जी खुप उत्तम! अनेक चाचपडणार्यांना वाट च दाखविली जणू…

 • Anil Paulkar….
  सर, ब्लॉग वाचला…सध्या आमचे असेच ‘ प्रयोग ’ सुरू आहेत…

 • Chandrakant Chaudhari….
  योग्य ,,,,

 • Prashant Jambhule ….
  सर एकदम बरोबर आहे..इंग्रजी बद्द्ल चा गैरसमज दूर होणे गरजेचे आहे…

 • Virag Pachpore

  हे अगदी बरोबर आहे. आम्ही सुद्धा आमच्या राधिकाला मराठी माध्यमाच्या शाळेत घातले तेव्हा अनेक मित्र-नातेवाईक यांनी ‘सुचवून’ पहिले होते तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दे म्हणून. आणि मी इंग्रजी वृत्तपत्रात काम करीत असल्याने तिने मराठी माध्यमाच्या शाळेत जावे हा अनेकांना विरोधाभास वाटत होता. पण माझा आणि माझ्या पत्नीचा अनुभव असाच आहे कि मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्याने मुलांचा व्यवस्थित विकास होतो. आत्मविश्वास वाढतो आणि भाषा देखील सुधारते. आज ती पुण्याच्या गरवारे महाविद्यालयातून एम एस्सी (सूक्ष्मजीवशास्त्र) झाली आहे. ते ही इंग्रजी माध्यमातून. तेव्हा मातृभाषेतून शिक्षण आणि त ही प्राथमिक-माध्यमिक स्तरापर्यंतचे मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे असे माझे ठाम मत आहे. आपले ही तसेच अनुभव वाचले म्हणून हा लेखनप्रपंच.