क्रिकेटचा देव नाही , मातीच्या पायाचा माणूस !

प्रत्येकाला एक भूमिका असली पाहिजे आणि ती भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्यही त्याला असलं पाहिजे . शिवाय आपण जे काही व्यक्त होतो त्या संदर्भात प्रतिवाद करण्याचा अधिकार समोरच्याला असतो , हे मला कायमच मान्य आहे . जात-पात-धर्माच्या पातळीवर आणि शारीरिक व्यंगात्मक नसलेला म्हणजे , सुसंस्कृतपणे केलेला प्रतिवाद किंवा असहमत होणं मी खिलाडूपणे स्वीकारतोच . मात्र , सुसंस्कृतपणाची पातळी सोडून जर कोणी प्रतिवाद करत असेल तर ते मला पूर्णपणे अमान्य असतं .  असो…हे सांगण्याचं कारण रिहाण , ग्रेटा , मिया , मीना हॅरिस यांनी भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात व्यक्त केलेल्या मताच्या संदर्भात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यानं कालपरवा जे काही ट्विट व्यक्त केलंय त्यामुळे हे लेखन-

आमच्या घरी टी.व्ही जेवढा वेळ चालतो त्यातला ७५ टक्के वेळ त्यावर नवे-जुने खेळ असतात .  साधारण २०टक्के वेळ बातम्यां आणि ५ टक्के वेळ मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी असतो . सचिनच्या अगदी पदार्पणापासून त्याचं क्रिकेट  पाहात आलो आहे . अगदीच एखाद-दुसरा अपवाद वगळता त्याची कोणतीही इनिंग्ज मी आजवर चुकवलेली नाही . सुरुवातीच्या काळातला त्याचा खेळ मला खूप आवडत असे . परंतु , हळूहळू जसं जसं बघत गेलो , वाचत गेलो , अनुभवत गेलो तसंतसं सचिन क्रिकेटपटू म्हणून कितीही चांगला असला तरी माणूस म्हणून रद्दड आहे या विषयी मी ठाम होत गेलो . अगदी खरं सांगायचं तर सचिनच्या शेवटच्या कालखंडात तो क्रिकेटपटू म्हणूनही स्वार्थी आहे असं माझं मत होत गेलं . स्वविक्रमासाठी तो रेटून क्रिकेट खेळतो ( म्हणून तो विक्रमादित्य ! ) , तोवरच्या त्याच्या निर्माण झालेल्या प्रतिमेचा दबाव टाकून खेळतच राहतो , असं माझं मत होत गेलं . बहुदा , २०१२ मधली घटना आहे . सचिन तेंडूलकर त्याच्या कसोटी क्रिकेट आणि एक दिवसीय क्रिकेट मधील मिळून शंभराव्या शतकाच्या

उद्योगपती मुकेश अंबानी आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत सचिन . 

प्रतिक्षेत होता आणि क्रिकेटपटू म्हणून ते उत्तुंग यश साजरं करण्यासाठी कसाबसा शब्द तोकडा पडावा इतका वाईट क्रिकेट खेळत होता ; तरी असंख्य चाहते त्याचा खेळ पाहतच होते . सचिनचं ‘ते तसं’ खेळणं बघून त्याची भयंकर किंव यायची . अगदी सुमार गोलंदाजाच्या गोलंदाजीवर सचिन बीट होत असे . तेव्हा “सचिन सदृश्य कोणीतरी खेळाडू कसंबसं क्रिकेट खेळतो आहे . त्याला चेंडू नीट दिसत नाही म्हणून त्यानं चष्मा लावून खेळावं म्हणजे त्याला चेंडू नीट दिसेल अन तो नीट खेळेल कारण त्याची चाळिशी आता जवळ आली आहे” , अशी एक पोस्ट मी फेसबुकवर टाकली . त्या पोस्टवर एबीपी माझानं एक चर्चाही घडवून आणली होती . त्यात सचिनचा भक्त असलेल्या एका क्रिकेट समीक्षकानी सचिनच्या त्या क्रिकेट खेळण्याचं जोरदार समर्थन केलं होतं आणि अतिशय स्वाभाविकपणे माझ्या कमेंटवर टीकाही केली होती . पण , ते असो … कारण मी व्यक्त केलेल्या मताशी सगळ्यांनी सहमत असलंच पाहिजे असं नसतं . पण सचिनचं ते क्रिकेट खेळणं बघून जीव गलबलून जायचा हे खरं होतं .

अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं शंभराव शतक सचिननं बांगला देश विरुद्ध पूर्ण केलं . ती त्याची खेळी आठवून बघा . त्याचं ते खेळणं नव्हतं तर कण्हणं होतं , कुंथणं होतं . अखेर त्यानं शतक पूर्ण केलं आणि ते यशाचं उत्तुंग शिखर गाठलंही ; परंतु त्या सामन्यात बांगला देश विरुद्ध भारत कधी नव्हे तो  हरला , हे अतिशय वाईट होतं . सचिन विक्रमासाठी खेळतो , क्रिकेटसाठी क्रिकेट खेळत नाही किंवा देशासाठी क्रिकेट खेळत नाही  या तोवरच्या हळूहळू पसरत चाललेल्या समजला पुष्टी देणारी त्याची ती खेळी होती . महत्वाचं म्हणजे ‘आपल्या विक्रमी शतकापेक्षा भारताचा विजय महत्वाचा होता…’ अशी तोंडदेखली खंतही सचिननं तेव्हा व्यक्त केली नाही . तो सामना हरल्यावर त्या  क्रिकेट समीक्षकाला एक अतिशय खवचट असा मेसेज पाठवला होता . अर्थात त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही तो भाग वेगळा .

आणखी एक प्रसंग सांगतो . सचिन निवृत्त झाला पण , त्याच्या तोवरच्या प्रतिमेला साजेसा शेवटचा सामना झाला नाही , हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे . त्याचा शेवटचा सामना कसोटी दर्जा दुय्यम असणार्‍या वेस्ट इंडिज विरुद्ध मुंबईत झाला . खरं तर , तो कसोटी क्रिकेट सामना न राहता सचिन उदोउदो कार्यक्रम झाला . त्या कसोटी सामन्यात सचिननं कसंबसं अर्धशतक गाठलं आणि क्रिकेट जगताचा निरोप घेतला .  त्याच्या कौतुकाच्या स्वाभाविक अहमहमिकेच्या धावांचा हिमालय तेव्हा उभा केला गेला  . लगेच त्या सामन्यानंतर सचिनला भारतरत्नही मिळालं आणि राज्यसभेचं सदस्यत्वही त्याला बहाल करण्यात आलं . सचिनचा असा बहुमान होण्याबद्दल मुळीच तक्रार नाही पण , सचिन त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘क्रिकेटसाठी क्रिकेट’ खेळला आणि नंतर विक्रमासाठी खेळला असं माझं जे मत होतं गेलं त्यावर या दोन घटनांमुळे शिक्कामोर्तब झालं . तरी सचिनविषयी तसं काही माझं वाईट मत नव्हतं .

दरम्यान एक फारच विचित्र घटना घडली . आपल्या सगळ्यांना माहीत आहे की , सचिनचे वडील एक कसदार कवी होते . रमेश तेंडूलकर हे त्यांचं नाव . त्यांच्या कविता प्रकाशित करण्यासाठी सचिन तेंडूलकरनी चक्क पुण्याचा एक प्रायोजक गाठला आणि त्या प्रायोजकत्वाच्या बदल्यात त्याने पुण्यात एक बंगलाही पदरात पाडून घेतला , हे जेव्हा समजलं तेव्हा मला सचिनची पितृभक्ती ही किती कचकड्याची आहे याची जाणीव झाली . सचिननं त्याच्या वडिलांच्या पुस्तकासाठी प्रायोजकत्व मिळवलं तेव्हा जी काही आकडेवारी प्रकाशित झालेली होती त्याप्रमाणे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या खालोखाल सचिनची मालमत्ता होती आणि तेव्हा अमिताभ यांची मालमत्ता दोन हजार कोटी रुपये होती अशा वार्ता प्रकाशित झाल्या होत्या आणि त्या खालोखाल सचिनचं नाव अठराशे कोटींवर होतं . त्यातले पांच-दहा लाख म्हणजे कीस झाड की पत्तीही नव्हते ! तरी वडिलांचा एक कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठीसुद्धा प्रायोजक शोधण्याइतका हा माणूस कंजूष ( Miser ) आणि लोभी ( Lobated ) आहे  हे आजवर कधीच स्वीकारता आलेलं नाही . पितृभक्तीचं हे उदाहरण आदर्श असूच शकत नाही .

सचिन – सत्य साईबाबांच्या चरणी

सचिन त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या उतारावर असताना परंतु , प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्याच्या क्रिकेटमधील यशाचं सर्व श्रेय त्यानी सत्य साईबाबांना दिलं होतं हा तर भंपकपणाचा कळस आणि क्रिकेटचा अपमान होता . ‘माझ्या क्रिकेट किटमध्ये सत्य साईबाबांचा फोटो लावलेला असतो आणि त्याला नमस्कार करुनच मी फलंदाजीसाठी उतरतो’, असं काहीसं विधान त्यानी त्यावेळी केलेलं होतं .  सचिन वैयक्तिक पातळीवर  श्रद्धावान असला तरी त्यानी त्याच्या त्या श्रद्धेचं हे असं जाहीर प्रदर्शन मुळीच समर्थनीय  नव्हतं . कोणी कुणाच्या कृपेनी मोठा होत नसतो तर  तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो , त्याच्या मनगटावर मोठा होत असतो . अशावेळी ‘माझी क्रिकेट  कारकीर्द कुणातरी बाबा महाराजाच्या कृपेमुळे फुलली’, हा जो काही संदेश सचिननं त्यावेळेस दिला ते  अतिशय खटकणारं , अतिशय वाईट होतं . मी दैववादी , नियतीवादी नाही . ललाट , भागध्येय , तळहातावरच्या रेषा वगैरेवर इतर अनेकांप्रमाणे  माझाही  विश्वास नाही पण , कुणी तसा असण्यास विरोध नाही ; विरोध आहे तो त्याचं जाहीर प्रदर्शन करण्यास . सचिननं जे क्रिकेटपटू त्याला आदर्श मानतात , देव मानतात त्यांना ‘बुवावादी’ होण्याचा जो काही चुकीचा संदेश दिला तो विवेकवादी विचाराच्या कुणालाही पटणारा नव्हता , हेही तेवढंच खरं .

सचिनला भारतरत्न जाहीर झालं आणि तो राज्यसभेचा सदस्य झाला . त्या काळात मी दिल्लीतच होतो . खासदाराला मिळालेला बंगला त्यानं घेतला नाही . तो स्वखर्चानं दिल्लीत राहिला आणि जी काही राज्यसभेत हजेरी लावायची होती ती लावली .  मात्र त्याही काळात सचिननं देशातल्या क्रीडाविश्वासाठी फार काही मोलाची कामगिरी बजावली असं काही दिसून आलं नाही . खासदार निधीतून त्यानं कांही  खेड्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला हे खरं आहे पण , त्या गावांचा जो काही कायापालट झाला त्यापेक्षा त्याच्या कैकपट जास्त प्रसिद्धी सचिननी मिळवली . ‘भारतरत्न’ मिळाल्यानंतरही सचिनला जाहिराती करण्याचा मोह आवरता आला नाही , हे तर अतिशय उद्वेगजनक होतं . खरं तो ‘भारतरत्न‘ या सन्मानाचा अवमानच होता . सचिनकडे बहुसंख्य बघण्याचं समाजमन तेव्हा देवत्वाचं होतं . ‘सचिन इज ए गॉड ऑफ क्रिकेट ‘ असं तेव्हा लिहिलं , बोललं जायचं . मला मात्र ‘ ही इज ए नेव्हर गॉड ऑफ क्रिकेट ’ असंच कायम वाटत असे . देवावर विश्वास नसला तरी क्रिकेटचा देव जो कोणी असेल तो ड्रॉन बॅडमन आहे असं जे माझं मत होतं , ते सचिनच्या या अशा वागण्यामुळे अधिकाधिक पक्कं होत गेलं हेही सांगितलं पाहिजे .

याचा अर्थ सचिनला  काही भूमिका असू नयेत असं आहे का ? तर नाही तसं मुळीच नाही . तरी , सचिन कधीच या देशातल्या सर्वसामान्य , दीनदलित , रस्त्यावरच्या माणसाच्या मदतीला म्हणून धावून गेल्याचं दिसलं नाही . त्यानी काही देणग्या दिल्या असतील . समाजातल्या एखाद्या किंवा काही एखाद्या किंवा जास्त वंचित गटासाठी साह्य केलंही असेल/केलं आहे , हेही मला माहिती आहे. परंतु , सचिनचं हे सगळं करणं हे एखाद्या पंचतारांकित एनजीओपेक्षा फार काही वेगळं नव्हतं . क्रिकेट खेळत असताना आणि क्रिकेट खेळणं संपल्यावरही आपल्या देशातले  एका बडे उद्योगपती , म्हणजे अंबानींच्या दरबारातच सचिन कायम पहुडलेला आहे . आयपीएल नावाचा जो काही क्रिकेटचा धंदा उभा राहिला त्यातही तो अंबानीच्या बाजूनी मार्केटिंग करण्यामध्ये आघाडीवर राहिला . अंबानींच्या अनेक उपक्रमामध्ये त्याचा असणारा सहभाग हा  त्याच्या कथित देवत्वाच्या प्रतिमेला तडा देणारा ठरलेला होता तरी त्याबद्दल फक्त कुजबूज झाली .

आता सचिनला त्याच्या ट्विटवरुन समाज माध्यमांवरून जोरदार ट्रोल करण्यात आलेलं आहे  . सचिननं ही जी काही प्रतिक्रिया व्यक्त केली ती प्रतिक्रिया त्याची स्वत:ची असती , ती सच्ची असती तर त्याबद्दलही दुमत असण्याचं काही कारण नव्हतं . मात्र , जे काही सगळं घडलं ते काही कुणीतरी प्रॉम्ट केल्याशिवाय घडलं नाही , असं म्हणण्यास वाव आहे . एकाच पद्धतीचं ट्विट लता मंगेशकर , सचिन तेंडुलकर , विराट कोहली , सुनील शेट्टी , सायना नेहवाल अशा असंख्य नामवंतांनी करावं , हा काही योगायोग असं म्हणता येणार नाही . कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूनी उभं राहावं असं सचिन तेंडुलकरला कधी वाटलं नाही . बॅट आणि चेंडू उकडून पोट भारत नाही तर त्यासाठी या भूमीपुत्रांनी घाम आणि रक्त गाळून काढलेलं पीक अन्न  म्हणून लागतं , याचा विसरा सचिनला पडला .  सरकारच्या बाजूने देशभक्तीचे उमाळे काढण्यापेक्षा अन्नदात्यांशी  सरकारने बोलावं , अशीच रास्त  भूमिका सचिननं घ्यायला हवी होती . कोरोनाच्या काळात टाळेबंदी जाहीर झाल्यावर टाचा घासत , रक्ताळावत गावाकडे परतणाऱ्या लोकांच्या मदतीला द्धावू जाणं तर लांबच राहिलं पण . आपुलकीचं एखादं ट्विट करावसं वाटलं नाही आणि विद्यमान सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला पाठिंबा देणारं ट्विट सचिनला करावसं वाटावं हे काही पटणारं नाही .  सचिन क्रिकेटपटू म्हणून देव कधीच नव्हता . माणूस म्हणूनही त्याचे पाय मातीचे आहे . वृत्तीने तो लोभी आहे , या आजवरच्या समजावर शिक्कामोर्तब करणारं सचिनचं हे ट्विट आहे , याबद्दल कोणतीही शंका असण्याचं कारणच नाही .

मुद्दा शेतकऱ्याच्या आंदोलनात कितपत तथ्य आहे याचा असला तरी आणि त्यात सरकारचीही एक निश्चित बाजू असली तरी ; भारतातल्या एका मोठ्या गटाला ( त्यात अस्मादिकही आहेत ) असं वाटतं की , शेतकऱ्यांची बाजू ग्राह्य आहे आणि  ती सरकारनं समजून घ्यायला पाहिजे . सरकारच्या भूमिकेचं समर्थन करुनही सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांची जी काही अक्षम्य उपेक्षा केली , त्यांना दहशतवादी , देशाचा शत्रू ठरवण्याचा जो काही प्रयत्न केला ते एक संवेदनशील माणूस म्हणून कधीही मान्य होणारं नाहीये , उलट ही कोंडी फोडण्यासाठी सरकारनं नमतं घ्यायला हवं ,  अशी भूमिका सचिनला घेता आली असती . पण , अशी संवेदनशीलता सचिन दाखवू शकला नाही .

खेळाडू , लेखक , कलावंतांनी नेहमीच समाजाच्या बाजूनं उभं राहिला पाहिजे , सत्ताधाऱ्यांच्या नाही . तसं उभं राहण्यात सचिन पूर्णपणे अयशस्वी ठरला . सचिनला आता मिळवायचं काहीच नाहीये आणि खरं सांगायचं तर , गमवायचंही काहीचं नाहीये  . अन्नेकांना मान्य असो अथवा नसो , एके काळी सचिन  देव म्हणून गणला गेला ; लोकांच्या गळ्यातला ताईत बनला . परंतु ते देवत्व त्याला पेलवलं नाही , ही वस्तुस्थिती आहे . त्या प्रतिमेला सचिननं स्वत;च  तडा दिलेला आहे . भारतरत्न आणि राज्यसभेचं सदस्यत्व मिळवण्यासाठी तो काँग्रेसच्या चरणी लीन आणि आता तो भाजपाच्या चरणी लीन झाला . उद्या अन्य पक्षाचं सरकार आलं तर त्याही सरकारच्या चरणी लीन होण्यास सचिन मागेपुढे पाहणार नाही . सचिनचं हे असं मातीच्या पायाचं असणं हे त्याच्या चाहत्यांनी समजून घेतलं पाहिजे . माणसांत देव नसतो . सचिन तर देव कधीच नव्हता त्याचे पाय मातीचेच आहेत , याचं भान आता तरी त्याच्या चाहत्यांना यावं .

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट